होमरुल चळवळ

सन १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. राष्ट्रीय चळवळीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ती पुन्हा सक्रीय करण्याचा निर्णय घेतला. या काळात मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्यात नेत्यांना यश आलेले होते. ब्रिटिशांच्या धोरणावर नाराज असलेल्या मुस्लिम लीगनेही राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मान्य केले होते. अशा पार्श्वभूमीवर होमरुल चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

होमरुल चळवळ :

डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक व जोसेफ बॅप्टिस्थ यांच्या नेतृत्त्वाखाली भारतात ही चळवळ घडून आली. होमरुल लीगच्या विविध संघटना अस्तित्वात आल्या. परंतु चळवळ एकच होती. 

‘होमरुल’ म्हणजे स्वराज्यप्राप्ती होय. आपल्या देशाचा राज्यकारभार करण्याचा अधिकार आपण प्राप्त करुन घेणे म्हणजे होमरुल होय.

होमरुलची चळवळ ही मूळात आयर्लंडधील लोकांनी श्री. रेडांड यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू केलेली होती. श्रीमती ॲनी बेझंट याही जन्माने आयरिश होत्या.भारत व आयर्लंड या दोन देशांची राजकीय समस्या सारखीच असल्याने भारतातही होमरुल चळवळ सुरू केली तर भारतीय लोकांत जागृती निर्माण होईल असे बेझंट यांना वाटत होते.

डॉ. ॲनी बेझंट :

 • ॲनी बेझंट यांचा जन्म १ ऑक्टोबर १८४७ रोजी झाला. इंग्लंड व जर्मनीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.
 • इंग्लंडधील आगपेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी त्या ठिकाणी चळवळ सुरू केली.
 • सन १८९३ मध्ये त्यांनी शिकागो येथील धर्म परिषदेत सहभाग घेतला. त्यावेळी स्वामी विवेकानंदानी केलेल्या भाषणामुळे त्या हिंदु धर्म व संस्कृतीकडे आकर्षित झाल्या.
 • सन १८९३ मध्ये बेझंट भारतात आल्या. भारतात आल्यानंतर सन १८९३ ते १९१२ या काळात थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य केले.
 • प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी बनारस येथे ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ स्थापन केले.
 • पुढे सन १९१३ मध्ये त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले.
 • राजकीय जीवनात कार्यरत असताना त्यांनी काँग्रेसकडे होमरुल चळवळ सुरू करावी अशी मागणी केली. परंतु काँग्रेसमधून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
 • त्यांनी मद्रास येथे सन १९१४ मध्ये ‘कॉन वील’ हे साप्ताहिक व ‘न्यू इंडिया’ हे वृत्तपत्र सुरू केले.
 • डॉ. ॲनी बेझंट यांनी सन १९१५ मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने होमरुल चळवळीचा कार्यक्रम स्विकारावा अशी विनंती केली. परंतु या काळात काँग्रेस मवाळ गटाच्या ताब्यात असल्याने बेझंट यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
 • लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर टिळकांनी या चळवळीस पाठिंबा दर्शविला. यानंतर डॉ. बेझंट यांनी सप्टेंबर १९१६ मध्ये होमरुल लीगची स्थापना केली. कलकत्ता, मद्रास, कानपूर अलाहाबाद इत्यादी ठिकाणी होमरुल लीगच्या शाखा स्थापन झाल्या.

होमरुल चळवळ व लोकमान्य टिळक :

 • लोकमान्य टिळकांची सन १९१४ मध्ये मांडलेल्या तुरुंगातून सुटका केली.
 • टिळकांना राष्ट्रीय चळवळ अधिक गतीमान करण्याची गरज वाटत असल्याने डॉ. बेझंट यांची ‘होमरुल’ची संकल्पना उचलून धरली.
 • २८ एप्रिल १९१६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या बैठकीत ‘होमरुल लीग’ची स्थापना केल्याचे घोषित केले व त्याचे कार्यालय पुणे येथे ठेवले. जोसेफ बॉप्टीस्टा यांना लगीचे अध्यक्ष नेमले व न. चि. केळकर यांना सचिव म्हणून घोषित केले. दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि. ल. करंदीकर इत्यादी मंडळी या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी होते.

होमरुल लीगची उद्दिष्टे :

 • भारतीय स्वातंत्र्य चळवळीला अधिक गती देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात राजकीय हक्कांची जाणीव निर्माण करणे, स्वयंशासनाची मागणी ब्रिटिशांपर्यंत पोहचवण्यासाठी संपूर्ण देशभर प्रचार करणे व स्वयंशासनाचे ध्येय पूर्ण होईपर्यंत सनदशीर मार्गाची चळवळ अधिक गतिशील करणे हे लीगचे उद्दिष्ट होते. 

होमरुल लीगचे परदेशातील कार्य :

 • मद्रास प्रांतातील होमरुल लीगचे अध्यय सर सुब्रह्मण्यम अय्यर यांनी जून १९१७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना पत्र पाठवून होमरुल चळवळीस मदत करण्याची विनंती केली. विल्सन यांनी जी युद्धतत्त्वे घोषित केलेली होती त्यामध्ये स्वयंनिर्णयाचे तत्त्व होते. या तत्त्वानुसार भारताचा स्वयंनिर्णयाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी अय्यर यांनी केली. हे पत्र वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे संसदेत ब्रिटनच्या धोरणावर टीका झाली.
 • जुलै १९१७ मध्ये जोसेफ बॅप्टिस्टा यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिष्टंडळ इंग्लंडला पाठविले. या शिष्टमंडळाने इंग्लंडचा दौरा करुन भारतीय स्वराज्याचा प्रश्न ब्रिटिश जनतेपुढे मांडला.
 • सन १९१८ मध्ये टिळकांनी आणखी दोन शिष्टमंडळे इंग्लंडला पाठवण्याचे ठरविले. परंतु त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याने ते जाऊ शकले नाही. लोकमान्य टिळकांनी स्वत:च होमरुल चळवळीसाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. टिळक, न. चि. केळकर, दादासाहेब खापर्डे, बिपिनचंद्र पाल इत्यादी मंडळी इंग्लंडला जाण्यास निघाली. मात्र त्यांचे पासपोर्ट रद्द केल्याने मधून परत यावे लागले.
 • टिळकांनी यानंतरही हार न मानता लाला लजपतराय, एस. एस. हार्डीकर व के. डी. शास्त्री यांना अमेरिकेस पाठविले. या नेत्यांनी भारतीय होमरुल चळवळीची भूमिका अमेरिकन जनतेसमोर मांडली.
 • सॅन फ्रांन्सिस्को येथे होमरुल लीगची शाखा स्थापन केली व भारतीय स्वराजाच्या प्रश्नासंदर्भात अमेरिकन जनतेचा विश्वास संपादण्यात यश मिळवले. 

जोसेफ बॅप्टिस्टा व होमरुल चळवळ :

 • लोकमान्य टिळकांचे विश्वासू सहकारी व होमरुल चळवळीचे खंदे पुरस्कर्ते म्हणून जोसेफ बॅप्टिस्टा ओळखले जातात. केंब्रिज विद्यापीठातून बॅप्टिस्टा यांनी कायद्याची पदवी घेतलेली होती.
 • मूळचे हिंदू सारस्वत पाठारे असलेल्या बॅप्टिस्टा यांच्या कुटूंबियांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता.
 • टिळकांच्या कार्यावर प्रभावित होऊन बॅप्टिस्टा टिळकांच्या कार्याकडे आकर्षित झाले. टिळकांचे राजकीय सल्लागार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली होती.
 • टिळकांनी होमरुल लीगची स्थापन केल्यानंतर जोसेफ बॅप्टिस्टा यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. होमरुलचा प्रसार करण्यासाठी नंतर ते इंग्लंडला गेले. इंग्लंडध्ये भारतीय होमरुल चळवळीचे कार्य व प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटपर्यंत पोहचवण्यात व पार्लमेंटच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आले.
 • जोसेफ बॅप्टिस्टा यांनी भारतीय मजूर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. मुंबईमधील मंजूर संघाचे ते अध्यक्ष होते.
 • ‘ईस्ट इंडिया’ नावाचे मासिक त्यांनी सुरू केलेले होते.