स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन

प्रास्ताविक :

एकोणिसाव्या शतकात धार्मिक-सामाजिक कार्य करणारी रामकृष्ण मिशन ही एक महत्त्वाची संस्था होती. रामकृष्ण परमहंस हे कलकत्त्याजवळील दक्षिणेश्वर मंदिरात पुजारी म्हणून कार्य करत. ते स्वत:ला कालीमातेचे भक्त समजत. कालीमातेच्या भक्तीने व योगसाधनेने त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याचे म्हटले जात होते. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इ. स. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बेलूर मठाची विवेकानंद यांनी स्थापना करुन ते रामकृष्ण मिशनचे मुख्य केंद्र बनवले.

रामकृष्ण परमहंस :

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव गदाधर चटोपाध्याय असे होते. त्यांचा जन्म इ. स. १८३६ मध्ये बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील एका खेड्यात गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. ईश्वराची भक्ती ते लहानपणापासून करत. इ. स. १८८५ मध्ये ते कालीमातेचे पुजारी म्हणून दक्षिणेेशर मंदिरात कार्य करू लागले. कालीमातेच्या भक्तीत ते एकरुप होत. शंकराचार्याचे अनुयायी तोतापुरी यांनी त्यांना संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनीच त्यांचे नाव गदाधर चटोपाध्याय ऐवजी रामकृष्ण असे ठेवले. पुढे त्यांचा विवाह शारदामनी यांच्याशी झाला. रामकृष्ण यांनी सोप्या व साध्या भाषेत तत्त्वज्ञान सांगितले आहे.

स्वामी रामकृष्ण परमहंसाचे तत्त्वज्ञान :

  1. सर्व धर्म खरे असून ते मनुष्यास परमेेशराकडे नेतात.
  2. मनुष्याने धन आणि भौतिक सुखाचा हव्यास न धरता ईश्वराच्या चरणी लीन व्हावे.
  3. सर्व धर्म खरे असल्याने इतरांच्या धर्माचा उपहास करू नये.
  4. मूर्तीपूजा मान्य केली पण कर्मकांडे महत्त्वाची नसून श्रद्धा ही महत्त्वाची आहे असे स्पष्ट केले.
  5. ईश्वराच्या प्राप्तीसाठी गृहस्थधर्माचा त्याग करू नये.
  6. मानवसेवा हाच खरा धर्म आहे.
  7. चारित्र्य हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे.
  8. स्त्रियांना सर्वत्र आदराने आणि सन्मानाने वागविणे गरजेचे आहे.
  9. ईश्वर प्राप्तीसाठी विवेक आणि वैराग्याची आवश्यकता आहे.
  10. संसार करत असताना मनुष्याने सत्कार्य करावे.

स्वामी विवेकानंद :

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्त्व पत्करुन त्यांचे विचार साध्या आणि सोप्या भाषेत सांगून त्यांच्या कार्याचा जगभर प्रचार व प्रसार केला. विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी कलकत्त्यातील एका कायस्थ कुटुंबात झाला. ते १८८४ मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे पदवीधर म्हणून बाहेर पडले. विवेकानंद यांनी ह्यू, कांन्त, हेंगल, डार्वीन, मील, स्पेन्सर या तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला. प्रारंभी ते ब्राह्मो समाजाच्या शिकवणूकीकडे आकर्षित झाले. पुढे ते वयाच्या २० व्या वर्षी रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात आले आणि त्यांच्या जीवनाला कालाटणी मिळाली. ते रामकृष्णाचे निस्सीम अनुयायी बनले. रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर विवेकानंदानी आपले सारे आयुष्य रामकृष्णाच्या संदेशाच्या प्रसारार्थ घालविण्याचे ठरविले. त्यांनी भारतभर प्रवास केल्यानंतर त्यांना सामान्य लोकांच्या दु:खाची आणि त्रासाची जाणीव झाली. त्यांनी सामान्य लोकांना दु:ख व दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. रामकृष्ण परमहंस यांची शिकवण व धर्म हा वेदांतावर आधारित आहे. वेदांतावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. भारतीयांच्या अवनतीचे खरे कारण त्यांना आपण जगातील इतर देशापासून दूर राहिलो हे वाटते. त्यावर उपाय म्हणजे आपण जागतिक प्रवाहात सामील होणे हेच आहे असे वाटे. गती हेच जिवंतपणाचे लक्षण असल्याचे ते सांगतात. त्यांनी इ. स. १८८७ मध्ये रामकृष्ण मठाची स्थापना केली. बेलूर मठ हेच मिशनचे प्रमुख केंद्र बनले.

शिकागो जागतिक सर्वधर्म परिषद :

भारतीय संस्कृतीला जगासमोर नेण्यासाठी आणि भारताच्या अवनतीवर उपाय शोधण्यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेस स्वामी विवेकानंद इ. स. १८९३ मध्ये हजर राहिले. त्यांनी आपल्या विद्वत्तेने व वक्तृत्त्वशैलीने, मानवतेबद्दलच्या कणवेने आणि विश्वबंधुत्त्वाच्या भावनेला आव्हान करुन साऱ्या श्रोत्यांना जिंकून घेतले. त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणाले कि, ‘‘पाण्याचे विविध प्रवाह सागराला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे विविध मार्ग मानवाला ईश्वराकडे घेऊन जातात.’’ स्वामी विवेकानंदाच्याबाबत ‘न्यूयॉर्क हेरॉल्ड’ मध्ये ‘‘विवेकानंद धर्मपरिषदेत नि:संशयपणे एक महनीय व्यक्ति ठरले. त्यांचे विचार ऐंकल्यानंतर आम्हांला असे वाटते कि, एवढ्या ज्ञानी देशात मिशनरी पाठविणे मूर्खपणाचे आहे.’’ स्वामी विवेकानंदानी अमेरिकेचा दौरा करुन हिंदू धर्मावर अनेक व्याख्याने दिली. अमेरिकेत त्यांनी ‘वेदांत समाज’ स्थापन केला. अमेरिकेतील अनेकांना त्यांनी आपले शिष्य बनवले. विवेकानंद आपल्या भाषणातून म्हणत, ‘‘हिंदूत्त्ववादाने मानवी प्रतिष्ठेचा उपदेश जेवढ्या भव्यपणे केला तेवढा भूतलावरील एकाही धर्माने केला नाही.’’ स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेनंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व स्वित्झर्लंडचा दौरा केला. या चार वर्षाच्या दौऱ्यानंतर ते १८९७ मध्ये मायदेशी परतले. तेव्हा हिंदी जनतेने त्यांचे भव्य स्वागत केले. हिंदुस्थानला परतल्यावर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.

रामकृष्ण मिशन संघटन आणि कार्य :

स्वामी विवेकानंद यांनी मिशनच्या संघटनेसाठी कार्य केले. मिशनच्या श्रद्धेचा प्रचार आणि देशाच्या प्रगतीसाठी काम केले. त्यासाठी त्यांनी दोन मुख्य केंद्राची स्थापना केली. त्यातील एक केंद्र कलकत्ता शहराच्या शेजारी बेलूर याठिकाणी तर दुसरे केंद्र आल्मोडा शेजारच्या मायावती येथे सुरू केले. त्याठिकाणी रामकृष्ण मिशनमध्ये तरुण सहभागी झाले. तेथे अशा तरुणांना मिशनच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचे संन्यासी म्हणून प्रशिक्षण देण्याची सोय केली. मिशनचे साधू प्राचीन काळातील साधूप्रमाणे रहात. परंतु हे संन्यासी समाजाची सेवा करत होते. त्यांना दुष्काळ पिडीतांसाठी मदत करणे, रोगी-पिडीतांना वैद्यकिय मदत करणे आणि प्लेग, कॉलरा, महारोगी आणि अनाथांची काळजी घ्यावी लागत असे. गरीब आणि वंचित लोकांच्यावर दया दाखवावी लागे. त्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी शिक्षितांना आव्हान करताना असे म्हटले कि, दीर्घकाळापासून हजारोजण भूक आणि अज्ञानात जगत आहेत. अशी प्रत्येक व्यक्ति देशद्रोही आहे, जी आपल्या खर्चाने शिक्षित झाली आहे त्या प्रत्येकाने शिक्षणप्रसार करण्यासाठी खर्च करावा. विवेकानंद पुढे असे म्हणतात की, भारताच्या अपेक्षा जनतेकडून आहेत. शारीरिक आणि नैतिकतेच्या दृष्टीने समाजातील वरच्या वर्गाचा मृत्यू झाला आहे.थोडक्यात, स्वामी विवेकानंद यांना भारतीय लोकांतील अशक्तपणा, भ्याडपणा आणि आळशी वृत्तीचा राग येत असे. त्याबाबत बोलताना स्वामी विवेकानंद म्हणत, ‘‘ज्या कशामुळे शारीरिक, बौद्धिक, धार्मीक आणि अध्यात्मिक वृत्ती तुम्हांला अशक्त बनवत असल्यास त्यांचा विष जसे नाकारले जाते तसे नाकारावे. ते जीवन नव्हे, ते खरे नव्हे. सत्य हे बलवान असते, सत्य हे शुद्ध आहे, सत्य म्हणजे पूर्ण ज्ञान आहे.’’ स्वामी विवेकानंद धर्माचे राष्ट्रीय जीवनातील महत्त्व विशद करताना म्हणत, ‘‘राष्ट्रीय जीवनांच्या संगीताचे सार म्हणजे धर्म होय.’’ स्वामी विवेकानंद यांनी नव्या पिढीतील लोकांना आत्मसन्मानाची शिकवण दिली. त्यांच्यात संस्कृतीबाबतचा आत्मविश्वास निर्माण केला.  जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे विशद केले.अशा या महान मानव सेवेचे व्रत घेतलेल्या स्वामी विवेकानंदांचा मृत्यू ४ जुलै, १९०२ रोजी झाला.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: