शब्दसिद्धी

शब्दसिद्धी

शब्दसिद्धी

सिद्ध शब्द

मूळ धातू किंवा मूळ शब्द शब्द म्हणजे सिद्ध शब्द होय. जा, ये, बोल, बस, पी, कर यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात, त्यांना सिद्ध शब्द म्हणतात.

तत्सम शब्द-

संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे शब्दाच्या रूपांत काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत, त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. तत्सम म्हणजे त्याच्यासारखे. उदा.

पुष्प, सत्कार, प्रीति, उत्सव, भीति, वृक्ष, कन्या, पिता, पुञ, गुरू, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, अग्नि, नदी, कमल, करण, पर्ण, यद्यपि, भगवान, परंतु, अरण्य, हस्त, मस्तक इ.

तद्भव शब्द-

संस्कृत भाषेतील शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल झालेला असतो. असे मूळ रूपात बदल होऊन आलेले शब्द म्हणजेच तद्भव शब्द होय. उदा. कान- कर्ण, कोवळा- कोमल, चाक- चक्र, पाय-पद, दुध-दुग्ध, आग-अग्नि, काम-कर्म, पान-पर्ण, ओठ-ओष्ठ इ.

देशी शब्द-

मराठी भाषेत अनेक शब्द असे आहेत की जे तत्सम, तद्भव किंवा परभाषीय नाहीत. ते महाराष्ट्रातील पुर्वी राहणाऱ्या लोकांचे बोलीभाषेतील शब्द असावेत. अशा शब्दांना देशी किंवा देशज शब्द म्हणतात. उदा.

”झाडाच्या डहाळीवर राघू आणि लुगडं नेसलेली चिमणी झोपलेली असताना एक खुळा बोका, रेडा आणि घोडा आले. त्यांनी दगडधोंडे मारायला सुरूवात केली. ते त्यांच्या डोक्याला ,डोळ्याला, पोटाला, पाठीला, कमरेला आणि गुडघ्याला लागले. त्यांच्या हाडांचा खुळखुळा झाला. ते ऐकून वांग्यातल्या ढेकणाने बाजरीचे पीठ मुस्काटाला लावले.”

सूचना: संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

अरबी शब्द-

उस्ताद उर्फ बिस्मील्ला खान शानदार जमातीचा शाहीर होता. पण नंतर पैजा लावून त्याच्यात फाजील फलाना हैवानी कैफ आला. तो पै पै ला मोताद झाला. त्याला अद्दल घडली. त्याने खजील होऊन साहेबांकडे नक्कल अर्ज केला की, माझ्या बक्कल खर्चासाठी आणि हाशीलसाठी काही मजबूत इनाम मंजूर केल्याचा जाहीरनामा काढा. मला मुलामा दिलेली कनातही देण्याचा हुकूम काढावा. मी जामीनावर जाहीर करतो की, यापुढे मौज न करता मेहनतीने कलम चालवीन आणि शहरावर अलंगनौबत नजर ठेवीन.

फारसी शब्द-

एक गरीब अवलीया साधू गुजराण करण्यासाठी हंगामी रियाज करून शहनाई वाजवायचा. तो अचानक पेशवा बनला. मग तो अस्सल शौकिन बनून दरबारात मैफिली अगर जलसा भरवू लागला. त्याची तनखा आणि खुमारी वाढली. तो अव्वल जरतारी फारशी पोषाख, शाईची दौत, निशान आणि अत्तर वापरू लागला. तावदानी मेण्यात बसू लागला. शेलका खुराक, खाना खाऊ लागला. त्यामुळे त्याची रग आणि वजन वाढले. त्याचे फडणवीस आणि सुमारे हजारो सौदागर त्याची खाविंद म्हणून सरबराई आणि खुशामत करू लागले. त्यांना तो अबकारी हप्ता म्हणून दर महिन्याला सरकारी दप्तरांतून मोहरांचा लाखोटा देऊ लागला. या हकीकतीचा खलिता गुन्हेगारांना आणि कामगारांना समजल्यावर ते खफा होऊन त्यांनी सगळीकडे दंगाधोफा सुरू केला. सर्व चीजवस्तू, किताब आणि सामान एवढी कुमक त्यांनी लुटली. त्यांच्यात कारभारावरून खडाजंगी सुरू झाली. त्यामुळे दस्तुरखुद्द साधूला जाब देऊन जेलमध्ये जावे लागले. त्याला चाबकाने मारण्यात आले. त्याची जहागीरी आणि अब्रूही गेली. हे ऐकून सर्वजण लेझीम खेळू लागले.

कानडी शब्द-

आण्णा कांबळे हा ताई आणि आक्का बरोबर तूप, भाकरी, आमसूल, उडदाचे पापड आणि कोशिंबीर गडंगनेर म्हणून खात होता. त्यांना त्यांच्याकडेच गाजर आणि पडवळ विळीने, खलबत्त्याने की अडकित्त्याने कापायचे हे समजेना. तेवढ्यात चिंधीचे मुंडासे बांधलेला शिंपी बांबूची परडी आणि हंडा घेऊन आला आणि म्हणाला, तू बांगड्या भर… तुझी मुरकुंडी वळवीन…. तुझ्या खोलीची किल्ली माझ्या चिरगुटाच्या पिशवीत आहे.

पोर्तुगीज शब्द-

एक पगारी आणि जुगारी खमीस घातलेला पोर्तुगीज पाद्री नाताळाच्या वेळी कोबी, पायरी, हापूस, पपई, अननस, फणस, काजू, बटाटे, पाव, बिस्किट, पेरूचे आचार व तंबाखू घेऊन तुरूंगात गेला. तेथून पैशांच्या तिजोरीच्या आणि अलमारीच्या चाव्या, काडतूसांचे घेमेले, बिजागीरीचा बंब, पिंप, इस्ञी, बादली, साबण, साबुदाणा, परात, मेज, टिकाव व रोटी या वस्तूंचा लिलाव करून कसलाही पुरावा न ठेवता व्हरांड्यात पलटणसह पिस्तूल दाखवून पसार झाला. त्यामुळे फित लावलेल्या व टोपी घातलेल्या पोलिसांच्या शिरपेचाला फालतू बूच बसले. त्यासाठी कर्नल मेस्ञी हा लवाद नेमला.

गुजराती शब्द-

हरताळात इजा झाल्याने नानावटी हा गुजराती शेटजी त्यांच्या दादरच्या हवेलीत पथारीवर मावा व ढोकळा खात रिकामटेकडा बसला असताना घी चा डबा आणि मथळ्याचे चोपडे घेऊन सारोळ्याचा दलाल आला. शेटजी त्यांना म्हणाला, आमच्या वतीने मी तुमची भलामण करतो की, जेमतेम चरख्यावर तरी खादीचे सदरे बनवा आणि डांगराची लागवड करा. मग आपण दूधपाक खाऊन गरबा खेळू.

तामिळ शब्द-

मलय पर्वतावर मांजरापाटी कपडे घालून डेंगूळ आलेले चिल्लेपिल्ले खेळत होते. काय खेळत होते तर…. आरिंग मिरिंग…लवंगा तिरिंग…आपडी थापडी गुळाची पापडी…अटक मटक चवळी चटक…आणि ऐलमा पैलमा खेळल्यावर मठ्ठा प्यायले.

तेलुगु शब्द-

बंडी घातलेला तांडेल अनारसे तूप खाऊन विटी दांडू खेळत असताना येळकोट येळकोट ओरडल्याने गदारोळ झाला. तेवढ्यात एक तेलुगु आळूमाळु टाळा लावलेल्या डबीत लेंडी घेऊन निघाला असताना किडूक मिडूकांनी त्यांना वेढा घातला. तेंव्हा तो ओरडला, तुला बुरगुंडा होईल.

साधित शब्द

सिद्ध शब्दांपासून जे शब्द बनतात त्यांना साधित शब्द म्हणतात.

उपसर्गघटित आणि प्रत्ययघटित शब्द-

उपसर्गघटित शब्द

मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनतात. या अक्षारांना उपसर्ग असे म्हणतात. ही अक्षरे अव्ययरूप असतात व ती केंव्हा केव्हा मूळ धातूचा अर्थ फिरवतात. उदा.

हार या धातूचा मूळ अर्थहरण करणे किंवा नेणे असा आहे. पण मागे उपसर्ग लावल्यामुळे त्याच्या मूळ अर्थात होणारा बदल पुढीलप्रमाणे-

आ+हार= आहार

वि+हार=विहार

सं+हार=संहार

प्र+हार=प्रहार

परि+हार=परिहार

अप+हार=अपहार

उप+हार=उपहार

उपसर्ग हे स्वतंञपणे येत नाहीत. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द असे म्हणतात.

मराठीतील उपसर्गांचे प्रकार-

१. संस्कृत उपसर्ग

अति- अतिश, अत्यंत, अतिक्रमण, अतिरेक, अतिप्रसंग

अधि- अधिपती, अध्यक्ष, अधिकार, अधिकरण, अद्ययन, अधिदैवत

अनु- अनुक्रम, अनुकरण, अनुवाद, अनुभव, अनुस्वार, अनुमती

अप- अपशब्द, अपमान, अपशकुन, अपराध, अपयश, अपकार

अभि- अभिनय, अभिरूची, अभिनंदन, अभ्यास, अभिद्य, अभिमुख

अव- अवकृपा, अवतरण, अवनत, अवमान, अवगुण

आ- आमरण, आक्रोश, आजन्म, आक्रमण

उत्- उत्तीर्ण, उद्योग, उत्प्रेक्षा, उत्कर्ष, उत्तम, उन्नती, उत्पत्ती

उप- उपाध्यक्ष, उपपद, उपवास, उपकार, उपनेञ

दुस्- दुर्गुण, दुर्जन, दुर्लभ,दुष्कृत्य

निर, नि-निरंतर, निर्धन, निरोगी, निकामी, निर्गत, निर्लज्ज

परा- पराकाष्ठा, पराजय, पराभव, पराक्रम

परि- परिणाम, परिपाठ, परिवार, परिपाक, परिपूर्ण, परिश्रम

प्र- प्रत्येक, प्रवाह, पगति, प्रतिदिन, प्रबल,प्रतिध्वनी, प्रतिकूल

वि- विसंगति, विशेष, विज्ञान, विख्यात, विधवा, विपत्ती

सम्- संयोग, संतोष, संकल्प, संगीत, संस्कृत, संस्कार, संगम

सु- सुकर, सुग्रास, सुगंध, सुभाषित, सुशिक्षित, सुगम

२. मराठी उपसर्ग

अ-अन् – अबोल, अजाण, अनोळखी, अडाणी

आड- आडवाट, आडवळण, आडनाव, आडकाठी

अद- अदकोस, अदपाव, अदशेर

अव- अवघड, अवजड, अवलक्षण, अवदसा, अवखळ, अवकळा

नि- निलाजरा, निकामी, निनावी, निकोप

पड- पडसाद, पडताळा, पडजीभ, पडछाया

फट- फटकळ, फटफजिती

भर- भरदिवसा, भरधाव, भरचौकात, भरजरी

३.फारसी व अरबी उपसर्ग

ऐन- ऐनदौलत, ऐनहंगाम, ऐनखर्च

कम- कमजोर, कमकुवत, कमनशीब

गैर- गैरसमज, गैरसावध, गैरसोय, गैरहजर, गैरशिस्त, गैरहिशोबी

दर- दरमहा, दरमजल, दरसाल, दररोज

ना- नापसंत, नाउमेद, नालायक, नाराज

बद- बदलौकिक, बदनाम, बदसूर, बदफैल

बिन- बिनतक्रार, बिनचूक, बिनधोक

बे- बेअब्रू, बेकायदा, बेदम, बेडर, बेईमान

सर- सरचिटणीस, सरकार, सरहद्द, सरदार

हर- हररोज, हरगडी, हरसाल

प्रत्ययघटित शब्द – शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अनेक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.

प्रत्यय दोन प्रकारचे असतात.

१. कृत् किंवा धातूसाधित- धातूंना जोडले जातात ते कृत् प्रत्यय. कृत् प्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होतात, त्यांना कृदन्त असे म्हणतात.

२. तद्धित किंवा नामसाधित- नामे, सर्वनामे, विशेषण किंवा अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना तद्धिते असे म्हणतात.

धातूसाधिते किंवा कृदन्ते

१. संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातूसाधिते (कृदन्ते)

अ- चोर, देव, सर्प, माभ, भाव

अक- तारक, मारक, रक्षक, लेखक, पाचक

अन- वदन, वंदन, नयन, पालन, चरण

अना- कल्पना, प्रार्थना, वेदना, तुलना

अनीय- रमणीय, श्रवणीय, वदनीय, पूजनीय

आ- कथा, इच्छा, चिंता

इ-ई – हरी, त्यागी, भाषी

इक- पथिक, रसिक

त- हत, भूत, रत, कृत, मृत

तृ(ता)- श्रोता, दाता, ञाता, भर्ता

तव्य- श्रोतव्य, कर्तव्य, गन्तव्य

ति- युक्ति, नीति, शक्ती, स्तुति, कृती

य- त्याज्य, पेय, देय, भोग्य, कार्य

२. मराठी प्रत्यय व त्यापसून बनलेली धातूसाधिते

अ- कर, लूट, डर, खोट, तूट, फूट

आ- ठेवा, ठेचा, वेढा, आेढा, झगडा

आई- घडाई, शिलाई, चढाई, खोदाई

आऊ- लढाऊ, शिकाऊ, जळाऊ, टाकाऊ

आरी- रंगारी, पुजारी, पिंजारी

आळू- विसराळू, लाजाळू, झोपाळू

ई- मोडी, कढी, बुडी, कढी

ईक- पडीक, सडीक, पढीक

ईत- चकचकीत, लखलखीत

ईव- कोरीव, पाळीव, जाणीव, घोटीव, रेखीव

ऊ- झाडू, लागू, चालू

ऊन- देऊन, बसून, रडून, ऊडून, करून

खोर- चिडखोर, भांडखोेर, दिवाळखोर

णावळ- खाणावळ, लिहिणावळ, धुणावळ, दळणावळ

प- कांडप, वाढप, दडप

पी- कांडपी, वाढपी, दडपी

णारा- ऐकणारा, लिहिणारा, सांगणारा, बोलणारा

लाजरा, कापरा, दुखरा, हसरा, नाचरा

शब्दसाधिते किंवा तद्धिते

धातूंखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना शब्दसाधिते किंवा तद्धिते असे म्हणतात.

१. संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले तद्धित शब्द

अ- राघव, पांडव, यादव, भार्गव

इक- मानसिक, धार्मिक, कायिक, मासिक, वाचिक

इत- मूर्छित, आनंदित, दुःखित

ईन- नवीन, कुलीन, शालीन

कीय- राजकीय, परकीय, स्वकीय

त्व- जडत्व, गुरूत्व, विद्वत्व, मूर्खत्व, महत्व

मान- श्रीमान, बुद्धीमान

२. मराठी प्रत्यय लागून तयार झालेली शब्दसाधिते

अ- भरडा, गारठा, ओढा, ठेवा, ठेचा, वेडा

आई- विटाई, खोदाई, लढाई, दांडगाई, दिरंगाई, कुचराई

ई- लाकडी, पितळी, बोली, मापी

कर- खेळकर, खोडकर, प्रभाकर, सुखकर

करी- वारकरी, भाडेकरी, शेतकरी, पहारेकरी

कट- मळकट, मातकट, पोरकट, तेलकट

की- पाटीलकी, उनाडकी, शेतकी, माणुसकी

खोर- चिडखोर, भांडखोर, चहाडखोर

वाईक- आस्थेवाईक, नातेवाईक

सर- वेडसर, गोडसर, ओलसर, काळसर

३. फारसी प्रत्यय लागून तयार झालेली धातूसाधिते

गर, गार- जादूगर, सौदागर, गुन्हेगार

वान- बागवान

ई- नेकी, हमाली, मजुरी, खुशी

स्तान- तुर्कस्तान, अरबस्तान, कबरस्तान

गिरी- मुलुखगिरी, गुलामगिरी,

दार- पोतदार, दुकानदार, फौजदार

दाणी- अत्तरदाणी, पिकदाणी, मच्छरदाणी

बाज- नखरेबाज, दारूबाज, दगलबाज

बंद- हत्यारबंद, चिरेबंद, नालबंद

खाना- तोफखाना, दवाखाना, कारखाना

नवीस- फडणवीस, चिटणवीस

नीस- फडणीस, चिटणीस

आबाद- हैदराबाद, औरंगाबाद

नामा- करारनामा, पंचनामा, जाहीरनामा, हुकुमनामा

अभ्यस्त शब्द

अनेक शब्दांमध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुर्नरावृत्ती झालेली असते. अशा प्रकारे अक्षराचे किंवा शब्दाचे अभ्यस्त (द्वित्व) होऊन तयार झालेल्या शब्दाला अभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदा. दगडबिगड, हळूहळू, घरघर

अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार पडतात.

१) पूर्णाभ्यस्त शब्द-

एक संपूर्ण शब्द जेंव्हा दोनदा येऊन एक जोडशब्द बनतो त्या जोडशब्दाला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदा.

कोणीकोणी, मागोमाग, लाललाल, हालहाल, तुकडेतुकडे, एकएक, पुढेपुढे, हायहाय, मधूनमधून, जे जे, वा वा, घरघर, इ.

२) अंशाभ्यस्त शब्द-

कधी कधी एक शब्द पुन्हा तसाच न येता त्यातील एखादे अक्षर बदलून एकापाठोपाठ दोनदा येऊन जोडशब्द बनतो, अशा जोडशब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदा. गोडधोड, किडूकमिडूक, शैजारीपाजारी, दगडबिगड, झाडबिड, घरबिर, उरलासुरला, बारीकसारीक, उद्याबिद्या, इ.

काही वेळी पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून द्विरूक्ती होते. उदा. अक्कलहुशारी, जुलुमजबरदस्ती, अंमलबजावणी, साजशृंगार, बाडबिस्तारा, डावपेच, कागदपञ, दंगामस्ती, थट्टामस्करी, मानमरातब, रीतरिवाज, धनदौलत, इ.

३) अनुकरणवाचक शब्द-

काही शब्दांमध्ये एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनरुक्ती असते. अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. उदा. लुटूलुटू, चुटचुट, गडगड, कडकडाट, वटवट, तुरूतुरू, गुटगुटीत, खदखदून, किरकीर, इ.