संसदीय कामकाजाच्या साधनांमध्ये प्रश्न काळ, शून्य प्रहर व विविध प्रस्ताव यांचा समावेश आहे.
१) प्रश्न काळ–
संसदेच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास प्रश्नोत्तरासाठी निश्चित केलेला असतो. संसदेचा कोणताही सदस्य प्रश्न विचारतो आणी मंञी त्यावर उत्तर देतो. संसदेत विचारण्यात येणार्या प्रश्नांचे तीन प्रकार आहेत.
- तारांकित – तोंडी उत्तर, पूरवणी प्रश्न उदभवू शकतात.
- अतारांकित– लेखी उत्तर, पूरवणी प्रश्न उदभवू शकत नाहीत.
- अल्प सूचना प्रश्न– दहा दिवसापेक्षा कमी दिवसाची सूचना देऊन हा प्रश्न विचारता येतो. तोंडी उत्तर.
२) शून्य प्रहर–
स़ंसदीय कार्यपध्दतीमध्ये ही भारताची देणगी आहे व १९६२ पासून अस्तित्वात आहे. जसा प्रश्न काळाचा उल्लेख संसदेच्या कार्यपध्दतीच्या नियमामध्ये आहे, शून्य प्रहरचा उल्लेख संसदेच्या कार्यपध्दतीच्या नियमामध्ये नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रश्न उपस्थित करण्याचे एक अनाैपचारिक साधन. प्रश्न काळ संपताच शून्य प्रहर सुरु होतो अाणी सभागृहाचे नियमीत कामकाज सुरु होईपर्यंत चालू राहतो.
३ प्रस्ताव–
सभागृहात एखाद्या सदस्याला एखाद्या विषयावर चर्चा करायची असल्यास त्याने सभागृहाच्या पीठासीन अधिकार्याच्या मान्यतेने प्रस्ताव आणल्याशिवाय सभागृहात चर्चा करता येत नाही. महत्वाचे प्रस्ताव पुढीलप्रमाणे आहेत. सर्वसाधारणपणे प्रस्तावाचे तीन भाग पडतात-(१) मूळ प्रस्ताव (२) बदली प्रस्ताव (३) अंगभूत प्रस्ताव
स्थगन प्रस्ताव-
सर्वसाधारणपणे सभागृहाचे कामकाज कामकाजपञिकेवर ठरवून दिलेल्या बाबीप्रमाणे चालते. परंतू बर्याचदा गंभीर व आकस्मिक परिस्थिती उद्भवते, अशा बाबी सभागृहासमोर चर्चेला येणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी अशा बाबींवर चर्चा होण्यासाठी सभागृहासमोरील कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्ताव आणला जातो. याचा मुख्य उद्देश अतिशय तातडीच्या व नुकत्याच घडलेल्या बाबींकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा आहे. संसदीय कार्यपद्धतीत या प्रस्तावाचे स्वरूप शासनाच्या कारभारावर ठपका ठेवणारे व निंदाव्यंजक अशा स्वरूपाचे असल्याचे मानले जाते. असा प्रस्ताव सभागृहाच्या पीठासीन अधिकार्याच्या मान्यतेशिवाय चर्चेला येत नाही. या प्रस्तावावर कमीत कमी अडीच तास चर्चा होते.
लक्षवेधी सूचना-
आधुनिक संसदीय कामकाज पद्धतीमध्ये लक्षवेधी सूचनेचा संसदीय कामकाजाच्या पद्धतीमधील समावेश ही संपूर्णपणे भारतीय संकल्पना आहे. १९५४ पासून ही भारतात संसदीय कामकाज पद्धतीमध्ये वापरली जाते. या सूचनेच्या माध्यमातून प्रशासनातील उणिवा शासनाच्या लक्षात आणून देणे, त्याबाबत शासनाची भूमिका व तातडीने करावयाची कार्यवाही हीदेखील सभागृहापुढे निवेदनाद्वारे आणून देणे व यामाध्यमातून शासनावर अंकुश ठेवणे इ. उद्दिष्टे साध्य करता येतात.
अर्धा तास चर्चा-
सभागृहात विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी अर्धा तास चर्चा या संसदीय आयुधाची तरतूद केली आहे. अर्धा तास चर्चेची सूचना अलिकडील प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या बाबींशी संबंधित असावी. ती बाब सार्वजनिक महत्वाची असली पाहिजे. सूचना देताना कोणत्या मुद्यांसंदर्भात चर्चा करावयाची आहे ते मुद्दे स्पष्टपणे पण थोडक्यात देण्यात यावेत. या प्रस्तावावर मतदानाची आवश्यकता नसते.
अल्पकालीन चर्चा-
निकडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी हे एक महत्वाचे संसदीय आयुध सदस्यांना उपलब्ध आहे.या प्रस्तावावर मतदानाची आवश्यकता नसते.
अविश्वास प्रस्ताव-
या प्रस्तावाच्या मागणीकरिता ५० सदस्यांचे अनुमोदन असणे आवश्यक असते. अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यास मंञीमंडळास राजीनामा द्यावा लागतो.