समास : मराठी व्याकरण- (Samas – Marathi)

समास : मराठी व्याकरण- (Marathi) व समासाचे प्रकार

समास : समासात (Samas in Marathi) कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकञ येतात. दोन शब्दापैकी वाक्यात कोणत्या पदाला अधिक महत्व असते, यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

 1. पहिले पद प्रमुख -अव्ययीभाव समास
 2. दुसरे पद प्रमुख-तत्पुरूष समास
 3. दोन्ही पदे महत्वाची –द्वंद्व समास
 4. दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध-बहुव्रीही समास

समास : समासाचे प्रकार

सूचना: संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

अव्ययीभाव समास

जेंव्हा समासातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेंव्हा अव्ययीभाव समास होतो.

उदा.

 1. आजन्म– जन्मापासून
 2. आमरण-मरेपर्यंत
 3. यथाशक्ती– शक्तीप्रमाणे
 4. यथाक्रम-क्रमाप्रमाणे
 5. यथान्याय-न्यायाप्रमाणे
 6. प्रतिदिन– प्रत्येक दिवशी
 7. प्रतिक्षण– प्रत्येक क्षणाला

या उदाहरणांत आ, यथा, प्रति हे संस्कृतमधील उपसर्ग आहेत. संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययेच मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द सामासिक शब्द आहेत. त्यांचा वर दिल्याप्रमाणे विग्रह करताना या उपसर्गांच्या अर्थांना वरील सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे. म्हणून या समासाला प्रथमपदप्रधान समास असेही म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे, म्हणून त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात.

उदा. दररोज, हरहमेशा, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर ( या शब्दांमध्ये फारसी उपसर्ग आहेत.)

तत्पुरूष समास

ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. त्यास तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदा.

 1. तोंडपाठ (तोंडाने पाठ)
 2. कंबरपट्टा(कंबरेसाठी पट्टा)
 3. महादेव(महान असा देव)
 4. अनष्टी(नाही इष्ट ते)

१) समानाधिकरण तत्पुरूष

तत्पुरूष समासातील दोन्ही पदे केंव्हा केंव्हा विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात. त्यास समानाधिरण तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदा. काळमांजर- काळे असे मांजर

२) व्यधिकरण तत्पुरूष

केंव्हा केंव्हा दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात. या प्रकारास व्याधिकरण तत्पुरूष समास असे म्हणतात.

उदा. देवपूजा- देवाची पूजा

तत्पुरूष समासाचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे-

विभक्ती तत्पुरूष

ज्या तत्पुरूष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरूष समास म्हणतात. या समासाच विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्तीप्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्तीचे नाव त्या समासास दिले जाते.

समाससामासिक शब्दविग्रह
द्वितीया तत्पुरूषदुःखप्राप्तदुःखाला प्राप्त
कृष्णाश्रितकृष्णाला आश्रित
देशगतदेशाला गत
तृतीया तत्पुरूषभक्तिवशभक्तीने वश
गुणहिनगुणांनी हीन
तोंडपाठतोंडाने पाठ
बुध्दिजडबुध्दीने जड
चतुर्थी तत्पुरूषक्रीडांगणक्रीडेसाठी अंगण
गायरानगायीसाठी रान
सचिवालयसचिवांसाठी आलय
वाटखर्चवाटेसाठी खर्च
पंचमी तत्पुरूषऋणमुक्तऋणातून मुक्त
सेवानिवृत्तसेवेतून निवृत्त
चोरभयचोरापासून भय
जन्मखोडजन्मापासून खोड
गर्भश्रीमंतगर्भापासून श्रीमंत
षष्ठी तत्पुरूषराजपुञराजाचा पुञ
देवपूजादेवाची पूजा
विद्याभ्यासविद्येचा अभ्यास
भगिनीमंडळभगिनींचे मंडळ
सप्तमी तत्पुरूषघरजावईघरातील जावई
वनभोजनवनातील भोजन
स्वर्गवासस्वर्गातील वास
पाणकोंबडापाण्यातील कोंबडा
पाणसापपाण्यातील साप

तत्पुरूष समासात काही सामासिक शब्द वेगवेगळ्या विभक्तीमध्ये देखील असू शकतात. उदा.

 1. गावदेवी (गावची देवी)- षष्ठी तत्पुरूष समास, (गावातील देवी)- सप्तमी तत्पुरूष समास
 2. चोरभय(चोराचे भय)- षष्ठी तत्पुरूष समास, (चोरापासून भय)- पंचमी तत्पुरूष समास.

अलुक् तत्पुरूष

ज्या विभक्ती तत्पुरूष समासात पूर्वपदाच्या विभक्तीप्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक् तत्पुरूष समास असे म्हणतात. उदा.

अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरूह, कर्तरिप्रयोग, सरसिज

या शब्दांच्या पहिल्या पदातील अग्रे, युधि, पंके, कर्तरि, कर्मणि, सरसि ही त्या त्या शब्दांची संस्कृतमधली सप्तमीची रूपे न गाळता तशीच राहिली आहेत. (अलुक् म्हणजे लोप न होणारे)

उपपद तत्पुरूष 

काही सामासिक शब्दांतील दुसरी पदे धातुसाधिते किंवा कृदन्ते असतात ज्यांचा वाक्यात स्वतंञपणे उपयोग करता येत नाही. अशा समासास उपपद किंवा कृदन्त तत्पुरूष समास असे म्हणतात. उदा.

 1. पंकज- पंकात(चिखलात) जन्मणारे ते
 2. जलद- जल देणारे ते
 3. ग्रंथकार- ग्रंथ करणारा
 4. मार्गस्थ- मार्गावर असणारा(राहणारा)
 5. शेषशायी- शेक्षावर निजणारा
 6. सुखद- सुख देणारा/देणारे
 7. देशस्थ- देशात राहणारा
 8. द्विज-दोनदा जन्मणारा
 9. नीरज-नीरात जन्मणारा
 10. खग-आकाशात गमन करणारा

उपरोक्त सर्वच शब्द तत्सम आहेत. माञ उपपद तत्पुरूष समासात केवळ तत्सम शब्दच असतात असे नाही.

काही मराठी शब्द-

 1. शेतकरी- शेती करणारा
 2. कामकरी- काम करणारा
 3. आगलाव्या- आग लावणारा
 4. भाजीविक्या- भाजी विकणारा
 5. पहारेकरी- पहारे करणारा
 6. गळेकापू- गळे कापणारा
 7. मळेकरी- मळे करणारा

नञ तत्पुरूष 

ज्या तत्पुरूष समासातील पहिले पद नकारार्थी असते, त्यास नञ तत्पुरूष समास असे म्हणतात. उदा.

 1. अपुरा- पुर्ण नसलेला
 2. नास्तिक- आस्तिक नसलेला
 3. अयोग्य- योग्य नव्हे ते
 4. अनादर- आदर नसणे
 5. नापसंत- पसंत नसलेला
 6. अन्याय- न्याय नसलेले
 7. अहिंसा- हिंसा नसणे
 8. नाइलाज- इलाज नसणे
 9. बेडर- डर किंवा भिती नसलेला
 10. गैरहजर- हजर नसलेला
 11. बेकायदा-कायदेशीर नसलेले
 12. निर्दोष-दोष नसलेला
 13. अशक्य-शक्य नसलेला

कर्मधारय

ज्या तत्पुरूष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात, तेंव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.यातील शक्यतो पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते. यातील दोन्ही पदांतील संबंध विशेषण-विशेष्य किंवा उपमान-उपमेय अशा स्वरूपाचा असतो. उदा.

 1. महादेव- महान असा देव
 2. घनश्याम- घनासारखा श्याम
 3. रक्तचंदन- रक्तासारखे चंदन
 4. मुखकमल- मुख हेच कमल
 5. पितांबर-पिवळे असे वस्ञ
 6. विद्याधन-विद्या हेच धन
 7. हिरवागार-खूप हिरवा
 8. महाराष्ट्र-महान असे राष्ट्र
 9. भवसागर-विश्वरूपी सागर
 10. कमलनेञ-कमळासारखे नेञ
 11. घननीळ-निळा असा घन
 12. वेशांतर-दुसरा वेश
 13. श्यामसुंदर-सुंदर असा श्याम
 14. भाषांतर-अन्य भाषा
 15. लालभडक-खूप लाल
उपप्रकार
 1.  विशेषण पूर्वपद- सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण. नीलकमल, पीतंबर, रक्तचंदन
 2. विशेषण उत्तरपद- सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण. घननील, पुरूषोत्तम, भाषांतर
 3. विशेषण उभयपद- सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषणे. पांढराशुभ्र, श्यामसुंदर, लालभडक
 4. उपमान पूर्वपद- सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते. कमलनयन- कमळासारखे डोळे
 5. उपमान उत्तरपद- सामासिक शब्दातील दुसरे पद उपमान असते. नरसिंह- सिंहासारखा नर
 6. रूपक उभयपद- सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात. विद्याधन- विद्या हेच धन

द्विगू

ज्या कर्मधाराय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक सब्दावरून एक समूह सुचविला जातो, तेंव्हा त्यास द्विगू समास असे म्हणतात. हा समास नेहमी एकवचनात असतो. हा समास कर्मधारय समासच असतो, त्यामुळे त्याला संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. उदा.

 1. पंचवटी- पाच वडांचा समूह
 2. नवराञी- नऊ राञींचा समूह
 3. चातुर्मास- चार मासांचा समूह
 4. ञिभुवन- तीन भुवनांचा समूह
 5. सप्ताह- सात दिवसांचा समूह
 6. बारभाई- बारा भाईंचा समूह
 7. पंचपाळे- पाच पाळ्यांचा समुदाय
 8. चौघडी- चार घड्यांचा समुदाय
 9. ञैलोक्य-तीन लोकांचा समुदाय

मध्यमपदलोपी

काही सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो म्हणून या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना युक्त, द्वारा, पुरता, असलेला यांसारख्या शब्दांची स्पष्टता करावी लागते. म्हणून या समासाला लुप्तपद कर्मधारय समास असेही म्हणतात. उदा.

 1. कांदेपोहे- कांदे घालून केलेले पोहे
 2. साखरभात- साखर घालून केलेला भात
 3. गुळांबा-गुळ घालून केलेला आंबा
 4. चुलतसासरे- नवर्याचा चुलता या नात्याने सासरा
 5. गुरूबंधू- गुरूचा शिष्य या नात्याने बंधू
 6. डाळवांगे- डाळयुक्त वांगे
 7. पुरणपोळी- पुरण घालून तयार केलेली पोळी
 8. लंगोटीमिञ- लंगोटी घालत असल्यावेळेपासूनचा मिञ
 9. घोडेस्वार- घोडा असलेला स्वार
 10. मावसभाऊ- मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ

द्वंद्व समास

ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात, त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात.

इतरेतर द्वंद्व

समासविग्रह करताना आणि, व या समुच्चयबोधक अव्ययांचा उपयोग. उदा.

 1. आईबाप- आई आणि बाप
 2. बहिणभाऊ- बहीण व भाऊ
 3. ने-आण – ने आणि आण
 4. हरिहर- हरि आणि हर
 5. स्ञीपुरूष- स्ञी आणि पुरूष
 6. अहिनकुल- अहि आणि नकुल
 7. दक्षिणोत्तर- दक्षिण आणि उत्तर
 8. पशुपक्षी- पशू आणि पक्षी
 9. शर्टपॅंट- शर्ट आणि पॅन्ट
 10. कृष्णार्जुन- कृष्ण आणि अर्जुन

वैकल्पिक द्वंद्व 

समासविग्रह करताना किंवा, अथवा, वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग. उदा.

 1. खरेखोटे- खरे किंवा खोटे
 2. न्यायान्याय- न्याय किंवा अन्याय
 3. तीनचार- तीन किंवा चार
 4. बरेवाईट- बरे किंवा वाईट
 5. छोट्यामोठ्या- छोट्या किंवा मोठ्या
 6. पापपुण्य- पाप किंवा पुण्य
 7. सत्यासत्य- सत्य किंवा असत्य

समाहार द्वंद्व

समासविग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश(समाहार) केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. उदा.

 1. मीठभाकर- मीठ, भाकर व इतर साधे पदार्थ
 2. बाजारहाट-बाजारहाट व तत्सम वस्तू
 3. चहापाणी- चहा, पाणी व इतर नाष्ट्याचे पदार्थ
 4. कपडालत्ता- कपडे व इतर कापडी वस्तू
 5. भाजीपाला- भाजी, पाला व इतर पालेभाज्या
 6. अंथरूणपांघरूण- अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणार्या वस्तू व इतर कपडे
 7. केरकचरा- केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
 8. पानपञावळ- पाने व इतर पानाच्या वस्तू
 9. शेतीवाडी- शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद
 10. वेणीफणी- वेणीफणी व इतर साजशृंगार

बहुव्रीही समास

बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते. उदा. निळकंठ- निळा आहे कंठ ज्याचा असा तो (शंकर)

बहुव्रीही समासाचे चार प्रकार आहेत.

विभक्तीबहुव्रीही

बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते, हे संबंधी सर्वनाम ज्या विभक्तीत असते, तिचेच नाव या समासाला देतात. उदा.

 1. लक्ष्मीकांत- लक्ष्मी आहे कांता(पत्नी) ज्याची तो- विष्णू(प्रथमा)
 2. गजानन- गजाचे आहे आनन ज्याला, तो- गणेश(षष्ठी, प्रथमा)
 3. जितेंद्रिय- जित् (जिंकली) आहेत इंद्रिये ज्याने तो- मारूती(प्रथमा)

विभक्तीबहुव्रीहीचे प्रकार-

प्रकारसामासिक शब्दविग्रह
द्वितीया बहुव्रीहीप्राप्तधनप्राप्त आहे धन ज्यास तो
प्राप्तोदकप्राप्त आहे उदक ज्यास तो
तृतीया बहुव्रीहीजितेंद्रियजित् आहेत इंद्रिये ज्याने तो
कृतकृत्यकेले आहे कृत्य ज्याने तो
चतुर्थी बहुव्रीहीचौकोनचार आहेत कोन ज्याला तो
दशमुखदहा आहेत मुख ज्याला तो
पंचमी बहुव्रीहीनिर्धनगेले आहे धन ज्याच्यापासून तो
गतवैभवगेले आहे वैभव ज्याच्यापासून तो
षष्ठी बहुव्रीहीलंबोदरलंब(मोठे)आहे ज्याचे उदर तो
चक्रपाणीचक्र आहे ज्याच्या पाणित असा तो
सप्तमी बहुव्रीहीभीमादीभीम आजे आदी ज्यांत ते (पांडव)
 नाकनाही अक(दुःख)ज्यात तो(स्वर्ग)

समानाधिकरण बहिव्रीही

बहुव्रीही समासातील दोन्ही पदे केंव्हा केंव्हा एकाच विभक्तीत येतात, त्यास समानाधिकरण बहुव्रीही समास असे म्हणतात. उदा. भक्तपिय- भक्त आहे प्रिय ज्याला तो(देव)- प्रथमा विभक्ती.

व्याधिकरण बहुव्रीही

केंव्हा केंव्हा दोन्ही पदे भिन्न अशा विभक्तीत असतात, यास व्याधिकरण बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा. पद्मनाभ- पद्म आहे ज्याच्या नाभीत(बेंबीत) तो (विष्णू)-प्रथमा, सप्तमी विभक्ती

नञ बहुव्रीही 

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि असे नकारदर्शक असेल तर त्यास नञ बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.

 1. अव्यय- नाही व्यय ज्याला ते
 2. नीरस- नाही रस ज्यात ते
 3. निर्धन- गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो
 4. निर्बळ- निघून गेले आहे बळ ज्याच्यापासून तो
 5. अखंड- नाही खंड ज्याला असे ते
 6. अस्पृश्य- ज्याला स्पर्श करता येत नाही असे ते
 7. अकर्मक- नाही कर्म ज्याला असे ते.
 8. अनादी-नाही आदी ज्याला तो
 9. निरोग-नाही रोग ज्याला असा तो
 10. अनियमित- नियमित नाही असे ते.

सहबहुव्रीही

सामासिक शब्दातील पहिली पदे सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द विशेषण असेल, तर त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. उदा.

 1. सादर- आदराने सहित असा जो(नमस्कार)
 2. सबल- बलाने सहित असा तो.
 3. सहकुटुंब- कुटुंबाने सहित असा जो (गृहस्थ)
 4. सफल- फलासहित आहे जे ते (कार्य)
 5. सानंद- आनंदासह (नमस्कार)
 6. सवर्ण- वर्णासहित असा तो.
प्रादिबहुव्रीही

बहुव्रीही समासाचे पहिले पद जर प्र, परा, अप, दुर, सु, वि अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्यास प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.  उदा.

 1. सुलोचना- जिचे डोळे चांगले आहेत ती स्ञी
 2. सुमंगल- पविञ आहे असे ते.
 3. प्रबळ- अधिक बलवान असा तो.
 4. दुर्गुणी- गुण नाहीत ज्यात असा तो.
 5. निघृण- निघून गेली आहे घृणा ज्यातून तो.
 6. प्राज्ञ- प्रज्ञा (बुद्धी) आहे ज्याच्याकडे असा तो.
 7. विख्यात- विशेष ख्याती असलेला.