विशेषण

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात.

विशेषण

विशेषणाचे प्रकार

विशेषणाचे खालीलप्रमाणे तीन मुख्य प्रकार

गुणविशेषण

ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण/अवगुण किंवा विशेष दाखविला जातो, त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदा. धूर्त, कडू, गोड, मोठी, आंबट, शुभ्र, शूर, सुंदर, वाईट, दुष्ट,इ.

संख्याविशेषण

ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते, त्यास संख्याविशेषण म्हणतात.

गणनावाचक संख्याविशेषण 

पूर्णांक वाचक ः एक, दोन, तीन….. शंभर, कोटी.

अपूर्णांक वाचक ः पाव, अर्धा, पाऊण, तीनपंचमांश.

साकल्य वाचक ः दोन्ही, तिन्ही, चारही

क्रमवाचक संख्याविशेषण 

पहिला, दुसरा, आठवी, साठावे, शंभरावे

आवृत्तीवाचक संख्याविशेषण

चौपट, दसपट, द्विगुणित, दुहेरी, इ.

पृथकत्ववाचक संख्याविशेषण 

एकेक, दहा-दहा, शंभर, इ.

अनिश्चित/सामान्य संख्याविशेषण

सर्व, थोडी, काही, इतर, इत्यादी, इ.

सार्वनामिक विशेषण

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात. उदा.

 • मी-माझा, माझे, माझी, माझ्या
 • तू-तुझा, तुझी, तुझे, तुझ्या
 • तो-त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या
 • आम्ही-आमचा, आमचे, आमच्या
 • तुम्ही-तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या
 • ती-तिचा, तिच्या, तिचे
 • हा-  असला, असा, इतका, एवढा, अमका
 • तो- तसा, तसला, तेवढा, तितका, तमका
 • जो- जसा, जसला, जितका, जेवढा
 • कोण- कोणता, केवढा
 • काय- कसा, कसला

नामे, धातुसाधिते व अव्ययसाधिते यांचा विशेषण म्हणून उपयोग

नामसाधित विशेषणे

नामांपासून साधलेली विशेषणे. उदा. समाज-सामाजिक, कला-कलावंत, सातारा-सातारी, नगर-नगरी, कोल्हापूर-कोल्हापूरी, राग-रागीट, माया-मायाळू, धन-धनवान, कापड-कापडदुकान, फळ-फळभाजी इ.

धातुसाधित विशेषणे

धातूंपासून बनलेली विशेषणे. उदा. हस-हसरा चेहरा, पिक-पिकलेला आंबा, रांग-रांगणारे बाळ, वाह-वाहती नदी, पेट-पेटती, बोल-बोलकी बाहुली इ.

अव्ययसाधित विशेषणे

अव्ययांपासून बनलेली विशेषणे. उदा. वर-वरचा मजला, खाली-खालील पुस्तक, मागे-मागील सायकल, पुढे-पुढची काॅलनी इ.

अधिविशेषण/ पूर्व विशेषण

विशेषणे समान्यतः विशेष्याच्या पूर्वी येतात त्यांना अधिविशेषण किंवा पूर्व विशेषण असे म्हणतात. उदा. चांगला मुलगा सर्वांना आवडतो.

विधिविशेषण

काही वेळा विशेषण विशेष्याच्या नंतर येतात, त्यांना विधिविशेषण किंवा उत्तरविशेषण म्हणतात. उदा. मुलगी सुंदर आहे. गुलमोहर मोहक दिसतो.

क्रियाविशेषण

काही विशेषणे क्रियापदांबाबत अधिक माहिती सांगतात, अशा विशेषणांना क्रियाविशेषणे म्हणतात. माञ काही क्रियाविशेषणे नामाच्या लिंग, वचन यानुसार बदलतात. त्यांना क्रियाविशेषण सव्यय म्हणतात. उदा. श्याम चांगला खेळतो- मीरा चांगली खेळते-ते चांगले खेळतात. या वाक्यात चांगला हे क्रियाविशेषण आहे, माञ ते कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलते आहे म्हणून ते क्रियाविशेषण सव्यय आहे.

शहाणा-शहाणी-शहाणे-शहाण्या

मोठा-मोठी-मोठे-मोठ्या

विशेषणाचे कार्य व उपयोग

 • विशेषणाचा विशेषण म्हणून वापर – जो शब्द नामाबद्दल माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात.
 • विशेषणाचा नाम म्हणून वापर – विशेषणाचा नाम म्हणून वापर करताना वाक्यातील मूळ नाम काढून टाकून त्याऐवजी विशेषण वापरावे. अशा वेळी नामाचा प्रत्यय विशेषणाला लागतो.
 • हा, ही, हे, तो, ती, ते चा वापर कर्त्यावर किंवा एखाद्या नामापूर्वी केल्यास ती दर्शक विशेषणे होतात.
 • मिश्रवाक्यात जो, जी, जे, ज्या चा वापर नामापूर्वी केल्यास ती संबंधी विशेषणे होतात.
 • कोण/काय/कोणता या शब्दांचा वापर प्रश्नार्थक वाक्यात नामापूर्वी केल्यास ते प्रश्नार्थक विशेषण होते.
 • सर्वनामांचा वापर नामापूर्वी किंवा कर्त्यापुर्वी अधिक माहिती सांगण्यासाठी केल्यास ते सर्वनाम विशेषणाची भूमिका करते.

सूचना: संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.