लाला लजपतराय

टिळक युगातील लाल-बाल-पाल या पैकी व जहालमतवादी विचारसरणीचे नेते म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जाते. लाला लजपतराय यांना ‘पंजाब केसरी’ व ‘पंजाबचा सिंह’ म्हणून ओळखले जाते. लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील ढोडिळी या गावामध्ये झाला. लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून सन १८८५ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. लहानपणापासून कुशाग्र बुद्धी व हिंदुत्त्वाबद्दल आकर्षण असलेल्या लजपतराय यांनी सन १८८६ पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला. स्वामी दयानंद सरस्वतींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

लजपतराय यांचे परदेशातील कार्य :

लाला लजपतराय यांनी सन १८८८ सालापासून सक्रिय राजकारणात सहभाग घेण्यास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी अमेरिका, इंग्लंड, जपान, इजिप्त, तुर्कस्थान, फ्रान्स इत्यादी देशातील नेत्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्ना संदर्भात चर्चा केली. अमेरिकेतील लाला हरदयाळ यांच्या गदर चळवळीमुळे ते अधिक प्रभावित झाले. टिळकांनी सुरू केलेल्या होमरुल लीगचे कार्य त्यांनी अमेरिकेत केले व ‘इंडियन होमरुल लीग ऑफ अमेरिका’ची स्थापना केली. होमरुलच्या प्रसारासाठी त्यांनी ‘यंग इंडिया’ नावाचे मासिक सुरू केले. ‘यंग इंडिया’ नावाचे पुस्तक छापून भारतातील ब्रिटिश राजवटीचे अंतरंग अमेरिकेत पोहचवण्याचे काम केले. यानंतर १० फेब्रुवारी १९२० रोजी ते भारतात आले.

असहकार आंदोलनातील सहभाग :

परदेशातून परत आल्यानंतर लजपतराय यांनी सन १९२० मध्ये सुरू झालेल्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला. प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आला तेव्हा सभा बंदीचा आदेश मोडून लालाजींनी पंजाब प्रांतीय काँग्रेसची सभा घेतली म्हणून त्यांना शिक्षा झाली. परंतु चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. म्हणून त्यांनी गांधीजीवर टिका केली. मोतीलाल नेहरु व चित्तरंजन दास यांच्या समतवेत स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.

सामाजिक व कामगारविषयक कार्य :

लाला लजपतराय यांनी राजकीय कार्याबरोबरच सामाजिक व कामगारविषयक कार्यही केले. लाहोर येथे दयानंद सरस्वतीचे स्मारक म्हणून त्यांनी ‘दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज’ स्थापन केले. मध्य प्रांतात दुष्काळ पडला तेव्हा लजपतराय यांनी आर्य समाजाच्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदत केली. उद्योगधंद्याच्या विकासासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. कामगार वर्गाबद्दल त्यांच्या मनामध्ये विशेष आदर व आत्मीयता होती. कामगार वर्गाचे कल्याण व शोषणमुक्ती संदर्भात ते सतत विचार मांडत. सन १९२० मध्ये मुंबई येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मजूर परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. सन १९२६ मध्ये लंडन येथे भरलेल्या जागतिक मजूर परिषदेला भा. म. संघाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी केलेल्या निदर्शनावेळी त्यांच्या डोक्याला जबर मारहान झाली त्यात त्यांचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी निधन झाले.