राज्यघटनेची प्रास्ताविका

भारतीय संविधानाच्या सुरुवातीस संविधानाची प्रस्तावना दिलेली आहे. तिलाच राज्यघटनेची प्रास्ताविका, सरनामा किंवा उद्देशपत्रिका असेही म्हणतात. प्रास्ताविकेतून भारतीय लोकांच्या आशा-आकांक्षा तसेच भारतासमोरील आदर्श व तत्वज्ञान व्यक्त होते.

सर्वप्रथम १९१९ च्या भारत सरकार(माॅटफर्ड) कायद्यास स्वतंञ प्रास्ताविका देण्यात आली होती. माञ १९३५ च्या भारत सरकार कायद्यास स्वतंञ प्रास्ताविका देण्यात आली नव्हती. जगात सर्वप्रथम अमेरिकन संविधानात प्रास्ताविका समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी आपापली राज्यघटना बनवताना या पद्धतीचे अनुसरण केले.

भारताच्या संविधानाची प्रास्ताविका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव १३ डिसेंबर १९४६ रोजी मांडला होता, तर २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने हा ठराव स्वीकृत केला.

प्रास्ताविकाच्या तसेच मूळ संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे(त्या काळी ते शांतीनिकेतन येथे होते). प्रास्ताविकाच्या पानावर खालील उजव्या कोपर्यात त्यांची राम अशी सही आहे.

प्रास्ताविका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभाैम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय,

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंञ्य,

दर्जा व संधीची समानता,

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्यासर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून,

आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रास्ताविकातून पुढील चार गोष्टी स्पष्ट होतात

  1. संविधानाच्या प्राधिकाराचा स्ञोत- भारतीय जनता
  2. भारतीय राज्याचे आदर्श- सार्वभाैम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य
  3. संविधानाची उद्दिष्टे- न्याय, स्वातंञ्य, समता, बंधुता, एकता व एकात्मता
  4. संविधानाच्या स्विकृतीचा दिनांक- २६ नोव्हेंबर १९४९

प्रास्ताविकेतील तत्वज्ञान

प्रास्ताविकात सार्वभाैम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंञ्य, समता, बंधुता, एकता व एकात्मता हे महत्वाचे शब्द आहेत. या शब्दातूनच प्रास्ताविकातील तत्वज्ञान व्यक्त होते.

प्रास्ताविका संविधानाचा भाग आहे का?

  • बेरूबारी युनियन खटल्यामध्ये (१९६०) सर्वोच्च न्यायालयाने प्रास्ताविका हा संविधानाचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. माञ संविधानातील कोणत्याही तरतूदींचा अर्थ काढण्यासाठी प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा व तत्वज्ञानाचा आधार घेता येऊ शकतो असे मत मांडले.
  • माञ केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सर्वोच्च न्यायालयाने आपला पूर्वीचा निर्णय बदलून प्रास्ताविका हा संविधानाचा भाग असल्याचा निर्णय दिला.

प्रास्ताविकेची दुरूस्ती

केशवानंद भारती खटल्यामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेत दुरूस्ती करता येऊ शकते का हा प्रश्न प्रथम उपस्थित झाला होता. माञ या खटल्यामध्ये प्रास्ताविका संविधानाचा भाग असल्याचा व त्यामध्ये दुरूस्ती करता येऊ शकते असा निर्णय दिला. त्यानुसार १९७६ च्या ४२ व्या घटनादुरूस्तीने प्रास्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे तीन शब्द समाविष्ट केले. प्रास्ताविकेतील ही आजपर्यंतची एकमेव दुरूस्ती आहे.

प्रास्ताविकेबद्दल तज्ञांची मते

नाना पालखीवाला-घटनेचे अोळखपञ.

पंडित ठाकूरदास भार्गव- प्रास्ताविका घटनेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. घटनेचा आत्मा आहे. घटनेची चावी आहे. घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य मोजमापाची पट्टी आहे.

के. एम. मुन्शी- सार्वभाैम लोकशाही गणराज्याची कुंडली.