वारे

वाहणारी हवा म्हणजेच वारे होय. तापमानातील बदलाला अनुसरून व्यस्त प्रमाणात वायूभार बदलत असता वायुभारात निर्माण होणारी असमानता नाहिशी करण्यासाठी जास्त भाराकडून कमी भाराच्या दिशेने हवा ढकलली जाते. व वाऱ्याची निर्मिती होते. वाऱ्याची दिशा व गती वायुभार उतारावार अवलंबून असते. वायुभार उतार हा समभार रेषा (Isobar) वर अवलंबून असतो.

सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

वारे नेहमी समभार रेषांना काटकोनात वाहतात. समभार रेषांतर कमी असेल तर वाऱ्यांचा वेग जास्त असतो आणि समभार रेषांतर जास्त असेल तर वाऱ्यांचा वेग मंद असतो. वारे नेहमी भूपृष्ठाजवळ व क्षितीजसमांतर दिशेस वाहतात. वाऱ्यांची दिशा ठरविण्यासाठी वातकुकुट किंवा वायुदिग्दर्शक (Wind Vane) तर वाऱ्यांची गती मोजण्यासाठी वायुवेगमापक (Anemometer) या उपकरणांचा वापर केला जातो. वाऱ्यांचा वेग ताशी नाविक मैल किंवा ताशी किलोमीटर या परिमाणांच्या सहाय्याने मोजला जातो.

वाऱ्यावर नियंत्रण करणारे घटक

वाऱ्यांची निर्मिती ही वायुभारातील क्षितिजसमांतर असमानतेुळे होत असते. वारे जास्त भाराच्या प्रदेशांकडून कमी भाराच्या प्रदेशांकडे वाहत असतात. परंतु वाऱ्यांची गती व दिशा यांना नियंत्रित करणाऱ्या इतर कांही शक्ती किंवा घटक कार्यरत असल्याने वाऱ्यांच्या गती व दिशा यामध्ये बदल होताना दिसतो. हे घटक पुढील प्रमाणे –

वायूभार उतार (Pressure gradient)

भूपृष्ठावरती जास्त भाराच्या प्रदेशांकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वायूभार कमी-कमी होत जातो. यालाच ‘वायूभार उतार’ असे म्हणतात. या वायूभार उताराच्या दिशेला अनुसरूनच वारे जास्त भाराकडून कमी भाराकडे वाहत असतात. वाऱ्यांची गती ही वायूभार उतारावार अवलंबून असते. समभार रेषांतर कमी असेल तर वायूभार उतार तीव्र असतो व वाऱ्यांचा वेग जास्त असतो. या उलट समभार रेषांतर जास्त असेल तर वायूभार उतार मंद असतो व वाऱ्यांचा वेग कमी असतो. म्हणजेच वाऱ्यांची दिशा व वेग वायूभार उतारावर अवलंबून असतात.

भूपृष्ठाचे स्वरूप (Nature of earth surface)

पृथ्वीचा पृष्ठभाग भूखंडे व महासागरांनी व्यापलेला आहे. भूखंडाचा पृष्ठभाग उंचसखल असून तो पर्वत, पठारे, मैदाने व नदीखोरी यांनी व्यापला आहे. मैदानी व पठारी प्रदेशांवर वाऱ्यांना फारसा अडथळा येत नाही यामुळे वाऱ्यांची दिशा सरळ व वाऱ्यांचा वेग जास्त होतो. तर पर्वतीय प्रदेशामध्ये वाऱ्यांची दिशा बदलली जाते व वेग कमी होतो. सागरी प्रदेशांवर वाऱ्यांना कोणताही अडथळा असत नाही. यामुळे वाऱ्यांचा वेग महासागरांवरती सर्वात जास्त असतो व वाऱ्यांची दिशा सरळ असते. किंवा वायुभार उताराला अनुसरून असतो.

केंद्रोत्सारी प्रेरणा (Centrifugal force)

कोणतीही वस्तू स्वतःभोवती फिरत असेल तर तिच्यामध्ये केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होते या भौतिकशास्त्रिय नियमानुसार पृथ्वीच्या परिवलनामुळे किंवा स्वपरिभ्रणामुळे केंद्रोत्सारी प्रेरणा निर्माण होते. या प्रेरणेचा परिणाम, भूपृष्ठावर वाहणाऱ्या वाऱ्यावर होतो. विशेषतः ग्रहिय वारे, चक्रिय वादळे, आवर्त या प्रेरणेने प्रभावित होतात. या प्रेरणेचा शोध किंवा वाऱ्यांवरील परिणाम ‘कॉरिऑलीज’ या हवामान तज्ञाने शोधला म्हणून या प्रेरणेला ‘कॉरिऑलीज ची प्रेरणा’ (Coriolis Force) असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो व दोन्ही ध्रुवांकडे तो कमी कमी होत जातो. याचा परिणाम उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेवर होतो. हा परिणाम फेरेल या तज्ञाने शोधला म्हणून याला ‘फेरेलचा नियम’ म्हणतात. त्याच्या मते, ‘‘ उत्तर गोलार्धातील वारे आपल्या मूळ दिशेच्या उजव्या बाजूला वळतात तर दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या डाव्या बाजूला वळतात.

वाऱ्यांचे वर्गीकरण

भूपृष्ठावर कमी-जास्त भाराचे पट्‌टे (Pressure belts)आहेत व त्यांना अनुसरूनच वारे वाहत असतात. वारे व भारपट्‌टे यांचा सबंध सांगणारा नियम बाईज बॅलॉट या तज्ञाने सांगितला त्यांच्या मते, ‘‘वाऱ्याच्या दिशेकडे पाठ करून उभे राहिले असता, उत्तर गोलार्धात जास्त भार प्रदेश उजव्या बाजूला व कमी भार प्रदेश डाव्या बाजूला असतात तर दक्षिण गोलार्धात उजव्या बाजूला कमीभार प्रदेश व डाव्या बाजूस जास्त भार प्रदेश असतात.’’ वाऱ्यांची निर्मिती, स्वरूप, कालावधी व प्रदेश यावरून वाऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण केले जाते.

ग्रहीय वारे (Planetary winds) :

पृथ्वीवर एकूण चार जास्तभार व तीन कमीभार पट्‌टे निर्माण झाले आहेत. या भारपट्‌ट्यांना अनुसरून जास्त भाराच्या पट्‌ट्यांकडून कमी भाराच्या पट्‌ट्यांकडे विस्तीर्ण प्रदेशात नियमीत वारे वाहतात यांनाच ग्रहीय वारे असे म्हणतात. त्यांची विभागणी तीन प्रकारात केली जाते.

 1. व्यापारी वारे
 2. प्रतिव्यापारी वारे
 3. ध्रुविय वारे

व्यापारी वारे (Trade Winds) :

उत्तर व दक्षिण गोलार्धातील कर्क वृत्तीय व मकरवृत्तीय जास्त भार पट्‌ट्यांकडून विषुववृत्तीय कमी भार पट्‌ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ म्हणतात. हे वारे दोन्ही गोलार्धात २५ अंश ते ५ अंश अक्षांशाच्या दरम्यान वाहतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी जाणाऱ्या शिडांच्या जहाजांना सागरी प्रवासासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे म्हणूनच या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हटले आहे .

पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी प्रेरणेुळे या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून – पश्चिमेकडे असते. म्हणूनच यांना ‘ पूर्विय वारे’ (Eastliser) असे ही म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून – नैॠत्येकडे वाहतात म्हणून त्यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात या वाऱ्यांची दिशा आग्नेयकडून वायव्येकडे असल्याने त्यांना ‘आग्नेय व्यापारी वारे’ असे म्हणतात. बहुतांशी प्रदेशात व्यापारी वारे नियमीत वाहतात. विशेषतः समुद्रावर यांची दिशा व वेग यात सातत्य आढळते. यांचा वेग ताशी १० ते १५ नाविक मैल एवढा असतेा. जमिनीवर/ भूखंडावर यांचा वेग थोडासा मंद होतो व स्थानिक घटकांना अनुसरून दिशाही बदलते. व्यापारी वारे थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहत असल्याने त्यांच्या कडून पर्जन्याची शक्यता फारच कमी असते. परंतु योग्य परिस्थिती असल्यास खंडाच्या पूर्व किनार पहिला थोडाफार पाऊस पडतो. हिवाळ्यात हे वारे वेगाने व विस्तीर्ण प्रदेशावर वाहतात. आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात भारतीय उपखंडावरून वाहतात त्यावेळी त्यांना ‘ मोसमीवारे’ म्हणून ओळखले जाते.

प्रतिव्यापारी वारे (Anti- trade winds) :

उत्तर गोलार्धात कर्कवृत्तीय जास्तभार पट्‌ट्याकडून आर्क्टिकवृत्तीय कमी भार पट्‌ट्याकडे व दक्षिण गोलार्धात मकरवृत्तीय जास्त भार पट्‌ट्याकडून आंटार्क्टिकवृत्तीय कमी भार पट्‌ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. दोन्ही गोलार्धात हे वारे साधारणपणे ३५ अंश ते ६० अंश अंक्षांशाच्या दरम्यान वाहतात. दोन्ही गोलार्धात फेरेलच्या नियमानुसार हे वारे आपली मूळ दिशा बदलतात व साधारणपणे पश्चिमेकडून वाहतात म्हणूनच यांना ‘ पश्चिमी वारे’ (Westerlies) असेही म्हटले जाते. उत्तर गोलार्धात या वाऱ्यांची दिशा नैॠत्येकडून ईशान्येकडे असते म्हणून त्यांना ‘ नैॠत्य प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्य दिशेकडून आग्नेय दिशेला वाहतात म्हणून त्यांना ‘ वायव्य प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. प्रतिव्यापारी वारे विस्तिर्ण प्रदेशात व नियमीत वाहतात यांची दिशा व्यापारी वाऱ्यांच्या विरूद्ध असल्याने त्यांना ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशांकडून थंड प्रदेशांकडे वाहत असल्याने पर्जन्यासाठी पोषक स्थिती निर्माण होते व खंडाच्या पश्चिम भागात या वाऱ्यापासून पाऊस पडतो. समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तांवर या वाऱ्यांचा जास्त प्रभाव असतो. उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात हे वारे नियमीत वाहतात. म्हणूनच दक्षिण गोलार्धात या वाऱ्यांना ‘ शुर पश्चिमी वारे ’ (Brave west winds) म्हणतात. सागरावरून वाहताना यांचा वेग वाढत जातो. यामुळे दक्षिण गोलार्धात ४० अंश ते ६० अंश अक्षवृत्तात या वाऱ्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. दक्षिण गोलार्धात ४० अंश अक्षांशात त्यांना ‘ गरजणारे चाळीस’ (Roaring ) म्हणतात. ५० अंश अक्षांशात त्यांना ‘खवळलेले पन्नास’ म्हणतात. (Furious Fifties) तर ६० अंश द. अक्षांशात त्यांना ‘किंचाळणारे साठ’ (Screaming sixties) असे म्हणतात. उत्तर गोलार्धात ३० अंश उ. ते ३५ अंश उत्तर अक्षवृत्तात या वाऱ्यांपासून हिवाळ्यात पाऊस पडतो या प्रदेशांना ‘ भूमध्य सामुद्रीक हवामान प्रदेश ’ म्हणतात.

ध्रुवीय वारे (Polar Winds) :

भूपृष्ठावर देान्ही ध्रुवावर तापमान गोठणबिंदूच्या खाली असते परिणामी ध्रुवीय प्रदेश वर्षभर बर्फाच्छादनाखाली असतात. म्हणूनच येथे जास्तभार प्रदेश विकसीत झाले आहेत. या जास्तभार प्रदेशांकडून उपध्रुवीय कमीभार प्रदेशांकडे (आर्क्टिक व अंटार्क्टिक वृत्तीय कमीभार प्रदेश) वारे वाहतात. त्यांना ‘ ध्रुवियवारे ’ असे म्हणतात. दोन्ही गोलार्धात ६० अंश ते ८० अंश अक्षांशाच्या दरम्यान ध्रुवीय वारे वाहतात. ध्रुवीय वाऱ्यांची वाहण्यांची दिशा साधारण पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्याने त्यांना ‘ पूर्व ध्रुवीय वारे’ (Polar Easterlies)असे म्हणतात. उत्तर ध्रुवाजवळील वेगवान वाऱ्यांना नॉरेस्टर (Noreasters) म्हणतात. तर दक्षिण ध्रुवाजवळ यांना गेल (Gale ) असे म्हणतात.

विषुववृत्तीय शांत पट्‌टा (Doldrum) :

विषुववृत्तीय प्रदेशात ५ अंश उत्तर व ५ अंश दक्षिण अक्षवृतांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप असतात. परिणामी या प्रदेशात तापमान जास्त असते. हवा तापली जाते. प्रसरण पावते. व वजनाने हलकी होते. व हवेचे उर्ध्वगामी प्रवाह सुरू होतात. याचाच परिणाम म्हणून ‘ विषुववृत्तीय कमी भार पट्‌ट्यांची’ निर्मिती होते हाच प्रदेश ‘विषुववृत्तीय’ शांत पट्टा (Doldrum) म्हणून ओळखला जातो. दोन्ही गोलार्धातील ‘व्यापारी वारे’ (Trade winds) व दक्षिण गोलार्धातील ‘आग्नेय व्यापारी वारे ’ याच प्रदेशात एकत्र येतात. म्हणूनच हा प्रदेश ’ आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीय विभाग’ (Intertropical Convergence Zone) म्हणूनही ओळखला जातो.

अश्व अक्षांश (Horse Latitude)

विषुववृत्तीय प्रदेशात अत्याधिक तापमानाने वातावरणात उर्ध्वगामी झालेली हवा दोन्ही ध्रुवांच्या दिशेने वाहते व नंतर उत्तर गोलार्धात कर्क वृत्ताजवळ व दक्षिण गोलार्धात मकर वृत्ताजवळ पुन्हा भूपृष्ठावर उतरते. यामुळे दोन्ही गोलार्धात २५ अंश ते ३५ अंश अक्षांशाच्या दरम्यान जास्त भार प्रदेशांची निर्मिती झाली आहे. या अधोगामी हवेचे प्रवाह असलेल्या प्रदेशाला ‘ अश्व अक्षांश’ (Horse Latitude)असे म्हणतात या प्रदेशात हवेची क्षितीजसमांतर किंवा आडवी हालचाल असत नाही. पूर्वीच्या काळी युरोप व अमेरिका खंडातील व्यापार विशेषतः घोडयांचा व्यापार येथून चालत असे. वाऱ्या अभावी ही व्यापारी जहाजे कित्येक दिवस कर्क व मकर वृत्तीय जास्त भार पट्‌ट्यात अडकून पडत . जहाजांवरील चारा व अन्न- धान्य संपुष्टात आल्याने नाइलाजाने घोड्यांना समुद्रात सोडून द्यावे लागत असे म्हणूनच दोन्ही गोलार्धातील २५ अंश ते ३५ अंश अक्षांशातील प्रदेश ‘ अश्व अक्षांश’ (Horse Latitude) म्हणून ओळखला जातो.

नियतकालीक वारे (Periodical winds)

‘विशिष्ट प्रदेशांध्ये व विशिष्ट कालावधीमध्ये तसेच विशिष्ट दिशेने व विशिष्ट गतीने वाहणारे वारे म्हणजेच नियतकालीक वारे (Periodical winds) होय’ . हे वारे ॠतुमानानुसार वाहत असल्याने यांना ‘ॠुतूप्रमाणित वारे’ (seasonal winds) असेही म्हणतात.

या मध्ये –

 1. मोसमी वारे
 2. खारे व मतलई वारे
 3. डोंगरी व दरीतील वारे

यांचा समावेश होतो.

मोसमी वारे (Monsoon Winds) :

‘भूपृष्ठावर ॠतुनुसार (उन्हाळा, हिवाळा) नियमित वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे असे म्हणतात’. ‘मौसीम’(mausim) म्हणजेच ॠतू या अरेबीक शब्दापासून ‘मौसमी’ (Monsoon) या शब्दाची उत्पत्ती झाल्याचे दिसते. जमीन व पाणी यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे आहेत. जमीन अपारदर्शक, घनरूप व स्थिर तर पाणी पारदर्शक, द्रवरूप व अस्थिर आहे. यामुळे पाण्याची विशिष्ट उष्णता जमीनीपेक्षा अडीचपट जास्त आहे. यामुळे एकाच कालावधीत जमीन व पाणी यांचे तापमान व परिणामी वायुभार यात भिन्नता आढळते याचाच परिणाम म्हणून ‘ॠतुनुसार जमीनीकडून जलभागाकडे व जलभागाकडून जमीनीकडे वारे वाहू लागतात यांना मोसमी वारे म्हणतात’. मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीसाठी कांही विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये

 1. विस्तृत भूखंडाचा प्रदेश
 2. विस्तृत सागर सानिध्य
 3. आयनिक (Tropical) प्रदेशातील स्थान

इ. गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी एकत्रित व योग्य पद्धतीने अस्तित्वात असल्यास मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते. उदा. भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इ.

भारतातील मोसमी वारे (Indian monsoon)

विस्तृत भूखंड, विस्तृत सागर सानिध्य व आयनिक प्रदेशातील स्थान यांची योग्य पूर्तता भारतीय उपखंडात होते. उन्हाळ्यात वायव्य भारतात जास्त तापमानामुळे कमीभार प्रदेश निर्माण होतो. याच काळात हिंदी महासागरावर जास्त भार प्रदेश विकसीत झालेला असतो. हिंदी महासागरावरावरील जास्त भाराच्या प्रदेशाकडून वायव्य भारतातील कमीभार प्रदेशाकडे वारे आकर्षिले जातात. हे वारे विषुववृत्त ओलांडून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून वायव्य भारताकडे वाहू लागतात. यांनाच ‘उन्हाळी मोसमी वारे’ किंवा ‘नैॠत्य मोसमी वारे’ म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असल्याने भारतीय उपखंडात या वाऱ्यांपासून पाऊस पडतो. विशेषतः सह्याद्री पर्वतरांगा व पूर्वांचलमध्ये अतिवृष्टी होते. हिवाळ्यात तापमान व वायूभार उत्तर स्थितीमध्ये असतात. भारतीय उपखंडात तापमान कमी व वायूभार जास्त असतो. तर हिंदी महासागरावर तुलनेने तापमान जास्त व वायूभार कमी असतो. या कालावधीत भारतीय उपखंडावरील जास्तभार प्रदेशाकडून हिंदी महासागरावरील कमी भार प्रदेशाकडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना ‘ ‘हिवाळी मोसमी वारे’ परतणारे मोसमी वारे’ किंवा ‘ईशान्य मोसमी वारे’ असे म्हणतात. या वाऱ्यांमुळे तामीळनाडूच्या पूर्व किनारपट्‌टीला पाऊस पडतो. परंतु हे वारे कोरडे असल्याने भारताच्या इतर भागात पाऊस पडत नाही.

खारे वारे व मतलई वारे (Sea and Land Breeze)

जमीन व पाणी यांचे भौतिक गुणधर्म (Physical Proerties) वेगवेगळे आहेत. पाण्याची विशिष्ट उष्णता जमिनीपेक्षा अडीच पट जास्त आहे. याचाच परिणाम म्हणून जमीन व पाणी यांना तापण्यासाठी व थंड होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. परिणामी वायुभारात भिन्नता निर्माण होते व वाऱ्यांची निर्मिती होते. दैनिक तापमान भिन्नतेुळे खारे व मतलई वारे निर्माण होतात.

खारे वारे (Sea Breeze)

सुर्योदयानंतर सौरशक्तीमुळे उष्णता मिळू लागते. दिवसा सूर्याच्या उष्णतेुळे जमिनीचे भाग लवकर तापतात. तुलनेने पाणी/ जलभाग तापण्यासाठी वेळ लागतो. यामुळे जमिनीवर कमीभार व सागरावर जास्त भार प्रदेशांचीनिर्मिती होते. व दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहू लागतात यांना ‘खारे वारे’ असे म्हणतात. खारे वारे सकाळी १० ते ११ पासून रात्री ७ ते ८ वाजे पर्यंत समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. १ ते २ वाजेपर्यंत त्यांचा वेग जास्त असतो व नंतर तो कमी कमी होत जातो. या वाऱ्यांचा वेग ताशी १५ ते २० कि.मी. असतो.

मतलई वारे (Land Breeze)

सूर्यास्तानंतर भूपृष्ठाला मिळणारी उष्णता संपुष्टात येते. रात्र होताच दिवसा मिळालेल्या उष्णतेचे उत्सर्जन होऊ लागते. जमिनीच्या भागाकडून वेगाने उष्णतेचे उत्सर्जन होते व ते लवकर थंड होतात या उलट पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौतिक गुणधर्मांमुळे पाणी थंड होण्यासाठी वेळ लागतो. रात्रीच्या वेळी जमिनीवर कमी तापमान व जलभागावर तुलनेने जास्त तापमान असते. वायुभाराची स्थिती या उलट असते. जमिनीवर जास्त वायुभार व पाण्यावर/सागरभागावर कमी वायूभार असल्याने जमिनीकडून सागरभागाकडे वारे वाहू लागतात. समुद्र सानिध्यातील या रात्रीच्या वाऱ्यांनाच ‘मतलई वारे’ (Land Breeze) असे म्हणतात. मतलई वारे रात्री १० ते ११ पासून सकाळी ७ ते ८ वाजपर्यंत वाहतात. रात्री २ वाजेपर्यंत या वाऱ्यांचा वेग जास्त असतो हे वारे सरासरी ताशी १५ ते २० कि.मी वेगाने वाहतात.

खारे व मतलई वारे जमिनीवर सुारे २५ ते ३० कि.मी अंतरापर्यंत तर समुद्रावर ३५ ते ४५ कि.मी अंतरापर्यंत वाहतात. या वाऱ्यांच्या प्रभावामुळेच समुद्रसानिध्यातील प्रदेशांची तापमानकक्षा कमी असते व येथील हवामान सम स्वरूपाचे असते. म्हणजेच येथे उन्हाळे व हिवाळे फार कडक स्वरूपाचे असत नाहीत.

डोंगरी व दरीतील वारे (Mountain and Valley winds)

दैनिक तापमानाच्या भिन्नतेमुळे डोंगराळ प्रदेशात या वाऱ्यांची निर्मिती होते. डोंगरी वारे रात्रीच्या वेळी डोंगरावरून उताराला अनुसरून गुरूत्वीय प्रभावाने दरी प्रदेशाकडे वाहतात तर दरीतील वारे दरी प्रदेशाकडून डोंगर माथ्याकडे नियमीत परंतु विशिष्ठ वेळेत वाहतात.

डोंगरी वारे (Mountain winds)

प्रदेशाच्या उंचीला अनुसरून डोंगर माथे व दरी प्रदेशात दिवसा व रात्री भिन्नता आढळते. सूर्यापासून दिवसभर मिळालेल्या उष्णतेचे रात्री उत्सर्जन सुरू होते. डोंगर माथ्याचा भाग लवकर उष्णता उत्सर्जित करतो व लवकर थंड होतो. म्हणूनच डोंगरमाथे/ पर्वत शिखरांचे भाग ‘उत्सर्जन खिडकी’ (Radiation window) म्हणून ओळखले जातात. या उलट दरी प्रदेशातील हवेचे तापमान तुलनेने जास्त असते. परिणामी डोंगर माथ्यावर जास्त भार व दरीप्रदेशात कमी भार निर्माण होतो. रात्री डोंगर माथ्याकडून दरीप्रदेशाकडे वारे वाहतात. यांनाच ‘डोंगरीवारे’ (Mountain winds) असे म्हणतात. यांची दिशा उतारावरून खाली असल्याने यांना ‘अधोमुखी उतार वारे’ (Down slope winds) असेही म्हणतात.

दरीतील वारे (Valley winds)

सुर्योदयानंतर सर्वात प्रथम डोंगर माथ्यावर सूर्यकिरण पडतात व हे भाग लवकर तापू लागतात. दरी प्रदेशांच्या तुलनेत डोंगरमाथ्यावरील हवा लवकर तापते व येथे कमी भार प्रदेशांची निर्मिती होते.या प्रदेशांच्या तुलनेत दरीप्रदेशातील हवा थंड असते. परिणामी येथे जास्त वायूभार असतो. याचाच परिणाम म्हणून दिवसा दरीप्रदेशाकडून डोंगर माथ्याकडे वारे वाहू लागतात यांना ‘दरीतील वारे’ (Valley winds) असे म्हणतात. हे वारे उताराला अनुसरून वरती वाहत असल्याने यांना ‘उर्ध्वमुखी उतार वारे’ (upslope winds) असे म्हणतात.

स्थानिक वारे (Local winds)

पृथ्वीतलावर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट स्थानिक भौगोलिक परिस्थितीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. या वाऱ्यांना ‘स्थानिक वारे’ (Local winds ) असे म्हणतात. हे वारे ज्या प्रदेशावरून वाहतात त्या प्रदेशातील तापमान, आर्द्रता व पर्जन्य या हवेच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणतात. म्हणजेच त्या प्रदेशांच्या हवामानात बदल घडवून आणतात. म्हणूनच स्थानिक वारे देखिल एखाद्या प्रदेशाच्या हवामानाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.

जगातील कांही विशिष्ठ प्रदेशातून वाहणारे वारे पुढील प्रमाणे –

उष्ण वारे (Hot winds) 

अ.क्र.वाऱ्याचे नावप्रदेश
1फॉन युरोप( आल्पस)
2चिनुकसंयुक्त संस्थाने (रॉकिज)
3सिरोक्कोयुरोप (इटली, ग्रीस)
4खामसीनउत्तर आफ्रिका (इजिप्त)
5हरमाटनगिनी (प. आफ्रिका)
6लू, नॉर्वेस्टरभारत ( उ. मैदान)
7सँटा ॲनाससंयुक्त संस्थाने ( कॅलिफोर्निया)
8बर्ग दक्षिण आफ्रिका
9सेमुन इराण
10ब्रिक फिल्डर्स ऑस्ट्रेलिया (व्हिक्टोरिया)
11झोंडा अर्जेटीना
12सोलॅनो प. युरोप( स्पेन)
13कराबुरान मध्य आशिया ( अरेबियन वाळवंट)
14सिमून मध्य आशिया ( अरेबियन वाळवंट)

थंड वारे (Cold winds)

अ.क्र.वाऱ्याचे नावप्रदेश
1बोरा ग्रिनलँडआंटार्क्टिका
2ट्रॅाँटाने युरोप (ऑस्ट्रिया)
3 मिस्ट्रलयुरोप (फ्रान्स)
4पूर्गा मध्य आशिया (अरेबियन वाळवंट)
5ब्लिझार्ड आर्क्टिक टुंड्रा( सैबेरीया, कॅनडा)
6ग्रीगेल माल्टा (द. अमेरीका)
7डिलीनॉस द. अमेरीका (अर्जेंटीना)
8पन्परास ब्राझील, अर्जेंटीना
9बुस्टर न्युझीलंड
10गेल आंटार्क्टिका

जेट प्रवाह (Jet Steam) :

‘‘भूपृष्ठावरील सामान्य वाऱ्यांच्या प्रवाह चक्रावरती भूपृष्ठापासून ५००० ते १०,००० मीटर उंचीवरील उच्च वातावरणीय हवेचे प्रवाह म्हणजेच जेट प्रवाह (Jet Steam) होय.’’ दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन विमानांना पहिल्यांदा या जेटप्रवाहांचा अनुभव आला. जेट प्रवाह हे समुद्र प्रवाहांसारखेच असतात. यांची लांबी हजारो किलोमीटर्स असून जाडी २ ते ५ कि.मी. रूंदी २०० ते ५०० किलोमीटर्स असते. या प्रवाहांचा वेग ताशी २०० ते ५०० किलोमीटर्स असतो. उन्हाळ्यांच्या तुलनेत हिवाळ्यात या वाऱ्याचा वेग थोडा जास्त असतो. जेट प्रवाहांच्या निर्मितीची कारणे आजही निश्चित स्वरूपात स्पष्ट झालेली नाहीत. तरी देखील उच्च वातावरणातील वायूभार या प्रवाहांच्या निर्मितीस कारणीभूत असल्याचे मानले जाते. उच्च वातावरणास ध्रुवीय प्रदेशात कमीभार व विषुववृत्तीय प्रदेशात जास्त भार कार्यरत असतो. यातूनच जेट प्रवाहांची निर्मिती होते. या शिवाय विषुववृत्तीय वायुराशी व ध्रुवीय वायुराशीदेखील जेट प्रवाहांच्या निर्मितीस कारणीभूत आहेत. जेट प्रवाहांचे स्थान २५ अंश ते ३५ अंश अक्षांशाच्या दरम्यान आहे. दोन्ही गोलार्धात हे प्रवाह कार्यरत असतात. उच्च वातावरणात पश्चिमेकडून वाहणारे हे हवेचे प्रवाह नागमोडी किंवा वळणांनी वाहातात. उच्च वातावरणातील भूआवर्त वाऱ्यांशी (Geostrophic winds) यांचे बरेच साधर्म्य असते. जेट प्रवाहांचा परिणाम हवामानावर होताना दिसतो. विशेषतः मध्य कटीबंधातील (समशितोष्ण कटीबंधीय प्रदेश) प्रदेशांच्या हवामानावर यांचा प्रभाव जाणवतो. मध्य कटीबंधातील आवर्तांची निर्मिती, पर्जन्य, बर्फवृष्टी, धुके यावर जेट प्रवाहांचा परिणाम होतो.

वायूराशी (Air Masses)

‘विस्तृत लांबी, रूंदी व जाडी असलेला भूपृष्ठाजवळचा वातावरणाचा भाग म्हणजेच वायूराशी होय’. प्रचंड आकाराच्या हवेचा थर म्हणजेच वायूराशी होय. वायुराशींचा विस्तार हजारो कि.मी. लांब, हजारो कि.मी. रूंद व शेकडो कि.मी. जाड असतो. एवढ्या प्रचंड आकाराची हवा वाहू लागते. त्यावेळी त्यांना वायूराशी म्हणतात. वायूराशी ह्या त्यांच्या भौतिक गुणधर्मावरून ओळखल्या जातात. वायुराशींचे तापमान आर्द्रता हे वायू राशींचे मुख्य भौतिक गुणधर्म स्पष्ट करतात. या गुणधर्मावरच वायुराशींची स्थिरता अवलंबून असते. वायुराशींचे भौतिक गुणधर्म हे ती वायुराशी ज्या प्रदशोत निर्माण होते त्यावर अवलंबून असतात. उदा- विषुववृत्तीय प्रदेशात निर्माण होणारी वायुराशी उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशात निर्माण होणारी वायुराशी थंड असते. संपूर्ण वायुराशी मध्ये भौतिक गुणधर्म समान असतात.

उत्पत्ती प्रदेशापासून वायूराशी वाहू लागल्यावर त्यांचे भौतिक गुणधर्म बदलतात. तसेच त्या ज्या प्रदेशातून वाहतात. त्या प्रदेशांच्या हवामानावरही परिणाम करतात. म्हणूनच वायुराशींचा अभ्यास हवामानशास्त्रात महत्वाचा मानला जातो. उदा. ध्रुवीय थंड वायुराशी विषुववृत्ताकडे वाहू लागल्यावर तीचे स्वतःचे तापमान वाढू लागते तर ती ज्या प्रदेशावरून वाहते त्या प्रदेशाचे तापमान कमी करते.

उत्पत्ती प्रदेश / स्त्रोत प्रदेश / आधार प्रदेश हा वायूराशींच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मानला जातो व म्हणूनच उत्पत्ती प्रदेशावरती आधारलेले वायुरांशींचे वर्गीकरण ही योग्य किंवा पर्याप्त मानले जाते. उत्पत्ती प्रदेशानुसार वायुराशींचे पुढील चार प्रकार केले जातात.

 1. उष्ण कटिबंधीय भूखंडीय वायूराशी
 2. उष्ण कटिबंधीय महासागरीय वायूराशी
 3. शीत कटिबंधीय भूखंडीय वायूराशी
 4. शीत कटिबंधीय महासागरीय वायूराशी

अशा भिन्न प्रदेशातील भिन्न हवामानाच्या / भौतिक गुणधर्माच्या वायुराशी उत्पत्ती प्रदेश सोडून वाहू लागल्यावर एकमेकींच्या संपर्कात येतात. त्यांचे तापमान, आर्द्रता व त्यांची घनता यांच्यात भिन्नता असल्याने त्या एकमेकीत मिसळत नाहीत. तर त्यांच्यात एक सीमा किंवा विषमता पातळी तयार होते. त्या सीमारेषेला किंवा विषमतेच्या पातळीला ‘ आघाडी’ (Front) असे म्हणतात. ही सीमारेषा म्हणजे एक संक्रमण पट्‌टा असतो त्याला ‘विलगता विभाग’ (Zone of Discountinuty) असेही म्हणतात. ज्यावेळी दोन भिन्न गुणधर्माच्या वायुराशी एकमेकींसमोर येतात त्यावेळी त्या एकमेकींना ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. थंड वायुराशी वजनाने जड असल्याने भूपृष्ठालगत राहते तर उष्ण वायुराशी वजनाने हलकी असल्याने थंड वायुराशीवर चढण्याचा प्रयत्न करते. यातूनच आवर्तांची निर्मिती होते. समशीतोष्ण कटीबंधीय प्रदेश विषुववृत्तीय व ध्रुवीय वायुराशींच्या मिलनाचे प्रदेश म्हणून ओळखले जातात. म्हणूनच वायुराशींचा प्रभाव समशीतोष्ण कटीबंधीय हवामानावर जास्त प्रमाणात होताना दिसतो. कोणती वायुराशी जास्त क्रियाशील (Active) आहे यावर निर्माण होणाऱ्या आघाडींचा प्रकार ठरतो. उदा. उष्णवायुराशी जास्त क्रियाशील असल्यास निर्माण होणारी आघाडी ‘ उष्ण आघाडी’ (Warm Front) असते तर थंड वायुराशी क्रियाशील असल्यास अशी आघाडी ‘ थंड आघाडी’ (Cold Front) म्हणून ओळखली जाते.