Back to Course

संधी

संधी म्हणजे सांधणे, जोडणे. जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण निर्माण होतो. वर्णांच्या अशा एकञ येण्याला संधी असे म्हणतात. 

संधीचे मुख्य तीन प्रकार केले जातात.

 1. स्वर संधी
 2. व्यंजन संधी
 3. विसर्ग संधी

अ. स्वर संधी

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे स्वरांनी जोडले असतील तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. स्वर+स्वर अशी त्यांची रचना असते. उदा.

सूर्य+अस्त= (अ+अ)= सूर्यास्त

 • सजातीय स्वर संधी – -हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर  -हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर होतो. याला सजातीय स्वर संधी असे म्हणतात. उदा.
एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
अ+अ=आ सूर्य+अस्त  सूर्यास्त
अ+आ=आ देव+आलय देवालय
आ+अ=आ विद्या+अर्थी विद्यार्थी
 आ+आ=आ महिला+आश्रम महिलाश्रम
 इ+इ=ई मुनि+इच्छा मुनीच्छा
इ+ई=ई गिरि+ईश गिरीश
 ई+ई=ई मही+ईश महीश
उ+उ=ऊ गुरु+उपदेश गुरूपदेश
ऊ+उ=ऊ भू+उद्धार भूद्धार

 

 • गुणादेश स्वर संधी –
 1. अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहोऐवजी ए येतो.
 2. अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा ऊ आल्यास त्या दोहोऐवजी ओ येतो.
 3. तसेच अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोऐवजी अर् येतो.
एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
अ+इ=ए मनुष्य+इतर मनुष्येतर
अ+ई=ए राम+ईश्वर रामेश्वर
आ+इ=ए ज्ञान+इश्वर ज्ञानेश्वर
आ+ई=ए लंका+ईश्वर लंकेश्वर
अ+उ=ओ पर+उपकार परोपकार
अ+ऊ=ओ जल+ऊर्मी जलोर्मी
आ+उ=ओ धारा+उष्ण धारोष्ण
आ+ऊ=ओ गंगा+ऊर्मी गंगोर्मी
अ+ऋ=अर् सप्त+ऋषी सप्तर्षी
आ+ऋ=अर् राजा+ऋषी राजर्षी

 

 • वृद्ध्यादेश स्वर संधी –
 1. अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोऐवजी ऐ येतो.
 2. अ किंवा आ यांच्यापुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोऐवजी औ येतो. याला वृद्ध्यादेश असे म्हणतात.
एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
अ+ए=ऐ क्षण+उक क्षणैक
आ+ए=ऐ सदा+एव सदैव
अ+ऐ=ऐ जन+ऐक्य जनैक्य
आ+ऐ=ऐ विद्या+ऐश्वर्य विद्येश्वर्य
अ+ओ=औ जल+ओघ जलौघ
आ+ओ=औ यमुना+ओघ यमुनौघ
अ+औ=औ वन+औषधी वनौषधी
आ+औ=औ क्षमा+औचित्य क्षमौचित्य

 

 • यणादेश स्वर संधी –

इ, उ व ऋ (-हस्व किंवा दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास-

 1. इ, ई बद्दल य हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
 2. उ, ऊ बद्दल व हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. आणि
 3. ऋ बद्दल र हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
इ+अ=य्+अ=य प्रति+अंतर प्रत्यंतर
इ+आ=य्+आ=या वि+आसंग व्यासंग
इ+उ=य्+उ=यु अति+उत्तम अत्युत्तम
ई+उ=य्+उ=यु नदी+उगम नद्युगम
इ+ए=य्+ए=ये प्रति+एक प्रत्येक
ई+ए=य्+ए=ये किती+एक कित्येक
उ+अ=व्+अ=व मनु+अंतर मन्वतंर
उ+आ=व्+आ=वा सु+आगत स्वागत
ऊ+ई=व्+ई=वी भानू+ईश्वर भान्वीश्वर
ऋ+आ=र्+आ=रा पितृ+आज्ञा पिञाज्ञा
ऋ+आ=र्+औ=रौ पितृ+औदार्य पिञौदार्य

 

 • उर्वरीत स्वर संधी –

ए, ऐ, ओ ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तरी त्याबद्दल अनुक्रमे अय, आय, अवी, आवि असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.

एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
ए+अ=अय्+अ=अय ने+अन नयन
ऐ+अ=आय्+अ=आय गै+अन गायन
ओ+ई=अव्+ई=अवी गो+ईश्वर गवीश्वर
औ+इ=आव्+इ=आवि नौ+इक नाविक
 ओ+अ=अव्+अ=अव पो+अन पवन
औ+अ=आव्+अ=आव पौ+अन पावन

 

ब. व्यंजन संधी

जोडाक्षर तयार होताना  जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. व्यंजन+व्यंजन किंवा व्यंजन+स्वर असे त्याचे स्वरूप असते.

 • प्रथम व्यंजन संधी –

पहिल्या पाच वर्णांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
विपद्+काल द्+क्=त्+क्=त्क्  द् चा त् विपत्काल
वाग्+पति ग्+प्=क्+प्=क्प् ग् चा क् वाक्पति
वाग्+ताडन ग्+त्=क्+त्=क्त् ग् चा क् वाक्ताडन
षड्+शास्ञ ड्+श्=ट्+श्=ट्श  ड् चा ट् षट्शास्ञ
क्षुध+पिपासा ध्+प्=त्+प्=त्प् ध् चा त् क्षुत्पिपासा
आपद्+काल द्+क्=त्+क्=त्क् द् चा त्  आपत्काल
शरद्+काल द्+क्=त्+क्=त्क् द् चा त्  शरत्काल
क्षुद्+पीडा द्+प्=त्+प्=त्प् द् चा त्  क्षुत्पीडा

 

 • तृतीय व्यंजन संधी –

पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. याला तृतिय व्यंजन संधी म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
वाक्+विहार क्+व्=ग्+व्=ग्व क् चा ग् वाग्विहार
षट्+रिपू ट्+र्=ड्+र्=ड्र ट् चा ड् षड्रिपू
सत्+आचार त्+आ=द्+आ=दा त् चा द् सदाचार
उत्+गम त्+ग्=द्+ग्=द्ग त् चा द् उद्गम
उत्+ध्वस्त त्+ध्=द्+ध्=द्ध त् चा द् उद्ध्वस्त
सच्चित+आनंद त्+आ=द्+आ=दा त् चा द् सच्चिदानंद
सत्+वासना त्+व=द्+व=द्व त् चा द् सद्वासना
विद्युत+दीप त्+द्=द्+द्=द्द त् चा द् विद्युद्दीप
भगवत्+भक्ती त्+भ=द्+भ्=द्भ त् चा द् भगवद्भक्ती
अच्+आदी च्+आ=ज+आ=जा च् चा ज् अजादी
अप्+ज प्+ज्=ब्+ज=ब्ज प् चा ब् अब्ज
जगत्+ईश्वर त्+ई=द्+ई=दी त् चा द् जगदीश्वर
षट्+आनन ट्+आ=ड्+आ=डा ट् चा ड् षडानन
सत्+भावना त्+भ्=द्+भ्=द्भ त् चा द् सद्भावना
दिक्+विजय क्+व्=ग्+व्=ग्व क् चा ग् दिग्विजय
भगवत्+गीता त्+ग्=द्+ग्=द्ग त् चा द् भगवद्गीता
दिक्+अंबर क्+अ=ग्+अ=ग क् चा ग् दिगंबर
दिक्+जह क्+अ=ग्+ग्=ग्ग क् चा ग् दिग्गज
दिक्+अन्त क्+अ=ग्+अ=ग क् चा ग् दिगन्त

 

 • अनुनासिक संधी –

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो, याला अनुनासिक संधी म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
षट्+मास ट्+म्=ण्+म्=ण्म  ट् चा ण् षण्मास
जगत्+नाथ त्+न्=न्+न्=न्न त् चा न् जगन्नाथ
सत्+मती त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् सन्मती
चित्+मय त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् चिन्मय
मत्+माता त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् मन्माता
तत्+मय त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् तन्मय
सत्+मार्ग त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् सन्मार्ग
भगवत्+नाम त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् भगवन्नाम
षट्+मुख ट्+म्=ण+म्=ण्म  ट् चा ण् षण्मुख
वाक्+मय क्+म्=ङ+म्=ङम् क् चा ङ वाङमय
जगत्+नियंता त्+न्=न्+न्=न्न त् चा न् जगन्नियंता
वाक्+निरस क्+न्=ङ+न्=ङन् क् चा ङ वाङनिरस
वाक्+निश्चय क्+न्=ङ+न्=ङन् क् चा ङ वाङनिश्चय
दिक्+मूढ क्+म्=ङ+म्=ङम् क् चा ङ  दिङ्मूढ

 

‘त’ व्यंजन संधी

त या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त बद्दल च् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
सत्+चरिञ त्+च्=च्+च्=च्च त् चा च् सच्चरिञ
तत्+छञ त्+छ=च्+छ=च्छ त् चा च् तच्छञ
उत्+छेद त्+छ=च्+छ=च्छ त् चा च् उच्छेद

 

त या व्यंजनापुढे ज् , झ् आल्यास त बद्दल ज् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
उत्+ज्वल त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् उज्ज्वल
सत्+जन त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् सज्जन
जगत्+जीवन त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् जगज्जीवन
यावत्+जीवन त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् यावज्जीवन
शरत्+झंझावत त्+झ=ज्+झ्=ज्झ् त् चा ज् शरज्झंझावत

 

त या व्यंजनापुढे ट् , ठ् आल्यास त बद्दल ट् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
तत्+टीका त्+ट्=ट्+ट्=ट्ट त् चा ट् तट्टीका

 

त या व्यंजनापुढे ल् आल्यास त बद्दल ल्  होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
उत्+लंघन त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् उल्लंघन
उत्+लेख त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् उल्लेख
तत्+लीन त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् तल्लीन
विद्युत्+लता त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् विद्युल्लता

 

त या व्यंजनापुढे श् आल्यास त बद्दल च् होतो व श बद्दल छ् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण संधी
सत्+शिष्य त्+श्=च्+छ=च्छ सच्छिष्य
सत्+शील त्+श्=च्+छ=च्छ सच्छिल
मृत्+शकटीक त्+श्=च्+छ=च्छ मृच्छकटिक
उत्+शिष्ट त्+श्=च्+छ=च्छ उच्छिष्ट

 

‘म’ पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘म्’ मध्ये मिसळून जातो. व्यंजन आल्यास ‘म्’ बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो. उदा.

 1. सम+आचार=समाचार
 2. सम्+गती= संगती
 3. सम्+कल्प=संकल्प
 4. सम्+बंध=संबंध
 5. किम्+कर=किंकर

‘छ्’ पूर्वी -हस्व स्वर आल्यास त्या दोहोंमध्ये ‘च्’ हा वर्ण येतो. उदा.

 1. रत्न+छाया=रत्नच्छाया
 2. शब्द+छल=शब्दच्छल

क. विसर्ग संधी

विसर्ग हे स्वरादी आहेत. विसर्ग हे कोणत्यातरी स्वरांनंतर येतात. विसर्गसंधी मध्ये एकञ येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेंव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.

 • विसर्ग-उकार संधी

विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो.

यशः+धन=यशोधन मनः+रंजन=मनोरंजन
तेजः+निधी=तेजोनिधी रजः+गुण=रजोगुण
मनः+राज्य=मनोराज्य मनः+वृत्ती=मनोवृत्ती
मनः+बल=मनोबल अधः+वदन=अधोवदन
मनः+रथ=मनोरथ तपः+बल=तपोबल

 

 • विसर्ग-र्-संधी

विसर्गाच्या मागे अ, आ शिवाय कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होऊन संधी होतो. याला विसर्ग-र्-संधी असे म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण संधी
निः+अंतर नि+र्+अंतर निरंतर
बहिः+अंग बहि+र्+अंग बहिरंग
निः+विकार नि+र्+विकार निर्विकार
निः+इच्छा नि+र्+इच्छा निरिच्छा
दुः+दैव दु+र्+दैव दुर्दैव
दुः+वासना दु+र्+वासना दुर्वासना
दुः+गती दु+र्+गती दुर्गती
धनुः+वात धनु+र्+वात धनुर्वात
दुः+जन दु+र्+जन दुर्जन
दुः+आत्मा दु+र्+आत्मा दुरात्मा
धनुः+विद्या धनु+र्+विद्या धनुर्विद्या
निः+लोभ नि++र्+लोभ निर्लोभ
निः+उद्योग नि+र्+उद्योग निरूद्योग
आशीः+वचन आशी+र्+वचन आशीर्वचन
आयुः+वेद आयु+र्+वेद  आयुर्वेद

 

 • पदाच्या शेवटी ‘स’ येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘स्’ चा विसर्ग होतो. उदा. मनस्+पटल=मनःपटल
 • पदाच्या शेवटी ‘र्’ येऊन त्याच्या पुढे कोणतेही कठोर व्यंजन आल्यास त्या ‘र्’ चा विसर्ग होतो. उदा. चतुर्+सूञी=चतुःसूञी
 • विसर्गाच्या ऐवजी येणार्या र् च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो ‘र्’ तसाच राहून संधी होतो. उदा.
 1. अंतर्+गत=अंतर्गत
 2. पुनर्+जन्म=पुनर्जन्म
 3. अंतर्+आत्मा=अंतरात्मा
 4. पुनर्+उक्ती=पुनरूक्ती
 • विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क् , ख् , प् , फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. माञ पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो. उदा.
 1. रजः+कण=रजःकण
 2. अधः+पात=अधःपात
 3. इतः+उत्तर=इतउत्तर
 4. प्रातः+काल=प्रातःकाल
 5. तेजः+पुंज=तेजःपुंज
 • विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क् , ख् , प् , फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो. उदा.
 1. दुः+परिणाम=दुष्परिणाम
 2. दुः+कृत्य=दुष्कृत्य
 3. निः+पाप=निष्पाप
 4. निः+कारण=निष्कारण
 • विसर्गाच्या पुढे च् , छ् आल्यास विसर्गाचा श् होतो आणि त् , थ् आल्यास विसर्गाचा स् होतो. उदा.
 1. मनः+ताप=मनस्ताप
 2. निः+तेज=निस्तेज
 3. दुः+चिन्ह=दुश्चिन्ह
 4. निः+चल=निश्चल
 • विसर्गाच्या पुढे श् , स् आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप पावतो. उदा.
 1. निः+संदेह=निःसंदेह
 2. चतुः+शृंगी=चतुःश्रृंगी
 3. दुः+शासन=दुःशासन

मराठीतील विशेष संधी

 • पूर्वरूप संधी – कधी कधी दोन स्वर एकपुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर (पूर्व स्वर) न बदलता तसाच राहतो व दूसरा स्वर लोप पावतो. उदा.
 1. लाडू+आत=लाडूत
 2. चांगले+असे=चांगलेसे
 3. नदी+आत=नदीत
 4. साजे+असा=साजेसा
 • पररूप संधी – कधी कधी संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दूसरा स्वर (पर स्वर) कायम राहून संधी होतो. उदा.
 1. हर+एक=हरेक
 2. भरड+ऊन=भरडून
 3. चिंधी+ओटी=चिंधोटी
 4. घर+ई=घरी
 • दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी सामान्यतः संधी होत नाही. उदा.
 1. जा+ऊन=जाऊन
 2. हो+ऊ=होऊ
 3. घे+ईल=घेईल
 • ‘ही’ या शब्दयोगी अव्ययाचा संख्याविशेषणाशी दोन प्रकारे संधी होतो. उदा.
 1. दोन+ही=दोन्ही/दोनी
 2. तीन+ही=तिन्ही/तिनी
 3. चार+ही=चार्ही/चारी
 • अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो. उदा.
 1. गरज+अनुसार=गरजेनुसार
 2. विषय+अनुरूप=विषयानुरूप
 3. पद्धत+अनुसार=पद्धतीनुसार
 • बोली भाषेतील संधी – बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकांत मिसळून नवी रुपे तयार होतात. उदा.
 1. येतो+आहे=येतोहे/येतोय
 2. बसला+आहात=बसलाआहात/बसलात
 3. गेली+आहे=गेलीहे/गेलीय
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register