लोकसभा

लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. पूर्वीच्या House of People चे नामकरण १९५४ मध्ये लोकसभा असे केले गेले. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.

रचना

 • लोकसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या ५५२ इतकी असते. यापैकी ५३० राज्याचे प्रतिनिधी असतात तर २० केंद्रशासित प्रदेशांचे असतात. २ सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती अॅंग्लो-इंडियन समाजातून करतो(जर त्या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नसेल तर) .
 • सध्या लोकसभेत ५४५ सदस्य आहेत. यापैकी ५३० राज्याचे प्रतिनिधी अाहेत तर १३ केंद्रशासित प्रदेशांचे अाहेत. २ सदस्य अॅंग्लो-इंडियन आहेत.

  राज्याचे प्रतिनिधी क्षेञीय मतदारसंघातून जनतेकडून प्रत्यक्षपणे सार्वञिक प्राैढ मतदार पध्दतीने निवडले जातात. १८ वर्षे वयावरील नागरिक या निवडणूकीत मतदान करतात. १९८८साली ६१ व्या घटनादुरूस्तीने मतदाराचे वय २१ वरून१८ केले. केंद्रशासित प्रदेशातील सदस्य निवडण्याची पध्दत ठरविण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिला आहे. त्यानुसार संसदेने १९६५ साली कायदा करुन केंद्रशासित प्रदेशातील सदस्य निवडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक ही पध्दत विहित केली आहे.

कार्यकाळ

 • लोकसभेचा कार्यकाळ सार्वञिक निवडणूकीनंतर होणार्या पहिल्या बैठकीपासून ५ वर्षे इतका असतो. त्यानंतर ती आपोआप बरखास्त होते.
 • राष्ट्रपतींना लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी  लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे.
 • राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेच्या कायद्याने लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी एक वर्ष असा कितीही काळासाठी वाढवता येतो.

सदस्यत्व पाञता

 • भारतीय नागरिक
 • २५ वर्षे वय
 • संसदेने विहित केलेल्या इतर पाञता

अपाञता

 • लाभाचे पद धारण केले तर
 • न्यायालयाने वेडा ठरवले तर
 • दूसर्या देशाचे नागरिकत्व स्विकारले तर
 • दिवाळखोर असेल तर
 • संसदेने केलेल्या इतर कोणत्याही कायद्याने तो अपाञ ठरत असेल तर

  पक्षांतरबंदी कायदयानुसार अपाञता– एखादा संसद सदस्य घटनेच्या १० व्या परिशिष्ठातालील तरतूदीनुसार अपाञ ठरू शकतो जर

 • एखादा सदस्य ज्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला असेल त्या पक्षाचे सदस्यत्व सोडले.
 • एखाद्या सदस्याने त्याच्या पक्षाच्या निर्देशाच्या विरुध्द मतदान केले किंवा मतदानास अनुपस्थित राहिला.
 • अपक्ष सदस्याने कोणत्याही पक्षात प्रवेश केला.
 • नामर्निदेशित सदस्याने त्याच्या निवडीनंतर सहा महिन्यानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश केला.

लोकसभेचा अध्यक्ष

 • सार्वञिक निवडणूकीनंतर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते.
 • लोकसभा सदस्य आपल्यामधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. अध्यक्ष निवडीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्पिकर प्रो-टेम हे भूषवितात.
 • अध्यक्ष लोकसभा सदस्य असावा. अध्यक्षाच्या पाञतेविषयी घटनेत कोणतीही तरतूद केलेली नाही.
 • लोकसभेच्या अध्यक्षाच्या पदाचा कालावधी लोकसभेच्या कालावधीइतकाच असतो.
 • लोकसभेच्या अध्यक्षांचे पद त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रिक्त होऊ शकते जर १) त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले २) जर त्यांनी उपाध्यक्षांना संबोधून आपल्या पदाचा राजीनामा दिला ३) जर लोकसभेने त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव पारित केला( असा ठराव मंडण्यासाठी किमान १४ दिवसांची नोटीस किमान ५० सदस्यांच्या अनुमोदक म्हणून सहीनिशी द्यावी लागते). हा ठराव लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या एकूण बहुमताने पारित व्हावा लागतो.

लोकसभा अध्यक्षाचे अधिकार व कार्ये

 1. लोकसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषविणे व सभागृहातील कामकाजाचे नियमन करणे.
 2. सभागृहात संविधान, कार्यपद्धतीचे नियम व परंपरांचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षास असतो.
 3. लोकसभा सदस्यांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे किंवा नाकारणे.
 4. गणसंख्येच्या अभावी सभागृह तहकूब किंवा निलंबित करणे.
 5. एखाद्या विधेयकावर समसमान मते पडल्यास निर्णायक मत देणे.
 6. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे.
 7. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविणे. याबाबत अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो.
 8. १० व्या अनुसूचीतील तरतूदीतील पक्षांतरबंदीच्या कारणांवरून सदस्यांच्या अपाञतेबाबत निर्णय घेणे.

लोकसभेचा उपाध्यक्ष

 • लोकसभा सदस्य आपल्यामधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात.
 • लोकसभेच्या उपाध्यक्षाच्या पदाचा कालावधी लोकसभेच्या कालावधीइतकाच असतो.
 • लोकसभा उपाध्यक्षांचे पद त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रिक्त होऊ शकते जर १) त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले २) जर त्यांनी अध्यक्षांना संबोधून आपल्या पदाचा राजीनामा दिला ३) जर लोकसभेने त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव पारित केला( असा ठराव मंडण्यासाठी किमान १४ दिवसांची नोटीस द्यावी लागते). हा ठराव लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या एकूण बहुमताने पारित व्हावा लागतो.

लोकसभेच्या उपाध्यक्षाचे अधिकार व कार्ये

 1. सामान्य परिस्थितीत उपाध्यक्ष इतर सदस्यांप्रमाणे असतात. त्यांना कामकाजात भाग घेण्याचा, बोलण्याचा व मतदानाचा अधिकार असतो. माञ अध्यक्ष गैरहजर असल्यास किंवा अध्यक्षपद रिक्त असल्यास उपाध्यक्षाची कार्ये अस्तित्वात येतात.
 2. अध्यक्षपद रिक्त असल्यास अध्यक्षपदाची कार्ये पार पाडणे.
 3. बैठकीस अध्यक्ष गैरहजर असल्यास उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून कार्ये पार पाडतात.
 4. उपाध्यक्षांचा विशेषाधिकार- जर उपाध्यक्षांची नेमणूक एखाद्या संसदीय समितीच्या सदस्यपदी झाली तर ते आपोआप त्या समितीचे अध्यक्ष बनतात.