1921 साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा संस्कृती हे नाव पडले. अनेक शहरे सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडल्याने सिंधु संस्कृती असेही म्हटले जाते. पाकिस्तान, भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, जम्मु-कश्मिर इ. प्रदेशात विस्तारीत संस्कृती होती. हे नागरीकीकरण सिंधु व तिच्या उपनद्या, घागरा आणि आता लोप पावलेली सरस्वती या नद्यांच्या काठी वसलेले होते. हडप्पा संस्कृतीचा काळ – साधारणपणे इ.स.पुर्व 3500-इ.स.पूर्व 1800. हडप्पा संस्कृतीचा उगम कसा झाला, संस्कृतीची स्थापना कोणी केली याविषयी माहिती अजुनही उपलब्ध नाही. आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागलाआहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.
हडप्पा कालीन महत्त्वाची ठिकाणे व त्यांचे संशोधक
राज्य | ठिकाण | संशोधक |
गुजरात | धौलविरा | आर. एस. बिश्त लुनी नदीच्या काठावर |
लोथल | एस. रंगनाथ राव (१९५४) भोगवा नदीच्या काठावर | |
रंगपुर | माधवस्वरुप वत्स, भगतत्राव | |
राजस्थान | कालीबंगन | ए. घोष घग्गर नदीच्या काठावर |
हरियाणा | बनवाली | आर.एस.विष्ठ |
रोपर | वाय.डी.शर्मा | |
जम्मू-काश्मीर | मांडा | जे. पी. जोशी (१९७६-७७) |
पंजाब | हडप्पा | दयाराम सहानी (१९२१-२३) रावी नदीच्या काठावर सध्या पाकिस्तानात |
उत्तर प्रदेश | आलमगीर | यज्ञदत्त शर्मा |
सिंध | मोहनजोदाडो | रखलदास बॅनर्जी (१९२२) सिंधू नदीच्या काठावर सध्या पाकिस्तानात |
चान्हुदारो | गोपाल मुजुमदार (१९३१) किल्ला नसलेले एकमेव ठिकाण | |
कोटदीजी | धूर्ये | |
बलुचिस्तान | सुटकाजेंदर | आर. एल. स्टाईन |
हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये
नियोजनबद्ध नगरे
- ग्रीड पॅटर्न शहर रचना.
- शहराची विभागणी – सिटॅडल आणि सामान्य भाग.
- सिटॅडल मध्ये उच्च कुलिन व शासनकर्ते राहत असावेत.
- रस्तेरुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात.
- हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती.
- मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत.
- सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते.
- शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणांचा समावेश. उदा. मोहनजोदाडो येथील धान्य कोठारे आणि सार्वजनिक कुंड. (कदाचित धार्मिक विधीपूर्वी स्नान करण्यासाठी वापर होत असावा.)
- शहरांभोवती तटरक्षक भिंती.
- तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यांमध्ये गहू, सातू (बार्ली) ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. यांखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता.
- जमिनी नांगरल्या जात. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे.
- शेतीला सिंचनासाठी नद्यांवर बांधारेही बांधले जात. उदा. धौलाविरा.
- अन्नधान्य साठवण्यासाठी गोदामे होती. (मोहनजोदाडो).
- प्राणी पाळले जात. – बैल, म्हैस, शेळी, डुक्कर, उंट, गाढव.
- हत्ती, हरिण इ. प्राण्यांबद्दल माहिती होती. मात्र घोडा त्यांना माहित नसावा.
तंत्रज्ञान व कला :-
- अवजारांसाठी मुख्यतः ब्राँझ आणि दगडांचा वापर.
- विविध नाणी, व्यापारी जहाजे बनवली जात. सोनार विविध आभूषणे बनवत. त्यासाठी स्टिएटाईट आणि लॅपीस लॅझुली दगडांचा तसेच सोने आणि तांब्यांचा वापर होत.
- हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यांमध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात
- कुंभार कामासाठी चाकाचा वापर होत असे.
- मोहनजोदाडो येथे नर्तिकेची प्रसिद्ध मूर्ती सापडली आहे.
व्यापार
- सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत.
- काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात.
- परदेशांशी चालणारा व्यापार खुश्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे.
- संपूर्ण प्रदेशात सारखीच वजन व मापे.
- मापांसाठी दशमान पद्धतीचा वापर. वजनमापे बनवण्यासाठी वेगवेगळया दगडांचा वापर होत असे.
- जहाजांचा वापर व्यापारासाठी होत; तसेच बैलगाडीही वापरत.
- लॅपिस लॅझुली या मौल्यवान दगडांचा व्यापार दुरस्थ भागाबरोबर चालत.
राजकीय व्यवस्था
व्यवस्थेबद्दल ठोस पुरावे नाहीत; मात्र प्रचंड विस्तारलेल्या नागरीकरण आणि मोहनजोदाडो येथील सार्वजनिक कुंड व सापडलेल्या पुरोहित सदृश्य मूर्तीच्या आधारे असे म्हणता येईल की शासन व्यवस्था नक्कीच अस्तित्वात होती.
धर्म
- स्त्री देवता व नैसर्गिक शक्तींची पूजा करत असावेत.
- अनेक नाणी आणि मुद्रांवर पशुपती शिवाची चित्रे आढळली आहेत.
- पिंपळाचे झाड आणि एक शिंगी प्राण्यांची मुद्राचित्र सापडले आहेत.
- मात्र धर्माबाबत काहीही स्पष्ट सांगता येत नाही; कारण लिखित पुरावे किंवा मंदिर सदृश्य इमारती आढळल्या नाहीत.
- हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत.
लिपी
हडप्पा कालीन लोक चित्र लिपी वापरत असत. मात्र आजपर्यंत त्याचा अर्थ समजू शकलेला नाही.
लोकजीवन व समाज
- उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता.
- विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री-पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत.
- शस्त्रांस्त्रांचा अभाव – समाज शांतताप्रिय होता.
- समाजात जातीभेद नसावेत.
- स्त्रीयांना समाजात महत्त्वाचे स्थान.
- गुलामगिरी अस्तित्त्वात होती.
- मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.
संस्कृतीचा अंत
संस्कृतीच्या उगमाप्रमाणे अस्ताविषयी ही कोणतीही ठोस माहिती नाही. साधारणपणे इ.स.पूर्व 1800 मध्ये संस्कृतीचा अंत झाला.त्याची खालील कारणे असावीत –
- दुष्काळ आणि भूकंप.
- पुन्हा पुन्हा येणारे महापूर
- व्यापारातील घट
- सिंधू नदीने पात्र बदलले असावे.
- प्रदेशातील शुष्कता वाढणे व घग्गर नदी कोरडी पडणे.
- आर्यांचा हल्ला.
- परिस्थितीकीय असमतोल.
मात्र यापैकी कोणतेही एक कारण इतिहासकारांना मान्य नाही.