१८५७ च्या उठावाची वाटचाल

१८५७ च्या उठावाची वाटचाल :

चरबीयुक्त काडतुसामुळे १८५७ च्या उठावास सुरुवात झाली व त्याला धार्मिक स्वरुप देण्यात आले. प्रथम लष्करातील शिपायांनी बंड केले व त्यांच्या पाठोपाठ जनतेने उठावात भाग घेतला. सर्वप्रथम बेहरामपूरच्या छावणीत फेब्रुवारी १८५७ रोजी शिपायांनी प्रथम काडतुसांना स्पर्श करण्यास नकार दिला. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांचा गणवेश उतरवून त्यांना नोकरीतून कायमची रजा दिली. २९ मार्च १८५७ रोजी बराकपूरच्या ३४ व्या पलटणीने काडतूसांना स्पर्श करण्यास नकार दिला. मंगल पांडे या ब्राह्मण सैनिकांने काडतुसे वापरण्यास नकार दिला. म्हणून त्यास पकडण्यासाठी ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन, सार्जंट, मेजर बॉ, कमांड व्हिलर हे पुढे सरसावले. पण मंगल पांडेने त्यांना गोळया घालून ठार केले. इंग्रजांनी मंगल पांडेस पकडून ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी दिले. या उठावानंतर तो पहिला हुतात्मा ठरला. यामुळे देशभर उठावाची सुरुवात झाली. तो १८५७ च्या उठावातील पहिल्या क्रांतिकारक हुतात्मा ठरला. बराकपूरची १९ व ३४ वी पलटण बरखास्त करण्यात आली. लखनौच्या शिपायांनी काडतुसे वापरण्यास नकार देऊन बंड केले. तेंव्हा ३ मे १८५७ रोजी लखनौच्या शिपायांना सेवामुक्त करण्यात आले.

मीरत उठाव (१० मे १८५७) :

६ मे १८५७ मध्ये मीरत मधील तिसऱ्या घोडदळाच्या रिजमेंटधील ८५ शिपायांनी काडतुसे वापरण्यास नकार दिल्याने तुरुंगात डांबण्यात आले. पुढे त्यांना ८, १० वर्षांच्या शिक्षा देण्यात आल्या व ९ मे रोजी त्यांचा जाहीररित्या गणवेश काढून घेण्यात आला. त्यांच्या पायात बेड्या घालण्यात आल्या. १० मे १८५७ रोजी रविवारी इंग्रज लोक चर्चध्ये प्रार्थनेसाठी गेले असता मिरतमधील २० व्या तुकडीने ‘मारो फिरंगीको’ असा आवाज उठवून बंडाचा झेंडा उभारला. तुरुंगातील ८५ साथिदारांना मुक्त केले. तसेच इंग्रजांना ठार मारले. त्यांचे बंगले व कचेऱ्या जाळल्या. तारायंत्रे तोडून दळणवळण बंद केले. यामध्ये सशस्त्र युद्धाला सुरुवात झाली. व ‘चलो दिल्ली’ची घोषणा करीत दुसऱ्या दिवशी दिल्लीत पोहचले.

दिल्ली :

११ मे १८५७ रोजी मेरठचे क्रांतिकारक दिल्लीला पोहचल्यानंतर दिल्लीत हिंदी शिपायांनी त्यांना साथ दिली. त्यांनी दिल्लीतील इंग्रज अधिकारी, सैनिक लोक व त्यांच्या बायका मुलींची कत्तल केली. २४ तासात दिल्ली ताब्यात घेतली. बंडवाल्या शिपायांना नेता हवा होता म्हणून नामधारी असलेला दिल्लीचा मुघल बादशहा बहादूरशहा जाफर (वय ८२) यांच्या नावे द्वाही फिरविण्यात आली. त्यास दिल्लीच्या गादीवर ११ मे १८५७ बसवून त्यास हिंदुस्थानचा बादशहा म्हणून घोषित केले. दिल्लीतील इंग्रजांचा शस्त्रसाठा, दारुसाठा व तोफा घेण्याचा बंडवाल्यांनी प्रयत्न केला. परंतु कोठाराचा रक्षक इंग्रज अधिकारी ‘स्कली’ याने कोठारास आग लावली. त्यामुळे हा शस्त्रास्त्राचा साठा बंडवाल्यांच्या हाती सापडला नाही. त्यामुळे क्रांतिकारकांच्या पुढील हालचालीवर परिणाम झाला. ११ मे ते १० सप्टेंबर १८५७ पर्यंत दिल्ली क्रांतिकारकांच्या ताब्यात होती. क्रांतिकारकांनी मीरतच्या शिपायांचे अनुकरण करुन दिल्लीत येऊन मिळण्यास सर्व शिपायांना आव्हान केले. या आव्हानानुसार अयोध्या व वायव्य (आग्रा) प्रांतातील फिरोजपूर (१३ मे), अलिगढ (२० मे), मुझफरनर (२४ मे), लखनौ-मथुरा (३० मे), वाराणी-कानपूर (४ जून), झाशी-अलाहाबाद (६ जून), बरेली, अंबाला, दक्षिणेतील सातारा, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या शिपायांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. सर्व देशभर इंग्रजांच्या विरोधी बंड केले. इंग्रजांनी उठावाचे गांभीर्य ओळखून पंजाब शीख, रजपूत व गुरखा या लढाऊ सैन्याची भरती करुन सैन्याची जमवाजमव केली. १५ सप्टेंबरला इंग्रजांनी युद्धास सुरुवात केली. १० दिवस बंडवाल्या शिपायांनी इंग्रजांना निकराचा लढा दिला. परंतु शेवटी त्यांचा पराभव झाला. इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेताच क्रूर व अमानुषपणे सर्रास हिंदी लोकांची कत्तल सुरू केली. बादशहा बहादूरशहास ताब्यात घेतला. त्यास कैद करुन ब्रह्मदेशातील रंगूनला पाठविले. तेथे मुघल बादशहा बहादूरशहा ७ नोव्हेंबर १८६२ रोजी मृत्यू झाला. इंग्रजांनी बंडवाल्यावर अत्याचार केले. अनेकांच्या कत्तली केल्या. शिपायांच्या प्रेतांच्या ढिगाऱ्याचे शहर असे वर्णन इंग्रजांनी केले आहे.

कानपूरमधील उठाव :

कानपूर येथे दुसरा बाजीराव इंग्रजांनी पाठविले होते. त्यांना तनखा, जहागीर व पेशवा ही पदवी दिली होती. दुसऱ्या बाजीरावास मुलगा नसल्याने त्यांने धोंडोपंत उर्फ नानासाहेब यास दत्तक घेतले. दुसऱ्या बाजीरावास मिळणारी ८ लाख रुपये तनखा, त्याची छोटी जहागीर व पदव्या त्यांच्या मृत्युनंतर नानासाहेबास देण्यास इंग्रजांनी नकार दिला. त्यामुळे नानासाहेबास इंग्रजांच्या विषयी राग होता. ४ एप्रिल १८५७ रोजी कानपूर मधील शिपायांनी बंड करुन इंग्रजांचा खजिना लुटला व दिल्लीकडे गेले. परंतु दिल्लीस गेल्यावर आपले वर्चस्व कमी होईल म्हणून कानपूरला परत जाण्यासाठी नानासाहेब पेशवे याने आपल्या शिपायांचे मन वळविले. दुसऱ्या दिवशी कानपूरला आल्यानंतर नानासाहेबांनी ब्रिटिशांना वेढा घातला. ४०० ब्रिटिशांनी तीन हजार सैनिकांना २५ जून पर्यंत दाद दिली नाही. शेवटी नानासाहेबांनी इंग्रजांना सुखरूप परत जाऊ देऊ या अटीवर बोलणी केली. इंग्रज बोटीने मायदेशी परत जात असतांना हिंदी शिपायांनी धावत जाऊन त्यांच्यावर गोळीबार केला. ब्रिटिशांनीही गोळीबार केला. बोटी जळाल्या. अनेक ब्रिटिश स्त्रिया, पुरुष व मुले बुडून मेली. १५० इंग्रजांना जीवंत पकडून २६ जून १८५७ रोजी बिबिघरात ठेवले. नानासाहेबाने स्वत:स पेशवा म्हणून जाहीर केले. जनरल हॅवलॅकच्या नेतृत्त्वाखाली इंग्रजांची फौज कानपूरकडे चाल करुन आली असता त्यास रस्त्यात गाठून नानासाहेबाने तोंड देण्याचा प्रयत्न केला. शेवटी माघार घेऊन नानासाहेब कानपूरात आले. नानासाहेब व अजिमुल्ला खान यांनी बिबिघर मध्ये ठेवलेल्या १५० युरोपियनांची कत्तल केली. १६ जुलैला हॅवलॉक कडून पराभव झाल्यावर नानासाहेब पेशवा विठूरला गेले. हॅवलॉकने कानपूर ताब्यात घेतले. यावेळी त्याने भारतीयांची क्रूर कत्तल केली. गावेच्या गावं जाळून खाक केली. शेकडो लोकांना मारुन त्यांची प्रेते झाडावर टांगून ठेवली. २० जून १८५७ रोजी नील कानपूरला आल्यावर हॅवलॉक लखनौस गेला. नानासाहेबांचा सेनापती तात्या टोपे याने १६ ऑगस्ट व २६ नोव्हेंबर १८५७ रोजी असे दोनदा कानपूरवर हल्ले चढविले. सर कॉलीन कॅम्पबेल याने ६ डिसेंबर १८५७ रोजी तात्या टोपेचा पराभव करुन कानपूर मुक्त केले. तात्या टोपे काल्पीस गेले.

लखनौ :

लखनौ ही अवध संस्थानची राजधानी होती. कंपनी सरकारने १८५६ मध्ये अयोग्य व अनागोंदी राज्यकारभार हे कारण दाखवून हे संस्थान खालसा केले. त्यामुळे या संस्थानातील हजारे लोक बेकार झाले होते. त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष होता. दिल्ली, मीरत व कानपूर येथील बंडाच्या बातम्या अवध मध्ये थडकल्यानंतर लखनौ येथे ३० मे १८५७ रोजी शिपायांनी बंड करुन लखनौच्या रेसिडेंसीला वेढा घातला. त्यात हेन्री लॉरेन्स ठार झाला. अनेक इंग्रजांच्या कत्तली केल्या. अवधच्या नबाबाची बेगम हजरत महल हीने बंडवाल्याचे नेतृत्त्व केले व आपला मुलगा (अल्पवयीन) कादर यास नबाब पद दिले. कंपनी सरकार संपले असे घोषित केले. ब्रिटिश सेनानी हॅवलॉक व औट रॅ यांनी मोठी फौज घेऊन लखनौवर चाल केली. बंडवाल्यांनीही प्रतिकार केला. इंग्रजांनी २२ मार्च १८५८ रोजी लखनौ जिंकून घेतले. यावेळी अवधची बेगम हरजत महल व नवीन नबाबास घेऊन नेपाळला पळून गेली.

जगदीशपूर :

बिहारमधील जगदीशपूर येथे राणा कुंवरसिंह या रजपुत जमीनदाराची छोटी जहागीर होती. अनागोंदी कारभार व कर्जाचा बोजा या सबबीखाली खालसा करण्याचा कंपनीचा विचार होता. त्यामुळे कुंवरसिंह अस्वस्थ होता. दिनापूरचे शिपाई बंद करुन दिनापूर सोडून लूटार ७ जुलै १८५७ रोजी करत. कुंवरसिंहाला येऊन मिळाले. खजिना लुटून, कचेऱ्या जाळून, कैद्यांना मुक्त करुन कुंवरसिंहाचे नेतृत्त्वाखाली शिपायांनी बॉईलच्या घरास वेढा घातला. यामध्ये कुंवरसिंहाला अपयश आले. या शिपायांचे नेतृत्त्व ८० वर्षाच्या कुवरसिंगाने स्विकारुन जगदीशपूर, आरा, अझमगढ, काल्पी, ग्वाल्हेर परिसरात इंग्रजांबरोबर लहान – मोठ्या लढाया केल्या. शेवटी मे १८५८ मध्ये कुंवरसिंह जगदीशपूरजवळ लढाईत मारला गेला.

झाशी :

झाशी संस्थान हे गंगाधरराव नेवाळकर हे होते. गंगाधरराव नेवाळकर यांचा मृत्यू १८५३ मध्ये झाला. पुढे लॉर्ड डलहौसीने ‘दत्तक वारस नामंजूर’ या तत्त्वानुसार झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या दत्तक पुत्रास राज्याधिकार नाकारुन व झाशीचे राज्य खालसा केले. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणामुळे राणी संतप्त झाली. मिरत, दिल्ली, कानपूर येथील उठावाच्या बातम्या झाशीत पोहोचताच ६ जून १८५७ रोजी झाशीत शिपायांनी बंड करुन ब्रिटिशांना ठार केले. नंतर शिपायांनी दिल्लीस प्रयाण केले. यामध्ये झाशीच्या राणीचा हात आहे असा आरोप ब्रिटिशांनी ठेवून झाशीवर स्वारी केली. याउलट राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारले. लष्कर भरती करुन तात्या टोपेची मदत घेतली. कॅनिंगच्या आदेशाप्रमाणे मुंबईहून सर हयू रोज हा डिसंेबर १८५७ मध्ये मध्य भारताचे आघाडीवर आला. जानेवारी १८५८ मध्ये रतनगड घेऊन त्याने सागर घेतले व २२ मार्च १८५८ ला झाशीला वेढा दिला. राणी मोठ्या पराक्रमाने किल्ला लढवू लागली. जेंव्हा नाईलाज झाला. तेंव्हा अविश्रांत घौड दौड करुन काल्पीला पोहोचली. सर हयू रोजच्या सैन्याशी दोन मोठ्या लढाया झाल्या. या लढाईचे नेतृत्त्व राणीने केले होते. इंग्रजांनी काल्पी जिंकल्यावर ती ग्वाल्हेरला गेली. हा तिने १८५८ मध्ये ताब्यात घेतला. हयू रोजने मोरार व कोटा घेतल्यावर ग्वाल्हेरकडे आगेकूच केली. या लढाईत राणीने खूप पराक्रम गाजविला. शेवटी सर्व बाजूंनी सैन्याने वेढल्याने वेढ्यातून घोडा उडवून ती बाहेर पडली. मात्र इंग्रजांनी पाठलाग करुन तिच्या डोक्यावर व छातीवर जबर वार केले. त्यात जखमी होऊन १७ जून १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू झाला. आधुनिक भारताच्या इतिहासात राणी लक्ष्मीबाईचे कार्य प्रेरणादायी ठरले होते.

महाराष्ट्र :

साताऱ्यात रंगो बापूजी, कारखानीस, यशामांग इत्यादी लोकांनी सातारा व महाबळेेशर येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तो उघड झाल्याने कटवाल्यांना शिक्षा दिल्या. तसेच नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी व बेळगाव येथे तुरळक उठाव झाले. कोल्हापूरात ३१ जुलै १८५७ रोजी तेथील २१ व्या व २८ व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. ही इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करुन व खजिना लुटून हे लोक सावंतवाडीकडे गेले. १५ डिसेंबरला कोल्हापूरात चिमाभाऊसाहेब यांनी उठावाचा झेंडा उभारला. परंतु हा उठाव इंग्रजांनी मोडून काढला. राजघराण्यातील प्रमुख लोकांना प्रथम मुंबईस नंतर कराचीस २७ वर्षे ठेवण्यात आले. नरगुंदच्या भावे या संस्थानिकाचा दत्तक पुत्र अमान्य केल्याने त्याने मे १८५८ मध्ये बंड केले. तेंव्हा इंग्रजांनी भावे यास पकडून फाशी दिले. तसेच नाशिक-नगर भागातील पथाजी नाईक, भागोजी नाईक यांना बंडवाल्यांनी साथ दिली. ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणीचे लढाईत या भिल्लाचा पराभव झाला. शेवटी चौकशी होऊन अनेकांना फाशी व इतर स्वरूपाच्या शिक्षा दिल्या.

१८५७ च्या उठावातील जनतेचा सहभाग :

उठावाची सुरुवात शिपायांनी केली असली तरी उठावाने सर्व देशभर पेट घेतला. इंग्रजांनी ज्यांची संस्थाने, वतने, जहांगिऱ्या, पदव्या जप्त केल्या ते संस्थानिक, वतनदार, जमीनदार, त्यांच्यावर अवलंबून असलेली जनता या उठावात सहभागी झाली. पदवी व पेन्शन रद्द झालेला दिल्लीचा बादशहा बहादुरशहा जाफर, नानासाहेब पेशवा, सेवक अजीमुल्लाह, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे व कुंवरसिंह ही मंडळी उठावात सामील होती. अवधचा नबाब वाजीदअली शहा, परत हजरतमहल, वजीरअली नकीखान यांनी उत्तरेत उठावाचा प्रसार केला. त्यांची माणसे लष्करी छावण्यात, जनसामान्यात फिरू लागली. तसेच सामान्य जनता, शेतकरी तसेच बेकारी व उपासमारीने त्रस्त झालेले लोक, सनातन धर्माचा आदर करणारे धर्मार्तंड, नव्या सुधारणांना विरोध करणारे सनातनी कमी जास्त प्रमाणात या उठावात सामील झाले. सर्व देशभर कमी जास्त प्रमाणात इंग्रज शासन काही काळ कोलमडून पडले. ३१ मे १८५७ या दिवशी सर्वांनी एकदम उठाव करण्याची योजना होती. त्यामुळे सरकारी खजिना लुटणे, तुरुंगातून कैद्याची मुक्तता करणे, इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करणे, रेल्वे, टेलीफोनची मार्ग नष्ट करणे याबाबींचा समावेश होता. या उठावात उत्तर भारतातील जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. या तुलनेने दक्षिण भारतामध्ये उठावामध्ये जनतेचा सहभाग कमी होता.

१८५७ च्या उठावाचे स्वरूप :

१८५७ च्या उठावामध्ये १/१० लोकसंख्येने व १/६ प्रदेशाने भाग घेतला होता. त्यामुळे तो थोड्याफार प्रमाणात देशव्यापी स्वरूपाचा होता. १८५७ च्या उठावाकडे पाहण्याचा दृष्टिकोण परस्परविरोधी स्वरुपाचा होता. १८५७ च्या घटनांध्ये प्रामुख्याने शिपायांचाच भाग होता. त्यांचे हे बंड शिस्तबद्ध नव्हते. म्हणून त्याला ‘शिपायांची भाऊगर्दी’ असे काही इतिहासकार म्हणतात.

१८५७ च्या उठावाविषयी भारतीय विचारवंत आणि विद्वान यांनी पुढीलप्रमाणे मते सांगितलेली आहेत.

१) वि. दा. सावरकर – ‘भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध’ मानतात.

२) डॉ. सेन – ‘ख्रिश्चन धर्मियांविरोधीचे हिंदूचे बंड’

३) प्रा. न. र. फाटक – ‘शिपायांची भाऊगर्दी.’

४) पंडित नेहरू – ‘१८५७ चा उठाव सैनिकांचा विद्रोह नसून ते स्वातंत्र्ययुद्ध होते.’

५) डॉ. मुजुदार, सरदार पण्णीकर व निळकंठ शास्त्री – ‘१८५७ चा उठाव भारतीय स्वातंत्र्याचा पहिला लढा नसून ब्रिटिश राजवटीमुळे दुखावलेल्या संस्थानिकांनी व शिपायांनी स्वत:वर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी केलेला एक शौर्यपूर्ण प्रयत्न होय.’

१८५७ च्या उठावाविषयी परकीय विचारवंत आणि विद्वान यांनी पुढीलप्रमाणे मते सांगितलेली आहेत –

१) सर जॉन लॉरेन्स : हे शिपायांचे बंड होते व त्याला काडतूस प्रकरण हे होते.

२) सर ऑटरम : इंग्रज राजवट उलथून टाकण्यासाठी हिंदू-मुसलमानांनी केलेला पूर्व नियोजित कट होय.

३) ग. ज. कॅनिंग : १८५७ चा उठाव सैनिकी बंडापेक्षा बराच मोठा असून लवकरच तो देशव्यापी बनून सर्वसामान्य जनता व सरकार यांच्यातील संघर्ष बनेल.

१८५७ च्या उठावाच्या स्वरूपाबाबत इतिहासकारांध्ये मतभेद आहेत. हे वरील विवेचनावरुन स्पष्ट होते.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: