राजर्षी शाहू महाराज

महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे जातो. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात शिक्षणप्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य
 • शिक्षण हे एक क्रांतीचे साधन मानून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक मोफत आणि सक्तीचे करण्याचा कायदा १९१६ मध्ये पास केला. अशाप्रकारचा कायदा करणारे कोल्हापूर संस्थान हे भारतातील पहिले संस्थान होते.
 • प्राथमिक शिक्षणाबरोबर शाहू महाराजांनी माध्यमिक उच्च व तंत्रशिक्षणाला महत्त्व दिले. १८५१ मध्ये सुरु झालेल्या इंग्रजी शाळेचे रुपांतर त्यांनी १८८१ मध्ये राजाराम महाविद्यालयात केले. त्यांनी तंत्रशिक्षणाला महत्त्व देऊन ‘जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था’ सुरु करुन लष्करी शिक्षणासाठी ‘इन्फॅन्ट्री स्कूल’ सुरु केले.
 • शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी प्रशिक्षित तलाठी व पाटील निर्माण करण्यासाठी ‘प्रशासकीय शाळा’ सुरु केल्या.
 • हुशार व प्रशिक्षित शिक्षकांची भरती शाळेंमध्ये करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरु केली.
 • त्यांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे, शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या व परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथे सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वसतीगृह सुरु केले. या वसतीगृहाचा लाभ प्रामुख्याने ब्राह्मण विद्यार्थ्यांना झाल्याने शाहू महाराजांनी जातीवार वसतीगृहे स्थापण्याचा निर्णय घेतला.
 • १९०१ मध्ये महाराजांनी मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग’ सुरु केली तसेच लिंगायत, वैश्य, चांभार, शिंपी, ढोर इत्यादी जातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वस्तीगृहे स्थापन केली.
 • शाहू महाराजांनी स्त्रीशिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केल्या व शाळा व महाविद्यालयातील मुलींना मोफत शिक्षण दिले.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनीच शिष्यवृत्ती देऊन आपल्या चळवळीचा वारसा त्यांना दिला.
राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य
 • अस्पृश्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळेल अशी व्यवस्था केली. १९०७ मध्ये कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी ‘‘मिस क्लार्क वसतिगृह’’ सुरु केले. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली.
 • मराठ्यांसाठी सुरु केलेल्या व्हिक्टोरिया वसतिगृहात अस्पृश्य व मुसलमान विद्यार्थ्यांचीही सोय केली.
 • १९१९ मध्ये अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करुन स्पृश्य विद्यार्थ्यांच्या शाळेत अस्पृश्यांना समाविष्ट करण्याचा आदेश काढला.
 • १९२० साली कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे त्यांनी अस्पृश्याची परिषद भरवली. या परिषदेत स्वत: शाहू महाराजांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मुक्ती चळवळीचे नेतृत्व करण्याबाबत प्रोत्साहन दिले. नागपूर, दिल्ली येथे भरलेल्या अस्पृश्याच्या परिषदाचे अध्यक्षपद स्विकारले व मार्गदर्शन केले.

शाहू महाराज गादीवर आले तेव्हा १८९४ साली संस्थानात अस्पृश्य समाजाची संख्या सुमारे १ लाख होती. त्यांच्या शिक्षणाची गरज शाहू महाराजांना वाटली त्यासाठी महाराजांनी पुढील धोरणांचा स्विकार केला.

 • २५ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. ४ मार्च १९१८ रोजी त्याची अंलबजावणी केली.
 • अस्पृशांसाठी असलेल्या शाळांच्या संख्येत वाढ केली. ते सत्तेवर आले तेव्हा ५ शाळा होत्या. १९१७ साली त्यांची संख्या २७ झाली.
 • अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत दिली.
 • खाजगी खर्चातून ३ व दरबारी खर्चातून ४ अशी ७ वसतिगृहे सुरु केली (सोनतळी स्टेशन, बंगला, रुकडी) खाजगी खर्चातून अस्पृश्यांच्या सुरु केलेल्या (पंढरपूर, नागपूर, नाशिक) या वसतीगृहांना भरीव आर्थिक मदत केली.
 • राजाराम हायस्कूल व कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तसेच अस्पृश्य विद्यार्थ्यांस ५रु.शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली.
 • दरबारातील मंडळीचे खाजगी नोकर म्हणून अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे अंगरक्षक महार होते.
 • जातीवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम हाती घेतला. अस्पृश्यांना मराठे व ब्राह्मणांची आडनावे लावली.
 • २६ ऑगस्ट १९१२ रोजी आपल्या जन्मदिनी मागासलेल्या लोकांसाठी ५० टक्के जागा नोकरीत राखून ठेवण्याचा आदेश काढला.
 • महार वतने कायद्याने १८१८ साली बंद केली.
 • गुन्हेगार जातीची (फासेपारधी,गारुडी) पोलिस ठाण्यावरील हजेरी बंद केली. ते म्हणत गुन्हेगार अशी कोणतीच जात नसते. या जातीतील लोकांना नोकऱ्या (रोजगार) देण्याची व्यवस्था केली.
 • गंगाराम कांबळे या महार व्यक्तीस हॉटेल चालवण्यास आर्थिक मदत केली. (मध्य वस्तीत) स्वत: त्या हॉटेलात चहा फराळ घेत.
 • शिक्षण, आरोग्य व इतर खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा नियम केला. आंतरजातीय विवाहाला पाठिंबा दिला. विटाळ (अस्पृश्यता) मानने, कायद्याने गुन्हा ठरविला.
 • कोल्हापूरचे भवानी मंदिर अस्पृश्यांना खुले केले.
 • अस्पृश्य व स्पृश्य यांची सहभोजने घडवून आणली.
 • कोल्हापूर संस्थानात तलाठी अस्पृश्य नेण्याचा निर्णय घेतला.
 • कोल्हापूर नगरपालिकेच्या अस्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते.