सर्वनाम

व्याख्या

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामांचा पुनरूच्चार किंवा पुनर्वापर टाळणे हे त्याचे कार्य असते.

प्रकार

 1. पुरूषवाचक सर्वनाम
 2. दर्शक सर्वनाम
 3. संबंधी सर्वनाम
 4. प्रश्नार्थक सर्वनाम
 5. सामान्य सर्वनाम/ अनिश्चित सर्वनाम
 6. आत्मवाचक सर्वनाम

पुरूषवाचक सर्वनामे

बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात. बोलणाऱ्याचा, ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा आणि ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा किंवा वस्तूंचा. व्याकरणात यांना पुरूष असे म्हणतात. या तीनही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरूषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

प्रथमपुरूषवाचक सर्वनामे

बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरूषवाचक सर्वनामे. उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः

द्वितीयपुरूषवाचक सर्वनामे

ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, ती द्वितीयपुरूषवाचक सर्वनामे. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः

तृतीयपुरूषवाचक सर्वनामे

ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, ती तृतीयपुरूषवाचक सर्वनामे. उदा. तो, ती, ते, त्या.

दर्शक सर्वनामे

जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविण्यासाठी जी सर्वनामे येतात, त्यांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.

संबंधी सर्वनामे

वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. संबंधी सर्वनामांना अनुसंबंधा सर्वनामे हे देखील नाव आहे. उदा. जो-जी-जे, जे-ज्या.

प्रश्नार्थक सर्वनाम

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, इ.

प्रश्नार्थक सर्वनामांचा इतर अर्थांनी वापर पुढीलप्रमाणे केला जातो.

 1. प्राण्यांसाठी व खासकरून मनुष्यासाठी कोण हे सर्वनाम वापरले जाते तर निर्जीव वस्तूंसाठी काय हे सर्वनाम वापरतात.उदा.कोणी मारले हे मांजर?   बाबांनी डायरीत काय लिहीले आहे?
 2. विलक्षणपणा, विचिञपणा किंवा आश्चर्य दाखविण्यासाठी.उदा. काय पोरगी आहे ही?
 3. तुच्छता किंवा तिरस्कार दाखविताना. उदा. कोण काय करतयं माझ?
 4. दोन गोष्टीतील फरक दर्शविण्यासाठी. उदा. तो कोण, हा कोण याचा विचार केलास का?
 5. अगणित्व, आश्चर्य व पृथकत्व दाखविण्यासाठी. उदा. कोणाकोणाची म्हणून नावे सांगू तुला आता?
 6. काय सर्वनामाचा काही ठिकाणी अव्ययासारखा उपयोग केला जातो. उदा. आई गावाला गेली काय?   तो काय भन्नाट नाचतो?   तो काय करणार आहे?

सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे

कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेंव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.

 1. कोणी कोणास हसू नये.
 2. कोणी यावे टिकली मारून जावे.
 3. कोणी कोणास काय म्हणावे?
 4. या जगाचे काय होईल, कोणास ठाऊक?
 5. जगी सर्वसुखी, असा कोण आहे?
 6. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते.
 7. देवाच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार?
 8. तिकडे कोण आहे, ते मला माहीत नाही.
 9. कोणी यावे, कोणी जावे.
 10. काय ही गर्दी!

आत्मवाचक सर्वनामे

आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो, तेंव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरूषवाचकही असतात. या दोहोंमधील फरक-

 • पुरूषवाचक आपण हे केवळ अनेकवचनात येते. आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते.
 • पुरूषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते. आत्मवाचक आपण तसे येत नाही.
 • आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येते, तेंव्हा ते पुरूषवाचक असते. व स्वतः या अर्थाने येते तेंव्हा ते आत्मवाचक असते.

आपण चा पुरूषवाचक सर्वनाम म्हणून उपयोग

 1. तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही. (या वाक्यात आपण म्हणजे मी, प्रथमपुरूषी एकवचन.)
 2. आम्ही ठरवले आहे की, आपण गडावर जाऊ. (या वाक्यात आपण म्हणजे आम्ही, प्रथमपुरूषी अनेकवचन.)
 3. शिक्षक विद्यार्थीनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबवून बोलाल का? (या वाक्यात आपण म्हणजे तू, द्वितीयपुरूषी एकवचन.)
 4. मी देवळात गेलो, तेंव्हा आपण इकडे घरी आलात.(या वाक्यात आपण म्हणजे तुम्ही, द्वितीयपुरूषी अनेकवचन.)
 5. रामने मला मैदानावर सोडले आणि आपण माञ खेळायला आलाच नाही. (या वाक्यात आपण म्हणजे तो, तृतीयपुरूषी एकवचन.)
 6. नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले. (या वाक्यात आपण म्हणजे ते, तृतीयपुरूषी अनेकचवन.)

आपण व स्वतः चा आत्मवाचक सर्वनाम म्हणून उपयोग

 1. थोड्या वेळाने राजा स्वतःच पुढे आला.
 2. मी आपणहून त्यांना देणगी दिली.
 3. ती आपणहून आली.
 4. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
 5. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे.
 6. त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला.
 7. तो स्वतः उठला व गाणे म्हणू लागला.
 8. तो आपणहून पोलिसांच्या हवाली झाला.
 9. मी स्वतः त्याला पाहिले.
 10. तुम्ही स्वतःला काय समजता.
 11. मनुष्याचा सर्वात मोठा शञू तो स्वतःच असतो.

सर्वनामांचा लिंगविचार

मुळ सर्वनामे

मराठीत मुळ सर्वनामे ९ आहेत.

 1. मी
 2. तू
 3. तो
 4. हा
 5. जो
 6. कोण
 7. काय
 8. आपण
 9. स्वतः

यातील लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीनच आहेत.

 1. तो ः तो-ती-ते
 2. हा ः हा-ही-हे
 3. जो ः जो-जी-जे

याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तीनही लिंगातील रुपे सारखीच राहतात, ती बदलत नाहीत.

सर्वनामांचा वचनविचार

९ सर्वनामांपैकी ५ सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.

 1. मी-आम्ही
 2. तू-तुम्ही
 3. तो-ती,ते,त्या
 4. हा-ही,हे,ह्या
 5. जो-जी,जे,ज्या

सर्वनामांचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आलेले असेल, त्यावर अवलंबून असते.

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: