मूलभूत कर्तव्ये

मूळ संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट नव्हती. १९७६ साली ४२ व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश सोव्हियत रशियाच्या घटनेवरून प्रेरित होऊन करण्यात आला आहे. जपानचा अपवाद वगळता जगातील कोणत्याही महत्वाच्या लोकशाही देशाच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही.

पार्श्वभूमी

१९७६ साली राष्ट्रीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्यांबाबत शिफारसी करण्यासाठी सरदार स्वर्ण सिंह समिती नेमली. या समितीने मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश करण्याची शिफारस केली. तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वर्ण सिंग समितीच्या शिफारसी स्वीकारल्या व ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत भाग IV A चा समावेश केला. या भागात ५१A हे एकच कलम समाविष्ट होते. ५१A कलमात एकूण १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता.

स्वर्ण सिंह समितीने एकूण आठ मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. मात्र सरकारने कूण १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. तसेच स्वर्ण सिंह समितीने काही मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समावेश करण्याची शिफारस केलेली असूनही त्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला नाही. अशी कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  1. मूलभूत कर्तव्यांचे पालन केले नाही किंवा पालन करण्यास नकार दिला तर त्याबाबत दंड किंवा शिक्षेची तरतूद.
  2. अशा दंड किंवा शिक्षेची तरतूद करणाऱ्या कायद्याला मूलभूत हक्क किंवा घटनेतील इतर कोणत्याही तरतुदीही विसंगत ठरतो या कारणामुळे कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
  3. कर भरण्याचे कर्तव्य

 

मूलभूत कर्तव्ये
संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंञ्य लढ्यास स्फुर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.
भारताची सार्वभाैमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.
देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेंव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्ञियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग करणे.
आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.
वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमाञांबद्दल दयाबुद्धी बाळगणे.
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निगृहपूर्वक त्याग करणे.
१०राष्ट्र सातत्याने, उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक स्वरुपाच्या सर्व कार्यक्षेञात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.
११माता पित्याने किंवा पालकाने सहा ते चाैदा वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे.