वासुदेव बळवंत फडके

इ.स. १८४५ मध्ये ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर रेल्वेखात्यात लिपीक म्हणून व नंतर लष्करी खात्यात नोकरी केली. या ठिकाणी मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत होऊन सरकारी नोकरी सोडली.

याच काळात संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातले होते. याबद्दल ब्रिटीशांची उदासीनता पाहून फडकेंच्या मनात क्रांतीवादी विचार घोळू लागले. त्यासाठी सुशिक्षितांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मांग व रामोशांचे सैन्य उभारले.

इ.स. १८७९ पासून फडकेंनी ब्रिटीशांविरुद्ध क्रांतीयुद्ध पुकारले. पश्चिम महाराष्ट्रात फडकेंची मोठी दहशत निर्माण झाली. फडकेंनी क्रांतीकारकांचे सशस्त्र गट तयार करुन त्यांच्याद्वारे दळणवळणाचे मार्ग उध्वस्त करणे, फोनच्या तारा तोडणे, कारागृहांवर हल्ला करुन कैद्यांना मुक्त करणे, सरकारी खजिने लुटणे असा उठाव सुरु केला. धनिकांच्या घरातील लुटलेला पैसा व धान्य त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना वाटल्यामुळे फडके लोकांचे दैवत बनले.

ब्रिटीश शासनाने फडकेंच्या उठावाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना पकडण्यासाठी मेजर डॅनियलची नियुक्ती केली तसेच मोठ्या बक्षिसाची रक्कमही जाहीर केली. २७ जुलै १८७९ रोजी गाणगापूरजवळील एका मंदिरात तापाने फणफणलेले फडके डॅनियलच्या हाती लागले. फडकेंवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.

फडकेंच्या वतीने सार्वजनिक काकांनी व नंतर सत्र न्यायालयात महादेव चिमणाजी आपटे या वकीलांनी खटला लढवला परंतु ब्रिटीश न्यायालयाने फडकेंना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एडनच्या तुरुंगात १७ फेब्रुवारी १८८३ रोजी या महान क्रांतीकारकाचा मृत्यु झाला.