वातावरणाचे घटक

वातावरण हे अनेक घटकांचे मिश्रण आहे. मात्र वातावरण हे प्रामुख्याने पुढील प्रमुख घटकांनी बनलेले आढळते. वातावरणामध्ये प्रामुख्याने (१) वायु (२) पाण्याची वाफ (३) धुलीकण इ. प्रमुख घटकांचा समावेश आढळतो.

वायु (Gases) :

वातावरण हे निरनिराळया वायुंच्या मिश्रणांनी बनलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑरगॉन, कार्बनडाय ऑक्साईड व इतर वायु आढळतात. वातावरणात या सर्व वायुंचे प्रमाण ९९.९८% आहे. अलिकडिल काळात अंतराळयानाच्या सहाय्याने वातावरणामधील विविध वायुंचे स्वरूप आणि प्रमाण या विषयी माहिती उपलब्ध झाली आहे. या वातावरणामध्ये सर्वात जास्त (७८.०८%) नायट्रोजन वायुचे प्रमाण आहे. त्याखालोखाल ऑक्सिजन (२०.९४%), ऑरगॉन (०.९३%) व कार्बनडाय ऑक्साईड (०.०३%) इतका आहे. हे वायु वजनाने जड असून त्यांचे अस्तित्व मुख्यत्वे करून वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात. या उलट निऑन, हेलियम, ओझोन, हायड्रोजन, क्रिप्टॉन, झेनिन, मिथेन या सर्व वायुंचे मिळून एकूण प्रमाण वातावरणात ०.०२% इतके नगण्य आढळते. हे वायू वजनाने हलके असल्याने ते वातावरणाच्या वरच्या थरात प्रामुख्याने आढळतात.

नायट्रोजन (Nitrogen) :

नायट्रोजन वायू वजनाने जड असल्याने वातावरणाच्या खालच्या थरात आढळतो. वातावरणात या वायूचे प्रमाण सर्वात अधिक असून ते ७८.०८% इतके आढळते. सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन व कुजने, भूगर्भातील तप्त लाव्हारसाचा उद्रेक इ. क्रियांद्वारे नायट्रोजन वायूचा पूरवठा वातावरणाला होत असतो. वनस्पतींची वाढ आणि संवर्धनासाठी नायट्रोजन वायूची आवश्यकता असते. नायट्रोजन वायू निष्क्रिय आहे. मात्र वातावरणातील नायट्रोजनच्या अस्तित्वामुळे ऑक्सिजन वायूची तिव्रता कमी होण्यास मदत होते. शिवाय झाडांच्या पेशी मजबूत करण्यासाठी नायट्रोजन वायूची गरज असते.

ऑक्सिजन (Oxygen) :

वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण २०.९४% इतके आहे. ऑक्सिजनची निर्मिती ही नैसर्गिक वनस्पतींच्या माध्यमातून होत असते. सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजन खूपच महत्त्वाचा वायू आहे. म्हणूनच त्यास ‘‘प्राणवायू’’ असेही म्हणतात. जमीनीपासून जसजसे वातावरणाच्या वरच्या थरात जावे तसतसे ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमीकमी होत जाते. म्हणूनच अतिउंचीवर किंवा उंच शिखरावर जाताना गिर्यारोहकांना, वैानिकांना कृत्रिम ऑक्सिजन वायूचे सिलेंडर बरोबर घेऊन जावे लागते. जास्त उंचीवर त्याचे प्रमाण कमी असल्याने श्वासोच्छवास करणे अवघड जाते. शिवाय ज्वलन क्रियेसाठी ऑक्सिजन उपयोगी ठरतो.

कार्बन डाय ऑक्साईड (Carbon Dioxide) :

वातावरणात कार्बनचे प्रमाण अस्थिर असते. हा वायू वातावरणातील तिसरा महत्त्वाचा वायू असून त्याचे वातावरणातील प्रमाण ०.०३% आहे. हा वायू अस्थिर असण्याची काही कारणे आहेत. त्यामध्ये प्राण्यांचे श्वसन, ज्वालामुखी क्रिया, वनस्पतींचे विघटन इ. मुळे कार्बनच्या प्रमाणात वाढ होते. हा वायू वनस्पतींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीवरील वनस्पती एका वर्षात ५०० अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. या वायूचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असले तरी त्याचे वातावरणातील प्रमाण कमी होत नाही कारण दिवसा वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषतात व रात्रीच्या वेळी उच्छवासाद्वारे कार्बन बाहेर सोडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा वायू सुर्यकिरणांबरोबर आलेले अतिनिल किरण शोषतात. त्यामुळे जमीनी लगतच्या थराचे तापमान संतुलित रहाते. आज मात्र औद्योगिकरण वाढल्याने व स्वयंचलीत वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे.

ओझोन वायु (Ozone) :

जमिनीलगत या वायूचे प्रमाण कमी आढळते. हा वातावरणातील एक महत्त्वाचा वायु असून आज ‘ग्लोबल वॉर्मिंग’ किंवा जागतिक तापमान वाढी मुळे सर्व जगाचे लक्ष ओझोनच्या थरावर केंद्रित झालेले आढळते. विषम प्रमाणात असलेला हा वायू भृपूष्ठापासून १५ ते ३५ कि.मी. उंची वरील वातावरणाच्या थरात पसरलेला आहे. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण ०.००००६% इतके अत्यल्प आहे. मात्र हा जिवसृष्ठीला वरदान ठरलेला आहे. याला पृथ्वीची ‘संरक्षक छत्री’ असेही म्हंटले जाते. कारण ओझोन वायूच्या थरात सुर्यप्रकाशातील अतिनिल (Ultraviolate) किरणे (जंबूपार किरणे) शोषली जातात. त्यामुळे या प्रखर सुर्यकिरणांपासून सजीव सृष्टीचा बचाव होतो. मात्र आज वाढते औद्योगिकरण व प्रचंड प्रमाणात होणाऱ्या प्रदुषणांुळे ओझोन वायूचा क्षय होत आहे. त्यामुळे कर्करोग व इतर दुर्धर रोगांना मानव बळी पडत आहे. शिवाय पृथ्वीचे तापमान देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज सुर्योदया नंतर कांही काळ वाताररणाच्या तळाच्या थरात ओझोन वायूचे प्रमाण जास्त असते. सुर्योदयानंतर प्रकाश रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायूचे रूपांतर ऑक्सिजन वायू मध्ये होते. वरील प्रमुख वायंू शिवाय रासायनिक दृष्ट्या अतिक्रियाशील व अत्यल्प प्रमाणात आढळणारे हलके व नोबल वायू म्हणून ओळखले जाणारे ऑरगॉन, निऑन, क्रेप्टॉन, झेनॉन वायूही वातावरणात आढळतात. आजचे वाढते औद्योगिकरण, सुपरसॉनिक विमानांची उड्डाणे, क्लोरोफ्ल्युरो कार्बनचे वाढते प्रमाण यामुळे ओझोन वायूच्या प्रमाणात घट झाल्याने संपूर्ण मानव जातीला धोका निर्माण झालेला आढळतो.

पाण्याची वाफ किंवा बाष्प (Water Vapour and Moisture) :

वातावरणात पाण्याची वाफ किंवा बाष्प वायूरूप अवस्थेत आढळते. वाळवंटी प्रदेशातही बाष्पाचे अल्प प्रमाण आढळते. पाण्याची वाफ म्हणजे एक प्रकारचा वायू होय. याचे प्रमाण मात्र प्रदेशानुसार, प्रदेशाचे तापमान, प्रदेशाची उंची आणि ऋतुानानुसार बदलताना आढळते. सौरउर्जेुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती वाफ वातावरणात येऊन मिसळते. हवेतील बाष्पकणांपासून पाऊस, धुके, दव आणि हिम यांची निर्मिती होते. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हवा कोरडी किंवा दमट आहे हे ठरविले जाते. वनस्पतीही मूळाद्वारे भूपृष्ठातील पाणी आकर्षून घेतात व बाष्प निर्माण करतात यात बाष्पोत्सर्जन म्हणतात. भूपृष्ठाजवळ बाष्पाचे प्रमाण ३ ते ४% असते. पृथ्वी पृष्ठभागावर दर सेकंदास १६ लाख टन पाण्याची वाफ होते व ती वातावरणात मिसळते. बाष्पामुळे वातावरणात विविध अविष्कार निर्माण होतात. बाष्पामुळेच आपली त्वचा मऊ व मुलायम रहाते. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. उंचीनुसार तापमान कमी होत गेल्याने हवेची बाष्प धारणाशक्ती कमी होत जाते. हवा बाष्प संपृक्त होऊन मेघामुळे वृष्टी होते.

धुलीकण (Dust Particals) :

हवेत निरनिराळया आकाराचे धुलीकण आढळतात. हे वातावरणातील धुलीकण निरनिराळया पदार्थापासून किंवा घटकांपासून बनतात. पृथ्वी वरील सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थापासून धुलीकण बनतात. धुलीकणांध्ये मातीचे कण, धुराचे कण, तंतू, जिवजंतू, सूक्ष्म बी-बियाणे इ. चा समावेश होतो. वजनाने जड असणारे धुलीकण वातावरणाच्या खालच्या थरात तर सूक्ष्म व हलके कण वातावरणाच्या वरच्या थरांपर्यंत पोहचतात. हे धुलीकण काही प्रमाणात सौरउर्जा शोषूण घेतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात संतूलन साधले जाते. प्रत्येक चौरस मीटर क्षेत्रात साधारणपणे १ लाख धुलीकण आढळतात. वातावरणातील धुलीकणांुळेच सूर्योदयापूर्वी व सुर्यास्ता नंतरही आपणास संधिप्रकाश मिळतो. औद्योगिक भागात वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण जास्त असते. कोळसा, पेट्रोलियम यांच्या वापरामुळे, खडक विखंडीत होऊन धुळ तयार होते. ही वाऱ्याबरोबर वाहत जाऊन वातावरणात तरंगते. ज्वालामुखीचे उद्रेक, अशनी, उल्का यांच्यामुळेही धुलिकण, राख निर्माण होते. या धुलीकणांुळेच आकाश निळे दिसते. वातावरणातील सुक्ष्म धुलीकरणांभोवती जलकण एकत्रित होऊन ढग निर्माण होतात व पाऊस पडतो. सागरावर १ घनमीटर हवेत ३००० तर शहरी भागात १ घनसेंटिीटर जागेत १००००० इतके धुलीकण आढळतात.