वाक्यांचे प्रकार व वाक्य संकलन

वाक्यांचे प्रकार व वाक्य संकलन

वाक्यांचे अर्थावरून प्रकार

विधानार्थी- ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, ते विधानार्थी वाक्य. उदा. माझे बाबा आज गावी गेले.
प्रश्नार्थी- ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, ते प्रश्नार्थी वाक्य. उदा. तू कोल्हापूरहून केंव्हा येणार आहेस?
उद्गारार्थी- ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, ते उद्गारार्थी वाक्य. उदा. अबब ! केवढा मोठा साप !
होकारार्थी (करणरूपी)- वाक्यातील विधाने होकारार्थी असल्यास. उदा. राम अभ्यास करतो.
नकारार्थी ( अकरणरूपी)- वाक्यातील विधाने नकारार्थी असल्यास. उदा. सीता मुळीच अभ्यास करत नाही.

वाक्यांचे क्रियापदाच्या रूपावरून प्रकार

स्वार्थी- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल, तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मीरा नाचत असते.
आज्ञार्थी- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशिर्वाद, प्रार्थना, विनंती, किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदा. परमेश्वरा, त्याचे भले कर.
विध्यर्थी- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. उदा. मुलांनी आई-वडिलांची व गुरूजनांची सेवा करावी.

वाक्यांचे वाक्यातील विधानांनुसार प्रकार

अ) केवलवाक्य- वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्या वाक्याला शुद्ध वाक्य किंवा केवलवाक्य असे म्हणतात. उदा. राम कविता वाचतो. केवलवाक्य हे साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल.

ब) संयुक्त वाक्य- दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.उदा. त्याला निमंञण दिले; परंतु तो आला नाही.उद्या सुट्टी मिळेल आणि मी गावाला जाईन.संयुक्त वाक्याचे तीन प्रकार आहेत.
  1. केवलसंयुक्त (केवल आणि केवल)
  2. मिश्रसंयुक्त (मिश्र आणि मिश्र)

केवलमिश्रसंयुक्त (केवल आणि मिश्र)मिश्रवाक्य आणि संयुक्त वाक्य यांत फरक असा की,मिश्रवाक्यात एकच वाक्य प्रधान असते. बाकीची सर्व गौण असतात. व ती गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात व ती प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

क) मिश्रवाक्य- एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्रवाक्य असे म्हणतात.

प्रधानवाक्य- अर्थाच्या दृष्टीने स्वतंञ असते, त्यास मुख्य किंवा प्रधानवाक्य म्हणतात.

गौणवाक्य- अर्थाच्या दृष्टीने प्रधानवाक्यावर अवलंबून राहणाऱ्या वाक्याला गौणवाक्य किंवा पोटवाक्य असे म्हणतात. उदा.

जे चकाकतेते सोने नसते. या वाक्यात जे चकाकते हे एक केवलवाक्य आहे व ते सोने नसते ते दुसरे केवलवाक्य आहे. त्यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंञ वाक्य नाही, ते दुसर्या केवल वाक्यावर म्हणजे ते सोने नसते यावर अवलंबून आहे.

वाक्यसंश्लेषण किंवा वाक्यसंकलन

”सकाळी आठ वाजण्याचा सुमार असावा. मी बाहेर जाण्याच्या तयारीत होतो. इतक्यात मला तार मिळाली. तारेत लिहिले होते. मुंबईस ताबडतोब निघून या.”

वरिल ५ वाक्याचे एकञितपणे वाक्य असे तयार होईल की, ”सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मी बाहेर जाण्याच्या तयारीत असताना मला ताबडतोब मुंबईस निघून येण्याबद्दल एक तार आली.”

दोन किंवा अनेक केवलवाक्यांचे एक केवलवाक्य बनवणे –

केवलवाक्यात एकच मुख्य क्रियापद असवे लागते. म्हणजे दिलेल्या वाक्यापैकी एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठरवून वाक्यातील क्रियापदांची धातूसाधिते, नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे आपणास बनवावी लागतात. उदा.

  • मी सिनेमा बघतो. माझे वडील माझ्यावर चिडतात. – माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
  • विंदा. करंदीकर हे कवी आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिलाला. – कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरसकार मिळाला.
  • माझ्या आजीने मला एक डबा पाठविला. त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. – माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठविला.
  • मी चहा पितो. माझ्या वडिलांना ते आवडत नाही. – माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही.
  • रविंद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रविन्द्रनाथांनी गीतांजली हे काव्य लिहिले. – गीतांजलीचे लेखक रविंद्रनाथ हे थोर कवी होते.
  • पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोपर्यात ते लावले. याची मला मोठी आवड आहे. – पुष्कळ वर्षापूर्वी मोठ्या आवडीने कॅशियाचे रोप आणून मी ते बागेत एका कोपर्यात लावले.
  • मी नोकरीतून निवृत्त झालो. मला थोडी फुरसत मिळाली. सुताराकडून एक छानदार झोपाळा तयार करवून घेतला. त्याची बागेत स्थापना केली. – नोकरीतून निवृत्त झाल्यावर फुरसत मिळताच सुताराकडून एक छानदार झोपाळा तयार करवून घेवून त्याची मी बागेत स्थापना केली.
  • बाबांनी मला तेथल्या एका माणसाची ओळख करून दिली. त्याने हे कोहळे पिकवले. एकेक कोहळा किती किलोचा म्हणता ? चाळीस. – चाळीस किलोचा एकेक कोहळा पिकवणाऱ्या तेथल्या एका माणसाची बाबांनी मला ओळख करून दिली.
दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनवणे –

दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविताना त्यांना जोडणारी योग्य अशीच उभयान्वयी अव्यये वापरायला हवीत. प्रधानत्वबोधक किंवा गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. केवळ प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय वापरले तर बनणारे वाक्य केवळ-संयुक्त होते. प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशा दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरल्यास ते मिश्र संयुक्त वाक्य होते. दोन्ही प्रकारच्या वाक्यांना संयुक्त वाक्यच म्हणतात.

समुच्चयबोधक- विजा चमकू लागल्या. पावसाला सुरूवात झाली. – विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली.
विकल्पबोधक- लोक आपली स्तुती करोत. लोक आपली निंदा करोत. – लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत.
न्यूनत्वबोधक- आपण मरावयास हरकत नाही. आपण किर्तीरूपाने उरावे. – मरावे परी किर्तीरूपी उरावे.
परिणामबोधक- वाटेत मोटार नादुरुस्त झाली. मला यावयास उशीर झाला. – वाटेत मोटार नादुरूस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.
मिश्र वाक्य बनवणे-
स्वरूपबोधक- गुरूजी म्हणाले, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. – गुरूजी म्हणाले की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
कारणबोधक- मला बरे नाही. मी नोकरीला जाणार नाही. – मी नोकरीला जाणार नाही कारण मला बरे नाही.
उद्देशबोधक- आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो. – आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.
संकेतबोधक- उद्या सुट्टी मिळेल. मी तुझ्या घरी येईन. – उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन.

केवळ मिश्रवाक्य बनवायचे असल्यास उपयोजिले जाणारे उभयान्वयी अव्यय हे गौणत्वबोधकच असायला हवे. प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशा दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरून बनविलेल्या वाक्यास मिश्र संयुक्त वाक्य असे म्हणतात.

सूचना: संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.