समाजसुधारक :: Current Affairs

महादेव गोविंद रानडे

महादेव गोविंद रानडे हे (१८ जानेवारी १८४२ – १६ जानेवारी १९०१) भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थसास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष होते. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. त्यांचे मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. तर माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले.  इ. स. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी. ए. परीक्षा दिली. १८६४ साली एम्. ए. ची परीक्षा दिली व १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

शासकीय सेवा

. स. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली.  १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी अ‍ॅडव्होकेटची परीक्षा दिली.

न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ साली रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते.

विवाह

न्यायमूर्ती रानडे यांचे दोन विवाह झाले होते. एक वयाच्या बाराव्या वर्षी आणि प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह एकतिसाव्या वर्षी रमाबाईंबरोबर झाला. ते थोर समाजसुधारक म्हणून नाणावले होते. समाजसुधारणेच्या चळवळी त्यांनी उभारल्या होत्या, तरी वृद्ध वडिलांच्या अत्याग्रहामुळे अकरा वर्षांच्या कुमारिकेबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे त्यांच्या समाजसुधारक म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला.

रमाबाई रानडे

रमाबाईंनी त्यांच्या उदात्त जीवनाशी समरसता प्राप्त करून घेतली. त्यामुळे रानड्यांच्या निधनांनतर त्यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही जी आत्मकथा लिहिली (१९१०), ती मराठीतील सुंदर साहित्य म्हणून मान्यता पावली. रमाबाईंनी पतिनिधनानंतर स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले. आर्य महिला समाज तसेच लेडी डफरिन फंड कमिटीशी त्यांचा जवळचा संबंध होता. स्त्रियांना व्यवसाय शिक्षण देणारी संस्था स्थापिली. पुण्याच्या प्रख्यात ‘सेवासदन’ या विविध प्रकारच्या स्त्रीशिक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या प्रमुख प्रेरणास्थान होत्या. शासकीय पाठ्य-पुस्तक समितीवरही चार वेळा त्या होत्या; तसेच महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारतीय स्त्रीसाठी केलेले त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.

समाजकार्य

हादेवराव यांच्या काळात ‘लोकहितवादी’ देशमुख, विष्णुशास्त्री पंडित, जोतीराव फुले इ. समाजसुधारकांनी सुधारणेचे आंदोलन सुरू केले होते. त्यात रानडे सहभागी झाले.

१८६५ साली विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने एक विधवाविवाह घडवून आणला. परंपरानिष्ठ सनातन धर्मीयांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा-विवाहाच्या पुरस्कर्त्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागला. महादेवरावांनी या वादाच्या निमित्ताने वेद, स्मृती, पुराणे व इतिहास यांचे आलोडन करून विद्वत्ताप्रचुर निबंध लिहिला.

१८६२ मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाजसुधारणेची मीमांसा अनेक लेख लिहून केली.

भारतीय सामाजिक परिषद

माजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी भारतीय सामाजिक परिषद ही संस्था स्थापन केली. समाजसुधारणेच्या विचारांचा आधार म्हणून निश्चित असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्मसुधारणा व समाजसुधारणा ही भिन्नभिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध आहेत, म्हणून समाजजीवनाचा साकल्याने विचार केला पाहिजे असा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता.

त्यांनी प्रतिपादिले की, वंशभेद किंवा धर्मभेद न मानता मनुष्यामनुष्यांत समानता व न्याय प्रस्थापित करणे, हे नव्या युगातील माणसाचे कर्तव्य आहे. त्याकरिता परंपरेवरच्या अंधश्रद्धेतून आणि धर्मग्रंथांच्या बंधनातून मानवाची बुद्धी प्रथम मुक्त केली पाहिजे. त्याची कर्तव्यनिष्ठा त्याच्या विवेकबुद्धीतून आली पाहिजे. अंध दैववादाऐवजी बुद्धिनिष्ठा रुजविली पाहिजे. मानव्याची प्रतिष्ठा समतेच्या तत्त्वावर व्हावयास पाहिजे. उच्च असे विश्वनियामक ईश्वरी तत्त्व आणि त्या ईश्वरी तत्त्वाची मानवी हृदयातील शुद्ध प्रेरणा हे सर्व धर्मांच्या मुळाशी असलेले रहस्य होय, असे ते म्हणत.

प्रार्थना समाज

मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेकबुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी व त्यांच्या अनेक मित्रांनी केली. त्या पंथाची तत्त्वे, उपासनापद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये ‘एकेश्वरनिष्ठाची कैफियत’ अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला.  एकनाथांच्या भागवत धर्माचाम्हणजे वारकरी संप्रदायाचा महादेवरावांच्या मनावर प्रभाव खोल उमटला होता. भक्तीचा प्रसार करण्यासाठी प्रार्थनासमाजाचा जन्म आहे, असे त्यांनी प्रतिपादिले.

सार्वजनिक सभा

न्या. रानडे १८७१ मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली; सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले.  भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी केली.

डेक्कन सभा

इ. स. १८९० मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले. रानडे यांनी १८७० मध्ये स्थापलेल्या पुण्यातील ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेमध्ये फाटाफूट झाली, दोन तट पडले. लो. बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानड्यांच्या अनुयायांना दूर सारले. तेव्हा रानड्यांनी १८९३ साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही नवी संस्था काढली. त्यावेळी त्यांनी काढलेल्या परिपत्रकात त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. लोकशिक्षण हाच राजकीय चळवळीचा उद्देश त्यांनी त्यात स्पष्ट केला. स्वाभिमान व स्वावलंबन या गुणांनी युक्त नागरिकत्व निर्माण करणे, ही राजकारणाची पहिली पायरी आहे. हे गुण अंगी बाणण्याला दीर्घ कालावधी लागतो. जातिपातीचा दुराभिमान सोडणे हा उदारमतवादाचा महत्त्वाचा भाग आहे, असे त्यांनी दाखवून दिले.

स्वदेशीचा प्रचार

स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले. रानडे यांनी भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा दोन व्याख्याने देऊन केली. रानड्यांनी आपल्या देशात औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून संरक्षक जकातीचे तत्त्व पुरस्कारिले. इंग्रज सरकार भारताच्या आर्थिक विकासाच्या विरूद्ध कसे आहे, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला.

हाराष्ट्रात १८७४ ते ७६ या कालखंडात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या हलाखीस कारण आहे, असे स्पष्ट केले. जनतेला जबाबदार राज्यपद्धती प्राप्त झाल्याशिवाय सामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, असा मुद्दा धरून जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीचा अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटकडे धाडून दिला. या अर्जावर हजारो लोकांच्या सह्या होत्या.

कौन्सिलचे सभासदत्व

१८७७ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे राणीला एक मानपत्र दिले आणि त्याबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्जही दिला. रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठविण्याचाही उद्देश असावा, अशी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली. रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले; परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे १८८५ साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले.

१८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. या स्थापनेच्या कार्यात रानड्यांचा मोठा भाग होता. गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले. गोखले यांनी १९०० साली केलेल्या एक भाषणात म्हटले आहे, की ‘मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो आहे’.

औद्योगिक परिषद

रानड्यांनी १८९० साली औद्योगिक परिषद स्थापली. त्यावेळच्या प्रास्ताविक भाषणात आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्‌बोधक व्याख्याने दिली. कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, असे त्यांनी प्रतिपादिले. मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.

लेखनसंपदा

‘राइझ ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज’ [मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (१९६४)] या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा विस्तार आणि ऱ्हास या संबंधीही पुढील दोन खंड लिहिण्याचा त्यांचा मानस होता; परंतु त्यांच्या निधनामुळे (१९०१) तो पूर्ण होऊ शकला नाही.

 

बाबा पदमनजी

बाबा पदमनजी (मे १८३१ – २९ ऑगस्ट १९0६) हे मराठी साहित्यिक आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक होते. त्यांचे पूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे असे होते.  त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला व शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे झाले. बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले; बायबल; तसेच अब्राहम, इझाक इत्यादींच्या कथा हे सर्व इंग्रजी समजू लागल्यानंतर वाचले. मुंबईच्या फ्री चर्च विद्यालयात ‘बैबल मास्तर’ म्हणून काम केले. हळूहळू ख्रिस्ती धर्माकडे ओढा निर्माण झाला.

परमहंस मंडळीतील सहभाग

काही काळ ते ‘परमहंस मंडळी’ ह्या प्रागतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते; परंतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार; तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वरदत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आशयाचे विचार त्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी ह्या संघटनेशी संबंध तोडला.

ख्रिस्ती धर्माचा स्वीकार

परमहंस मंडळीतून बाहेर पडल्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा त्यानंतर अधिकाधिक तीव्र होत गेली व अखेरीस ३ सप्टेंबर १८५४ रोजी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्ती झाल्यानंतर ते पुण्यास गेले. पुणे येथे त्यांचे वास्तव्य सु. १६ वर्षे होते. तेथे असताना त्यांनी बरीच वर्षे फ्री चर्च मिशनच्या मंडळीचे पाळक म्हणून १८६७ मध्ये त्यांची नेमणूक झाली; परंतु १८७३ मध्ये ह्या कामाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:ला लेखनास वाहून घेतले.

यमुना पर्यटन-मराठीतील पहिली कादंबरी

बाबा पदमनजी यांच्या ग्रंथांपैकी यमुनापर्यटन ही कादंबरी असून मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून तिचा उल्लेख करण्यात येतो.
मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून यमुनापर्यटनाचा उल्लेख करण्यात येत असला, तरी यमुनापर्यटनात कादंबरीचे व्यवच्छेदक असे विशेष घटक सापडत नसून ती कांदबरी नव्हे, असेही विचार व्यक्तविले गेले आहेत. तसेच विधवांच्या दु:खापेक्षा बाबांची ख्रिस्ती धर्म प्रचाराची प्रेरणा यमुनापर्यटन लिहिताना बलवत्तर ठरली, असेही म्हटले गेले आहे. परंतु ह्या कादंबरीतील काही कलात्मक न्यूने दाखविल्यानंतरही वास्तववादी मराठी कादंबरीच्या प्रवासातील अगदी आरंभीचा व महत्त्वाचा टप्पा म्हणून तिचा गौरव करणारे अभ्यासकही आहेत.

ग्रंथसंपदा

 1. स्त्रीविद्याभ्यास निबंध (१८५२),
 2. व्यभिचारनिषेधक बोध (१८५४),
 3. यमुनापर्यटन (१८५७),
 4. सर्वसंग्रही ऊर्फ निबंधमाला (१८६॰)
 5. शब्दरत्नावली (१८६0),
 6. महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास (१८६६),
 7. स्त्रीकंठभूषण (१८६८), 
 8. ए काँप्रेहेन्सिव्ह डिक्शनरी इंग्लिश अँड मराठी (नवी आवृ. १८७॰),
 9. कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना (१८७३),
 10. नव्या करारावर टीका (१८७७),
 11. उद्धारमार्गविज्ञान (१८७८) आदींचा समावेश होतो.
 12. अरुणोदय (१८८४) ह्या नावाने त्यांनी आपले लालित्यपूर्ण व कलात्मक आत्मचरित्रही लिहिले.
 13. उदयप्रभा, कुटुंबमित्,, सत्यदीपिका अशा काही नियत-कालिकांचेही त्यांनी संपादन केले.मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका

गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका (९ एप्रिल १८२८–२५ जुलै १८८०) हे एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म वासुदेव व सावित्रीबाई या दांपत्यापोटी सातारा येथे झाला. ते मूळ कसबा संगमेश्वर, रत्नागिरीचे होते; पण चरितार्थासाठी त्यांचे कुटुंब देशावर येऊन सातारला स्थायिक झाले. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले.

वकिली

सार्वजनिक काका नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आले (१८४८) आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला (१८५६). नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली (१८६५) आणि पुण्यातच ते वकिली करू लागले.

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले. ‘फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्‌गार त्यांनी यावेळी काढले होते.

सार्वजनिक सभा

सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार व सभेचे स्थान महत्त्वाचे आहे. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात २ एप्रिल १८७० रोजी ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली. ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती.

तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी अध्यक्ष होते. प्रथम या संस्थेचा उद्देश केवळ पर्वती संस्थानच्या कारभारातील गोंधळ सरकारदरबारी मांडणे, एवढाच मर्यादित होता; पण लवकरच संस्थेला सामाजिक व राजकीय असे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पुढे न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर तिचे नाव झाले (१८७१). सभेचे राजकारण हे सनदशीर व इंग्रजांच्या मदतीनेच होणार होते. जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरुपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले. शिवाय जनतेची गाऱ्हाणी व अडचणी सरकारदरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले.

स्वदेशीचा प्रसार-प्रचार

न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी १८७२ मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. लो. टिळक, म. गांधी यांच्या कितीतरी वर्षे अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. १२ जानेवारी १८७२ रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होत.

खादीचा पोशाख करून ते १८७७ च्या दिल्ली दरबारात गेले. या दरबारात इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिला ‘हिंदुस्थानची सम्राज्ञी’ हा किताब बहाल करण्यात येणार होता. त्यावेळी सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. या मानपत्रात सभेने हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राबरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा, तसेच स्वावलंबी बनविणारे शिक्षण व राजकीय हक्क द्यावेत, अशा मागण्या नोंदविल्या होत्या. याशिवाय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत, अशीही मागणी एका स्वतंत्र अर्जाने केली होती.

देशी व्यापारोत्तेजक मंडळ

त्यांनी ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इ. स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली. त्या मालाच्या विक्रीसाठी सहकारी तत्त्वावर पुणे, सातारा, नागपूर, मुंबई, सुरत आदी ठिकाणी दुकाने काढण्यास लोकांना प्रोत्साहित केले. स्वदेशी वस्तूंची प्रदर्शने भरविली, व्याख्याने दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग्रा येथे ‘कॉटन मिल्स’ सुरू करण्यात आली.

स्त्री विचारवती संस्था 

जातिभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुढाकार घेऊन १८७१ मध्ये पुण्यात ‘स्त्री विचारवती’ या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे जातिभेद दूर करण्यासाठी हळदीकुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जातिजमातींच्या स्त्रिया सामील होत असत.

दुष्काळातील कार्य

सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली (१८७३). या पाहणीतून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची माहिती प्रकाशात आली. १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. स्वस्त धान्याची दुकाने उघडली. सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे साहाय्य केले. तसेच सरकारने आपल्या ‘पब्लिक वर्क्स’ खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत म्हणून लढा दिला.

लवाद न्यायालयाची स्थापना

ब्रिटिशांच्या वेळखाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नानेच पुणे येथे त्या सुमारास लवाद न्यायालयाची स्थापना झाली (१८७६).

वृत्तपत्रकारांचे संमेलन

सार्वजनिक काकांना लोकजागृतीच्या कार्यातील वृत्तपत्रांच्या सामर्थ्याची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी व्हाइसरॉय लॉर्ड लिटनच्या १८७८ मधील मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला कडाडून विरोध केला. या कृतीचा निषेध करण्यासाठी इंदुप्रकाश चे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन २९ मार्च १८७८ रोजी मुंबई येथे भरविले. शिवाय कलकत्ता (कोलकाता) येथील त्याच वर्षीच्या अशाच प्रकारच्या अन्य संमेलनांस ते आवर्जून उपस्थित राहिले.

निधन

सार्वजनिक सभेच्या कार्याला त्यांनी स्थापनेपासून अखेरपर्यंत वाहून घेतले होते. त्यामुळे सार्वजनिक सभा म्हणजे गणेश वासुदेव असे समीकरण झाले होते. त्यांच्या या समर्पित जीवनामुळे त्यांना सार्वजनिक काका हे नामाभिधान प्राप्त झाले. या दगदगीच्या जीवनात त्यांना  हृदयविकार जडला आणि त्यातच त्यांचे पुण्यात निधन झाले.

विष्णुशास्त्री पंडित

विष्णुशास्त्री पंडित (१८२७-१८७६) हे समाजसुधारक, मराठी ग्रंथकार आणि वृत्तपत्रकार होते. त्यांचे पूर्ण नाव विष्णु परशुराम शास्त्री पंडित असे होते. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे घराणे सातारा जिल्ह्यातील बावधान ह्या गावचे होते. सातारचे प्रख्यात विद्वान राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर आणि त्यांचे चिरंजीव नारायाणाचार्य ह्यांच्याकडे न्याय आणि व्याकरण ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पुण्याच्या सरकारी पाठशाळेत इंग्रजीचे अध्ययन केले. महादेवशास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे सहाध्यायी होते.

 1. १८४८ मध्ये त्यांनी सरकारी शिक्षणखात्यात नोकरी पत्करली. तेथे शिक्षक, भाषांतरकार, भाषांतरपरीक्षक अशी कामे केली.
 2. १८६४ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईच्या इंदुप्रकाश ह्या सामाजिक. सुधारणावादी वृत्तपत्राचे ते संपादक झाले. बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठकुमारीविवाह इ. प्रश्नांवर आपले पुरोगामी विचार त्यांनी सडेतोडपणे मांडले. त्यासाठी प्राचीन धर्मग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला.
 3. स्त्रियांच्या उन्नतीची त्यांना तळमळ होती. पुनर्विवाहाचा केवळ पुरस्कार करूनच ते थांबले नाहीत, तर एका विधवेशी स्वतः विवाह करून आपण कर्ते सुधारक असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते.
 4. १८७० मध्ये पुण्यास शंकराचार्याच्या अध्यक्षते खाली झालेल्या पुनर्विवाहविषयक वादात भाग घेऊन आपले विचार त्यांनी साधार आणि तर्कशुद्धपणे मांडले होते.
 5. पुनर्विवाहाच्या सशास्त्रते-संबंधी त्यांनी दिलेली काही व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहेत (१८७०).
 6. ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांनी पुनर्विवाहाच्या सशास्त्रतेसंबंधी लिहिलेल्या ग्रंथाचे त्यांनी केलेले विधवाविवाह हे भाषांतर १८६४ मध्ये प्रसिद्ध झाले.
 7. त्यांच्या अन्य ग्रंथांत मॅक्‌डॉनल्डकृत कॉनिकल ऑफ नाना फडणवीस ह्या आणि अन्य काही ग्रंथांच्या आधारे लिहिलेली नाना फडणवीस  ह्यांची संक्षिप्त बखर (१८५९), मरेकृत हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडियाच्या १० ते १४ प्रकरणांवर आधारित हिंदुस्थानाचा इतिहास (१८६१), इंग्रजी आणि मराठी कोश (१८६४), संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश (१८६५) आदींचा समावेश होतो.
 8. शंकर पांडुरंग पंडित ह्यांच्या साहाय्याने त्यांनी तुकारामाच्या अभंगांची गाथा दोन खंडांत संपादिलेली आहे (१८६९, १८७३).

वस्ताद लहुजी साळवे

वस्ताद लहुजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४–१७ फेब्रुवारी १८८१) हे एकोणिसाव्या शतकातील एक क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक होते. त्यांचे पूर्ण नाव लहुजी राघोजी साळवे असे होते. ते लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती.

 1. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना लहुजींचे वडील धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला.
 2. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली.
 3. महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले.
 4. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला.
 5. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले.
 6. अठराशे सत्तावनच्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या.
 7. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.

समाजकार्य

 1. हुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले.
 2. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले.
 3. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्घ झाला (१८५५).
 4. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली.
 5. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत.

वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले. क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवेंची समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.

विष्णुबुवा ब्रम्हचारी

विष्णुबुवा ब्रम्हचारी (इ.स.१८२५ ते १८७१) हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत व धर्मसुधारक होते. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. ते रायगड जिल्ह्यातील शिरवली या गावचे राहणारे होते. यांचे वडील लहानपणीच वारले. त्यांनी आईच्या सांगण्यावरून शेती केली, गुरे राखली. नंतर ते महाडला आले. नंतर संगमेश्वर येथे काही काळ कस्टम खात्यात नोकरीही केली. नंतर तीही नोकरी सोडली. ते साधु-संतांबरोबर खूप भटकले. त्यांनी कथा-कीर्तने ऐकली. वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्यांनी सर्वसंगपरित्याग केला. त्यांनी विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, बोधसागर इत्यादी ग्रंथांचे सखोल वाचन व चिंतन केले. नंतर ते सप्तशृंगी गडावर जाऊन राहिले. कंदमुळे खाऊन तपस्या केली. त्यांना आत्मज्ञान झाले.

विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचे कार्य

विष्णुबोवांचा प्रथमत: भर व्याख्यानांवर होता. नंतर त्यांनी ग्रंथलेखन केले. वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थसिंधु, चतु:श्लोकी भागवताचा मराठीत अनुवाद, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, बोधसागर असे पाच ग्रंथ प्रसिध्द आहेत. भगवद्गीतेवरील ‘सेतुबंधिनी टीका’ ही अपूर्ण राहिली.

ब्रिटिश काळात ख्रिश्र्चन मिशनरी अनेक प्रकारे हिंदुधर्मावर टीका करीत आणि औषधे देऊन, शाळा काढून, कधी विहिरीत पाव टाकून हिंदूंना ख्रिश्र्चन धर्मात ओढीत. त्यांच्याच पध्दतीने ही लाट परतविण्याचे प्रयत्न केले. त्यांनी ख्रिश्र्चन धर्मातील वैगुण्यांवर व्याख्यानांची झोड उठविली. त्यांचे खंडन-मंडन आवेशपूर्ण असे. त्यांच्या सभा मुंबईस चौपाटीवर होत; कारण त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी होत असे.

जातिभेदाबद्दलही त्यांची मते विलक्षण क्रांतिकारक होती. जाती कार्यावरून ठरतील, आणि वर्ण ‘गुणधर्मावरून’ ठरेल. एकाच पित्याची चार मुले चार वर्णाची असू शकतील! कारण ‘वर्ण’ गुणावरूनच ठरतो. जो सत्वगुणयुक्त आहे व धर्ममार्ग दाखविण्यास समर्थ आहे, त्यास ब्राम्हण म्हणावे. अशा ब्राम्हणांनी आदिवासींना ज्ञान द्यावे व उन्नत करावे अशी त्यांची विचारसरणी होती.

इंग्रजी राज्यामुळे कारखानदारी सुरू झाली. यंत्रयुग सुरू झाले. त्यामुळे नवाच कामगारवर्ग निर्माण झाला. विष्णुबोवा ब्रम्हचारी यांनी ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ लिहून कार्ल मार्क्सच्या कितीतरी वर्षे आधी समाजवादी समाजरचनेबद्दलचे विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘खाजगी संपत्ती हेच सर्व दु:खांचे व गुन्ह्यांचे उत्पत्तिस्थान आहे. म्हणून सर्व प्रजा एक कुटुंब मानावी. गावाची सर्व  जमीन सर्वांची मानावी. सर्वांनी कष्ट करावेत. गावाची कोठारे असतील, त्यातून गरजेप्रमाणे धान्य, कापड इत्यादी न्यावे.’

विष्णुबोवांनी ‘सेतुबंधिनी’ नावाची गीतेवर टीका लिहिली आहे. ही टीका गीता अध्याय १८, श्लोक १७ पर्यंत लिहिली गेली; पुढील टीका त्यांच्या एका शिष्याने पुरी केली. ही टीका इ.स. १८७० च्या सुमारास लिहिली- पण १९८० ला प्रकाशित झाली. या टीकेचे वैशिष्टय म्हणजे ती गद्य स्वरूपात व तत्कालीन ज्ञात वैद्यानिक परिभाषेत लिहिली आहे. वैद्यानिक परिभाषेत लिहिलेली ही पहिलीच टीका मानावी लागेल. या टीकेतही इंग्रजी राज्य व ख्रिश्र्चन धर्म यावर परखड मते मांडली आहेत.

विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचा १८ फेब्रुवारी १८७१ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला.

भाऊ दाजी लाड

भाऊ दाजी लाड ( १८२२ – ३१ मे १८७४) हे महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वतंरी होते. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड असे होते. त्यांचा जन्म गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (१८३२).

शिक्षण व जीवन 

भाऊ दाजी लाड यांचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३).

भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्यांना ६०० रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्‌धृत केला आहे.

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे.

सामाजिक कार्य

 1. बाँबे ॲसोसिएशनचे ते चिटणीस झाले. पुढे दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया ॲसोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले.
 2. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
 3. १८५४ मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.
 4. जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होत (१८६३-७३). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात.
 5. विधवाविवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला.
 6. लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले.
 7. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रध्देला फाटा द्यावा, या मताचे ते होते.
 8. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली (१८६४-६९).

संशोधन विषयक कार्य

 1. वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले.
 2. राणीचा बाग (जिजामाता बाग), ॲल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे.
 3. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला.
 4. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले.
 5. मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्यूलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत.
 6. कालीदासाचे कुमारसंभव व मेरूतुंगाचार्याचा प्रबंध चिंतामणि हे ग्रंथ त्यांनी संपादित केले.
 7. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द केले.
 8. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊदाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिध्द केले (१९७४).

 

त्यांच्यावर १८६५ मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. परिणामत: त्यांचे उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्य व वैफल्य यांनी ग्रासले गेले. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३ ते ९ ऑक्टोबर १८९२) हे १९ व्या शतकात होऊन गेलेले अग्रणी समाजसुधारक, मराठी पत्रकार व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे  लिहिली. त्यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव सिद्धये असे होते. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे होते. गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे देशमुख हे आडनाव ह्या घराण्याला मिळाले. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.

लेखन कार्य 

शतपत्रे

थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांची कीर्ती मुख्यतः त्यांनी शतपत्रे म्हणून लिहिलेल्या निबंधांवर अधिष्ठित आहे. लोकहितवादी हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर या पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही शतपत्रे वस्तुतः १०८ आहेत. समारोपाचे शंभरावे पत्र (निबंध) लिहिल्यानंतर आणखी शंभर निबंध लिहिण्याचा त्यांचा उद्देश होता. तथापि हे निबंध प्रभाकरातून प्रसिद्ध होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी पहिल्या शंभर पत्रांत आठ निबंधांची भर घालून अष्टोत्तरशतपत्रे पूर्ण केली.

या निबंधांतून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.

इतर साहित्य

 1. रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक लिहिले.
 2. १८४९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे
 3. हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ? ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे.
 4. महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९),
 5. यंत्रज्ञान (१८५०),
 6. खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१),
 7. निगमप्रकाश (गुजराती, १८७४),
 8. जातिभेद (१८७७),
 9. गीतातत्त्व (१८७८).
 10. सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०),
 11. ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३),
 12. स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३),
 13. पंडितस्वामी श्रीमद्‌द्‌‌‌‌‌यानंद सरस्वती (१८८३),
 14. ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५),
 15. गुजराथचा इतिहास (१८८५).

सामाजिक कार्य

त्यांचे सामाजिक कार्यही त्यांचे लोकहितवादी पण सार्थ ठरविणारे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते जेथे जेथे गेले, तेथे त्यांनी समाजोपयोगी संस्था निर्माण केल्या.

 1. वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून काम करीत असताना त्यांनी एक वाचनालय स्थापन केले होते.
 2. पुण्याच्या नेटिव्ह जनरल लायब्ररी च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
 3. पुण्यात तेलुगू वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते. 
 4. ज्ञानप्रकाश ह्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
 5. मुंबईहून निघणाऱ्या इंदुप्रकाश ह्या पत्राच्या स्थापनेतही ते होतेच. 
 6. लोकहितवादी ह्या नावाचे एक नियतकालिक ते स्वतःही काळ चालवीत होते.
 7. अहमदाबाद येथे असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाहमंडळ इत्यादींची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. 
 8. हितेच्छू हे इंग्रजी पत्र काढण्यामागेही त्यांची प्रेरणा होती, असे म्हणतात.
 9. गुजराती कवी मोहनलाल दलपतराम ह्यांनी लोकहितवादींच्या गुणवर्णनपर एक काव्य लिहिले, ही बाब लोकहितवादींची गुजरातेतील लोकप्रियता स्पष्टपणे दर्शविणारी आहे.
 10. प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्णवर्मा ह्यांना विलायतेत शिक्षण घेता यावे, म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले होते आणि पुढे श्यामजींचे नाव त्यांनी रतलाम संस्थानच्या दिवाणपदासाठी सुचवले व त्याला मान्यता मिळविली.
 11. हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या भूमिकेतून स्थापन झालेल्या आर्य समाज आणि प्रार्थना समाज ह्या दोन्ही पंथांशी त्यांचा निकटचा संबंध आलेला होता. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्याविषयी लोकहितवादींना मोठा आदर होता. मुंबई आर्य समाजाचे प्रमुखपदही काही काळ त्यांच्याकडे होते.
 12. अहमदाबाद येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता. तथापि ह्या दोन्ही पंथांच्या ते आहारी गेले नव्हते. वेदांतील मंत्रभाग हा ईश्वरप्रणीत होय, आर्य समाजाची भूमिका लोकहितवादींना मान्य नव्हती. वेदांना ते मानवप्रणीत मानीत होते. त्याचप्रमाणे त्यांचा ओढा ज्ञानमार्गकडे असल्यामुळे पुढे भक्तिमार्गाकडे वळलेल्या प्रार्थना समाजाशी ते एकरुप होऊ शकले नाहीत.

 

भाऊ महाजन

भाऊ महाजन (१८१५-१८९०) हे मराठी पत्रकार होते. त्यांचे मुळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे असे होते. त्यांचा जन्म रायगड जिल्हातील पेण येथे झाला. १८२२ च्या सुमारास ते मुंबईला आले आणि तेथे सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे ह्यांच्याकडे राहुन त्यांनी शिक्षण घेतले. मुंबईच्या एल्‌फिन्स्टन विद्यालयात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले. इंग्रजी, संस्कृत व फार्सी ह्या भाषांचा त्यांचा चांगला अभ्यास होता.

भाऊ महाजन यांची पत्रकारिता

 1. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८४१ मध्ये त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक पत्र काढले. व ते २०-२१ वर्षे चालविले. स्वजनांना स्वदेशी-विदेशी घडामोडी समजाव्यात व लोकमताला योग्य वळण लावावे, हा हेतू हे पत्र काढण्यामागे होता. तत्कालिन आंग्लशिक्षित विद्वान ह्या पत्रात लिहीत.
 2. बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं ‘दर्पण’ हे द्वैभाषिक नियतकालिक होतं. त्यातील इंग्रजी मजकुराचं संपादन स्वत: जांभेकर करत, तर मराठी विभाग भाऊ महाजन पाहत असत.
 3. महाजनांची दृष्टी पुरोगामी होती. लोकहितवादींच्या शतपत्रांना त्यांनीच प्रभाकरातून निर्भयपणे प्रसिद्धी दिली. इंग्रजांच्या राज्यपद्धतीवरही ह्याच पत्राने प्रथम टीका केली. इंग्रजांकडून भारताचे होणारे शोषण, इंग्रज अधिकाऱ्यांची लाचबाजी आणि भारतीयांचा इंग्रजांकडून होणारा अवमान ह्यांकडे प्रभाकराने लक्ष वेधले.
 4. १८५३ मध्ये त्यांनी धूमकेतू हे साप्ताहिक काढले. सनातनी विचारांच्या वृत्तपत्रांना त्यातून उत्तरे दिली जात. विरुद्ध बाजूच्या विचारांनाही आपल्या पत्रांचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याइतका उमेदपणा महाजनांच्या ठायी होता. विष्णुबुवा ब्रह्मचारी ह्यांच्यावर धूमकेतूने परखड टीका केली; त्यांच्या, वेदोक्त धर्मप्रकाशातील दोष दाखविले; परंतु त्या बाबतीतली विष्णुबुवांची बाजूही धूमकेतूने प्रसिद्ध केली होती. बाबा पदमनजी ह्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या वेळी त्यांची कैफियतही भाऊ महाजन ह्यांनी धूमकेतूतून मांडू दिली होती.
 5. भाऊ महाजन हे वादपटू होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ मेजर कँडी ह्याच्या बरोबर मराठी भाषेच्या लेखनपद्धती बाबत त्यांनी परखडपणे वाद केला होता.
 6. पाश्चात्य विद्यांचा परिचय लोकांना करून देण्यासाठी ज्ञानदर्शन नावाचे एक त्रैमासिकही त्यांनी १८५४ मध्ये काढले होते. मराठीतून कायदा, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, पदार्थविज्ञान, राजकीय अर्थशास्त्र, इतिहास या विषयांवरचे लेख त्यात प्रसिद्ध होत. त्याच्या ऑक्टोबर, १८५४ च्या अंकात एका कादंबरीचे पहिले प्रकरण प्रसिद्ध झाले होते. ही कादंबरी भाऊंनी लिहायला घेतली होती. तिचं नाव- ‘परागंदा जाहालेल्या गृहस्थाची कन्या’. परंतु पुढे १८५६ मध्ये तेही बंद पडले आणि कादंबरीचे लेखनही. ती पूर्ण झाली असती तर मराठीतील पहिली कादंबरी ठरू शकली असती.
 7. स्वसमाज सुविद्य व स्वाभिमानी व्हावा, ह्यासाठी त्यांनी आपल्या पत्रांतून प्रयत्न केले. तथापि पश्चिमी संस्कृतीचे अंधानुकरण त्यांना मान्य नव्हते.
 8. त्यांनी स्वतंत्र ग्रंथनिर्मित केल्याचे दिसत नाही; तथापि विनायकशास्त्री दिवेकर ह्यांच्या शब्दसिद्धिनिबंध (१८४३) ह्या ग्रंथाच्या लेखनात त्यांनी सहाय्य केले होते.

दादोबा पांडुरंग तर्खडकर

दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२) हे मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि धर्मसुधारक होते. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे बिरुद त्यांना लावले जाते. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता.

त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. त्यांना गुजराती व फार्सी भाषा अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.

लेखन

 1. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली.
 2. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या.
 3. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी  (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत.
 4. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र  (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये.
 5. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक  (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन  (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म  (१८८०) आणि शिशुबोध  (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले.
 6. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन  ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता.
 7. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती.

त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे बिरुद त्यांना लावले जाते.

सामाजिक कार्य

ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता.

रावबहादूर पदवी

भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मुंबई येथे ते निधन पावले.

error: