Contents
show
25 सप्टेंबर २०१५ रोजी युनोच्या आमसभेतील १९४ देशांनी Transforming our world: the 2030 Agenda for Sustainable Development या शीर्षकाखाली २०३० साठीचा विकास अजेंडा स्वीकृत केला. यांलाच शाश्वत विकास उद्दिष्टे-२०१५ असे संबोधले जाते. या अजेंड्यामध्ये १७ उद्दिष्टे व त्याच्याशी संबंधित 169 लक्ष्ये होती.
या अजेंडय़ातील १७ उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
- सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.
- भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.
- आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.
- सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.
- लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.
- पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.
- सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.
- शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.
- पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.
- विविध देशांमधील असमानता दूर करणे.
- शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.
- उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.
- हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.
- महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.
- परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.
- शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.
- चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.
शाश्वत विकास उद्दिष्टे-२०१५ : त्यांच्याशी संबंधित तथ्ये व आकडेवारीसह सविस्तरपणे अशी आहेत.
१) गरीबी-सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.
तथ्ये व आकडेवारी-
- अद्याप ८३६ दशलक्ष लोक अति-दारिद्र्यात जगतात.
- विकसनशील प्रदेशातील दर ५ व्यक्तीमधील १ व्यक्ती प्रतिदिन १.२५ डाॅलरपेक्षा कमीवर जगतो.
- प्रतिदिन १.२५ डाॅलरपेक्षा कमीवर जगणाऱ्या लोकांपैकी बहुतांश लोक दक्षिण आशिया व सब-सहारन आफ्रिकेतील आहेत.
- दारिद्र्याचा उच्च दर छोट्या, अस्थिर व संघर्ष-ग्रस्त देशांत आढळतो.
- जगातील ५ वर्षांखालील बालकांमध्ये चार पैकी एका बालकाची त्याच्या वयाच्या मानाने कमी उंची आहे.
- २०१४ या वर्षात दररोज ४२,००० लोकांना संघर्षांमुळे आपले घर सोडावे लागले.
ध्येये-
- २०३० पर्यंत, १.२५ डाॅलरपेक्षा कमीवर उत्पन्नावर जगणाऱ्या सर्व लोकांच्या दारिद्रयाचे निर्मूलन करणे.
- २०३० पर्यंत, दारिद्रयात जगणाऱ्या सर्व वयोगटातील पुरूष, स्ञिया व बालकांचे प्रमाण निम्याने कमी करणे.
- सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्थेची व साधनांची तरतूद करणे व २०३० पर्यंत गरीब व वंचित घटकांना यात सामावून घेणे.
- २०३० पर्यंत सर्व पुरूष व स्ञियांना विशेषतः वंचित घटकांना आर्थिक संसाधनांवर समान हक्क असेल. तसेच मूलभूत सेवा जमीन व इतर संपत्तीची मालकी व नियंञण, वारसाहक्क, नैसर्गिक संसाधने, वित्तीय सेवा यांच्यावर समान हक्क असेल.
- २०३० पर्यंत, असुरक्षित परिस्थितीतील गरीबांना समर्थ बनविणे. आणि त्यांना नैसर्गिक आपत्ती, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय धक्के/आपत्ती यांपासून असलेला धोका कमी करणे.
- विकसनशील व अविकसित राष्ट्रांत धोरणे व कार्यक्रमांच्या माध्यमातून गरीबी नष्ट करण्यासाठी सहकाराद्वारे संसाधनांची जुळवाजुळव करणे.
- गरीबी निर्मूलनाच्या क्षेञात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सशक्त धोरणात्मक आराखडा आखणे.
२) भूक- भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.
तथ्ये व आकडेवारी-
(I) भूक
- जगातील नऊपैकी एक व्यक्ती कुपोषित आहे.
- जगातील बहुतांश कुपोषित लोक विकसनशील राष्ट्रांत राहतात. विकसनशील राष्ट्रांत १२.९ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.
- एकूण उपाशी लोकांपैकी २/३ आशिया खंडात राहतात. याबाबत दक्षिण आशियातील टक्केवारी घटली आहे तर पश्चिम आशियात किंचित वाढली आहे.
- दक्षिण आशियात सुमारे २८१ दशलक्ष कुपोषित व्यक्ती राहतात. तर सब-सहारन आफ्रिकेत २३ टक्के लोक कुपोषित आहेत.
- पाच वर्षांखालील बालकांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये अपुऱ्या पोषणआहारामुळे निम्मे (सुमारे ४५ टक्के) मृत्यू होतात. (दरवर्षी ३.१ दशलक्ष बालके)
- जगातील चारपैकी एक बालक अपुऱ्या वाढीने ग्रस्त आहे. विकसनशील देशांच्या बाबतीत हे प्रमाण तीनपैकी एक असे आहे.
- विकसनशील देशांतील ६६ दशलक्ष बालके उपाशी शाळेत उपस्थित राहतात. यापैकी २३ दशलक्ष आफ्रिकेतील आहेत.
(2) अन्न सुरक्षा
- कृषी हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्येला कृषी आजिविका प्राप्त करून देते.
- जगभरात ५०० दशलक्ष अल्प भू-धारक आहेत. यापैकी बहुतांश कोरडवाहू शेती आहे. यातूनच विकसनशील देशांतील अन्नापैकी ८० टक्के उपलब्ध होते.
- सन १९०० पासून सुमारे ७५ टक्के पीक विविधता नष्ट झाली आहे.
- जर स्ञियांकडे पुरूषांप्रमाणेच संसाधनांची मालकी व नियंञण असते तर जगातील उपाशी लोकांची संख्या १५० दशलक्षने कमी होऊ शकली असती.
- जगातील १.४ अब्ज लोकांकडे वीजेची उपलब्धता नाही.
ध्येये-
- २०३० पर्यंत, भूक संपविणे व सर्व लोकांना विशेषतः गरीब व दुर्बल घटकांना वर्षभर सुरक्षित, पोषक व पुरेसे अन्न उपलब्ध असेल याची खाञी करणे.
- 2030 पर्यंत सर्व प्रकारचे कुपोषण नष्ट करणे. २०२५ पर्यंत पाच वर्षांखालील बालकांतील अपुरी वाढ व अतिकूपोषतपणाची समस्या सोडविणे. तसेच किशोरवयीन मुली, गरोदर-स्तनदा माता व वृद्ध यांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करणे.
- २०३० पर्यंत, कृषी उत्पादकतेत व अल्प-भूधारकांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करणे.
- २०३० पर्यंत शाश्वत अन्न उत्पादन पद्धत व संवेदनक्षम शेती पद्धतीच्या वापराची खाञी करणे ज्यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढेल, पर्यावरण अबाधित राहील, पर्यावरण बदल व नैसर्गिक आपत्तींशी जुळवून घेण्याची क्षमता बळकट होईल व मृदेचा दर्जा विकसित होईल.
- २०२० पर्यंत, बी-बियाणे, पीके, पाळीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित जंगली प्राणी यांच्यातील जनुकीय विविधता टिकवणे.
- आंतरराष्ट्रीय सहकार्याने ग्रामीण पायाभूत संरचना, कृषी संशोधन व विस्तार सेवा, कृषी तंञज्ञान यामध्ये गुंतवणूक वाढविणे.
- जागतिक कृषी बाजारपेठेतील व्यापाराची बंधने व विकृती नष्ट करणे. तसेच दोहा विकास फेऱ्यातील निर्णयाप्रमाणे कृषी निर्यात अनुदाने (सबसिडी) इ. नष्ट करणे.
- फूड कमोडिटी मार्केटचे कार्य योग्य पद्धतीने होईल याची खाञी करणे.