राष्ट्रीय सभेतील फूट

प्रस्तावना

दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कलकत्ता (१९०६) अधिवेशनात स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार व स्वराज्य हे जहालमतवाद्यांचे कार्यक्रम मवाळांनी मान्य केल्यामुळे जहालांना आनंद झाला होता. परंतु कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसला जहालमतवादी होऊ द्यायचे नाही असा निर्णय फिरोजशहा मेहतांसारख्या नेत्यांनी घेतलेला होता. जहालमतवादी नेते अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळकलाला लजपतराय यांनी मवाळांशी तडजोड न करता राष्ट्रसभेला जहालमार्गी बनविण्याचा निर्णय घेतला होता. जहालमतवादी व मवाळवादी या दोन्ही गटांनी काँग्रेसवर ताबा मिळविण्याचा छूपा प्रयत्न चालविला होता. परंतु मवाळ व जहाल यांच्यातील हा मतभेद सूरत अधिवेशनापर्यंत टोकाला गेला आणि राष्ट्रसभेत उभी फूट पडली.

सुरत अधिवेशन (सन १९०७) व राष्ट्रीय सभेतील फूट :

सन १९०७ मध्ये राष्ट्रसभेचे अधिवेशन नागपूरला घेण्याचे ठरलेले होते. परंतु लोकमान्य टिळकांच्या नेतृत्त्वाखालील जहालमतवादी गट महाराष्ट्रात प्रभावी असल्याने नागपूरला अधिवेशन झाले तर लोकमान्य टिळकांना अध्यक्षपद देण्यास जहालमतवादी भाग पाडतील अशी भिती त्यांना वाटत होती. त्यामुळे मवाळांनी फिरोजशहा मेहता यांचा बालेकिल्ला असलेल्या सूरत येथे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. मवाळ व जहालांच्या प्रखर मतभेदाच्या पार्श्वभूीवर राष्ट्रसभेचे २३ वे अधिवेशन डिसेंबर १९०७ रोजी सूरत येथे संपन्न झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी डॉ. रासबिहारी घोस यांच्या नावाला सुरेंद्रनाथ बॅनजी यांनी अनुमोदन दिले. परंतु जहालांनी त्याला विरोध दर्शविला. लोकमान्य टिळक बोलण्यास उभे राहिले असता मवाळांनी त्यांना बोलण्यासही विरोध दर्शविला. त्यामुळे संतप्त झालेल्या जहालमतवाद्यांनी सभा मंडपात गोंधळ घातला. जहालमतवादी नेते लाला लजपतराय नुकतेच तुरुंगातून बाहेर आलेले होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना अध्यक्षपद द्यावे व कलकत्ता अधिवेशनात मांडलेल्या चतु:सूत्रीस सुरत अधिवेशनात मान्यता मिळावी हा उद्देश जहालांचा होता. लोकमान्य टिळकांनी यामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही टिळकांना भाषण करण्यास मज्जाव केल्याने जहालमतवाद्यांनी सभा मंडपात गोंधळ घातला. मवाळांनी स्वतंत्र बैठक घेऊन जहाल गटाची राष्ट्रसभेतून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. परिणामी, मवाळ व जहाल अशी उभी फूट पडली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फुटीच्या संदर्भात जाहीर आनंद व्यक्त केला. कारण ब्रिटिशांना होणारा काँग्रेसचा विरोध आता नाहीसा होईल, असा त्यांचा अंदाज होता. टिळकांनी वारंवार प्रयत्न करूनही मवाळ गटाने जहालांच्या बरोबर युती करण्याचे टाळले. कारण भारत मंत्री मोर्ले यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना राजकीय सुधारणांचे आश्वासन दिलेले होते. सूरत अधिवेशनापासून ते सन १९१६ च्या लखनौ अधिवेशनापर्यंत जहालमतवाद्यांचा गट काँग्रेस बाहेरच होता.

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: