सत्यशोधक समाज

स्थापना

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला अज्ञान, अंधःकाराच्या महानिद्रेतून जागे करण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी व मानवधर्म स्थापण्यासाठी व आपल्या विचारसरणीला संघटनेच्या माध्यमातून मूर्त स्वरुप देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे बैठक बोलवली. संपूर्ण महाराष्ट्रातून ६० प्रतिनिधी या सभेला आले. या सर्वांसमोर फुले यांनी आपले विचार मांडले. अत्यंत तळमळीने भाषण करुन संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी कार्यकर्त्यांसमोर विशद केली. विचार-विमर्श होऊन त्याच दिवशी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वसामान्यासाठी आणि त्यांच्यामार्फत व त्यांच्यासाठी पोहोचलेली ही पहिलीच चळवळ होती. सर्वानुमते जोतीराव फुले अध्यक्ष व कोषाध्यक्ष तर श्री. नारायण गोविंदराव कडलक यांची कार्यवाह म्हणून निवड झाली.

सत्यशोधक समाजाची तत्त्वे :

महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची तत्त्वे पुढीलप्रमाणे होती.

 1. ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार आहे.
 2. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
 3. सर्व शक्तिमान अशा परमेश्वराची भक्ति किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे.
 4. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही; म्हणून कोणत्याही व्यक्तिला पुरोहित किंवा धर्मगुरु यांच्या मध्यस्थीशिवाय आपल्या प्रिय परमेश्वराची उपासना किंवा भक्ती करता येते.
 5. मानवाला जातीने नव्हे तर गुणाने श्रेष्ठत्त्व प्राप्त होते.
 6. पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. तसेच त्या कनिष्ठ वर्गाच्या पिळवणूकीचे कारण आहेत.
 7. कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केली आहे.

सत्यशोधक समाजाची चळवळ कोणत्या एका खास समाजाच्या वर्गाविरुद्ध नव्हती. बहुजन समाजात जागृती करणे हेच या समाजाचे उद्दिष्टे होते. ब्राह्मणांचे सामाजिक वर्चस्व या चळवळीमुळे हळुहळु कमी झाले. या समाजाने लोकशिक्षण, तमाशे, लावण्या, सवाल जबाबी, कीर्तने या माध्यमातून दिले.

सत्यशोधक समाजाचे बोधवाक्य 

“सर्वसाक्षी जगत्पती। त्यासी नकोच मध्यस्थी।।

सभासदाने घ्यावयाची शपथ

सत्यशोधक समाजाच्या सभासदाने घ्यावयाची शपथ सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक सभासदाने पुढीलप्रमाणे शपथ घ्यावी लागत असे.

“सर्व मानवप्राणी एकाच देवाची लेकरे आहेत; अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती अगर ध्यानसाधना करतेवेळी अगर धार्मिक विधीच्यावेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही. दुसऱ्यांनाही तसेच वागण्याबद्दल मी उपदेश करीन. सत्यरुपी परमेश्वरास साक्ष ठेवून मी ही प्रतिज्ञा करीत आहे. या प्रतिज्ञेप्रमाणे वागण्यास मला सामर्थ्य येईल, अशा प्रकारे आयुष्यक्रम गुजारण्यास योग्य प्रकारे तो मला मदत करो.”

सत्यशोधक समाजाचे कार्य :

 1. ज्या गावी सत्यशोधक समाजाच्या शाखा सुरु करण्यात आल्या होत्या त्या गावात दर आठवड्यातून एकदा सभा घेतल्या जात असत. या सभांमधून बहुजन समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांचा उहापोह केला जात असे. त्यामध्ये इथल्या कनिष्ठ जातीच्या लोकांत शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, सर्व प्रकारचे धार्मिक विधी भटभिक्षकांच्या पौरोहित्याशिवाय पार पाडणे, बहुजन समाजातील सामान्य लोकांना ज्योतिष, भूतपिशाच्च, जादूटोणा या सारख्या गोष्टींच्या भितीपासून मुक्त करणे इत्यादी बाबींना चालना देण्याविषयी चर्चा होत असे. या खेरीज, समाजातील जातिभेद, उच्चनिचता मूर्तिपूजा याविरुद्ध जोरदार प्रचार सत्यशोधक समाजाच्या सभामधून केला जात असे.
 2. सत्यशोधक समाजाने शिक्षणावर बराच भर दिला होता. बहुजन समाजाच्या दारिद्र्याचे आणि मागासलेपणाचे एक महत्त्वाचे कारण त्यास शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते हे होय, असे महात्मा जोतिबा फुल्यांचे प्रतिपादन होते. त्यांनी बहुजन समाजाच्या मुलांमुलीत शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले. त्यासाठी गरजू व लायक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना उत्तेजन देण्यासाठी समाजाने वक्तृत्त्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
 3. सत्यशोधक समाजाने ब्राम्हण-पुरोहिताशिवाय विवाह लावण्याचा उपक्रम सुरु केला. काही सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलामुलींचे आणि नातेवाईकांचे विवाह ब्राह्मण-पुरोहिताशिवाय लावून दिले. ही त्या काळातील अत्यंत क्रांतीकारक अशी घटना होती.
 4. सन १८७७ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला असताना; दुष्काळ पीडितांच्या मुलांची सोय करण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या वतीने एक बालाश्रम उघडला होता. त्याच्या मदतीसाठी समाजाच्या सभासदांना विनंती करणारे निवेदन सत्यशोधक समाजाचे चिटणीस या नात्याने स्वतः महात्मा फुले यांनी काढले होते.
 5. पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सावकार व जमीनदार यांच्याकडून होत असलेली जुलूम जबरदस्ती व पिळवणूक या विरुद्ध चळवळ सुरु केली. त्यांनी सावकार व जमीनदार यांच्या जमिनी कसण्यास नकार दिला. शेतकऱ्यांच्या या चळवळीचे नेतृत्त्व महात्मा फुल्यांनी केले आणि त्यांनी गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.
 6. इंग्लंडच्या महाराणीचे चिरंजीव व ‘ड्यूक ऑफ कनॉट‘ यांच्या भारतभेटीच्या वेळी मा. फुले शेतकऱ्यांच्या वेशात म्हणजे, डोक्यास मुंडासे, साधा अंगरखा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व पायात फाटक्या वहाणा घालून भेटीला गेले व तेथे त्यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून निर्भिडपणे सांगितले, “येथील जनतेचे आपणास हित करावयाचे असेल तर त्यांचे अज्ञान घालवा. त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा.”
 7. सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते नारायण लोखंडे यांनी मा. फुले व सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेने मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हॅड असोसिएशन सोसायटी” नावाची संघटना स्थापन करून कामगारांचे प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून दिले. आठ वर्षाच्या आतील मुलांना कामावर घेऊ नये, स्त्रियांना विशेष सवलती द्याव्यात, कामगारांना मध्यांतरी विश्रांतीसाठी सुट्टी इत्यादी बाबतीत त्यांनी सरकारला निवेदन सादर केले.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

7 thoughts on “सत्यशोधक समाज”

error: