१८५७ च्या उठावाचे परिणाम

ईस्ट इंडिया कंपनी कारभाराचा शेवट

 • १८५७ च्या उठावाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे सरकार अधिनियमानुसार भारतीय प्रशासनाचे नियंत्रण कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश राजपदाकडे म्हणजे इंग्लंडच्या राणीकडे सोपविण्यात आले.
 • राणीच्या वतीने गव्हर्नर जनरल ऐवजी नवे पद व्हाईसरॉयचा ब्रिटिश राजपदाचा प्रतिनिधीची नेणूक करण्यात आली.
 • भारताचा कारभार पाहण्यासाठी भारतमंत्री नियुक्त करण्यात येऊन त्याच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे ‘इंडियन कौन्सिल’ नेून देण्यात आले.

राणीचा जाहीरनामा :

१८५७ च्या उठावानंतर भारतीयांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिने १ नोव्हेंबर १८५८ रोजी एक शाही घोषणा केली. यास राणीचा जाहीरनामा म्हणून ओळखले जाते. हा जाहीरनामा ग. ज. लॉर्ड कॅनिंग याने अलाहाबाद येथे दरबार भरवून ‘राणीचा जाहिरनामा’ वाचून दाखवला. या जाहीरनाम्यात खालील गोष्टींचा समावेश केला आहे.

 • भारतीय संस्थानांच्या अंतर्गत राज्यकारभारात ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही.
 • भारतीयांना त्यांच्या जात, वर्ण व धर्माचा विचार न करता पात्रता पाहून सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
 • सर्व भारतीयांना समानतेने वागविले जाईल. भेदभाव केला जाणार नाही.
 • भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य व समानता याची हमी देण्यात येईल.
 • ब्रिटन भारतात साम्राज्यविस्तार करणार नाही.
 • भारतीयांचा सामाजिक व धार्मिक चाली रीतीमध्ये कसलाही हस्तक्षेप केला जाणार नाही.
 • संस्थानिकाना स्वातंत्र्य देण्यात येऊन त्यांना दत्तक घेण्यास परवानगी दिली जाईल.
 • देशाच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतील.

या जाहीरनाम्याचे रुपांतर १८५८ च्या कायद्यात करण्यात आले.

सैन्याची पुनर्रचना :

 • १८५७ च्या उठावाची सुरुवात कंपनीच्या लष्करातील हिंदी सैनिकांनीच केली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी सैन्याची पुनर्रचना विभाजन व संतुलन या तत्त्वावर केली.
 • सन १८६१ च्या आदेशान्वये कंपनीच्या सैन्याचे सरकारकडे हस्तांतरण करण्यात आले.
 • युरोपियन सैन्याची संख्या ४०,००० वरुन २५,००० व भारतीय शिपायांची संख्या दोन लाख पंधरा वरुन एक लाख एकेचाळीस हजार एवढी करण्यात आली.
 • लष्करातील सर्व अधिकार पदे इंग्रजांना देण्यात आली.
 • जात, धर्म, पंथ यावर आधारित पलटणी निर्माण केल्या. पुढे शीख, गुरखा, पंजाबी, रजपूत व मराठा या पलटणी तयार करण्यात आल्या. 

मोगल सत्तेचा शेवट

 • १८५७ च्या उठावात मुघल बादशहा महम्मद बहादूरशहा सहभागी झाला होता.
 • उठाववाल्यांनी बादशहाला बळ देऊन उठावात ओढले होते. क्रांतिकारकांनी ११ मे रोजी दिल्ली जिंकून त्यास मोघल बादशहा म्हणून घोषित केले.
 • इंग्रजांनी दिल्ली जिंकून मोगल बादशहास आजन्म कैदी म्हणून ब्रह्मदेशात रंगून येथे ठेवले. तेथे इ. स. १८६२ मध्ये बहादूरशहाचा अंत झाला. त्यांच्या मृत्यूबरोबर मुलघ सत्ता संपली.

आधुनिक युगाची सुरुवात :

 • १८५७ पूर्वी इंग्रजानी रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे व कारखाने इत्यादींचा आधुनिक सुधारणांना प्रारंभ केला होता. याचा फायदा ब्रिटिशांना उठाव मोडून काढण्यासाठी झाला.
 • पाश्चात्य देशातील नवे विचार, कल्पना या देशात आल्या. तसेच सामाजिक धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात गती आली. यामुळे आधुनिक युगाची सुरुवात झाली.

राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली :

 • भारतात पुन्हा असा उठाव होऊ नये म्हणून इंग्रजांनी सावधगिरीचे धोरण अवलंबले. त्यासाठी अती केंद्रीत नोकरशाही निर्माण करण्यात आली. यासाठी रेल्वे, तारा, टपाल इत्यादीत वाढ करण्यात आली.
 • रेल्वे, टपाल वाढीमुळे भारत विस्तारीत होत जाऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली.

फोडा व झोडा या भेदनीतीचा अवलंब :

 • इंग्रजांनी १८५७ च्या उठावानंतर संस्थानिकांना खुश करुन त्या प्रजेपासून फोडून घेतले.
 • हिंदु-मुसलमानात भांडणे लावून त्यांच्यात जातीय तंटे निर्माण केले. त्यांच्यातील एकी नष्ट केली. प्रथम इंग्रजांनी मुसलमानांना झोडपले व हिंदूंना जवळ केले. हिंदूना अनेक सवलती देऊन मुसलमानाना कारभारातून डावलले. मुसलमानांना मत्सर वाटू लागला. त्यांच्यातील जातीय तेढ व जातीय भावना वाढीस लागली. त्यांच्यातील वैनस्य वाढत गेले.
 • पुढे भेदनीतीने मुसलमानांना अनेक सवलती दिल्या. जातीय मतदार संघाची निर्मिती केली. पुढे मुस्लीमांनी पाकिस्तानची मागणी केली. याला इंग्रजांची निती कारणीभूत ठरली.

समाज जागृती झाली :

१८५७ च्या उठावामुळे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सुधारणा झाल्या. यासाठी अनेक विद्‌वान लोकांनी व समाज सुधारकांनी वैचारिक जागृती केली. यांना सनातनी लोकांकडून मोठा विरोध झाला. अनेक समाजसुधारक व धर्मसुधारकांनी या कामी मोठे कार्य केले. त्यामुळे भारताचा चेहरा बदलला. अनिष्ट प्रथा पद्धतीवर या समाजसुधारकांनी मोठी टिका केली व लोकांच्यात मोठे परिवर्तने घडवून आणले. या उठावामुळे समाज जागृत झाला.

वर्णभेद प्रखर झाला :

१८५७ च्या उठावामुळे ब्रिटिश व भारतीय यांच्यातील वंश व वर्णभेद प्रखर झाला. इंग्रजांच्या वंश श्रेष्ठत्वाचा वाईट परिणाम भारतीयांना झाला. या उठावानंतर भारतीय आणि युरोपियन यांच्यातील दरी अधिक वाढत गेली. 

सनदशीर चळवळीचा पाया घातला गेला :

ब्रिटिशांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रापुढे उठाववाल्यांचा निभाव लागला नाही. उठाव दडपला गेला. या अनुभवातून सशस्त्र लढ्याने ब्रिटिशांना आपण देशाबाहेर घालवू शकणार नाही याची जाण भारतीय विचारवंतांना झाली. यासाठी पाश्चात्य ज्ञान आत्मसात करुन सनदशीर मार्गाने ब्रिटिशांना भारतातून घालविता येईल व देश स्वातंत्र्य करता येईल, या नव्या विचारातून सनदशीर चळवळीने जन्म घेतला आहे.