भूगोल :: Current Affairs

हिमनदीमुळे तयार होणारी भूरूपे

हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

हिमगव्हर/हिमगर्त/सर्क (Cirque)-

हिमनदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना तिच्या खनन कार्यामुळे पर्वताच्या उतारावर अर्धवर्तुळाकार खड्यांची निर्मिती होते. हे खड्डे एका बाजूने उघडे असतात, यांनाच हिमगव्हर/हिमगर्त/सर्क (Cirque) असे म्हणतात.

‘यु’  आकाराची दरी (‘U’ shaped valley)-

हिमनदी ड्रीमधून वाहत असताना ती दरीच्या तळभागाची मोठ्या प्रमाणावर झीज करते. त्यामुळे पूर्वीची ‘व्ही’ आकाराची दरी तळभागात अधिक रुंद होऊन तिला ‘यु’ आकार प्राप्त होतो.

By DanHobley (Own work) [CC BY-SA 3.0], via Wikimedia Commons

लोंबणारी दरी (Hanging Valley)-

मुख्य-हिमनदीला उप-हिमनद्या मिळतात त्याठिकाणी उप-हिमनद्या मुख्य-हिमनदीच्या तळापासून अधिक उंचीवर असतात. त्यामुळे उप-हिमनद्यांच्या दऱ्या मुख्य-हिमनदीवर लोंबताना दिसतात, त्यांनाच लोंबणाऱ्या दऱ्या (Hanging Valley) असे म्हणतात.

By Greg Willis from Denver, CO, usa [CC BY-SA 2.0], via Wikimedia Commons

गिरिशृंग (Horn)-

काही ठिकाणी पर्वत शिखराच्या अनेक बाजूंना हिमगव्हर/हिमगर्त/सर्क ची निर्मिती होते. त्यांचा विस्तार पर्वत शिखराकडे होत जाऊन ते परस्परांना मिळतात. त्यामुळे शिखराचा भाग शिंगाप्रमाणे उंच व टोकदार दिसू लागतो, यालाच गिरिशृंग (Horn) असे म्हणतात.

दैत्यसोपान (Glacial Stairways)-

हिमनदी वाहत असताना तिच्या खननकार्याने प्रवाहमार्गात मोठ्या आकाराच्या पायऱ्यांची निर्मिती होते. या पायऱ्या पर्वताच्या कड्यांनी एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या असतात. यांनाच दैत्यसोपान (Glacial Stairways) असे म्हणतात.

By Walter Siegmund (Own work) [GFDL, CC-BY-SA-3.0 or CC BY 2.5], via Wikimedia Commons

मेषशिला (Roche Moutonnee)-

हिमनदीच्या मार्गात कठीण खडक किंवा अडथळा आल्यास त्या आपला मार्ग न बदलता अडथळ्यावर चढून वाहते. अशा छोट्या टेकड्यांना मेषशिला (Roche Moutonnee) असे म्हणतात.

By Jasmin Ros (Own work) [CC BY-SA 3.0], via Wikimedia Commons

शृंखला हिमगर्त (Tandem Cirque)-

हिमनदीने जोडलेल्या हिमगव्हर/हिमगर्त/सर्क यांच्या मालिकेला शृंखला हिमगर्त (Tandem Cirque) असे म्हणतात.

तळपात्र (Rock Basins)-

हिमनदीच्या तळभागावरील खडक झिजून खळग्यांची निर्मिती होते. यांनाच ‘तळपात्र’ (Rock Basins) असे म्हणतात.

शृंग व पुच्छ (Crag and Tail)-

हिमनदीच्या मार्गात बेसाल्टसारखा खडक आल्यास त्याचे अपक्षरण होत नाही, अशा खडकास शृंग (Crag) असे म्हणतात. मात्र हिमनदीच्या प्रवाहाभिमुख बाजूच्या खडकाची झीज होऊन प्रवाहाच्या दिशेत निक्षेपणाचे लांब भाग तयार होतात यांनाच पृच्छ (Tail) असे म्हणतात.

हिमखाडी (Fiord )-

हिमनदी समुद्रास मिळाली तरी तिचे पात्र जमिनीकडे भागात खोल व समुद्राकडील भागात उथळ असते. त्यामुळे समुद्राचे पाणी हिमनदीत शिरते. या भूरूपाला हिमखाडी (Fiord ) असे म्हणतात व अशा समुद्रकिनाऱ्याला फियॉर्ड किनारा असे म्हणतात.

By Ahmedherz (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons

हिमनदीच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

हिमोढ (Moraines)-

हिमनदीने आपल्याबरोबर वाहून आणलेल्या पदार्थांच्या निक्षेपणापासून जे ढीग तयार होतात त्यांना हिमोढ(Moraines) असे म्हणतात.

By Wilson44691 (Own work) [Public domain], via Wikimedia Commons

गाळाचे मैदान (Till Plain)-

द्वीपकल्पीय महानदीचे पीछेहाट होताना हिमनदीच्या मुखाजवळ बारीक गाळाचे निक्षेपण होऊन हिमानी गाळाचे मैदान (Till Plain) तयार होते.

हिमोढगिरी (Drumlins)-

हिमनदीच्या निक्षेपणामुळे तयार होणाऱ्या उलट्या बोटीच्या आकाराच्या टेकडयांना हिमोढगिरी (Drumlins) असे म्हणतात.

By Martin Groll (Aufnahme aus dem Zeppelin NT) [GFDL or CC BY 3.0 de], via Wikimedia Commons

हिमोढ कटक (Eskers)- 

By Hanna Lokrantz [CC BY 2.0], via Wikimedia Commons

कंकतगिरी/केम्स (Kames)

हिमाजलोढ मैदान (Out Wash Plains)

By Steve Hillebrand, U.S. Fish and Wildlife Service [Public domain], via Wikimedia Commons

नदीमुळे तयार होणारी भूरुपे

नदीच्या युवावस्थेतील भूरूपे

खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

‘व्ही’ आकाराची दरी (‘V’ Shaped Valley) –

नदीमुळे उभे खनन कार्य जास्त होऊन नदीपात्राचा तळभाग खोल खणला जातो. त्यामुळे नदीच्या पात्राला इंग्रजी ‘व्ही’ (V) असा आकार प्राप्त होतो.

'व्ही' आकाराची दरी

‘व्ही’ आकाराची दरी Jim Barton [CC BY-SA 2.0], via Wikimedia Commons


घळई (Gorge) –

नदीच्या उभ्या खनन कार्यामुळे नदीपात्राचा तळभाग खोल खणला जातो. नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूचे काठ तीव्र उताराचे बनतात. या दरीची खोली रुंदीच्या मानाने अधिक असते.

घळई

घळई


निदरी (Canyon)-

काही नद्यांच्या दऱ्यांमध्ये तशाच प्रकारची दुसरी घळई निर्माण होते, या भूरूपाला निदरी असे म्हणतात.

By PradeepBisht (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons


कुंभगर्त/रांजणखळगे (Pot Holes)-

वाहत्या पाण्यामध्ये काही ठिकाणी पाण्याला चक्राकार गती प्राप्त होते. या ठिकाणी पाण्यातील दगड-गोटे नदीतळाच्या पृष्ठभागावर गोल फिरू लागतात. त्यामुळे त्याठिकाणी जी छिद्रे कोरली जातात त्यांना रांजणखळगे असे म्हणतात.

रांजणखळगे by By Sachin.gorade (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons


धावत्या (Rapids)-

पर्वतीय उंच-सखल प्रदेशात नदीप्रवाहाचा वेग अधिक असतो. येथे तीव्र उतारामुळे नदीप्रवाह वेगाने पुढे येतो यालाच ‘धावत्या’ असे म्हणतात.

By Pandionwater (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons


धबधबा (Waterfall)-

नदीप्रवाह उंच कड्यावरून खाली कोसळत असेल तर त्याला धबधबा असे म्हणतात.


गुंफित गिरीपाद (Interlocking Spur)-

नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरांची रचना  दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवल्याप्रमाणे असेल तर नदीप्रवाहाला वाट काढताना वळणे घ्यावी लागतात, अशा भूरूपाला ‘गुंफित गिरीपाद’ असे म्हणतात.

गुंफित गिरीपाद

गुंफित गिरीपाद


निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

जलोढ शंकू (Alluvial Cones)-

नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना आपल्या प्रवाहासोबत आणलेल्या पदार्थांचे निक्षेपण पर्वताच्या पायथ्याशी करते. या पदार्थांचे निक्षेपण होताना शंकूच्या आकाराचे मैदान तयार होते याला ‘जलोढ शंकू’ असे म्हणतात.

जलोढ शंकू

जलोढ शंकू


पंखाच्या आकाराची मैदाने/जलोढ पंख (Alluvial Fan)-

पर्वतीय प्रदेशातून वाहणारी नदी जेंव्हा पर्वताच्या पायथ्याशी येते, त्यावेळी मंद उतारामुळे तिचा वेग कमी होतो. याठिकाणी पंखाच्या आकारात प्रवाहासोबत आलेल्या पदार्थांचे निक्षेपण होते. या भूरूपास ‘जलोढ पंख’ असे म्हणतात.

जलोढ पंख

जलोढ पंख


नदीच्या प्रौढावस्थेत भूरूपे

खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

नागमोडी वळणे (Meanders)-

नदीप्रवाहात एखादा कठीण खडक किंवा अडथळा आडवा आल्यास नदीप्रवाह आपला मार्ग बदलतो व वळण घेतो. अशा वळणावर नदीच्या एकाच काठाची झीज जास्त होते व दुसऱ्या काठावर निक्षेपण होते. अशा झिजेमुळे नदीला अनेक वळणे प्राप्त होता.  या भूरूपाला ‘नागमोडी वळणे'(Meanders) असे म्हणतात.

नागमोडी वळणे

नागमोडी वळणे

नालाकृती सरोवरे (Ox-bow Lakes)-

काही वेळेस पुरामुळे नागमोडी वळण तुटते व नदी सरळ वाहू लागते. तुटलेल्या नालाकृती भागात पाणी साचून सरोवर बनते. या भूरूपाला ‘नालाकृती सरोवर’ (Ox-bow Lakes) असे म्हणतात.

नालाकृती सरोवर

नालाकृती सरोवर

 

निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

पूरतट (Natural Levees)-

नदीच्या प्रौढावस्थेत गाळाच्या नियमित निक्षेपणामुळे नदीच्या दोन्ही काठांवर गाळाचे उंच बांध तयार होतात. या भूरूपाला पूरतट असे म्हणतात.

 

पूरतट

पूरतट

 

पूरमैदान (Flood Plains)-

पूरपरिस्थितीत नदीचे पाणी सभोवतालच्या प्रदेशात पसरते. नदीने आपल्यासोबत वाहून आणलेल्या गाळाचे या प्रदेशात निक्षेपण होते. यामुळे सभोवतालच्या प्रदेशात गाळाची मैदाने तयार होतात यालाच पूरमैदान असे म्हणतात.

पूरमैदान

पूरमैदान

त्रिभुज प्रदेश (Delta Region)-

नदी समुद्रास मिळण्यापूर्वी नदीला अनेक फाटे फुटतात व हे फाटे स्वतंत्ररीत्या समुद्रास जाऊन मिळतात. या फाट्यांच्या दरम्यान त्रिकोणी आकाराची गाळाची मैदाने तयार होतात. या प्रदेशालाच त्रिभुज प्रदेश असे म्हणतात.

त्रिभुज प्रदेश

त्रिभुज प्रदेश

ज्वालामुखी

पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.

ज्वालामुखीचे प्रकार

उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात.

भेगीय ज्वालामुखी :

ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे.


केंद्रीय ज्वालामुखी :

उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होत ात. जपानमधील फुजिय ामा, टांझानियातील कि लीमांजारो
ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.

लाव्ह्याचे रासायनिक संघटन व तापमान, विशेषतः लाव्ह्यात असणाऱ्या वायूंचे प्रमाण व दाब यांनुसार केंद्रीय उद्रेकाचे अनेक प्रकार होतात. त्यांतील महत्त्वाच्या प्रकारांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

हवाई प्रकार : 

यामध्ये मध्यवर्ती निर्गम द्वारातून अत्यंत सुवाही अशा लाव्ह्याचे निस्सारण होत असते. लाव्ह्यातील वायू शांतपणे बाहेर पडतात. क्वचित प्रसंगी कुंडात असलेल्या लाव्ह्याच्या पृष्ठावरून वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूंच्या धक्क्यामुळे तप्त लाव्ह्याचे फवारे उडतात व ते वाऱ्याच्या झोतात सापडून लाव्ह्याच्या थेंबांचे तारेसारखे लांब काचतंतू तयार होतात. त्यांना ‘पेली’ या पॉलिनेशियन अग्निदेवतेवरून ‘पेलीचे केस’ असे म्हणतात. हवाई प्रकारच्या उद्रेकांमुळे विस्तिर्ण आकारमानाचे ढाल ज्वालामुखी तयार होतात. हवाई उद्रेकाचा एक दुय्यम प्रकार लाव्हा तलाव हा आहे. ढाल ज्वालामुखीच्या कटाहात अत्यंत तप्त व तरल लाव्हा असतो. तलावाच्या मध्यातून वर येणारा तप्त लाव्हा चोहोबाजूंना काठाकडे वाहत जातो आणि काठाशी पुन्हा आत बुडून हे अभिसरणाचे चक्र चालू राहते. अशा प्रकारे काठाबाहेर लाव्हा न सांडता कटाहात दीर्घकाल एखाद्या तलावाप्रमाणे द्रव लाव्हा राहतो. कीलाउआ ज्वालामुखीतील हालेमाऊ माऊ नावाच्या कुंडामध्ये १८२३ पासून १९२४ पर्यंतच्या काळात असा लाव्हा तलाव तयार झालेला होता.

स्ट्राँबोली प्रकार :

लाव्ह्याचा दाटपणा जसजसा वाढत जातो आणि त्याचा सुवाहीपणा कमी होतो, तसतसा लाव्ह्यातील वायू बाहेर पडण्यास होणारा अडथळा वाढत जातो व उद्रेकाचे स्वरूप अधिकाधिक स्फोटक होत जाते. हवाई लाव्ह्यापेक्षा काहीसा कमी सुवाही लाव्हा कुंडात उघडा पडला म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरील थर घट्ट होतो आणि त्याच्याखाली अडकून पडलेले वायू साचत राहून मधून मधून धक्क्याने सौम्य स्फोटांच्या रूपाने निसटत राहतात. हे स्फोट ठराविक कालावधीने, तालबद्धतेने किंवा सातत्याने होत असतात. स्फोटामुळे लाव्ह्याचे लहान मोठे थेंब व गोळे हवेत फेकले जाऊन त्यांचे बाँब, लॅपिली, अंगार इ. पदार्थ होतात. अधिक जोराच्या स्फोटात तप्त लाव्ह्याचे कारंजे वर उडून त्याचा प्रकाशमान फवारा दिसतो. सिसिली बेटाच्या उत्तरेस असलेल्या लिपारी समूहातील ज्वालामुखींपैकी स्टाँबोली या ज्वालामुखीत अशी क्रिया दिसत असल्यामुळे या प्रकाराला त्याचे नाव मिळाले आहे. मॅक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखीही स्ट्राँबोली प्रकारचा होता.

व्हल्कॅनी प्रकार :

लिपारी समूहातील व्हल्कॅनो नावाच्या ज्वालामुखीवरून हे नाव दिले आहे. या प्रकांरातील लाव्हा बराच दाट असून कुंडात तो थिजून त्याचा घट्ट खडक होतो. थिजलेल्या कवचाखाली असलेल्या लाव्ह्यात बराच काळ वायू साचत राहून अखेर त्याचा दाब इतका वाढतो की, वरच्या कवचाच्या ठिकऱ्या उडवून फार मोठ्या प्रमाणात स्फोटक उद्रेक होतो. घनीभूत लाव्ह्याच्या कवचाचे लहान मोठे तुकडे आणि वायू यांचा प्रचंड लोट आकाशात खूपच उंच उसळून त्याचा फूलकोबीसारखा माथ्याशी विस्तारणारा ढग बनतो. हा ढग काळा दिसतो. दीर्घकाल निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीतून जेव्हा पुन्हा नव्याने उद्रेकाची सुरुवात होते तेव्हाचा उद्रेक व्हल्कॅनी प्रकाराने होतो. या उद्रेकाने नळीच्या तोंडाशी असलेला अडथळा उडवून देऊन नळी मोकळी करण्याचे कार्य होते.

व्हीस्यूव्हिअसी प्रकार :

हा व्हल्कॅनी प्रकाराचाच पण अधिक उग्र स्फोटक आविष्कार आहे. दीर्घकालापर्यंत बाह्यतः निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीत नळीच्या खाली असणाऱ्या शिलारसातील वायूंचे प्रमाण व दाब वाढत वाढत इतके वाढते की, शेवटी नळीचे तोंड उडवले जाऊन अत्यंत उग्र स्फोटक रीत्या खालचा तप्त शिलारस बाहेर भिरकावला जातो. शिलारसावरील दाब एकदम कमी झाल्यामुळे त्यातील वायू मुक्त होऊन शिलारसाचे रूपांतर फेसाळ लोटात होते. हा लोट आकाशात खूप उंचीपर्यंत चढून त्याचा माथा विस्तारतो. फुलकोबीसारख्या आकाराचा हा विस्तारणाचा ढग तळपत्या शिलारसाच्या सूक्ष्म थेंबांमुळे प्रकाशमान झालेला असतो. व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या १९०६ सालच्या स्फोटक उद्रेकात वायूचा स्तंभ १० किमी. उंचीपर्यंत उसळला होता व सतत २० तासांपर्यंत वायूचा लोट बाहेर येत होता.या वायूच्या लोटामुळे ४५० मी. व्यासाचे नळीसारखे भोक पोखरले गेले.

प्लिनी प्रकार : 

हा व्हीस्यूव्हिअसी प्रकाराचा पण अत्यंत उग्र स्वरूपाचा स्फोटक उद्रेक आहे. या प्रकारात वर उसळणारा वायूचा लोट कित्येक किमी. उंच चढून विस्तारतो, त्यामुळे आसपासच्या विस्तृत प्रदेशात राखेचा वर्षाव होतो. व्हीस्यूव्हिअसच्या इ. स. ७९ सालच्या उग्र स्फोटक उद्रेकाचे वर्णन धाकटे प्लिनी यांनी लिहून ठेवले आहे, त्यावरून हे नाव दिले आहे. या उद्रेकात पाँपेई व हर्क्यूलॅनियम ही दोन मोठी शहरे नष्ट झाली व याच उद्रेकाचे जवळून निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात थोरले प्लिनी (धाकट्या प्लिनींचे चुलते) यांचा अंत झाला.

पेली प्रकार :

या उद्रेकात लाव्ह्याचा दाटपणा आणि वायूंची स्फोटकता यांची परमावधी होते. नळीच्या वरच्या भागात थिजून घट्ट झालेल्या लाव्ह्याचे टोपण इतके जाड झालेले असते की, खालच्या बाजूस लाव्ह्यात साचत असलेल्या वायूला ते उडवून देणे अशक्य होते. वरच्या बाजूने सुटकेचा मार्ग न उरल्याने वायूने भारलेला शिलारस नळीच्या बाजूला भेग पाडून तेथून बाहेर वाट काढतो व उतारावरून तप्त शिलारसाचे लोढें खाली वाहू लागतात. शिलारस बाहेर पडताच त्यातील वायू मुक्त होऊन त्याचा फेसाळ प्रवाह बनतो. या प्रवाहाच्या खालच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या वायूंचा वंगणासारखा उपयोग होऊन घर्षणरहित झालेल्या उतारावरून शिलारसाचे अतितप्त फेसाळ लोंढे प्रचंड वेगाने खाली धाव घेतात. क्वचित प्रसंगी त्यांचा वेग ताशी १६० किमी.पर्यंत जातो. उतारावरून वेगाने धाव घेणारे हे लोंढे काळे वा तळपते (प्रकाशमान) असतात. त्यांना ‘न्ये आर्दांत’ असे फ्रेंच नाव आहे. मार्टिनिक बेटावरील माँ पले या ज्वालामुखीचा १९०२ मध्ये अशा प्रकारचा उद्रेक होऊन त्यात पायथ्याचे ३० हजार वस्तीचे सेंट पिअरे हे शहर काही क्षणांत बेचिराख झाले.


उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात.

 1. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
 2. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा., इटलीतील व्हेस्‍ाुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.
 3. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा., टांझानियातील किलीमांजारो.

ज्वालामुखीचे परिणामः

 1. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते.
 2. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात.
 3. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
 4. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते.
 5. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात.
 6. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते.
 7. मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.

भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता; परंतु फेब्रुवारी २०१७ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आह

पृथ्वी: अंतर्गत हालचाली

भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होते. भूपृष्ठांंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थांतून प्रचंड
प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जालहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. अंतर्गत भू-हालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपांवर आधारित केले जाते.

अंतर्गत भू-हालचालींचे वर्गीकरण

अ.क्र. वर्गीकरणाचा आधार हालचाली
गती (अ) मंद भू-हालचाली (सातत्याने होणाऱ्या)
उदा., पर्वत व खंडांची निर्मिती.
(ब) शीघ्र भू-हालचाली (घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या)
उदा., भूकंप, ज्वालामुखी.
दिशा (अ) क्षितिजसमांतर भू-हालचाली.
(ब) ऊर्ध्वगामी, अधोगामी भू-हालचाली.
भूरूपे (अ) खंडजन्य (भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या)
(ब) पर्वतजन्य (वलीकरण, प्रस्तरभंग क्रिया)

मंद भू-हालचाली 

मंद भू-हालचालींचे भूकवचावर पर्वतनिर्मिती व खंडनिर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे सांगता येतील.

पर्वतनिर्माणकारी हालचालीः

वली पर्वत

पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गंुतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत.

गट पर्वत

अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून आेळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार  होतात. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा
माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्यांचे उतार तीव्र असतात. उदा., युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. भारतातील मेघालय पठार देखील अशाच पद्‌धतीने तयार झाले आहे.

खचदरी

कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदा., भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील ऱ्हाईन नदीची खचदरी इत्यादी.

खंडनिर्माणकारी हालचालीः

मंद भू-हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते, म्हणून या भू-हालचाली खंडनिर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते; परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भू-भाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागरतळाचा भाग बनतो.

शीघ्र भू-हालचाली

भूकंप

ज्वालामुखी

खडक व खडकांचे प्रकार

पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच (शिलावरण) कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे. खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. भूपृष्ठावर व त्याखालीसुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्येसिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. यांशिवाय इतरही खनिजे असतात.

खडकांचे प्रकार

निर्मितीप्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

 1. अग्निजन्य खडक /अग्निज खडक/मूळ खडक
 2. गाळाचे खडक /स्तरित खडक
 3. रूपांतरित खडक

अग्निजन्य खडक

ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस (मॅग्मा) आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्‍यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.

अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अतंर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य
खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्रपठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले अाहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे.

प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.

गाळाचे खडक /स्तरित खडक

तापमानातील सतत होणाऱ्या फरकांमुळे खडक तुटतात. खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशाप्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध हाेतात व त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात.

गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. स्तरित खडकांमधे गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारणतः गाळाचे खडक सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म (शेल), प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात.

राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लालकिल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते.

रूपांतरित खडक

पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू-हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते. म्‍हणजेच खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकांत जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक वजनाला जड व कठीण असतात.

आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला हाेता.  मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्‍तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृष्‍य फार मनोवेधक असते.

अ.क्र. मूळ खडक रूपांतरित खडक
ग्रॅनाईट (अग्निजन्य) नीस
बेसाल्ट (अग्निजन्य) ॲम्फिबोलाईट
चुनखडक (स्तरित) संगमरवर
कोळसा (स्तरित) हिरा
वाळूचा खडक (स्तरित) क्वार्टझाईट
पंकाश्म (शेल) (स्तरित) स्लेट

 

भूकंप

भूकंप म्हणजे भूपृष्ठाला बसणारे हादरे. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने तणाव उत्पन्न होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसला म्हणजे धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होऊन ती सभोवार पसरतात, त्यालाच भूकंप म्हटले जाते. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात.

भूकंपाची कारणे

 1. भूपट्ट सरकणे.
 2. भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
 3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
 4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
 5. ज्वालामुखींचे उद्रेक होणे.

भूकंपनाभी व अपिकेंद्रः

भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो, त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात. या केंद्रातून
विविध दिशांना ऊर्जालहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वांत प्रथम पोहचतात, (म्हणजेच भूकंपनाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वांत जवळचे ठिकाण) तेथे भूकंपाचा धक्का सर्वांत प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते.

भूकंप लहरी

भूकंपनाभीकडून ताण मुक्त झाल्यावर, मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे तीन प्रकार होतात.

प्राथमिक लहरी (Primary or ‘P’ Waves)

भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात, त्यामुळे या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे-मागे हलतात.

दुय्यम लहरी (Secondary or ‘S’ Waves)

प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते. या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात; परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

भूपृष्ठ लहरी (Surface or ‘L’ waves)

प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत (अपिकेंद्र) येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात.

भूकंपाचे परिणाम 

 1. जमिनीला तडे पडतात.
 2. भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
 3. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा., विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.
 4. काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
 5. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
 6. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
 7. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
 8. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.
 9. संदेशवहन व्यवस्था कोलमडते.

पर्जन्य

वातावरणातील बाष्प सांद्रीभवनाच्या क्रियेने दंव, दहिवर, धुके, पर्जन्य, हिमवृष्टी या स्वरूपात दिसू लागते त्यावेळी त्याला पर्जन्य किंवा वृष्टी असे म्हणतात. वृष्टीची ही विविध रूपे हवामानाच्या दृष्टीने व सजीवांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. वृष्टीची ही भिन्न रूपे कधी जमिनीवर, कधी हवेत तर कधी उंच वातावरणात दिसून येतात. त्यांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

दव (Dew) आणि दहिवर (Frost)

पहाटेच्या वेळी विशेषत: हिवाळयातील रात्री पाण्याचे थेंब किंवा जलकण वनस्पती, लोखंडी वस्तू किंवा जमिनीवर दिसतात यांना दव असे म्हणतात. हिवाळयात रात्रीमान मोठे असते. त्यामुळे उष्णतेचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी भूपृष्ठाजवळ तापमान एकदम कमी होते. वनस्पती, जमीन, लोखंडी वस्तू सभोवतालच्या हवेपेक्षा जास्त थंड झालेल्या असतात. परिणामी भोवतालच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व जलकणांची निर्मिती होते. हे जलकण या वनस्पती, लोखंडी वस्तू व जमिनीवर जलद निर्माण होतात. यांना दव असे म्हणतात. दव निर्माण होण्यासाठी दवांक नेहमी गोठण बिंदूच्या वरती असावा लागतो. दवामुळे वनस्पती व पिकांना फायदा होतो. विशिष्ट परिस्थितीत तापमानाची पातळी (संपृक्ततेची पातळी) किंवा दवांक जर गोठणबिंदूखाली असेल तर संक्रमण (Sublimation) घडून येते. म्हणजेच बाष्पाचे रूपांतर हिमकणात होते. या विविध वस्तूंवर थिजलेल्या/गोठलेल्या हिमकणांनाच दहिवर (Frost) असे म्हणतात. दहिवराच्या निर्मितीसाठी दवांक नेहमीच गोठण बिंदूच्या खाली असावा लागतो. दहिवर हे पिकांसाठी व वनस्पतींसाठी नुकसानकारक मानले जाते. जमिनीलगत वाहनारे बाष्प किंवा जलबिंदू लोखंडी खांब, विद्युतवाहक तारा, लोखंडी पत्रे, वनस्पती यांच्या संपर्कात येते व एकदम गोठते. हे गोठलेले जलबिंदू म्हणजेच ‘राईम’ (Rime) होय. विशेषत: समशितोष्ण कटिबंधात मोठ्या प्रमाणात राईची निर्मिती होते.

हिम (Snow) व गारा (Hoil)

वातावरणातील किंवा हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन सुरू झाल्यावर अभिसरण प्रवाहांमुळे (Convectional Currents) जलकण वारंवार वातावरणात उंच फेकले जातात. तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते व जलकणांचे रूपांतर हिमकणात होते. ही क्रिया मोठ्या प्रमाणात घडते व हिमवृष्टी होते. भूपृष्ठावर अनेक वेळा हिमवृष्टी होऊन हिमसंचय होतो. तेंव्हा त्यास हिम (Snow) म्हणतात. हिमकणांचे संचयन होऊन मोठ्या आकाराचे हिमखडे तयार होतात व पर्जन्याबरोबर भूपृष्ठावर येतात. तेंव्हा त्यांना ‘गारा’ (Hoil) असे म्हणतात. उर्ध्वगामी हवेच्या प्रवाहांमुळे पाऊस पडू लागतो. हे पावासाचे थेंब या प्रवाहांमुळे वारंवार उंच वातावरणात फेकले जातात. त्यावेळी हे जलकण हिमकणात रूपांतरीत होतात. असे हिमकण एकत्र येऊन हिमखडे बनतात. ते वातावरणात तरंगू शकत नाहीत. ते पावसाबरोबर भूपृष्ठावर येतात. तेंव्हा त्यास गारा किंवा गारांचा पाऊस असे म्हणतात. गाराचा वर्षाव फळबागा, पिके यांच्यासाठी हानीकारक असतो. तर जनावरे व मानवासाठीही तो नुकसानकारक ठरतो.

धुके (Fog)

रात्रीच्या वेळी विशेषत: हिवाळयातील रात्री मोठ्या प्रमाणात उष्णतेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ अधिक प्रमाणात थंड होते. या वेळी भूपृष्ठालगतचा वातावरणाचा तळाचा थर थंड होतो. परिणामी हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व भूपृष्ठालगत सूक्ष्म जलकणांची निर्मिती होते. यालाच धुके म्हणतात. धुके म्हणजेच भूपृष्ठालगतचे ढग होय. धुक्यामुळे वातावरणातील दृष्यतेवर (Visibility) परिणाम होतो. वृष्टीतील इतर घटकांच्या मानाने धुके कमी महत्त्वाचे असले तरी ते सर्वात जास्त अपायकारक व हानीकारक मानले जाते. दाट धुक्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक यामध्ये अडथळा निर्माण होतो. वनस्पती व पिकांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. दाट धुक्यामुळे मैदानी खेळ व मानवी व्यवहारावरही परिणाम होतो. दाट धुके (Fog) दृष्यता १ कि.मी., विरळ धुके (mist) दृष्यता १ ते २ कि.मी., हलके धुके (Haze) दृष्यता २ ते ५ कि.मी. असे धुक्याचे प्रकार केले जातात. तर शहरी भागावर धुर व धुके मिळून धुरके (Smog) निर्माण होताना दिसते. धुक्यामुळे जीवीत हानी घडून येते. धुके बहुतेक वेळा पहाटेच्या वेळी पडते व सुर्योदयानंतर कांही वेळाने तापमान वाढू लागल्यावर नाहीसे होते. निर्मितीनुसार धुक्याचे पुढील प्रकार केले जातात.

अ) विसर्जन धुके (Radiation Fog)

दिवसभर मिळालेल्या सौरशक्तीचे रात्रीच्या वेळी विसर्जन होते. पहाटेच्या वेळी तापमान एकदम कमी होते व वातावरणातील बाष्पाचे जल कणात रूपांतर होते. यालाच विसर्जन किंवा उत्सर्जन धुके म्हणतात. डोंगराळ भागात उत्सर्जन धूके मोठ्याप्रमाणात निर्माण होते.

ब) अभिवहन धुके (Advaction Fog)

भूखंड व महासागरांच्या थंड पृष्ठभागांवरून उष्ण बाष्पयुक्त वायुराशी वाहत जाताना थंड होते. तिच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन घडून पृष्ठभागावर जलकणांची निर्मिती होते व अभिवहन धुके निर्माण होते. समुद्रकिनारी भागात या प्रकारचे धुके सारखे पहावयास मिळते. तसेच उष्ण व शीत समुद्र प्रवाहांच्या एकत्र येण्याच्या प्रदेशात अभिवहन धुके आढळते. उदा. न्यु फाऊंडलँड बेटांजवळ गल्फस्ट्रीम (उष्ण) व लॅब्रॉडोर (शित) समुद्रप्रवाहांमुळे धुके निर्माण होते.

क) सीमांत धुके (Front Fog)

समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशात दोन भिन्न गुणधर्माच्या (उष्ण व शित) वायूराशी एकत्र येऊन आघाडी (Front) निर्माण होते. यालाच वायूरांशींची सीमा म्हणतात. उष्णवायूराशी थंड वायूराशीवर आरूढ झाल्यास सांद्रीभवन घडून येते व धुके निर्माण होते. यालाच सीमांत धुके म्हणतात. समशितोष्ण कटीबंधात किंवा मध्य अक्षांशात सीमांत धुके मोठ्याप्रमाणात व वारंवार निर्माण होते. समशितोष्ण कटिबंधीय आवर्तांच्या वेळी देखील सिमांत धुक्याची निर्मिती होते.

ड) वाफ धुके (Steam Fog)

उष्ण समुद्र प्रवाहावरून थंड वारे वाहत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन घडून येते व प्रचंड प्रमाणात वाफेची निर्मिती होते. यालाच वाफ धुके म्हणतात. उच्च अक्षांशीय प्रदेशात म्हणजेच शीत कटीबंधात समुद्र भागांवर हे वाफधुके मोठ्या प्रमाणात निर्माण होते. म्हणूनच याला ‘सागरी धुर’ (Sea Smoke) असेही म्हटले जाते. उत्तर ध्रुवाजवळील आर्क्टिक महासागरावर हजारो चौरस कि.मी. क्षेत्रात सुमारे दोन कि.मी. उंच वातावरणात हे धुके आढळून येते. थोडक्यात पृथ्वीवर धुक्याची निर्मिती भूभागांपेक्षा जलभागांवर जास्त प्रमाणात होते. समशितोष्ण व शीत कटिबंधीय प्रदेश, डोंगराळ प्रदेशातही धुके वारंवार निर्माण होते. उष्ण व शीत समुद्रप्रवाह जेथे एकत्र येतात त्या प्रदेशातही मोठ्या प्रमाणात धुके आढळते. ऋतृंचा विचार करता उन्हाळयाच्या तुलनेत हिवाळयात जास्त प्रमाणात धुक्याची निर्मिती होताना दिसते.

५) ढग किंवा मेघ (Clouds) :

वातावरणात वेगवेगळया उंचीवर हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून बाष्पाचे रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होते हा जलकणांचा किंवा हिमकणांचा समुह किंवा समुच्चय म्हणजेच ‘ढग किंवा मेघ’ होय. ढगांचा उल्लेख ‘उंच वातावरणातील धुके’ असाही केला जातो. हवेचे उर्ध्वगामी प्रवाह ढगांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे मानले जातात. सर्व ढग एकसारखे असत नाहीत. कांही ढग तंतूमय, दोऱ्यासारखे, स्तरांचे, ढिगांचे तर कांही पसरट, तुकड्यांचे, लहान किंवा आवाढव्य आकाराचे असतात. त्यांच्या वेगवेगळया रंगछटा असतात. उदा. पांढरे, सोनेरी, निळे, तांबडे, काळे इ. कांही ढग अति उंचावर तर कांही अगदी भूपृष्ठाजवळ कमी उंचीवर आढळतात. १९३२ साली आंतरराष्ट्रीय मोसम विज्ञान परिषद (International Metrological Council) यांनी केलेले ढगांचे वर्गीकरण सर्व जगभर प्रमाण मानले जाते. ढगांची उंची व त्यांनी वेगवेगळी वैशिष्ट्ये यांच्या आधारे ढगांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले आहे.

अतीउंचीवरील मेघ (High Altitude Clouds)

हे ढग ६ ते १२ कि.मी. उंचीवर तयार होतात. या गटात पुढील प्रमुख ढगांचा समावेश होतो.

सिरस मेघ (Cirrus Clouds)

वातावरणात सर्वाधिक उंचीवर हे ढग आढळतात. यांची निर्मिती हिमकणांपासून झालेली असते. पिजलेल्या कापसाप्रमाणे, पांढऱ्या व सोनेरी रंगाचे हे ढग असतात. यांच्यातून सुर्यप्रकाश आरपार जात असल्याने त्यांची सावली पडत नाही.

सिरो-क्युुलस मेघ (Cirro-Cumulus Clouds)

सिरस व क्युुलस ढगांपासून यांची निर्मिती होते. आकाशात उंचीवर पसरलेल्या अवस्थेत असतात. कधी कधी हे ढग पाण्यावरील तरंगाप्रमाणे भासतात. पांढऱ्या रंगाचे चकाकणारे हे ढग हिमकणांपासून बनलेले असतात. सुर्यप्रकाश यांच्यातून जात असल्याने यांची सावली पडत नाही.

सिरो-स्ट्रॅटस मेघ (Cirro-stratus clouds)

सिरस व स्ट्रॅटस ढगांपासून यांची निर्मिती होते. हे ढग सर्व आकाश व्यापतात. त्यांच्यामुळे आकाशाला दुधाळ रंग प्राप्त होतो. यांच्यात हिमकणांचे प्रमाण जास्त असल्याने यांचीही सावली पडत नाही. परंतू यांच्यामुळे चंद्र व सुर्याला खळी (Halo) पडतात. हे ढग वादळी हवेची सुचना देतात.

मध्यम उंचीवरील मेघ (Medium Altitude Clouds)

हे ढग २ ते ६ कि.मी. उंचीवर तयार होतात. यामध्ये अल्टो-स्ट्रेटस व अल्टो-क्युुमुलस मेघांचा समावेश होतो.

अल्टो-स्ट्रेटस मेघ (Alto-stratus clouds)

मध्यम उंचीवरील वातावरणात वेगवेगळया थरांच्या स्वरूपात आढळतात. जलकणांचे बनलेले हे ढग दाट निळसर-काळया रंगाचे असतात. यांच्यातून सुर्य, चंद्र अस्पष्ट दिसतात या ढगांपासून विस्तृत प्रदेशात पाऊस पडतो.

अल्टो-क्युुमुलस मेघ (Alto-cumulus clouds)

मध्यम उंचीवरील उभ्या विस्ताराचे व प्रचंड आकाराचे हे ढग घुटाकृती दिसतात. जलकणांनी बनलेले हे ढग काळया रंगाचे असल्याने चंद्र, सुर्य झाकले जातात तसेच या ढगांची गडद सावली पडते. यांच्या पासून थोड्या प्रदेशात पण भरपूर पाऊस पडतो.

कमी उंचीवरील मेघ (Low Attitude Clouds)

हे ढग भूपृष्ठापासून २ कि.मी. उंची पर्यंत तयार होतात. यामध्ये पुढील प्रकारच्या ढगांचा समावेश होतो.

स्ट्रॅटो-क्युुलस मेघ (Strato-cumulus clouds)

स्तरांचे व अवाढव्य आकाराचे हे ढग सिरस व क्युुलस ढगांपासून तयार होतात. कमी उंचीवरील हे मेघ पाण्याने किंवा जलकणांनी भरलेले असतात. यांच्या पासून भरपूर पाऊस पडतो. काळया रंगांच्या या ढगांपासून चंद्र, सुर्य दिसत नाहीत. यांची गडद सावली पडते.

स्ट्रॅटस मेघ (Stratus clouds)

कमी उंचीवरील हे ढग दाट धुक्याचे व विविध स्तरांचे बनलेले असतात. एकावर एक स्तरांची रचना यांध्ये स्पष्टपणे पहावयास मिळते. यांच्या पासून रिमझिम पाऊस पडतो.

निंबो-स्ट्रॅटस मेघ (Nimbo-stratus clouds)

आकार नसलेले, पाण्याने भरलेले, काळया रंगाचे हे ढग जमीनीवर उतरंड्या प्रमाणे भासतात. काळया रंगाचे हे ढग सुर्य, चंद्र यांना पूर्णपणे झाकून टाकतात. या ढगांपासून सतत व बराच वेळ पाऊस पडतो. बहुतेक वेळा यांच्यापासून हिमवर्षाव होण्याची शक्यता असते.

उभ्या विस्ताराचे मेघ (Vertical streached clouds)

हे ढग भूपृष्ठापासून ते १५ कि.मी. उंची पर्यंत आढळून येतात. या ढगांचा उभा विस्तार/आकार आडव्या विस्तारापेक्षा जास्त असल्याने त्यांना उभ्या विस्ताराचे ढग म्हणतात. यामध्ये पुढील ढगांचे प्रकार समाविष्ट होतात.

क्युुलस मेघ (Cumulus clouds)

वातावरणाच्या २ ते १५ कि.मी. अंतरात हे ढग आढळतात. सपाट तळ भाग व घुटाकार माथा यामुळे हे ढग कापसाच्या ढिगाप्रमाणे भासतात. त्यांच्या आडव्या विस्तारापेक्षा त्यांचा उभाविस्तार जास्त असतो. जोरदार उर्ध्वगामी हवेच्या प्रवाहांनी त्यांची निर्मिती होते. त्यांच्या पायथ्याकडील भागात जलकण तर माथ्याकडील भागात हिमकण असतात. पांढऱ्या रंगाचे हे ढग चांगल्या हवेचे निदर्शक मानले जातात. क्वचित प्रसंगी यांच्यापासून जोरदार वृष्टी होते व गारा पडतात. हे ढग क्युुलो-निंबस ढगांची पहिली अवस्था मानले जातात.

क्युुमुलो-निंबस मेघ (Cumulo-Nimbus Clouds)

सर्वात आवाढव्य व प्रचंड आकाराचे हे ढग जास्त तापमानाने निर्माण झालेल्या उर्ध्वगामी अभिसरण प्रवाहांपासून तयार होतात. डोंगराच्या आकाराचे हे ढग वेगवान सांद्रीभवनाने तयार होत असल्याने यांच्यात प्रचंड पाण्याचा साठा असतो. काळया रंगाचे हे ढग विजा, वारे यासह जोरदार वादळी पाऊस देतात. गारांसह पडणारा हा पाऊस कमी वेळेसाठी असतो. महाराष्ट्रात उन्हाळी पावसाच्या वेळी हे ढग दिसून येतात. जलचक्र व हवामानामध्ये ढगांची निर्मिती ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. सौरशक्तीचे परावर्तन, तापमान नियंत्रण, विकीरण, तापमान कक्षेचे नियंत्रण या सारख्या क्रियांध्ये ढगांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. सागरी भाग, विषुववृत्तीय प्रदेश, समशितोष्ण कटिबंधीय प्रदेश, पर्वतांचे वाताभिमुख उतार (Windward Slope) इ. प्रदेशात ढगांचे प्रमाण जास्त आढळते.

पर्जन्य किंवा पाऊस (Rainfall) :

वातावरणात हवेचे उर्ध्वगामी संचलन होत असते. अशा वेळी हवा बाष्पयुक्त असेल तर वातावरणात उंच गेल्यावर हवा थंड होऊ लागते व सांद्रीभवनाच्या क्रियेला सुरूवात होते. दवबिंदू किंवा दवांक किंवा बाष्प संपृक्ततेच्या पातळीपेक्षा तापमान कमी झाल्यास बाष्पाचे रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होते. हे जलकण व हिमकण हवेत तरंगताना जड होतात व भूपृष्ठावर अवतरतात. यालाच ‘पर्जन्य किंवा पाऊस’ म्हटले जाते. गोठण बिंदूच्या खाली जर सांर्द्रीभवन घडून आले तर बाष्पाचे रूपांतर हिमकणात होऊन हिमवर्षा होते. पर्जन्याचे मोजमाप मीलीमीटर, सेंटीमीटर, किंवा इंचात करतात. पर्जन्याच्या मोजमापासाठी ‘पर्जन्य मापक (Rain Guage)’ हे उपकरण वापरतात. एखाद्या प्रदेशातील समान पर्जन्य असलेली ठिकाणे जोडणारी रेषा ‘समपर्जन्य रेषा (Isohyte)’ म्हणून ओळखली जाते. या रेषेच्या सहाय्याने पर्जन्याचे वितरण समजण्यास मदत होते. एका समान प्रक्रियेने पर्जन्याची निर्मिती होते. बाष्पयुक्त हवा वातावरणात उंच जाते व थंड होते. ती हवा बाष्पसंपृक्त बनते व सांद्रीभवनाच्या क्रिया घडून येते. बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते किंवा जलकणात होते. किंवा हिमकणात होते व पर्जन्य भूष्टावर अवतरतो. परंतू हवा ज्या पध्दतीने वातावरणात उर्ध्वगमन करते व ज्या पध्दतीने तीचे सांद्रीभवन होते या वरून पावसाचे पुढील प्रकार सांगितले जातात.

आरोह किंवा अभिसरण पर्जन्य (Convectional Rainfall)

सुर्यापासून मिळालेल्या सौरशक्तीमुळे भूपृष्ठ तापते. त्यामुळे भूपृष्ठाला लागून असलेली हवा देखील तापली जाते ही हवा प्रसरण पावते, तिचे वजन कमी होते व वातावरणात उर्ध्वगमन करते. वातावरणात वरती गेलेल्या हवेची पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा येते. पून्हा ही हवा तापली जाते व वातावरणात उर्ध्वगमन करते. अशा प्रकारे हवेचे उर्ध्वगामी प्रवाह सुरू होतात यांना ‘अभिसरण प्रवाह (Convectional Currents)’ असे म्हणतात. उर्ध्वगमन करणारी हवा बाष्पयुक्त असेल तर ती बाष्पसंपृक्त बनते. तीची सापेक्ष आर्द्रता १००% बनते. याच हवेचे तापमान आणखी कमी झाल्यास सांद्रीभवनाची क्रिया घडून येते. जलकणांची निर्मिती होते व पावसाला सुरूवात होते. यालाच ‘अभिसरण किंवा आरोह पर्जन्य’ म्हणतात. आरोह पर्जन्याची निर्मिती जोरदार अभिसरण प्रवाहांुळेच होत असते. विषुववृत्तीय प्रदेशांध्ये म्हणजेच ५० उ. ते ५० द. अक्षांशांच्या दरम्यान दररोज दुपारी ढगांचा गडगडाट व विजांच्या चमचमाटासह हा पाऊस पडतो. आयनिक प्रदेशांध्ये उन्हाळयात अशा प्रकारचा पाऊस पडतो. हा पाऊस कमी विस्ताराच्या प्रदेशांध्ये पडत असला तरी तो कमी कालावधीत परंतू प्रचंड प्रमाणात असतो. क्युुलोनिंबस ढगांपासून पडणारा हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असत नाही. तो जमीनीची धुप घडविणारा असतो. याचा उपयोग भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठीही होत नाही कारण या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते.

प्रतिरोध पर्जन्य (Orographic Rainfall) :

जलाशयांवरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात डोंगर रांग, पर्वत किंवा उंच पठार आल्यास वाऱ्यांना विरोध किंवा प्रतिरोध होतो. हे वारे डोंगर किंवा पर्वतांचा अडथळा ओलांडून पुढे वाहण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी ते वातावरणात उंच जातात व थंड होतात. दवबिंदूवर पोहोचल्यावर त्यांची सापेक्ष आर्द्रता १००% होते. सांद्रीभवनाच्या क्रियेने ढगांची निर्मिती होते व पर्वतांच्या वातसन्मुख उतारांवर (Windward Slope) तसेच पर्वत माथ्यांवर जोरदार पर्जन्यवृष्टी होते. यालाच ‘प्रतिरोध पर्जन्य’ म्हणतात. भूपृष्ठाच्या/भूरूपांच्या अडथळयांुळे हा पाऊस पडतो म्हणून याला ‘भूरूपीय पाऊस (Relief Rainfall)’ असे ही म्हणतात. पर्वत रांगा ओलांडून गेल्यावर पर्वतांच्या विरूध्द बाजूवरून किंवा ‘वातविन्मुख उतारावरून (Leeward Slope)’ हे वारे खाली उतरू लागतात. या वाऱ्यातील बाष्प आगोदरच कमी झालेले असते. तसेच उतारावरून खाली उतरताना या वाऱ्यांचे तापमान वाढू लागते. त्यामुळे त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते. याचाच परिणाम म्हणून वातविन्मुख उतारांवर पाऊस पडत नाही व या प्रदेशांवर ‘पर्जन्य छायेच्या प्रदेशांची (Rain Shadow Area)’ निर्मिती होते. हा प्रदेश ‘कायम दुष्काळी प्रदेश (Permanent Draught Region)’ म्हणूनही ओळखला जातो. भारतीय उपखंडात पडणारा पाऊस याच प्रकारात मोडतो. तसेच जगातील सर्वात जास्त पाऊस या पध्दतीने पडतो. मेघालयाातील ‘मॉसीनराम’ या ठिकाणी जगातील सर्वात जास्त पाऊस या प्रकारे पडतो.

आवर्त पर्जन्य (Cyclonic Rainfall) :

कोणत्याही प्रकारच्या आवर्तात किंवा चक्रवातामध्ये ‘कमी भार केंद्र (Low Pressure Area)’ विकसित होते. या कमी भार केंद्राकडे बाजूच्या प्रदेशातील वारे आकर्षिले जातात. चक्राकार दिशेत व प्रचंड वेगाने फिरणारे हे वारे वातावरणात उर्ध्वगमन करतात. हे वारे जर बाष्पयुक्त असतील तर वातावरणात वरती गेल्यावर थंड होतात. दबबिंदूवर त्यांची सापेक्ष आर्द्रता १००% होते. म्हणजेच ते बाष्पसंपृक्त बनतात व सांद्रीभवनाच्या क्रियेने ढगांची निर्मिती होते व शेवटी पाऊस पडतो. यालाच ‘आवर्त किंवा चक्रवात पर्जन्य’ म्हणतात.

आवर्त पर्जन्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. यामध्ये उष्णकटिबंधीय आवर्त पर्जन्य व समशितोष्णकटिबंधीय आवर्त पर्जन्य यांचा समावेश होतो. उष्णकटिबंधीय आवर्त हे वादळी वारे असतात. यांच्यामध्ये किंवा केंद्रभागी असलेल्या कमीभार केंद्राकडे व उर्ध्वगामी दिशेने वारे जोराने वाहतात. हे उर्ध्वगामी वारे उंच जाऊन थंड होतात व विजा, गडगडाटासह जोराचा पाऊस देतात. ही वादळे सागरी भागावर निर्माण होतात. किनारवर्ती प्रदेशात ही वादळे मोठे नुकसान घडवतात. या वादळी पावसामुळे महापूर येतात व मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्त हानी होते. मान्सुनपूर्व व मान्सुनोत्तर काळात भारताच्या पूर्व व पश्चिम किनारी प्रदेशात म्हणजेच बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात ही वादळे निर्माण होतात. समशितोष्ण कटिबंधीय आवर्त हे वेगळया प्रकारचे असते. यामध्ये दोन वेगवेगळया गुणधर्माच्या म्हणजेच उष्ण व थंड तापमानाच्या वायूराशी विषुवतृत्तीय व ध्रुविय प्रदेशातून मध्य कटीबंधात एकत्र येतात. या वायूराशी समोरासमोर आल्यावर एकमेकांना ओलांडण्याचा प्रयत्न करतात. थंड वायूराशी जड असल्याने खाली भूपृष्ठाजवळ राहते तर उष्ण वायूराशी हलकी असल्याने वरती चढते. ही उष्ण वायूराशी बाष्पयुक्त असेल तर ती थंड होते व सांद्रीभवनानंतर मोठा पाऊस देते. या आवर्तात पडणारा पाऊस शांत व रिमझिम स्वरूपाचा तसेच जास्त विस्तारित प्रदेशात जास्त काळ असतो. ही सौम्य वादळे पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली प्रवास करतात व मध्य कटिबंधात बहुधा हिवाळयात पाऊस देतात. हा पाऊस विशेषत: खंडाच्या पश्चिम भागात पडतो.

 

आर्द्रता

तापमान, वायुभार, वारे यांच्या बरोबरीनेच वातावरणीय आर्द्रता हा देखील हवा व हवामानाचा एक महत्वाचा घटक मानला जातो.  दव, दहिवर, धुके, पर्जन्य यांची निर्मिती आर्द्रतेवरच अवलंबून असते. पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील वायू धुलीकरण या बरोबरच वातावरणात वायुरूप अवस्थेत अस्तित्वात असलेले पाणी किंवा बाष्प म्हणजेच आर्द्रता होय. 

वातावरणीय आर्द्रतेचे प्रमाण सर्वत्र सारखे असत नाही उष्ण कटीबंधात ते ४%, मध्य कटीबंधात ३%, तर वाळवंटी प्रदेश, ध्रुवीय प्रदेशात २% किंवा त्यापेक्षा कमी असते. तसेच एकूण वर्षभरात सर्व काळ आर्द्रता सारखी असत नाही. उन्हाळ्यात विशेषतः पावसाळ्यात आर्द्रता सर्वाधिक असते तर हिवाळ्यात सर्वात कमी असते म्हणजेच स्थळकाळानुसार आर्द्रता बदलताना दिसते. वातावरणातील ही आर्द्रता बाष्पीभवन (Evaporation) क्रियेवरती अवलंबून असते. ‘‘ज्या क्रियेमुळे पाण्याचे किंवा बर्फाचे रूपांतर वाफेमध्ये होते त्या क्रिेयेला बाष्पीभवन म्हणतात’’. किंवा ‘‘द्रवरूप किंवा घनरूप अवस्थेतील पाणी वायुरूप अवस्थेत परावर्तीत होते ती क्रिया म्हणजेच बाष्पीभवन होय.’’ बाष्पीभवनाची क्रिया हवेचे तापमान तसेच उपलब्ध जलाशय यावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या प्रदेशात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते तर तापमान कमी झाले असता हवेतील आर्द्रताही कमी होते. पृथ्वीतलावरील महासागर व समुद्र ही बाष्पाची प्रमुख उगमस्थाने आहेत. याशिवाय सरोवरे, तलाव, नद्या, विहीरी, अरण्ये यांच्यापासून देखील वातावरणाला आर्द्रतेचा पुरवठा होतो. वनस्पतींच्या पानाद्वारे होणारे बाष्पोत्सर्जन (Evapo- Transpiration ) बाष्पनिर्मितीसाठी उपयुक्त मानले जाते. जमिनींच्या तुलनेत जलभागावर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते म्हणूनच भूखंडाच्या तुलनेत महासागरावर आर्द्रता जास्त आहे. दोन्ही गोलार्धांचा विचार करता उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. आर्द्रतेच्या अक्षांशीय वितरणाचा विचार करता दोन्ही गोलार्धात १० अंश ते २० अंश अक्षांशामध्ये व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावक्षेत्रात आर्द्र्रतेचे प्रमाण सर्वाधिक असते. वातावरणातील जलचक्राद्वारे (Hydrological cycle) संपूर्ण सजीवसृष्टीला आर्द्रतेचा पुरवठा केला जातो. सूर्याच्या उष्णतेुळे पाण्याचे रूपांतर बाष्पात होते. उंच वातावरणात बाष्पाचे ढग तयार होतात. सांद्रीभवन (Condensetion) क्रियेद्वारा बाष्पाचे पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होते. वृष्टीच्या (Precipitation) रूपाने पाणी पुन्हा भूपृष्ठावर अवतरते. भूपृष्ठावरील हे पाणी नद्या, नाले, ओढे यांच्या स्वरूपात पुन्हा सागराला मिळते. म्हणजेच सागर विभागाकडून भूभागाकडे व भूभागाकडून पुन्हा सागरभागाकडे होणारे बाष्पाचे वहन’ जलचक्र म्हणून ओळखले जाते.

वातावरणातील बाष्प व तापमान यांचा सम स्वरूपाचा संबंध आहे. हवेचे तापमान वाढले असता हवेची बाष्प धारणाशक्तीही वाढते. तर तापमान कमी झाले असता हवेची बाष्पधारणाशक्ती कमी होते. आकारमानाची हवा विशिष्ट तापमानावर विशिष्ट वजनाचे बाष्प सामाऊन घेते. यालाच त्या हवेची ‘बाष्पधारणशक्ती’ असे म्हणतात. प्रत्यक्षात तेवढे बाष्प जर त्या हवेत असेल तर अशी हवा ‘बाष्प संपृक्त हवा’ म्हणून ओळखली जाते. बाष्पसंप्रक्त हवेचे तापमान कमी झाल्यास तिच्यातील ज्यादा बाष्पाचे सांद्रीभवन होते व बाष्पाचे रूपांतर पाण्यात किंवा बर्फात होते. वृष्टीच्या निर्मितीमध्ये विशेत: पर्जन्याचा निर्मितीसाठी ही क्रिया महत्त्वाची मानली जाते. विषुववृत्तीय प्रेदशांध्ये हवेचे तापमान नेहमीच जास्त असते. त्यामुळे तेथील हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त असते. अशा हवेचे तापमान कमी झाल्यास पाऊस पडतो. तर ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असते. त्यामुळे तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते. परिणामी अशा वातावरणात पावसाची शक्यता कमी होते.

आर्द्रतेचे प्रकार (Types of Humdidity)

ज्या प्रमाणे हवेला वजन असते त्याच प्रमाणे वायुरूप अवस्थेतील पाण्याला किंवा बाष्पालाही वजन असते. बाष्पाच्या या वजनी प्रमाणानुसार हवेतील बाष्पाचा किंवा आर्द्रतेचा उल्लेख केला जातो. हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्याच्या पध्दती वरूनच आर्द्रतेचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. यामध्ये निरपेक्ष आर्द्रता, विशिष्ट आर्द्रता व सापेक्ष आर्द्रता यांचा समावेश होतो. आर्द्रतेचे हे प्रकार पुढील प्रमाणे –

निरपेक्ष आर्द्रता(Absolute Humidity)

निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी, विशिष्ट आकारमानाच्या, विशिष्ट तापमानाच्या हवेतील बाष्पाचे वजनी प्रमाण होय. उदा. एखाद्या प्रदेशातील १ घनमीटर आकारमानाच्या, ५० सें.ग्रे. तापमानाच्या हवेध्ये ५ ग्रॅ बाष्प असल्यास ती त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता होय. निरपेक्ष आर्द्रता ही हवेचे आकारमान व तापमान यावरून ठरविली जाते. तापमानानुसार हवेचे आकारमान बदलत असल्याने आर्द्रतेमध्येही बदल होताना दिसतो. म्हणूनच हवामानाच्या अभ्यासात निरपेक्ष आर्द्रता कालबाह्य वाटू लागली व आर्द्रतेच्या मोजमापासाठी दुसरी पध्दती अस्तित्वात आली.

विशिष्ट आर्द्रता(Specific Humidity)

विशिष्ट तापमानाची व विशिष्ट आकारमानाची हवा वातावरणात उंच गेल्यास किंवा खाली आल्यास तिच्या तापमानात बदल होतो. परिणामी हवेचे आकारमानही बदलते. त्यामुळे त्या हवेच्या निरपेक्ष आर्द्रतेमध्ये बदल घडून येतो. हा बदल वातावरणाच्या व हवामानाच्या अभ्यासास योग्य नसतो. यावर उपाय म्हणून आर्द्रतेच्या मोजमापासाठी नवीन पध्दती वापरात आली.

‘‘एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वजनाच्या हवेत बाष्पाचे जेवढे वजनी भाग प्रमाण असते त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असे म्हणतात.’’ उदा. १००० ग्रॅ वजनाच्या हवेध्ये १००० ग्रॅ बाष्पाचे प्रमाण असल्यास ती त्या हवेची विशिष्ट आर्द्रता मानली जाते. विशिष्ट वजनाची हवा वातावरणात उंच गेल्यास किंवा खाली आल्यास तिच्या तापमानात बदल होतो. आकारमानात बदल होतो परंतू तिच्या वजनात बदल होत नाही परिणामी त्या हवेच्या विशिष्ट आर्द्रतेत बदल होत नाही म्हणूनच वातावरणाच्या व हवामानाच्या अभ्यासात विशिष्ट आर्द्रता महत्त्वाची मानतात.

सापेक्ष आर्द्रता(Relative Humdity)

विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारणशक्ती यांचे गुणोत्तर म्हणजेच सापेक्ष आर्द्रता होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच हवेची बाष्पधारणशक्ती यांची तुलना किंवा गुणोत्तर म्हणजेच ‘सापेक्ष आर्द्रता’ होय. सापेक्ष आर्द्रता अपूर्णांकात किंवा टक्केवारीत सांगितली जाते. बाष्पधारण शक्तीच्या अनुषंगाने किंवा तुलनेने निरपेक्ष आर्द्रता सांगीतली जाते. म्हणूनच तिला सापेक्ष आर्द्रता असे म्हंटले जाते. कोणत्याही प्रदेशाची किंवा ठिकाणाची सापेक्ष आर्द्रता शून्य किंवा ०% असत नाही. कारण हवा कितीही कोरडी असली तरी तिच्यात थोडातरी बाष्पाचा अंश असतोच. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले असता सापेक्ष आर्द्रताही वाढत जाते. हवेच्या कमाल बाष्पधारण शक्ती एवढे बाष्प जर त्या हवेध्ये सामावले गेले तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता १००% होते या हवेत या पुढे जास्त बाष्प सामावले जाऊ शकत नाही. अशा हवेला ‘बाष्पसंपृक्त हवा’ (Saturated Air) म्हणतात. जर बाष्पधारणशक्ती पेक्षा बाष्पाचे प्रमाण कमी असेल तर ती हवा असंपृक्त हवा (Unsaturated Air) म्हणून ओळखली जाते. एखाद्या प्रदेशातील निरपेक्ष आर्द्रता व तेथील हवेची बाष्पधारणशक्ती यांची तुलना करून त्या प्रदेशातील हवेची सापेक्ष आर्द्रता ठरवता येते.

म्हणजेच हवेच्या बाष्पधारणशक्तीपेक्षा कमी बाष्प जर त्या हवेध्ये प्रत्यक्ष सामावलेले असल्यास त्या हवेची सापेक्ष आर्द्रता १००% पेक्षा कमी असते. अशी हवा अजून जास्त बाष्प सामाऊन घेऊ शकते. तिला असंप्रक्त हवा असे म्हणतात. सापेक्ष आर्द्रतेचे मोजमाप करण्यासाठी ओल्या व कोरड्या फुग्याचा तापमापक (Wet and Dry Bulb Thermometer) वापरतात. तर सापेक्ष आर्द्रतेची सतत एक आठवड्याची नोंद ठेवण्यासाठी आर्द्रता लेखक (Hair Hygrograph) हे उपकरण वापरतात.

वातावरणाच्या व हवामानाच्या आभ्यासात आर्द्रता हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. हवेचे वातावरणीय अविष्कार जसे दंव, दहिवर, धुके, पर्जन्य इ. वातावरणातील आर्द्रते वर अवलंबून असतात.ध्रुविय व वाळवंटी प्रदेशांच्या तुलनेत विषुववृत्तीय प्रदेशात आर्द्रता जास्त असल्याने तेथे पर्जन्याचे प्रमाण जास्त आढळते. आर्द्रतेच्या प्रमाणावर त्या प्रदेशातील हवामान ठरत असते. सागरसानिध्यातील प्रदेशात आर्द्रता जास्त असल्याने तेथील हवामान उष्ण व दमट स्वरूपाचे असते तर खंडातर्गत भाग व वाळवंटामध्ये हवा कोरडी असल्याने तेथील हवामान उष्ण व कोरडे बनले आहे. पृथ्वीतलावरील वनस्पती व प्राणी या सजीवांच्या दृष्टीने तर आर्द्रता खुपच महत्त्वाची मानली जाते.

सांद्रीभवन / संघनन (Condensation) :

‘हवेतील किंवा वातावरणातील बाष्प, तापमान कमी झाल्यामुळे पून्हा जलकणात किंवा हिमकणात रूपांतरित होण्याची क्रिया म्हणजेच सांद्रीभवन किंवा संघनन होय.’ असंपृक्त हवा किंवा १००% पेक्षा कमी सापेक्ष आर्द्रता असलेली हवा तापमान कमी होत गेल्याने थंड होऊ लागते. परिणामी तिची बाष्पधारणशक्ती कमी कमी होत जाते. शेवटी ती हवा बाष्पसंपृक्त बनते. म्हणजेच तिची सापेक्ष आर्द्रता १००% होते. ‘‘असंपृक्त हवा ज्या विशिष्ट तापमानाच्या पातळीवर बाष्पसंपृक्त होते त्या तापमानाला किंवा तापमानाच्या पातळीला दवबिंदू किंवा दवांक (Dew Point) असे म्हणतात.’’

वातावरणीतील सांद्रीभवनाची क्रिया मुख्यत: दोन घटकांवर अवलंबून असते. यामध्ये तेथील हवेची सापेक्ष आर्द्रता व हवेचे तापमान. आर्द्रतायुक्त हवेचे तापमान कमी होत गेल्यास ती बाष्प संपृक्त बनते व मोठ्या प्रमाणात सांद्रीभवनाची क्रिया घडून येते. सांद्रीभवनाची क्रिया होताना वाफेचे रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होत असते. या जलकणांच्या किंवा हिमकणांच्या निर्मितीला ज्या धुलीकणांची आवश्यकता असते त्यांना ‘जलाकर्षक धुलीकण (Hygroscopic Nuclei) असे म्हणतात. सांद्रीभवनाची क्रिया होत असताना तापमानाची पातळी (दवबिंदू किंवा दवांक) जर गोठणबिंदूच्या वरती असेल तर बाष्पाचे रूपांतर (जलकणात) दव, धुके, ढग किंवा पाऊस अशा वेगवेगळया स्वरूपात होताना दिसते. आणि जर, सांद्रीभवनाची क्रिया होताना दवबिंदू किंवा दवांक गोठणबिंदूच्या (०० सें.ग्रे.) च्या खाली असेल तर बाष्पाचे रूपांतर हिमकणात होते व दहिवर गारा किंवा हिमवर्षा यांची निर्मिती होते.

सांद्रीभवनाच्या क्रियेसाठी हवेध्ये भरपूर आर्द्रता असावी लागते. तसेच त्या हवेचे तापमान कमी व्हावे लागते. तापमान कमी होण्याच्या स्वरूपावरून सांद्रीभवनाचे गतिशील व स्थितीशील असे प्रकार केले जातात.

गतीशील सांद्रीभवन (Dynamic Condensation)

तापमानाच्या बदलाला अनुसरून हवेचे उध्वगामी प्रवाह सुरू होतात भूपृष्ठाजवळ हवा तापते. प्रसरण पावते, वजनाने हलकी होते व वातावरणात उंच जाऊ लागते. त्यामुळे ती थंड होते व तिला दवांक प्राप्त होतो वर गेल्यावर ती थंड होते व तिला दवांक प्राप्त होतो व सांद्रीभवनाची क्रिया घडून येते. यालाच गतिशील सांद्रीभवन असे म्हणतात. उष्ण व थंड वायुराशींच्या एकत्र येण्यानेही उंच वातावरणात सांद्रीभवनाची क्रिया घडते. म्हणूनच याला उच्चवातावरणीय सांद्रीभवन (Uppar Atmospheric Condensation) असेही म्हणतात. या प्रकारच्या सांद्रीभवनाने ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते.

स्थितीशील सांद्रीभवन (Static Condensation)

रात्रीच्यावेळी विशेषत: हिवाळयात भूपृष्ठाच्या अत्याधिक उष्णता उत्सर्जनाने तापमान एकदम कमी होते. पहाटेच्या वेळी भूपृष्ठाकडील उष्णतेचे उत्सर्जन संपूष्टात येते व भूपृष्ठाजवळ तापमान दवांक पातळीवर पोहोचते. अशा वेळी भूपृष्ठाजवळ सांद्रीभवनाची क्रिया घडून येते आणि जलकण व हिमकणांची निर्मिती होते. यालाच स्थितीशील सांद्रीभवन किंवा भूपृष्ठीय सांद्रीभवन (Surface Condensation) असे म्हणतात. या प्रकारच्या सांद्रीभवनाने दंव, दहिवर, धुके यांची निर्मिती होते.

एकूणच हवामानाच्या दृष्टीने सांद्रीभवनाची क्रिया महत्त्वाची मानली जाते. सांद्रीभवनामुळेच वृष्टीची सर्व रूपे दंव, दहिवर, धुके, गारा, पर्जन्य, हिमवृष्टी यांची निर्मिती होते. सांद्रीभवनाची क्रिया घडून येताना मोठ्या प्रमाणात अनद्‌भूत उष्णता / गुप्त उष्णता (Latant Heat) वातावरणाला पूरवली जाते. या उष्णतेुळे हवेत अस्थिरता (Instability) निर्माण होते. या अस्थिरतेुळे वातावरणात अभिसरण प्रवाह (Convectional Current)) निर्माण होतात व पर्जन्याला पोषक स्थिती निर्माण होते.

वारे

वाहणारी हवा म्हणजेच वारे होय. तापमानातील बदलाला अनुसरून व्यस्त प्रमाणात वायूभार बदलत असता वायुभारात निर्माण होणारी असमानता नाहिशी करण्यासाठी जास्त भाराकडून कमी भाराच्या दिशेने हवा ढकलली जाते. व वाऱ्याची निर्मिती होते. वाऱ्याची दिशा व गती वायुभार उतारावार अवलंबून असते. वायुभार उतार हा समभार रेषा (Isobar) वर अवलंबून असतो. वारे नेहमी समभार रेषांना काटकोनात वाहतात. समभार रेषांतर कमी असेल तर वाऱ्यांचा वेग जास्त असतो आणि समभार रेषांतर जास्त असेल तर वाऱ्यांचा वेग मंद असतो. वारे नेहमी भूपृष्ठाजवळ व क्षितीजसमांतर दिशेस वाहतात. वाऱ्यांची दिशा ठरविण्यासाठी वातकुकुट किंवा वायुदिग्दर्शक (Wind Vane) तर वाऱ्यांची गती मोजण्यासाठी वायुवेगमापक (Anemometer) या उपकरणांचा वापर केला जातो. वाऱ्यांचा वेग ताशी नाविक मैल किंवा ताशी किलोमीटर या परिमाणांच्या सहाय्याने मोजला जातो.

वाऱ्यावर नियंत्रण करणारे घटक

वाऱ्यांची निर्मिती ही वायुभारातील क्षितिजसमांतर असमानतेुळे होत असते. वारे जास्त भाराच्या प्रदेशांकडून कमी भाराच्या प्रदेशांकडे वाहत असतात. परंतु वाऱ्यांची गती व दिशा यांना नियंत्रित करणाऱ्या इतर कांही शक्ती किंवा घटक कार्यरत असल्याने वाऱ्यांच्या गती व दिशा यामध्ये बदल होताना दिसतो. हे घटक पुढील प्रमाणे –

वायूभार उतार (Pressure gradient)

भूपृष्ठावरती जास्त भाराच्या प्रदेशांकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वायूभार कमी-कमी होत जातो. यालाच ‘वायूभार उतार’ असे म्हणतात. या वायूभार उताराच्या दिशेला अनुसरूनच वारे जास्त भाराकडून कमी भाराकडे वाहत असतात. वाऱ्यांची गती ही वायूभार उतारावार अवलंबून असते. समभार रेषांतर कमी असेल तर वायूभार उतार तीव्र असतो व वाऱ्यांचा वेग जास्त असतो. या उलट समभार रेषांतर जास्त असेल तर वायूभार उतार मंद असतो व वाऱ्यांचा वेग कमी असतो. म्हणजेच वाऱ्यांची दिशा व वेग वायूभार उतारावर अवलंबून असतात.

भूपृष्ठाचे स्वरूप (Nature of earth surface)

पृथ्वीचा पृष्ठभाग भूखंडे व महासागरांनी व्यापलेला आहे. भूखंडाचा पृष्ठभाग उंचसखल असून तो पर्वत, पठारे, मैदाने व नदीखोरी यांनी व्यापला आहे. मैदानी व पठारी प्रदेशांवर वाऱ्यांना फारसा अडथळा येत नाही यामुळे वाऱ्यांची दिशा सरळ व वाऱ्यांचा वेग जास्त होतो. तर पर्वतीय प्रदेशामध्ये वाऱ्यांची दिशा बदलली जाते व वेग कमी होतो. सागरी प्रदेशांवर वाऱ्यांना कोणताही अडथळा असत नाही. यामुळे वाऱ्यांचा वेग महासागरांवरती सर्वात जास्त असतो व वाऱ्यांची दिशा सरळ असते. किंवा वायुभार उताराला अनुसरून असतो.

केंद्रोत्सारी प्रेरणा (Centrifugal force)

कोणतीही वस्तू स्वतःभोवती फिरत असेल तर तिच्यामध्ये केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होते या भौतिकशास्त्रिय नियमानुसार पृथ्वीच्या परिवलनामुळे किंवा स्वपरिभ्रणामुळे केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होते. या प्रेरणेचा परिणाम, भूपृष्ठावर वाहणाऱ्या वाऱ्यावर होतो. विशेषतः ग्रहिय वारे, चक्रिय वादळे, आवर्त या प्रेरणेने प्रभावित होतात. या प्रेरणेचा शोध किंवा वाऱ्यांवरील परिणाम ‘कॉरिऑलीज’ या हवामान तज्ञाने शोधला म्हणून या प्रेरणेला ‘कॉरिऑलीज ची प्रेरणा’ (Coriolis Force) असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो व दोन्ही ध्रुवांकडे तो कमी कमी होत जातो. याचा परिणाम उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेवर होतो. हा परिणाम फेरेल या तज्ञाने शोधला म्हणून याला ‘फेरेलचा नियम’ म्हणतात. त्याच्या मते, ‘‘ उत्तर गोलार्धातील वारे आपल्या मूळ दिशेच्या उजव्या बाजूला वळतात तर दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या डाव्या बाजूला वळतात.

वाऱ्यांचे वर्गीकरण

भूपृष्ठावर कमी-जास्त भाराचे पट्‌टे (Pressure belts)आहेत व त्यांना अनुसरूनच वारे वाहत असतात. वारे व भारपट्‌टे यांचा सबंध सांगणारा नियम बाईज बॅलॉट या तज्ञाने सांगितला त्यांच्या मते, ‘‘वाऱ्याच्या दिशेकडे पाठ करून उभे राहिले असता, उत्तर गोलार्धात जास्त भार प्रदेश उजव्या बाजूला व कमी भार प्रदेश डाव्या बाजूला असतात तर दक्षिण गोलार्धात उजव्या बाजूला कमीभार प्रदेश व डाव्या बाजूस जास्त भार प्रदेश असतात.’’ वाऱ्यांची निर्मिती, स्वरूप, कालावधी व प्रदेश यावरून वाऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण केले जाते.

ग्रहीय वारे (Planetary winds) :

पृथ्वीवर एकूण चार जास्तभार व तीन कमीभार पट्‌टे निर्माण झाले आहेत. या भारपट्‌ट्यांना अनुसरून जास्त भाराच्या पट्‌ट्यांकडून कमी भाराच्या पट्‌ट्यांकडे विस्तीर्ण प्रदेशात नियमीत वारे वाहतात यांनाच ग्रहीय वारे असे म्हणतात. त्यांची विभागणी तीन प्रकारात केली जाते.

 1. व्यापारी वारे
 2. प्रतिव्यापारी वारे
 3. ध्रुविय वारे

व्यापारी वारे (Trade Winds) :

उत्तर व दक्षिण गोलार्धातील कर्क वृत्तीय व मकरवृत्तीय जास्त भार पट्‌ट्यांकडून विषुववृत्तीय कमी भार पट्‌ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ म्हणतात. हे वारे दोन्ही गोलार्धात २५ अंश ते ५ अंश अक्षांशाच्या दरम्यान वाहतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी जाणाऱ्या शिडांच्या जहाजांना सागरी प्रवासासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे म्हणूनच या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हटले आहे .

पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी प्रेरणेुळे या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून – पश्चिमेकडे असते. म्हणूनच यांना ‘ पूर्विय वारे’ (Eastliser) असे ही म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून – नैॠत्येकडे वाहतात म्हणून त्यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात या वाऱ्यांची दिशा आग्नेयकडून वायव्येकडे असल्याने त्यांना ‘आग्नेय व्यापारी वारे’ असे म्हणतात. बहुतांशी प्रदेशात व्यापारी वारे नियमीत वाहतात. विशेषतः समुद्रावर यांची दिशा व वेग यात सातत्य आढळते. यांचा वेग ताशी १० ते १५ नाविक मैल एवढा असतेा. जमिनीवर/ भूखंडावर यांचा वेग थोडासा मंद होतो व स्थानिक घटकांना अनुसरून दिशाही बदलते. व्यापारी वारे थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहत असल्याने त्यांच्या कडून पर्जन्याची शक्यता फारच कमी असते. परंतु योग्य परिस्थिती असल्यास खंडाच्या पूर्व किनार पहिला थोडाफार पाऊस पडतो. हिवाळ्यात हे वारे वेगाने व विस्तीर्ण प्रदेशावर वाहतात. आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात भारतीय उपखंडावरून वाहतात त्यावेळी त्यांना ‘ मोसमीवारे’ म्हणून ओळखले जाते.

प्रतिव्यापारी वारे (Anti- trade winds) :

उत्तर गोलार्धात कर्कवृत्तीय जास्तभार पट्‌ट्याकडून आर्क्टिकवृत्तीय कमी भार पट्‌ट्याकडे व दक्षिण गोलार्धात मकरवृत्तीय जास्त भार पट्‌ट्याकडून आंटार्क्टिकवृत्तीय कमी भार पट्‌ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. दोन्ही गोलार्धात हे वारे साधारणपणे ३५ अंश ते ६० अंश अंक्षांशाच्या दरम्यान वाहतात. दोन्ही गोलार्धात फेरेलच्या नियमानुसार हे वारे आपली मूळ दिशा बदलतात व साधारणपणे पश्चिमेकडून वाहतात म्हणूनच यांना ‘ पश्चिमी वारे’ (Westerlies) असेही म्हटले जाते. उत्तर गोलार्धात या वाऱ्यांची दिशा नैॠत्येकडून ईशान्येकडे असते म्हणून त्यांना ‘ नैॠत्य प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेला वाहतात म्हणून त्यांना ‘ वायव्य प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. प्रतिव्यापारी वारे विस्तिर्ण प्रदेशात व नियमीत वाहतात यांची दिशा व्यापारी वाऱ्यांच्या विरूद्ध असल्याने त्यांना ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशांकडून थंड प्रदेशांकडे वाहत असल्याने पर्जन्यासाठी पोषक स्थिती निर्माण होते व खंडाच्या पश्चिम भागात या वाऱ्यापासून पाऊस पडतो. समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तांवर या वाऱ्यांचा जास्त प्रभाव असतो. उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात हे वारे नियमीत वाहतात. म्हणूनच दक्षिण गोलार्धात या वाऱ्यांना ‘ शुर पश्चिमी वारे ’ (Brave west winds) म्हणतात. सागरावरून वाहताना यांचा वेग वाढत जातो. यामुळे दक्षिण गोलार्धात ४० अंश ते ६० अंश अक्षवृत्तात या वाऱ्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. दक्षिण गोलार्धात ४० अंश अक्षांशात त्यांना ‘ गरजणारे चाळीस’ (Roaring ) म्हणतात. ५० अंश अक्षांशात त्यांना ‘खवळलेले पन्नास’ म्हणतात. (Furious Fifties) तर ६० अंश द. अक्षांशात त्यांना ‘किंचाळणारे साठ’ (Screaming sixties) असे म्हणतात. उत्तर गोलार्धात ३० अंश उ. ते ३५ अंश उत्तर अक्षवृत्तात या वाऱ्यांपासून हिवाळ्यात पाऊस पडतो या प्रदेशांना ‘ भूमध्य सामुद्रीक हवामान प्रदेश ’ म्हणतात.

ध्रुवीय वारे (Polar Winds) :

भूपृष्ठावर देान्ही ध्रुवावर तापमान गोठणबिंदूच्या खाली असते परिणामी ध्रुवीय प्रदेश वर्षभर बर्फाच्छादनाखाली असतात. म्हणूनच येथे जास्तभार प्रदेश विकसीत झाले आहेत. या जास्तभार प्रदेशांकडून उपध्रुवीय कमीभार प्रदेशांकडे (आर्क्टिक व अंटार्क्टिक वृत्तीय कमीभार प्रदेश) वारे वाहतात. त्यांना ‘ ध्रुवियवारे ’ असे म्हणतात. दोन्ही गोलार्धात ६० अंश ते ८० अंश अक्षांशाच्या दरम्यान ध्रुवीय वारे वाहतात. ध्रुवीय वाऱ्यांची वाहण्यांची दिशा साधारण पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्याने त्यांना ‘ पूर्व ध्रुवीय वारे’ (Polar Easterlies)असे म्हणतात. उत्तर ध्रुवाजवळील वेगवान वाऱ्यांना नॉरेस्टर (Noreasters) म्हणतात. तर दक्षिण ध्रुवाजवळ यांना गेल (Gale ) असे म्हणतात.

विषुववृत्तीय शांत पट्‌टा (Doldrum) :

विषुववृत्तीय प्रदेशात ५ अंश उत्तर व ५ अंश दक्षिण अक्षवृतांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप असतात. परिणामी या प्रदेशात तापमान जास्त असते. हवा तापली जाते. प्रसरण पावते. व वजनाने हलकी होते. व हवेचे उर्ध्वगामी प्रवाह सुरू होतात. याचाच परिणाम म्हणून ‘ विषुववृत्तीय कमी भार पट्‌ट्यांची’ निर्मिती होते हाच प्रदेश ‘विषुववृत्तीय’ शांत पट्टा (Doldrum) म्हणून ओळखला जातो. दोन्ही गोलार्धातील ‘व्यापारी वारे’ (Trade winds) व दक्षिण गोलार्धातील ‘आग्नेय व्यापारी वारे ’ याच प्रदेशात एकत्र येतात. म्हणूनच हा प्रदेश ’ आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीय विभाग’ (Intertropical Convergence Zone) म्हणूनही ओळखला जातो.

अश्व अक्षांश (Horse Latitude)

विषुववृत्तीय प्रदेशात अत्याधिक तापमानाने वातावरणात उर्ध्वगामी झालेली हवा दोन्ही ध्रुवांच्या दिशेने वाहते व नंतर उत्तर गोलार्धात कर्क वृत्ताजवळ व दक्षिण गोलार्धात मकर वृत्ताजवळ पुन्हा भूपृष्ठावर उतरते. यामुळे दोन्ही गोलार्धात २५ अंश ते ३५ अंश अक्षांशाच्या दरम्यान जास्त भार प्रदेशांची निर्मिती झाली आहे. या अधोगामी हवेचे प्रवाह असलेल्या प्रदेशाला ‘ अश्व अक्षांश’ (Horse Latitude)असे म्हणतात या प्रदेशात हवेची क्षितीजसमांतर किंवा आडवी हालचाल असत नाही. पूर्वीच्या काळी युरोप व अमेरिका खंडातील व्यापार विशेषतः घोडयांचा व्यापार येथून चालत असे. वाऱ्या अभावी ही व्यापारी जहाजे कित्येक दिवस कर्क व मकर वृत्तीय जास्त भार पट्‌ट्यात अडकून पडत . जहाजांवरील चारा व अन्न- धान्य संपुष्टात आल्याने नाइलाजाने घोड्यांना समुद्रात सोडून द्यावे लागत असे म्हणूनच दोन्ही गोलार्धातील २५ अंश ते ३५ अंश अक्षांशातील प्रदेश ‘ अश्व अक्षांश’ (Horse Latitude) म्हणून ओळखला जातो.

नियतकालीक वारे (Periodical winds)

‘विशिष्ट प्रदेशांध्ये व विशिष्ट कालावधीमध्ये तसेच विशिष्ट दिशेने व विशिष्ट गतीने वाहणारे वारे म्हणजेच नियतकालीक वारे (Periodical winds) होय’ . हे वारे ॠतुमानानुसार वाहत असल्याने यांना ‘ॠुतूप्रमाणित वारे’ (seasonal winds) असेही म्हणतात.

या मध्ये –

 1. मोसमी वारे
 2. खारे व मतलई वारे
 3. डोंगरी व दरीतील वारे

यांचा समावेश होतो.

मोसमी वारे (Monsoon Winds) :

‘भूपृष्ठावर ॠतुनुसार (उन्हाळा, हिवाळा) नियमित वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे असे म्हणतात’. ‘मौसीम’(mausim) म्हणजेच ॠतू या अरेबीक शब्दापासून ‘मौसमी’ (Monsoon) या शब्दाची उत्पत्ती झाल्याचे दिसते. जमीन व पाणी यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे आहेत. जमीन अपारदर्शक, घनरूप व स्थिर तर पाणी पारदर्शक, द्रवरूप व अस्थिर आहे. यामुळे पाण्याची विशिष्ट उष्णता जमीनीपेक्षा अडीचपट जास्त आहे. यामुळे एकाच कालावधीत जमीन व पाणी यांचे तापमान व परिणामी वायुभार यात भिन्नता आढळते याचाच परिणाम म्हणून ‘ॠतुनुसार जमीनीकडून जलभागाकडे व जलभागाकडून जमीनीकडे वारे वाहू लागतात यांना मोसमी वारे म्हणतात’. मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीसाठी कांही विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये

 1. विस्तृत भूखंडाचा प्रदेश
 2. विस्तृत सागर सानिध्य
 3. आयनिक (Tropical) प्रदेशातील स्थान

इ. गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी एकत्रित व योग्य पद्धतीने अस्तित्वात असल्यास मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते. उदा. भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इ.

भारतातील मोसमी वारे (Indian monsoon)

विस्तृत भूखंड, विस्तृत सागर सानिध्य व आयनिक प्रदेशातील स्थान यांची योग्य पूर्तता भारतीय उपखंडात होते. उन्हाळ्यात वायव्य भारतात जास्त तापमानामुळे कमीभार प्रदेश निर्माण होतो. याच काळात हिंदी महासागरावर जास्त भार प्रदेश विकसीत झालेला असतो. हिंदी महासागरावरावरील जास्त भाराच्या प्रदेशाकडून वायव्य भारतातील कमीभार प्रदेशाकडे वारे आकर्षिले जातात. हे वारे विषुववृत्त ओलांडून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून वायव्य भारताकडे वाहू लागतात. यांनाच ‘उन्हाळी मोसमी वारे’ किंवा ‘नैॠत्य मोसमी वारे’ म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असल्याने भारतीय उपखंडात या वाऱ्यांपासून पाऊस पडतो. विशेषतः सह्याद्री पर्वतरांगा व पूर्वांचलमध्ये अतिवृष्टी होते. हिवाळ्यात तापमान व वायूभार उत्तर स्थितीमध्ये असतात. भारतीय उपखंडात तापमान कमी व वायूभार जास्त असतो. तर हिंदी महासागरावर तुलनेने तापमान जास्त व वायूभार कमी असतो. या कालावधीत भारतीय उपखंडावरील जास्तभार प्रदेशाकडून हिंदी महासागरावरील कमी भार प्रदेशाकडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना ‘ ‘हिवाळी मोसमी वारे’ परतणारे मोसमी वारे’ किंवा ‘ईशान्य मोसमी वारे’ असे म्हणतात. या वाऱ्यांमुळे तामीळनाडूच्या पूर्व किनारपट्‌टीला पाऊस पडतो. परंतु हे वारे कोरडे असल्याने भारताच्या इतर भागात पाऊस पडत नाही.

खारे वारे व मतलई वारे (Sea and Land Breeze)

जमीन व पाणी यांचे भौतिक गुणधर्म (Physical Proerties) वेगवेगळे आहेत. पाण्याची विशिष्ट उष्णता जमिनीपेक्षा अडीच पट जास्त आहे. याचाच परिणाम म्हणून जमीन व पाणी यांना तापण्यासाठी व थंड होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. परिणामी वायुभारात भिन्नता निर्माण होते व वाऱ्यांची निर्मिती होते. दैनिक तापमान भिन्नतेुळे खारे व मतलई वारे निर्माण होतात.

खारे वारे (Sea Breeze)

सुर्योदयानंतर सौरशक्तीमुळे उष्णता मिळू लागते. दिवसा सूर्याच्या उष्णतेुळे जमिनीचे भाग लवकर तापतात. तुलनेने पाणी/ जलभाग तापण्यासाठी वेळ लागतो. यामुळे जमिनीवर कमीभार व सागरावर जास्त भार प्रदेशांचीनिर्मिती होते. व दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहू लागतात यांना ‘खारे वारे’ असे म्हणतात. खारे वारे सकाळी १० ते ११ पासून रात्री ७ ते ८ वाजे पर्यंत समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. १ ते २ वाजेपर्यंत त्यांचा वेग जास्त असतो व नंतर तो कमी कमी होत जातो. या वाऱ्यांचा वेग ताशी १५ ते २० कि.मी. असतो.

मतलई वारे (Land Breeze)

सूर्यास्तानंतर भूपृष्ठाला मिळणारी उष्णता संपुष्टात येते. रात्र होताच दिवसा मिळालेल्या उष्णतेचे उत्सर्जन होऊ लागते. जमिनीच्या भागाकडून वेगाने उष्णतेचे उत्सर्जन होते व ते लवकर थंड होतात या उलट पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौतिक गुणधर्मांमुळे पाणी थंड होण्यासाठी वेळ लागतो. रात्रीच्या वेळी जमिनीवर कमी तापमान व जलभागावर तुलनेने जास्त तापमान असते. वायुभाराची स्थिती या उलट असते. जमिनीवर जास्त वायुभार व पाण्यावर/सागरभागावर कमी वायूभार असल्याने जमिनीकडून सागरभागाकडे वारे वाहू लागतात. समुद्र सानिध्यातील या रात्रीच्या वाऱ्यांनाच ‘मतलई वारे’ (Land Breeze) असे म्हणतात. मतलई वारे रात्री १० ते ११ पासून सकाळी ७ ते ८ वाजपर्यंत वाहतात. रात्री २ वाजेपर्यंत या वाऱ्यांचा वेग जास्त असतो हे वारे सरासरी ताशी १५ ते २० कि.मी वेगाने वाहतात.

खारे व मतलई वारे जमिनीवर सुारे २५ ते ३० कि.मी अंतरापर्यंत तर समुद्रावर ३५ ते ४५ कि.मी अंतरापर्यंत वाहतात. या वाऱ्यांच्या प्रभावामुळेच समुद्रसानिध्यातील प्रदेशांची तापमानकक्षा कमी असते व येथील हवामान सम स्वरूपाचे असते. म्हणजेच येथे उन्हाळे व हिवाळे फार कडक स्वरूपाचे असत नाहीत.

डोंगरी व दरीतील वारे (Mountain and Valley winds)

दैनिक तापमानाच्या भिन्नतेमुळे डोंगराळ प्रदेशात या वाऱ्यांची निर्मिती होते. डोंगरी वारे रात्रीच्या वेळी डोंगरावरून उताराला अनुसरून गुरूत्वीय प्रभावाने दरी प्रदेशाकडे वाहतात तर दरीतील वारे दरी प्रदेशाकडून डोंगर माथ्याकडे नियमीत परंतु विशिष्ठ वेळेत वाहतात.

डोंगरी वारे (Mountain winds)

प्रदेशाच्या उंचीला अनुसरून डोंगर माथे व दरी प्रदेशात दिवसा व रात्री भिन्नता आढळते. सूर्यापासून दिवसभर मिळालेल्या उष्णतेचे रात्री उत्सर्जन सुरू होते. डोंगर माथ्याचा भाग लवकर उष्णता उत्सर्जित करतो व लवकर थंड होतो. म्हणूनच डोंगरमाथे/ पर्वत शिखरांचे भाग ‘उत्सर्जन खिडकी’ (Radiation window) म्हणून ओळखले जातात. या उलट दरी प्रदेशातील हवेचे तापमान तुलनेने जास्त असते. परिणामी डोंगर माथ्यावर जास्त भार व दरीप्रदेशात कमी भार निर्माण होतो. रात्री डोंगर माथ्याकडून दरीप्रदेशाकडे वारे वाहतात. यांनाच ‘डोंगरीवारे’ (Mountain winds) असे म्हणतात. यांची दिशा उतारावरून खाली असल्याने यांना ‘अधोमुखी उतार वारे’ (Down slope winds) असेही म्हणतात.

दरीतील वारे (Valley winds)

सुर्योदयानंतर सर्वात प्रथम डोंगर माथ्यावर सूर्यकिरण पडतात व हे भाग लवकर तापू लागतात. दरी प्रदेशांच्या तुलनेत डोंगरमाथ्यावरील हवा लवकर तापते व येथे कमी भार प्रदेशांची निर्मिती होते.या प्रदेशांच्या तुलनेत दरीप्रदेशातील हवा थंड असते. परिणामी येथे जास्त वायूभार असतो. याचाच परिणाम म्हणून दिवसा दरीप्रदेशाकडून डोंगर माथ्याकडे वारे वाहू लागतात यांना ‘दरीतील वारे’ (Valley winds) असे म्हणतात. हे वारे उताराला अनुसरून वरती वाहत असल्याने यांना ‘उर्ध्वमुखी उतार वारे’ (upslope winds) असे म्हणतात.

स्थानिक वारे (Local winds)

पृथ्वीतलावर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट स्थानिक भौगोलिक परिस्थितीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. या वाऱ्यांना ‘स्थानिक वारे’ (Local winds ) असे म्हणतात. हे वारे ज्या प्रदेशावरून वाहतात त्या प्रदेशातील तापमान, आर्द्रता व पर्जन्य या हवेच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणतात. म्हणजेच त्या प्रदेशांच्या हवामानात बदल घडवून आणतात. म्हणूनच स्थानिक वारे देखिल एखाद्या प्रदेशाच्या हवामानाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.

जगातील कांही विशिष्ठ प्रदेशातून वाहणारे वारे पुढील प्रमाणे –

उष्ण वारे (Hot winds) 

अ.क्र. वाऱ्याचे नाव प्रदेश
1 फॉन युरोप( आल्पस)
2 चिनुक संयुक्त संस्थाने (रॉकिज)
3 सिरोक्को युरोप (इटली, ग्रीस)
4 खामसीन उत्तर आफ्रिका (इजिप्त)
5 हरमाटन गिनी (प. आफ्रिका)
6 लू, नॉर्वेस्टर भारत ( उ. मैदान)
7 सँटा ॲनास संयुक्त संस्थाने ( कॅलिफोर्निया)
8 बर्ग दक्षिण आफ्रिका
9 सेमुन इराण
10 ब्रिक फिल्डर्स ऑस्ट्रेलिया (व्हिक्टोरिया)
11 झोंडा अर्जेटीना
12 सोलॅनो प. युरोप( स्पेन)
13 कराबुरान मध्य आशिया ( अरेबियन वाळवंट)
14 सिमून मध्य आशिया ( अरेबियन वाळवंट)

 

 

 

थंड वारे (Cold winds)

अ.क्र. वाऱ्याचे नाव प्रदेश
1 बोरा ग्रिनलँड आंटार्क्टिका
2 ट्रॅाँटाने युरोप (ऑस्ट्रिया)
3 मिस्ट्रल युरोप (फ्रान्स)
4 पूर्गा मध्य आशिया (अरेबियन वाळवंट)
5 ब्लिझार्ड आर्क्टिक टुंड्रा( सैबेरीया, कॅनडा)
6 ग्रीगेल माल्टा (द. अमेरीका)
7 डिलीनॉस द. अमेरीका (अर्जेंटीना)
8 पन्परास ब्राझील, अर्जेंटीना
9 बुस्टर न्युझीलंड
10 गेल आंटार्क्टिका

 

जेट प्रवाह (Jet Steam) :

‘‘भूपृष्ठावरील सामान्य वाऱ्यांच्या प्रवाह चक्रावरती भूपृष्ठापासून ५००० ते १०,००० मीटर उंचीवरील उच्च वातावरणीय हवेचे प्रवाह म्हणजेच जेट प्रवाह (Jet Steam) होय.’’ दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन विमानांना पहिल्यांदा या जेटप्रवाहांचा अनुभव आला. जेट प्रवाह हे समुद्र प्रवाहांसारखेच असतात. यांची लांबी हजारो किलोमीटर्स असून जाडी २ ते ५ कि.मी. रूंदी २०० ते ५०० किलोमीटर्स असते. या प्रवाहांचा वेग ताशी २०० ते ५०० किलोमीटर्स असतो. उन्हाळ्यांच्या तुलनेत हिवाळ्यात या वाऱ्याचा वेग थोडा जास्त असतो. जेट प्रवाहांच्या निर्मितीची कारणे आजही निश्चित स्वरूपात स्पष्ट झालेली नाहीत. तरी देखील उच्च वातावरणातील वायूभार या प्रवाहांच्या निर्मितीस कारणीभूत असल्याचे मानले जाते. उच्च वातावरणास ध्रुवीय प्रदेशात कमीभार व विषुववृत्तीय प्रदेशात जास्त भार कार्यरत असतो. यातूनच जेट प्रवाहांची निर्मिती होते. या शिवाय विषुववृत्तीय वायुराशी व ध्रुवीय वायुराशीदेखील जेट प्रवाहांच्या निर्मितीस कारणीभूत आहेत. जेट प्रवाहांचे स्थान २५ अंश ते ३५ अंश अक्षांशाच्या दरम्यान आहे. दोन्ही गोलार्धात हे प्रवाह कार्यरत असतात. उच्च वातावरणात पश्चिमेकडून वाहणारे हे हवेचे प्रवाह नागमोडी किंवा वळणांनी वाहातात. उच्च वातावरणातील भूआवर्त वाऱ्यांशी (Geostrophic winds) यांचे बरेच साधर्म्य असते. जेट प्रवाहांचा परिणाम हवामानावर होताना दिसतो. विशेषतः मध्य कटीबंधातील (समशितोष्ण कटीबंधीय प्रदेश) प्रदेशांच्या हवामानावर यांचा प्रभाव जाणवतो. मध्य कटीबंधातील आवर्तांची निर्मिती, पर्जन्य, बर्फवृष्टी, धुके यावर जेट प्रवाहांचा परिणाम होतो.

वायूराशी (Air Masses)

‘विस्तृत लांबी, रूंदी व जाडी असलेला भूपृष्ठाजवळचा वातावरणाचा भाग म्हणजेच वायूराशी होय’. प्रचंड आकाराच्या हवेचा थर म्हणजेच वायूराशी होय. वायुराशींचा विस्तार हजारो कि.मी. लांब, हजारो कि.मी. रूंद व शेकडो कि.मी. जाड असतो. एवढ्या प्रचंड आकाराची हवा वाहू लागते. त्यावेळी त्यांना वायूराशी म्हणतात. वायूराशी ह्या त्यांच्या भौतिक गुणधर्मावरून ओळखल्या जातात. वायुराशींचे तापमान आर्द्रता हे वायू राशींचे मुख्य भौतिक गुणधर्म स्पष्ट करतात. या गुणधर्मावरच वायुराशींची स्थिरता अवलंबून असते. वायुराशींचे भौतिक गुणधर्म हे ती वायुराशी ज्या प्रदशोत निर्माण होते त्यावर अवलंबून असतात. उदा- विषुववृत्तीय प्रदेशात निर्माण होणारी वायुराशी उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशात निर्माण होणारी वायुराशी थंड असते. संपूर्ण वायुराशी मध्ये भौतिक गुणधर्म समान असतात.

उत्पत्ती प्रदेशापासून वायूराशी वाहू लागल्यावर त्यांचे भौतिक गुणधर्म बदलतात. तसेच त्या ज्या प्रदेशातून वाहतात. त्या प्रदेशांच्या हवामानावरही परिणाम करतात. म्हणूनच वायुराशींचा अभ्यास हवामानशास्त्रात महत्वाचा मानला जातो. उदा. ध्रुवीय थंड वायुराशी विषुववृत्ताकडे वाहू लागल्यावर तीचे स्वतःचे तापमान वाढू लागते तर ती ज्या प्रदेशावरून वाहते त्या प्रदेशाचे तापमान कमी करते.

उत्पत्ती प्रदेश / स्त्रोत प्रदेश / आधार प्रदेश हा वायूराशींच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मानला जातो व म्हणूनच उत्पत्ती प्रदेशावरती आधारलेले वायुरांशींचे वर्गीकरण ही योग्य किंवा पर्याप्त मानले जाते. उत्पत्ती प्रदेशानुसार वायुराशींचे पुढील चार प्रकार केले जातात.

 1. उष्ण कटिबंधीय भूखंडीय वायूराशी
 2. उष्ण कटिबंधीय महासागरीय वायूराशी
 3. शीत कटिबंधीय भूखंडीय वायूराशी
 4. शीत कटिबंधीय महासागरीय वायूराशी

अशा भिन्न प्रदेशातील भिन्न हवामानाच्या / भौतिक गुणधर्माच्या वायुराशी उत्पत्ती प्रदेश सोडून वाहू लागल्यावर एकमेकींच्या संपर्कात येतात. त्यांचे तापमान, आर्द्रता व त्यांची घनता यांच्यात भिन्नता असल्याने त्या एकमेकीत मिसळत नाहीत. तर त्यांच्यात एक सीमा किंवा विषमता पातळी तयार होते. त्या सीमारेषेला किंवा विषमतेच्या पातळीला ‘ आघाडी’ (Front) असे म्हणतात. ही सीमारेषा म्हणजे एक संक्रमण पट्‌टा असतो त्याला ‘विलगता विभाग’ (Zone of Discountinuty) असेही म्हणतात. ज्यावेळी दोन भिन्न गुणधर्माच्या वायुराशी एकमेकींसमोर येतात त्यावेळी त्या एकमेकींना ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. थंड वायुराशी वजनाने जड असल्याने भूपृष्ठालगत राहते तर उष्ण वायुराशी वजनाने हलकी असल्याने थंड वायुराशीवर चढण्याचा प्रयत्न करते. यातूनच आवर्तांची निर्मिती होते. समशीतोष्ण कटीबंधीय प्रदेश विषुववृत्तीय व ध्रुवीय वायुराशींच्या मिलनाचे प्रदेश म्हणून ओळखले जातात. म्हणूनच वायुराशींचा प्रभाव समशीतोष्ण कटीबंधीय हवामानावर जास्त प्रमाणात होताना दिसतो. कोणती वायुराशी जास्त क्रियाशील (Active) आहे यावर निर्माण होणाऱ्या आघाडींचा प्रकार ठरतो. उदा. उष्णवायुराशी जास्त क्रियाशील असल्यास निर्माण होणारी आघाडी ‘ उष्ण आघाडी’ (Warm Front) असते तर थंड वायुराशी क्रियाशील असल्यास अशी आघाडी ‘ थंड आघाडी’ (Cold Front) म्हणून ओळखली जाते.

तापमान

हवेच्या विविध अंगापैकी तापमान हा घटक महत्वपूर्ण असून हवेच्या इतर अंगावर (वायूभार, वारे, वृष्टी) परिणाम करीत असल्यामुळे त्याला ‘नियंत्रण’ घटक असेही म्हणतात. सूर्यकिरणामुळे प्रत्यक्ष हवा तापत नाही. प्रथम सौरशक्ती पृथ्वीपृष्ठभागाला मिळते. त्यानंतर भूपृष्ठापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपासून वातावरणातील हवा तापते. हवेचे भूपृष्ठालगतचे थर अगोदर तापतात नंतर वरचे थर तापतात. वातावरणात तापण्यासाठी वहन उत्सर्जन व अभिसरण या क्रियांचा वापर होत असतो.

हवेचे तापमान मोजण्यासाठी साधा तापमापक, कमाल व किमान तापमापक व तापमान लेखक या उपकरणांचा वापर केला जातो. हवेचे तापमान अंश, फॅरेनाईट व अंश सेल्सियसमध्ये मोजले जाते. हवेच्या तापमानावर हवेचा दाब, बाष्पीभवन, आर्द्रता, वारे, ढग, वृष्टी इत्यादी घटक अवलंबून असतात. सर्व सजीवसृष्टीला जगण्यासाठी व विकसित होण्यासाठी तापमानाची आवश्यकता असते, म्हणून हवेच्या तापमानाचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो.

हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक :

पृथ्वीवर सर्वत्र हवेचे तापमान सारखे आढळत नाही. कारण हवेच्या तापमानावर अनेक घटकांचा परिणाम होतो. हवेच्या तापमानावर परिणाम करणारे घटक पुढीलप्राणे आहेत.

अक्षांश :

पृथ्वीवरील अक्षांशानुसार तापमान बदलत जाते. विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण धु्रवाकडे जाताना तापमान कमी कमी होत जाते. कारण विषुवृत्तीय प्रदेशात संपूर्ण वर्षभर सूर्यकिरणे लंबरुप पडतात व कमी जागा व्यापत असल्यामुळे सौरशक्ती जास्त मिळून हवेचे तापमान वाढते. परंतू विषुवृत्तापासून दोन्ही धु्रवाकडे सूर्यकिरणे तिरपी होत जातात. तिरपी सूर्यकिरणे जास्त जागा व्यापत असल्यामुळे मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्राण कमी असते. त्यामुळे कमी उष्णता मिळाल्याने हवेचे तापमान कमी असते.

समुद्रसपाटीपासून उंची :

पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेपासून हवा खालून वर तापत जाते. त्यामुळे समुद्रसपाटीलगत तापमान जास्त असते. तर समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. सर्वसाधारणपणे १६० मीटर उंचीला १ अंश से.ग्रे. तापमान कमी होते. त्यामुळे वाई येथे तापमान जास्त आढळते. तर जास्त उंचीवरील महाबळेश्वर व पाचगणी येथे तापमान कमी आढळते. उंचीनुसार हवेचा दाब कमी झाल्यामुळे हवेचे प्रसरण होऊन तापमान कमी आढळते. वातावरणाच्या खालच्या थरात धुलीकण व बाष्प जास्त असल्यामुळे उष्णता जास्त ग्रहण केली जाते. त्यामुळे तापमान जास्त असते. परंतू समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे धुलीकण बाष्प व वायुंचे प्राण कमी झाल्यामुळे तापमान कमी असते.

समुद्रसानिध्य :

समुद्रसानिध्याचा परिणाम हवेच्या तापमानावर होतो. समुद्रालगत असणाऱ्या हवेचे तापमान कमी असते, तर समुद्रापासून जसजसे दूर जावे तसतसे तापमान वाढत जाते. पाणी उशीरा तापत असल्यामुळे दिवसा तापमान कमी असते. तर पाणी सावकाश थंड होत असल्यामुळे रात्रीचे तापमान फारसे कमी होऊ दिले जात नाही. समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात दिवसाच्या समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यामुळे व रात्री जमिनीवरुन समुद्राकडे वाहणाऱ्या मतलई वाऱ्यामुळे तापमान सम रहाते. मात्र समुद्रापासून दूर अंतरावर या सागरी वाऱ्याचा व समुद्रसानिध्याचा प्रभाव पडत नाही, म्हणून समुद्रापासून जसजसे दूर जावे, तसतसे तापमान वाढते. समुद्रसानिध्य लाभलेल्या मुंबईचे तापमान कमी असून खंडान्तर्गत प्रदेशात असणाऱ्या नागपूरचे तापमान मात्र जास्त आहे.

प्रचलित वारे :

एखाद्या प्रदेशात विशिष्ठ काळ एकाच प्रकारचे वारे वाहत असतील तर त्यांचा परिणाम हवेच्या तापमानावर होत असतो. असे वारे थंड प्रदेशावरुन येत असतील तर तापमान कमी केले जाते. परंतू जर हे वारे उष्ण प्रदेशाकडून येत असतील तर तापमान वाढविले जाते. नैऋत्य मौसमी वारे समुद्रावरुन येत असल्यामुळे भारतातील हवेचे तापमान कमी होण्यास मदत होते.

समुद्रप्रवाह :

समुद्रातून उष्ण व थंड सागरी प्रवाह वाहत असतात. या समुद्रप्रवाहांच्या लगतच्या प्रदेशाच्या तापमानावर परिणाम होतो. उष्ण प्रवाहामुळे तापमान वाढते, तर शीत प्रवाहामुळे तापमान कमी होते. उष्ण प्रवाहावरुन वाहणारे वारे उष्ण असतात. त्यामुळे लगतच्या प्रदेशाचे तापमान वाढवितात. संयुक्त संस्थानच्या पूर्व व आग्नेय किनाऱ्याजवळून गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह वाहत असल्यामुळे किनाऱ्याचे तापमान वाढते. शीत प्रवाहावरुन वाहणारे वारे थंड असतात. या प्रवाहावरुन जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान कमी केले जाते. कॅनडाच्या ईशान्य किनाऱ्याजवळून लॅब्राडोर शीत प्रवाह वाहत असल्यामुळे किनारी प्रदेशाचे तापमान कमी झाले आहे.

ढगांचे आच्छादन :

आकाश ढगाने अभ्राच्छादित असल्यास सौरशक्तीच्या परावर्तनाचे प्राण वाढते. त्यामुळे भूपृष्ठाला कमी सौरशक्ती मिळते व तापमान कमी असते. याउलट ज्या प्रदेशात आकाश निरभ्र असते. त्या भागात सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचत असल्यामुळे तापमान जास्त आढळते.

पर्जन्य :

जास्त पर्जन्याच्या प्रदेशातील बरीचशी उष्णता ओलसर जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन करण्यात खर्च होते. त्यामुळे हवेचे तापमान कमी असते. याउलट कमी पर्जन्याच्या प्रदेशातील जमिन कोरडी असल्यामुळे तापमान जास्त असते.

वनस्पतींचे आच्छादन :

घनदाट जंगलाच्या प्रदेशात सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचण्यास अडथळा होतो. त्यामुळे जमीन फारशी तापत नाही. तसेच वनस्पतीद्वारे होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे हवेची आर्द्रता जास्त असते. हवेतील हे बाष्प उष्णतेचे शोषण करीत असल्यामुळे हवेचे तापमान फारसे वाढत नाही. याउलट नैसर्गिक वनस्पतीचे आच्छादन नसलेल्या वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त असते.

मृदा प्रकार व रंग :

वाळुमिश्रीत खडकाळ जमिन सौरशक्ती जास्त शोषून घेत असल्यामुळे अशा प्रदेशात हवेचे तापमान जास्त असते. याउलट गाळाची व चिकणमातीची मृदा कमी सौरशक्ती शोषून घेते त्यामुळे त्याठिकाणचे तापमान कमी असते.

जमिनीचा उतार :

जमिनीचा दक्षिणेकडील उतार व उत्तरेकडील उतार येथील तापमानात भिन्नता आढळते. सूर्यकिरणांच्या दिशेने भूपृष्ठाचा उतार असल्यास ती लंबरुप पडल्यामुळे कमी जागा व्यापतात त्यामुळे जास्त उष्णता मिळाल्यामुळे तापमान जास्त असते. मात्र सूर्यकिरणांच्या विरुद्ध दिशेने उतार असल्यास सूर्यकिरणे जास्त जागा व्यापतात, त्यामुळे कमी उष्णता मिळते. सहाजिकच अशा प्रदेशाचे तापमान कमी असते.

error: