वृत्तपत्रांचा इतिहास

भारतीय वृत्तपत्रांची सुरुवात :
 • मुद्रणकलेचा शोध युरोपमध्ये १५ व्या शतकात लागल्यामुळे वृत्तपत्रे व ग्रंथनिर्मितीस चालना मिळाली.
 • मुद्रणकलेचा प्रवेश भारतामध्ये १६ व्या शतकात झाला. भारतात मुद्रणाची सुरुवात सर्वप्रथम गोव्यात झाली, भारतात मुद्रणकलेचा प्रसार ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केला.
 • २९ जानेवारी १७८० रोजी भारतातील पहिले वृत्तपत्र ‘बेंगाल गॅझेट’ या नावाने जेम्स ऑगस्टस हिकीने इंग्रजी साप्ताहिक बंगालमध्ये सुरु केले.
महाराष्ट्रात वृत्तपत्रांची सुरुवात :
 •  १८१८ मध्ये पेशवाईचा शेवट झाल्यावर मुंबई प्रांतात इंग्रजाच्या प्रत्यक्ष अंमलापूर्वी वृत्तपत्रांचा उदय झाला होता. 
 • महाराष्ट्रात वृत्तपत्राचा प्रांरभ ‘बॉम्बे हेरॉल्ड’ (१७८९) या इंग्रजी साप्ताहिकापासून झाला. पुढे ‘बॉम्बे कुरिअर’ (१७९०), ‘बॉम्बे गॅझेट’ (१७९१) व ‘बॉम्बे टाईम्स’ (१८३२) या वृत्तपत्रांचा उदय झाला.
 • रॉबर्ट नाईट यांनी बॉम्बे टाईम्स, स्टँटर्ड व टेलीग्राफ या तीन वृत्तपत्रांचे एकत्रीकरण करुन ‘टाईम्स ऑफ इंडिया’ हे वृत्तपत्र सुरु केले.
 • मुंबई प्रांतात पहिले देशी वृत्तपत्र फर्दुनजी मर्झबान यांनी ‘मुंबई समाचार’ या नावाने १८२२ मध्ये सुरु केले. १८३० पर्यंत ‘मुंबई वर्तमान’, मुंबई दुर्बिण, चित्रज्ञान दर्पण, रास्त गोफतार अशी अनेक गुजराती वृत्तपत्रे सुरु झाली.
मराठी वृत्तपत्रांचा उदय व विकास :
 • मराठी वृत्तपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला. 
 • मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले. हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते. हे वृत्तपत्र १८४० मध्ये बंद पडले. त्यामुळे जांभेकरांनी १८४० मध्ये ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक सुरु केले.
 • मराठीतील ही दोन्ही वृत्तपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृत्तपत्राचे जनक’ मानले जाते. 
 • संपूर्ण मराठी वृत्तपत्र म्हणून  ४ जुलै १८४० पासून सुरु झालेल्या ‘मुंबई अखबार’ या वृत्तपत्रास मानले जाते. (दर्पण हे वृत्तपत्र द्विभाषिक असल्यामुळे त्यांस निखळ मराठी पत्र म्हणता येणार नाही.)
 • गोंविद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन यांनी  १८४० मध्ये ‘प्रभाकर’ हे साप्ताहिक सुरु केले.

१८४८ च्या नंतर मराठी वृत्तपत्राचा विशेष विकास झाल्याचे दिसून येते. १९६० पर्यंत अनेक वृत्तपत्रे महाराष्ट्रात सुरु झाली. त्यांनी महाराष्ट्रात समाजप्रबोधन केले व राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ मजबूत केली. त्यातील काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्रांचा आढावा पुढीलप्रमाणे.

ज्ञानप्रकाश (१८४९) :

‘ज्ञानप्रकाश’ हे मराठीतील पहिले दैनिक होते. या पत्राची सुरुवात कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी १८४९ मध्ये साप्ताहिकाच्या स्वरुपात पुण्यात केली. १९०४ पासून या साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात झाले. नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणून ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने मवाळवादी कालखंडात महत्त्वाची भूमिका बजावली.

विचारलहरी (१८५२) :

पुण्यातील काही विद्‌वानांनी एकत्र येऊन ‘विचारलहरी’ नावाचे मासिक जुलै १८५२ मध्ये सुरु केले. ख्रिचन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला उत्तर देण्यासाठी व ख्रिस्ती मतांचे खंडण करण्यासाठी हे पत्र सुरु करण्यात आले. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याकडे संपादनाची सूत्रे होती.

धूमकेतू व ज्ञानदर्शन (१८५३) :

भाऊ महाजनांनी १८५३ मध्ये धुमकेतू हे साप्ताहिक व ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरु केले. ‘प्रभाकर’ मधील उदार धोरण महाजनांनी धुमकेतून चालू ठेवले.

निबंधमाला (१८५४) :

विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी १८५४ मध्ये ‘निबंधमाला’ हे मासिक पुण्यातून सुरु केले. त्यांनी या वृत्तपत्रातून स्वदेशी, स्वधर्म व स्वभाषेचा जोरदार पुरस्कार केला. तसेच त्यांनी निंबधमालेतून महात्मा फुल्यांच्या सामाजिक कार्यावर व विचारावर जोरदार टिका केली.

इंदुप्रकाश (१८६२) :

इ.स. १८६२ मध्ये विष्णूशास्त्री पंडित यांनी द्विभाषी ‘इंदुप्रकाश’ हे वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्राने विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण व सामाजिक सुधारणेचा जोरदार पुरस्कार केला. हे वृत्तपत्र सुमारे ६२ वर्ष टिकले.

नेटिव्ह ओपिनियन (१८६४) :

विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी १८६४ साली ‘नेटिव्ह ओपिनियन’ हे वृत्तपत्र समाजप्रबोधनासाठी सुरु केले. मामा परमानंद हे या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. हे वृत्तपत्र दिर्घकाळ म्हणजेच १९०८ पर्यंत चालू होते.

अरुणोदय (१८६६) :

‘अरुणोदय’ हे ठाणे जिल्ह्यातील पहिले वृत्तपत्र होय. या वृत्तपत्राची सुरुवात १८६६ साली काशीनाथ विष्णू फडके यांनी केली. या वृत्तपत्राने ब्रिटिश सरकारला विरोध करीत सामाजिक व राजकीय प्रश्न सोडविण्यावर अधिक भर दिला. 

सुबोधपत्रिका (१८७३) :

‘सुबोधपत्रिका’ हे वृत्तपत्र ४ मे १८७३ पासून सुरु झाले. हे वृत्तपत्र प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते.

दीनबंधू (१८७७)

महात्मा जोतीराव फुले यांचे सत्यशोधक चळवळीतील प्रमुख सहकारी कृष्णराव भालेकर यांनी पुण्यातून बहुजन समाजाचे पहिले वृत्तपत्र ‘दीनबंधू’ इ.स. १८७७ पासून सुरु केले. पुढे नारायण मेधाजी लोखंडे व रामजी संतुजी आवटे यांनी या वृत्तपत्रांचे संपादन केले व हे वृत्तपत्र चालू ठेवले. तसेच या वृत्तपत्राने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, दलित समाजाचा उद्धार कामगार चळवळ व सावकारशाहीवर प्रकाश टाकला. म्हणूनच या वृत्तपत्राचे कार्य ऐतिहासिक मानले जाते.

केसरी व मराठा (१८८१) :

गोपाळ गणेश आगरकरबाळ गंगाधर टिळक यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील लोकांमध्ये राजकिय व सामाजिक जागृती घडवून आणण्यासाठी ‘केसरी’ हे मराठीतून व ‘मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्र १८८१ पासून सुरु केले. आगरकरांनी केसरीचे व टिळकांनी ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे संपादन केले. आगरकरांनी टिळकांशी मतभेद झाल्यानंतर केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा दिला त्यानंतर टिळकांनी १९२० पर्यंत केसरी व मराठा या दोन्ही वृत्तपत्राचे संपादन केले.

सुधारक (१८८८) :

गोपाळ गणेश आगरकर, यांचे बाळकृष्ण गंगाधर टिळक यांच्याशी मतभेद झाल्याने १८८७ मध्ये केसरी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला व समाजसुधारणेविषयीचे आपले विचार परखडपणे मांडण्यासाठी सुधारक हे नवीन वृत्तपत्र १८८८ मध्ये सुरु केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे :
 • राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने बाबासाहेबांनी ‘मुकनायक’ हे वृत्तपत्र ३१ जानेवारी १९२० पासून सुरु केले. पुढे काही कारणांनी हे वर्तमानपत्र बंद पडले.
 • बाबासाहेबांनी आपली चळवळ भारतातील लाखो बहिष्कृत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व पुढे महाडच्या चवदार तळाच्या सत्याग्रहाच्या वेळी स्पृश्य वर्गाच्या टिकेला उत्तर देण्यासाठी १९२७ पासून ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरु केले. याच वृत्तपत्रातून समाजसुधारणेविषयी आपले विचार परखडपणे मांडणाऱ्या लोकहितवादींची ‘शतपत्रे’ पुन्हा प्रकाशित करण्यात आली. १९३० मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. 
 • बहिष्कृत भारत बंद पडल्यावर डॉ. आंबेडकरांनी आपले राजकिय विचार व त्यांचे चळवळीतील कार्य पोहोचविण्यासाठी १९३० साली ‘जनता’ हे नवीन वर्तमानपत्र सुरु केले. जनतेपर्यत हे वृत्तपत्र १९५३ पर्यंत सुरु होते.
 • कालांतराने त्यांनी भारत बौद्धमय करण्याचे हेतूने ‘प्रबुद्ध भारत’ हे वर्तमानपत्र सुरु केले. 
नवयुग व मराठा :

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरुवातीला नवयुग व नंतर मराठा हे वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्रांचे प्रमूख वैशिष्ट्य म्हणजे चळवळीविषयीची व्यंगचित्रे. या वृत्तपत्रांनी काँग्रेस नेतृत्त्वावर प्रखर टिका केली.  

मराठी वृत्तपत्रांवरील सरकारचे निर्बंध :
 • देशी वृत्तपत्रांवर इंग्रजांनी १८१८ ते १८३५ च्या दरम्यान अनेक बंधने घातली. पुढे विल्यम बेंटिक व चार्ल्स मेटकाल्फ यांसारख्या उदारमतवादी गव्हर्नर जनरलमूळे ही बंधने शिथिल करण्यात आली व १८३६ ते १८५६ या काळात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्यात आले. 
 • १८५७ च्या उठावामुळे इंग्रजांनी देशी वृत्तपत्रांवर पुन्हा बंधने घातली व राणीच्या जाहीरनाम्याने १८५८ नंतर ती बंधने दूर केली. 
 • लॉर्ड लिटन यांनी १८७८ मध्ये देशी वृत्तपत्र नियंत्रण कायदा जारी करुन पुन्हा मुद्रण स्वातंत्र्यावर अनेक बंधने लादली. पुढे १८८२ मध्ये लॉर्ड रिपनने या कायद्यातील काही निर्बंध दूर केले.
 • १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीमुळे मुद्रण स्वातंत्र्यावर पुन्हा बंधने घालण्यात आली. अशा प्रकारे १९४७ पर्यंत भारतीय वृत्तपत्रांवर सरकारने अनेक निर्बंध लादले. ही बंधने केवळ भारतीय वृत्तपत्रावरच होती तर अँग्लो इंडियन वृत्तपत्रावर ही बंधने नव्हती. स्वातंत्र्यानंतर मुंबई सरकारने वृत्तपत्रांना स्वातंत्र्य बहाल केले व सर्व प्रकारची बंधने उठविली.