Back to Course

ब्राह्मो समाज

ब्राह्मो समाज
 • राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना २० ऑगस्ट, १८२८ रोजी केली.
 • रॉय यांनी आपल्या विचारांच्या प्रसारार्थ इ. स. १८१५ साली ‘आत्मीय सभा’ तर सन १८२२ मध्ये ‘युनिटेरियन कमिटी’ स्थापन केली. २० ऑगस्ट, १८२८ रोजी कलकत्ता येथे ब्राह्मो समाज स्थापन केला.
 • तसेच राजा राममोहन रॉय यांनी स्त्री-पुरुष समतेची कल्पना मांडून सती प्रथा, केशवपन या चालीरीतींना विरोध करण्यासाठी आंदोलने केली. परिणामी तत्कालिन गव्हर्नर जनरल विल्यम्‌ बेटिंग यांनी ४ डिसेंबर, १८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा पास केला.
ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे
 • हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.
 • समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.
 • ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.
 • हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.
ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान
 • एकेश्वरवाद : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.
 • मूर्तीपूजेस विरोध : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.
 • बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.
 • अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.
 • आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.
 • सर्व धर्मातील ऐक्य : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.
 • विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.
 • प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.
ब्राह्मो समाजाची वाटचाल

संवाद कौमुदी’ हे नियतकालिक सुरू करून ब्राह्मो समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. राजा राममोहन रॉय यांनी एकेेश्वरवादाच्या प्रसारार्थ अनेक ग्रंथ प्रकाशित केले. त्यांनी धर्म आणि समाज सुधारणा चळवळ सुरू केली. इ. स. १८३३ मध्ये राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू झाला.

देवेद्रनाथ टागोरांचे कार्य

राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाजाला नवचैतन्य देण्याचे कार्य देवेंद्रनाथ टागोरांनी केले. त्यांनी ब्राह्मो समाजात १८३८ मध्ये प्रवेश केला. इ. स. १८३८ साली त्यांनी ‘तत्त्वबोंधिनी सभा’ स्थापन केली.

केशवचंद्र सेन

केशवचंद्र सेन यांच्या कार्यपद्धतीमुळे ब्राह्मो समाजास नवी दिशा मिळाली. त्यांनी ब्राह्मो समाजाचा प्रसार उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास प्रांतात केला. केशवचंद्रांनी आंतरजातीय व विधवा विवाहाचा पुरस्कार केला.

ब्राह्मो समाजात फूट
 • देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी ‘भारतीय ब्राह्मो समाज’ स्थापन करुन समाज कार्य सुरू केले.
 • देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज ‘आदि ब्राह्मो समाज’ या नावाने कार्य करू लागला.
 • इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण भारतीय ब्राह्मो समाजातून बाहेर पडले व त्यांनी १८७८ मध्ये ‘साधारण ब्राह्मो समाज’ स्थापना केला.

‘First Voice Of Freedom’ या शब्दांत डॉ. शिशिरकुमार मित्र यांनी ब्राह्मो समाजाच्या कार्याचे कौतुक केले आहे.

SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register