Back to Course

सत्यशोधक समाज

स्थापना

महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. सर्वानुमते जोतीराव फुले अध्यक्ष व कोषाध्यक्ष तर श्री. नारायण गोविंदराव कडलक यांची कार्यवाह म्हणून निवड झाली.

सत्यशोधक समाजाची तत्त्वे
 • ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार आहे.
 • सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
 • सर्व शक्तिमान अशा परमेश्वराची भक्ति किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे.
 • परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही; म्हणून कोणत्याही व्यक्तिला पुरोहित किंवा धर्मगुरु यांच्या मध्यस्थीशिवाय आपल्या प्रिय परमेश्वराची उपासना किंवा भक्ती करता येते.
 • मानवाला जातीने नव्हे तर गुणाने श्रेष्ठत्त्व प्राप्त होते.
 • पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. तसेच त्या कनिष्ठ वर्गाच्या पिळवणूकीचे कारण आहेत.
 • कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केली आहे.

सत्यशोधक समाजाचे बोधवाक्य –

“सर्वसाक्षी जगत्पती। त्यासी नकोच मध्यस्थी।।
सभासदाने घ्यावयाची शपथ

“सर्व मानवप्राणी एकाच देवाची लेकरे आहेत; अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती अगर ध्यानसाधना करतेवेळी अगर धार्मिक विधीच्यावेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही. दुसऱ्यांनाही तसेच वागण्याबद्दल मी उपदेश करीन. सत्यरुपी परमेश्वरास साक्ष ठेवून मी ही प्रतिज्ञा करीत आहे. या प्रतिज्ञेप्रमाणे वागण्यास मला सामर्थ्य येईल, अशा प्रकारे आयुष्यक्रम गुजारण्यास योग्य प्रकारे तो मला मदत करो.”

सत्यशोधक समाजाचे कार्य
 • ज्या गावी सत्यशोधक समाजाच्या शाखा सुरु करण्यात आल्या होत्या त्या गावात दर आठवड्यातून एकदा सभा घेतल्या जात असत. त्यामध्ये कनिष्ठ जातीच्या लोकांत शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, सर्व प्रकारचे धार्मिक विधी भटभिक्षकांच्या पौरोहित्याशिवाय पार पाडणे, बहुजन समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष, भूतपिशाच्च, जादूटोणा या सारख्या गोष्टींच्या भितीपासून मुक्त करणे इत्यादी बाबींना चालना देण्याविषयी चर्चा होत असे.
 • सत्यशोधक समाजाचा शिक्षणावर अधिक भर दिला होता.
 • सत्यशोधक समाजाने ब्राम्हण-पुरोहिताशिवाय विवाह लावण्याचा उपक्रम सुरु केला. काही सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलामुलींचे आणि नातेवाईकांचे विवाह ब्राह्मण-पुरोहिताशिवाय लावून दिले. ही त्या काळातील अत्यंत क्रांतीकारक अशी घटना होती.
 • सन १८७७ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला असताना; दुष्काळ पीडितांच्या मुलांची सोय करण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या वतीने एक बालाश्रम उघडला होता.
 • पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सावकार व जमीनदार यांच्याकडून होत असलेली जुलूम जबरदस्ती व पिळवणूक या विरुद्ध चळवळ सुरु केली. शेतकऱ्यांच्या या चळवळीचे नेतृत्त्व महात्मा फुल्यांनी केले.
 • इंग्लंडच्या महाराणीचे चिरंजीव व ‘ड्यूक ऑफ कनॉट‘ यांच्या भारतभेटीच्या वेळी मा. फुले शेतकऱ्यांच्या वेशात म्हणजे, डोक्यास मुंडासे, साधा अंगरखा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व पायात फाटक्या वहाणा घालून भेटीला गेले व तेथे त्यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून निर्भिडपणे सांगितले, “येथील जनतेचे आपणास हित करावयाचे असेल तर त्यांचे अज्ञान घालवा. त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा.”
 • सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते नारायण लोखंडे यांनी मा. फुले व सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेने मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हॅड असोसिएशन सोसायटी” नावाची संघटना स्थापन करून कामगारांचे प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register