मुस्लिम लीग

स्थापना

भारताचे तत्कालीन व्हाॅईसरॉय गिल्बर्ट जॉन मिंटो यांना मुस्लिम प्रतिनिधिमंडळ मुस्लिमांना सर्व स्तरांवर राजकीय प्रतिनिधित्व मिळावे म्हणून १ ऑक्टोबर १९०६ रोजी सिमला येथे भेटले. मिंटो यांच्या आश्वासनामुळे मुस्लिम समाजात विशेष औत्सुक्य निर्माण झाले.  मुस्लिम समाजाला संख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्‍यांत अगर राजकारणात विशेष स्थान नव्हते. त्यामुळे आपल्या मागण्यांना व्यापक प्रमाणावर पाठिंबा मिळावा, यासाठी ३० डिसेंबर १९०६ रोजी मुस्लिम लीग या संघटनेची ढाक्का येथे स्थापना मेहंदी अली (नवाब-मोहसिन-उल्-मुल्क) आणि मुश्ताक हुसेन (नवाब-विकार-उल्-मुल्क) यांच्या नेतृत्वाखाली झाली. खोजा संप्रदायाचे प्रमुख सुलतान महंमद शाह (आगाखान) यांचा त्यांना पाठिंबा होता.

मागण्या

सुरूवातीच्या काळातील मुस्लिम लीगच्या मागण्या पुढील प्रकारच्या होत्या : (१) मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ, (२) काँग्रेसच्या स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार कार्यक्रमाला विरोध, (३) भारताच्या फाळणीला पाठिंबा, (४) मुस्लिमांना सरकारी नोकऱ्‍यात अधिक संधी, (५) मोर्ले-मिंटो सुधारणांना पाठिंबा आणि (६) पूर्व बंगाल आणि आसामसाठी वेगळे उच्च न्यायालय.

मुस्लिम लीग: वाटचाल

हिल्या महायुध्दाच्या काळात तुर्कस्तान आणि ब्रिटन परस्पर विरोधात उभे राहिल्याने भारतीय मुस्लिम लीगच्या दृष्टिकोनात फरक झाला. तिचे नेतृत्व कट्टर धार्मिक पण ब्रिटिश विरोधी बनले. ब्रिटिशांना करावयाच्या राजकीय विरोधात तीही काँग्रेसच्या बरोबर होती. असहकार आंदोलनात व खिलाफत चळवळीत हिंदू आणि मुस्लिम म. गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र होते. फेब्रुवारी १९२२ मध्ये असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आणि हिंदु-मुस्लिम विरोधाची धार वाढत चालली. मुस्लिमांच्या ‘तबलीघ’ आणि ‘तनझीम’ या चळवळी उग्र बनत चालल्या; त्याबरोबरच हिंदूंच्या संघटन आणि शुध्दीकरण या मोहिमांनी जोर धरला.

१९२२ ते १९२७ या काळात देशात उग्र धार्मिक दंगली झाल्या. १९२४ च्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आणि संघराज्यात स्वायत्त प्रांतांची जोरदार मागणी एम्. ए. जिना यांच्या अध्यक्षतेखाली लीगने केली. या अधिवेशनानंतर काँग्रेसपासून लीग दूर गेली आणि तिने स्वतंत्र ध्येयधोरणांचा पुरस्कार करावयाला सुरूवात केली.

नेक प्रांतांत १९३७ साली काँग्रेस अधिकारावर आली. प्रांतिक काँग्रेस मंत्रिमंडळांनी लीगशी सहकार्याचे धोरण ठेवले नाही. त्यामुळे लीग स्पर्धात्मक पक्ष म्हणून आकारास येऊ लागला.

२३ मार्च १९४० रोजी लाहोरच्या ऐतिहासिक अधिवेशनात मुस्लिम लीगने आक्रमक ठराव मांडला व द्विराष्ट्र-सिद्धांताला मान्यता देऊन पाकिस्तान निर्मितीला पाठिंबा दिला. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मुस्लिम लीगचे अस्तित्व नगण्य होते.

१९४८ साली मलबार (केरळ) येथील मुस्लिम नेत्यांनी लीगचे पुनरूज्जीवन केले व इंडियन युनियन मुस्लिम लीग असे तिचे नामांतर करण्यात आले.