- विभक्ती- नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
- कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.
- कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात
- उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.
प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. ही क्रिया कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात. नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो. विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात.
- प्रथमा
- द्वितीया
- तृतीया
- चतुर्थी
- पंचमी
- षष्ठी
- सप्तमी
- संबोधन
विभक्ती | प्रत्यय | कारकार्थ |
प्रथमा | प्रत्यय नाहीत | कर्ता |
द्वितीया | स, ला, ते, ना | कर्म |
तृतीया | ने, ए, शी, नी | करण |
चतुर्थी | स, ला, ते, ना | संप्रदान |
पंचमी | ऊन, हून | अपादान |
षष्ठी | चा, ची, चे, च्या, ची | संबंध |
सप्तमी | त, इ, आ | अधिकरण |
संबोधन | -, नो | हाक |
विभक्ती | ||||
प्रथमा | — | मूल | — | मुले |
द्वितीया | स, ला, ते | मुलास, मुलाला | स, ला, ते, ना | मुलांस, मुलांना |
तृतीया | ने, ए, शी | मुलाने, मूलाशी | नी, शी, ई, ही, | मुलांना, मुलांशी |
चतुर्थी | स, ला, ते | मुलास, मुलाला | स, ला, ना, ते | मुलांस, मुलांना |
पंचमी | ऊन, हून | मुलाहून | ऊन, हून | मुलांहून |
षष्ठी | चा, ची, चे | मुलाचा, मुलाची | चे, च्या, ची | मुलांचा, मुलांची |
सप्तमी | त, ई, आ | मुलात | त, ई, आ | मुलांत |
संबोधन | — | मुला | नो | मुलांनो |
उदा.
१)तो घरातून बाहेर पडला.
२) तुझ्या हातून हे काम होणार नाही.
वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून पंचमीचा कारकार्थ अपदान आहे. दुसऱ्या वाक्यात हातून या शब्दात ऊन हा प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे असे निर्विवादपणे म्हणू शकतो का? प्रत्ययावरून पंचमी म्हणाव तर कारकार्थ करण आहे म्हणजेच तृतीया विभक्ती यायला हवी. मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय असला पाहिजे?
हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही. अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल. म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी काही हरकत नाही.