1857 च्या उठावाची कारणे

राजकीय कारणे

ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण

इ. स. १७५७ च्या प्लासीच्या युद्धाने भारतात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली. पुढे १८५७ पर्यंत ब्रिटिशांनी सर्व भारतावर वर्चस्व मिळविले. 

तैनाती फौजेचे दुष्परिणाम

लॉर्ड वेलस्लीने प्रथम तैनाती फौजेची पद्धत भारतात सुरू केली. या पद्धतीनुसार भारतीय सत्ताधिशांना कंपनीशी एक करार करावा लागे.

  • भारतीय सत्ताधिशाने ब्रिटिश फौज त्याच्या राज्यात कायम ठेवून घ्यावी.
  • त्याचा खर्च म्हणून कंपनीस पैसा व काही प्रदेश द्यावा.
  • ही पद्धत स्विकारणाऱ्यांनी दुसऱ्या राजांशी युद्ध अथवा तह करु नये.
  • आपल्या राजधानीत एक इंग्रज अधिकारी ठेवावा.
  • इंग्रजाशिवाय कोणत्याही युरोपियन व्यक्तीस नोकर म्हणून ठेवू नये.
  • ही पद्धत स्वीकारणाऱ्या राजांचे इंग्रज अंतर्गत व बाह्य संरक्षण करतील.

या पद्धतीमुळे भारतातील संस्थाने दुबळी बनली.

संस्थानांचे विलीनीकरण

भोंगळ राज्यकारभार, अनागोंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था, दत्तक विधान नामंजूर करून लॉर्ड डलहौसीने भारतीय संस्थानांचे विलीनीकरण केले. उदा.

सातारा१८४८
जैतपूर-संबलपूर१८५०
उदमपूर१८५२
नागपूर१८५३
झाशी१८५४

पदव्या, पेन्शन व इनाम रद्द

भारतीय संस्थानिकांनी आपल्या राज्यातील कर्तृत्ववान व गुणी लोकांना पदव्या, वतने, पेन्शन व इनाम दिलेली होती. परंतु लॉर्ड डलहौसीने भारतीय राजांच्या पदव्या, वतने, पेन्शन व इनामाची समाप्ती करुन भारतीयांचा असंतोष ओढवून घेतला.

भारतीय मुसलमानांची नाराजी

बहादूरशहा या बादशहास ब्रिटिशांनी दिल्लीतील त्याचा राजवाडा व वैभव सोडून जाण्यास सांगितले होते. दिल्लीचा मोगल बादशहास मुस्लिम लोक मानबिंदू मानत. यामुळे मुसलमान दुखावले. पुढे ब्रिटिशांनी १८४३ मध्ये इस्लामधर्मीय सिंधच्या अमीराची सत्ता नष्ट केली. सन १८३९-१८४२ अफगाणिस्तानाशी व १८५६ मध्ये इराणशी युद्ध केले. तसेच अयोध्या प्रांत खालसा केला. ब्रिटिश हे केवळ हिंदुस्थानातील मुस्लिमांचे नव्हे तर जगातील सर्व मुसलमानांचे शत्रू आहेत, अशी भावना मुसलमानांची झाली. 

सामाजिक कारणे

वांशिक भेदभाव

ब्रिटिश आपला धर्म, संस्कृती, वंश हे हिंदूपेक्षा श्रेष्ठ आहेत असे समजत.  भारतीय लोकांवर राज्य करण्यासाठी आपण आलो आहोत अशी प्रोढी मानून इंग्रजांनीभारतीयांना क्रूरपणे वागविले. भारतीय अशिक्षित, असंस्कृत, रानटी व मागासलेले आहेत असा आरोप करून कमी लेखत असत. 

सामाजिक चालीरितीमध्ये हस्तक्षेप

ब्रिटिशांनी हिंदूंच्या सामाजिक चालीरितीमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरवात केली. सतीबंदी, बालविवाह प्रतिबंध, बहुपत्नीत्व प्रथा बंदी, विधवा पुनर्विवाह कायदा इत्यादी कायदे आल्यामुळे आपला धर्म व संस्कृती बुडविण्यासाठी हे सर्व केले जात आहे. हिंदी लोकांना ब्रिटिश आपल्या संस्कृतीवर आक्रमण करुन ती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वाटले. 

धार्मिक कारणे

धार्मिक संकट

कंपनी सरकारने १८१३ च्या सनदी कायद्याने ख्रिस्ती मिशनऱ्यांना शिक्षणाचा व धर्मप्रसार करण्यास सवलत दिली. दुष्काळ व अन्य आपत्तीत सापडलेल्या गरीब जनतेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराला सुरुवात केली. धर्मांतर करणाऱ्यास सैन्यात, नोकऱ्यात प्रधान्य व सवलत मिळत. 

पाश्चात्य शिक्षण

सन १८१३ पासून ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात प्रवेश दिला. त्याने प्रथम शिक्षण व आरोग्य सेवा भारतीयांना मोफत दिल्या. पुढे १८३५ पासून इंग्रजी शिक्षण भारतीयांना दिले. इंग्रजी शाळातून ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसविले जात व सर्वांना समान वागविले जात असत. 

संस्कृतीवर संकट

ब्रिटिशांनी रितीरिवाज, रुढी, परंपरा व संस्कृती यांच्यावर बंधने आणली. लॉर्ड विल्यम बेटिंक, लॉर्ड डलहौसी या सुधारणावादी राज्यकर्त्यांनी कायदे करुन भारतीय लोकांच्यात सुधारणा व बदल घडविण्याचा प्रयत्न केला. बालविवाह, विधवा पुनर्विवाह, सतीबंदी, बहुपत्नीत्व प्रथाबंदी कायदा इत्यादी कायद्यामुळे हिंदी संस्कृतीवर संकट आले होते. 


आर्थिक कारणे

आर्थिक पिळवणूक

ब्रिटिश लोक भारतात व्यापारासाठी आले होते. येथील राजकीय अराजकतेचा फायदा घेऊन व्यापाराबरोबर त्यांनी राज्य स्थापन केले. या राजकीय सत्तेचा वापर भारताची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी केला. इ. स. १७७५ ते १७८० या काळात फक्त बंगालमधून ३ कोटी ८४ लक्ष पौंड संपत्ती इंग्लंडला गेली. याशिवाय कंपनीच्या नोकरांनी खाजगी व्यापार करुन मोठा नफा मिळाला होता. 

ब्रिटिशांचे कृषी धोरण

भारतीयांची आर्थिक दुरावस्था होण्यास ब्रिटिशांचे शेतीविषयक धोरण कारणीभूत ठरत. लॉर्ड कॉर्नवालीसने बंगाल, बिहार व ओरिसामधील कायमधारा पद्धत सुरू केली व थॉस मन्रोच्या रयतवारी पद्धतीमुळे भारतीय शेतकरी गरीब होत गेला. पूर्वी महसूल पिकांचे प्रमाणावर आकारला जाई. पुढे पिकांच्या विचार न करता शेतसारा पैशाच्या रुपाने घेतला जाई. उद्योगधंदे बुडाल्याने शेतीवरील ताण वाढला. 

उद्योग धोरण

कंपनी सरकारचे धोरण इंग्लंडधील उद्योगांना पोषक व भारतीय उद्योगांना बुडविणारे होते. भारतातून आयात झालेल्या मालावर इंग्लंडध्ये ७०% जकात कर बसविली जाई. भारतीय माल, कापड व मलमल वापरू नये असा कायदा इंग्लंडध्ये केला. तर ब्रिटिश मालावर जकात न बसविता भारतात आयात करण्यात आला. यंत्राच्या व सफाईदार मालापुढे भारतातील हातावर तयार केलेला माल टिकणे अवघड झाले. त्यामुळे भारतीय उद्योगधंदे बुडाले.

सावकारांकडून पिळवणूक

ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे मोठ्या प्रमाणात सावकार वर्ग उदयास आला. त्यांनी लहान लहान शेतकऱ्यांना कर्जे देऊन त्यांचे प्रचंड शोषण केले.

वाढती बेकारी

ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली गेली. त्यामुळे सैनिक व नबाब व राजे यांना चैनीच्या वस्तू व किंती वस्तू पुरविणारे बेकार बनले.व्यापार, उद्योगधंदे बसल्यामुळे व्यापारी व कामगार यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली. या सर्व घटनामुळे बेकारी वाढत गेली. 

लष्करी कारणे

हिंदी शिपायांवर धार्मिक बंधने

हिंदी शिपायांना सैन्यात दाखल होताना धार्मिक स्वातंत्र्याची ग्वाही दिली जात असे. परंतु प्रत्यक्ष सैन्यात दाखल झाल्यानंतर शिपायांना गंध लावू नये, शेंडी राखू नये, लुंगी नेसू नये, दररोज दाढी करावी इत्यादी बंधने पाळावी लागत असत. याविरुद्ध इ. स. १८०६ मध्ये वेल्लोर येथील शिपायांनी बंड केले. वेल्लोरचा किल्ला घेऊन तेथील युरोपियनांची कत्तल केली.

समुद्रपर्यटन करणे हिंदु धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेच्या विरुद्ध आहे. तरी ही इ. स. १८२४ मध्ये ब्रह्मदेशावर स्वारीसाठी निघण्याची आज्ञा दिली असता बराकपूर येथील शिपायांनी नाकारले व बंड केले.

क्रिमियन युद्धाच्या (१८५४-५६) आघाडीवर जाण्यास हिंदी शिपायांनी नकार दिला. तेंव्हा इ. स. १८५६ मध्ये जनरल सर्वीस एन्लिस्टेंट ॲक्ट पास करुन लष्करी सेवेसाठी भारताबाहेर जाण्यास हिंदी शिपायांवर बंधन घातले. 

हिंदी शिपायांना बढत्या नव्हत्या

हिंदी सैनिकांना वरिष्ठ पदे मिळत नव्हती. याउलट नवीन सैन्यात प्रवेश घेतलेल्या साध्या युरोपियन शिपायास मोठा पगार व मानमरातब मिळत असत. हिंदी शिपायास जास्तीत जास्त सुभेदार बनता येई. सुभेदाराचा पगार हा नव्या दाखल होणाऱ्या ब्रिटिश शिपाया पेक्षा कमी होता. धर्मांतर केल्यास मात्र ताबडतोब बढत्या मिळत.

तात्कालिक कारण

इ. स. १८५३ पासून हिंदुस्थानात लष्करासाठी ‘एनफील्ड’ बंदुका वापरात आणल्या गेल्या. या रायफलीच्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबी लावली जात असे अशी बातमी लष्करात पसरली.

चरबीयुक्त काडतुसे तोेंडाने तोडावी लागत असत. गाय हिंदुंना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असल्यामुळे धार्मिक भावना दुखविणारे हे कृत्य होते. इंग्रज आपला धर्म बुडवण्यास निघाले आहेत असा समज होऊन हिंदी सैनिक खवळले.

एप्रिल १८५७ मध्ये बराकपूरच्या छावणीतील शिपायांनी चरबीयुक्त काडतुसे वापरण्यास नकार दिला. तेंव्हा त्यांच्यावर लष्करी कायद्याप्रमाणे चौकशी होऊन दहा वर्षे कारवासाच्या शिक्षा देण्यात आल्या.

या काडतूस प्रकरणामुळे १८५७ च्या उठावास सुरुवात झाली.

 

Leave a Reply