वस्ताद लहुजी साळवे

जन्म व शिक्षण 
  • वस्ताद लहुजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४–१७ फेब्रुवारी १८८१) हे एकोणिसाव्या शतकातील एक क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक होते. त्यांचे पूर्ण नाव लहुजी राघोजी साळवे असे होते.
  • त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला.
  • साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती.
समाजकार्य
  • १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना लहुजींचे वडील धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला.
  • १८२३ मध्ये त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा सुरु केली.
  • सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला.
  • १८५७ च्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या.
  • म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले.
  • मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ”ज्ञानोदय”   नियतकालिकात प्रसिद्ध झाला (१८५५).

निधन –

वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले. क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवेंची समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.