मानव विकास निर्देशांक (Human Development Index)

प्रस्तावना

१९९० मध्ये UNDP ने प्रथमच मानव विकास अहवाल सादर केला. याबाबत पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ मेहबूब उल हक व भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे महत्वाचे योगदान होते. मेहबूब उल हक यांना मानवी विकास निर्देशांकाचे जनक म्हणून आेळखले जाते.

निकष

मानव विकास निर्देशांक (Human Development Index) हा आरोग्य, शिक्षण व जीवनमानाचा दर्जा या तीन निकषांवरून काढला जातो. हे तीन निकष पुढील चार निर्देशांकावरून काढतात.

आरोग्य

देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळचे आयुर्मान हा निर्देशांक वापरला जातो. या निर्देशांकाचे किमान मूल्य २५ तर कमाल मूल्य ८५ असते.

शिक्षण

देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील दोन निर्देशक वापरतात.

अ) २५ वर्षांहून अधिक वयाच्या प्राैढांची सरासरी शालेय वर्षे.

ब) १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे.

या निर्देशांकाचे किमान मूल्य शून्य तर कमाल मूल्य त्या वर्षी आढळलेले एखादया देशाच्या सर्वाधिक मूल्याइतके असते.

जीवनमानाचा दर्जा

देशाच्या जीवनमानाचा स्तर मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हा निर्देशांक वापरला जातो. या निर्देशांकाचे किमान मूल्य १०० डाॅलर तर कमाल मूल्य ४०००० डाॅलर इतके असते. या प्रत्येक निकषांचे मूल्य पुढील सुञानुसार ० ते १ मध्ये व्यक्त केले जाते.

निकषाचे मूल्य = प्रत्यक्ष मूल्य – किमान मूल्य/ कमाल मूल्य – किमान मूल्य.

त्यानंतर या तिन्ही निर्देशाकाचा भूमितीय मध्य काढून मानवी विकास निर्देशांक तयार होतो.

मानवी विकास अहवाल २०१० पासून निर्देशांकात केलेले बदल

शिक्षण

२०१० पूर्वी हा निकष साक्षरता व gross enrolment या निर्देशांकावर आधारित होता. त्याची जागा आता २५ वर्षावरील प्राैढांची सरासरी शालेय वर्षे व १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे या निर्देशांकांनी घेतली.

राहणीमानाचा दर्जा

२०१० पूर्वी हा निकष दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न (per capita GDP) या निर्देशांकावर आधारित होता. त्याची जागा आता दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ( per capita GNI) या निर्देशांकाने घेतली.

भूमितीय मध्य

२०१० पुर्वी HDI ची गणना करण्यासाठी या तीन निकषांचा साधारण मध्य काढला जायचा. त्याची जागा आता भूमितीय मध्याने घेतली.