महाराष्ट्र: प्राकृतिक रचना

महाराष्ट्र: प्राकृतिक रचना महाराष्ट्रामध्ये एकूण ०३ प्राकृतिक विभाग पडतात.

1) कोकण किनारपट्टी

2) पश्चिम घाट / सह्याद्री

3) दख्खनचे पठार / महाराष्ट्र पठार / देश पठार

कोकण किनारपट्टी

सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट, चिंचोळया व सखल भागास “कोकण” असे म्हणतात.

कोकण निर्मीती :-

महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्रास लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तर भंग होवून कोकण किनारपट्टी तयार झाली आहे.

कोकणाचे क्षेत्रफळ :-

कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी एवढी आहे. उत्तरेस दमणगंगा नदीपासुन दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंतचा प्रदेश कोकणाने व्यापलेला आहे. पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वञ सारखी नसून कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी ३० ते ६० किमी आहे. उत्तर भागामध्ये ही रुंदी ९० ते ९५ किमी एवढी आहे तर दक्षिणेकडे ही रुंदी ४० ते ४५ किमी एवढी रुंद आहे. कोकणाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेल्याचे दिसून येते. उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणाची रुंदी १०० किमी एवढी आढळते. उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.

कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ ३०,३९४ चौकिमी एवढे आहे.


कोकणाचे उपविभाग 

कोकणाचे ०२ उपविभाग पडतात.

१)उत्तर कोकण २)दक्षिण कोकण

उत्तर कोकणामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्हयांचा समावेश होतो तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयांचा समावेश होतो. उत्तर कोकण दक्षिण कोकणापेक्षा अधिक खडकाळ व डोंगराळ असून या विभागात शहरी वस्ती कमी आढळते.

कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पुर्वेकडे वाढत जाते. पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या लगत असलेल्या सखल भागास “खलाटी” असे म्हणतात. त्याची समुद्रसपाटीपासुनची उंची फार कमी आहे. खलाटीच्या पूर्वेस असलेल्या डोंगराळ भागास “वलाटी” असे म्हणतात.


कोकणातील खाड्या 

कोकणातील नद्या ह्या सह्याद्री पर्वतामध्ये उाम पावतात व पश्चिमेकडील सखल भागात वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात. भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.

या खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.

१) डहाणूची खाडी, जि. ठाणे

२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे

३) वसईची खाडी, जि. ठाणे

४) धरमतरची खाडी, जि. रायगड

५) रोह्याची खाडी, जि. रायगड

६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी

७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी

८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी

९) जयगड, जि. रत्नागिरी

१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग

११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग


कोकणातील किल्ले

रायगड- कर्नाळा, प्रबळगड, सरसगड, लिंगाळा सुधागड, मुरूड-जंजीरा

सिंधुदूर्ग – विजयदुर्ग, सिंधुदूर्ग

ठाणे- वसई


महाराष्ट्रातील बंदरे

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुंबई हे महत्वाचे नैसर्गिक व आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचा मोठ्या प्रमाणात व्यापार मुंबई या बंदरावरुन चालतो. मुंबई या बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट हे नवीन बंदर रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा 1989 मध्ये उभारण्यात आले आहे.   मुंबईच्या दक्षिणेस अलीबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगूर्ला ही बंदरे आहेत. महाराष्ट्रात सध्या लहान मोठी एकूण ४९ बंदरे आहेत.


सह्याद्री पर्वत / पश्चिम घाट

भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे. हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा निश्चीत करतो. उत्तरेस तापी नदीपासुन दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्रीचा पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी १६०० किमी आहे व त्याची महाराष्ट्रातील लांबी ८०० किमी एवढी आहे. सह्याद्रीची सरासरी उंची ९०० ते १२०० मीटर एवढी आहे. सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे वाढत व दक्षिणेस कमी होत जाते. अरबी समुद्रापासुन सह्याद्री पर्वताची लांबी ३० ते ६० किमी एवढी आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस तीव्र उतार आहे. या रांगांमुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या अशा प्रकारच्या नद्या तयार झालेल्या आहेत.


सह्याद्री पर्वतरांगांमधील महत्वाची शिखरे

कळसूबाई (१६४६ मी) हे शिखर नाशिक-अहमदनगर या जिल्हयांच्या सीमेवर “अकोले” या तालुक्यामध्ये आहे. प्रवरा नदीच्या उगमाजवळ कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे. त्यानंतर साल्हेर (१५६७ मी) हे दुसऱ्या क्रमांकाचे, सप्तश्रुंगी शिखर (१४४६ मी) हे तिसऱ्या क्रमांकाचे व ञ्यंबकेश्वर (१३०४ मी) हे शिखर महाराष्ट्रातच आहेत. ही तिन्ही शिखरे नाशिक जिल्हयामध्ये आहेत. तौला (नाशिक), हनुमान (धुळे), तोरणा (पुणे) ही महाराष्ट्रातील इतर महत्वाची शिखरे आहेत.

महत्वाचे :- “अस्थंबा” (१३२५ मी) हे शिखर सातपुडा पर्वत रांगातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर “धुपगड” हे सातपुडा पर्वत रांगातील सर्वात उंच शिखर आहे. ते मध्यप्रदेश मध्ये येते.


सह्याद्री रांगेतील घाट

  1. अंबोली: कोल्हापूर – सावंतवाडी (आजरा)
  2. फोंडा: कोल्हापूर – पणजी
  3. आंबा:  कोल्हापूर – रत्नागिरी
  4. माळशेज: नगर – कल्याण
  5. कुंभार्ली: कराड – चिपळूण
  6. वरंधा: भोर – महाड
  7. कसारा (थळ):  नाशिक – मुंबई
  8. खंबाटकी: सातारा – पुणे
  9. बोरघाट: पुणे – मुंबई
  10. दिवे: पुणे – सासवड – बारामती

घाटमाथा

सह्याद्री पर्वताच्या शिखरावरील उंच व रुंद सपाट प्रदेशास ” घाटमाथा” असे म्हणतात. उदा :- माथेरान(नेरळ-रायगड), महाबळेश्वर व पाचगणी (सातारा). पाचगणीस “टेबल लँड” म्हणून ओळखले जाते.


सह्याद्री पर्वत रांगेतील किल्ले 

शिवनेरी, सिंहगड (पुणे), प्रतापगड (सातारा), पन्हाळा (कोल्हापुर), रायगड (रायगड), विशालगड.


सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा

मुख्य सह्याद्री पर्वतापासुन पुर्व पश्चिम अशा लहान मोठ्या डोंगर रांगा तयार झालेल्या आहेत.

शंभु महादेव डोंगर रांगा

शंभु महादेव डोंगर रांगा या सह्याद्री पर्वत रांगेच्या आग्नेय दिशेस येते. ही रांग रायरेश्वर पासुन शिंगणापुर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेस शंभु महादेव डोंगर रांग असे म्हणतात. या डोंगर रांगा “सातारा व सांगली” जिल्ह्यातुन पुढे कर्नाटकमध्ये प्रवेश करतात. या रांगामुळे भिमा नदी व कृष्णा नदी यांची खोरे वेगळी झाली आहेत. महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठी डोंगर रांग म्हणून शंभु महादेव डोंगरास ओळखले जाते.

हरिश्चंद्र-बालाघाट डोंगर रांग

गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरीश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. या डोंगर रांगेमुळे गोदावरी नदी व भिमा नदी या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र डोंगर घाट व पुर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते. पुढे याच रांगा आग्नेय दिशेस वळून आंध्रप्रदेशातील हैद्राबाद पर्यंत जातात. बालाघाट सर्वात जास्त सपाट माथ्याचा प्रदेश आहे.

सातमाळा-अजिंठा डोंगर रांगा

या रांगांमुळे गोदावरी व तापी नदींची खोरी वेगळी झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगर रांगा आढळतात. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यास अजिंठा डोंगर रांगा म्हणून ओळखले जाते. देवगिरी हा इतिहास प्रसिद्ध किल्ला व अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या ह्या अजिंठा डोंगररांगामध्ये उत्तरेकडे “वाघुर” नदीच्या घळईत आहे. या डोंगर रांगांच्या पश्चिम भागास सातमाळा डोंगर रांगा असे म्हणतात. नाशिक जिल्हयाच्या वायव्य भागामध्ये सातमाळा डोंगर सुरु होतो व पुढे याच डोंगराच्या रांगा मनमाडच्या पुढे जावुन “अंकाई-टंकाई” पासुन त्यांना अजिंठा टेकड्या या नावाने ओळखले जाते.

इतर डोंगर रांगा

गाळणा डोंगर (धुळे), वेरुळ डोंगर (औरंगाबाद), हिंगोली डोंगर (हिंगोली), मुदखेड(नांदेड), गरमरसुर (नागपुर), दरकेसा डोंगर (गोंदिया), भांमरागड (गडचिरोली).

सातपुडा पर्वत 

ह्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या पुर्व-पश्चिम पसरलेल्या आहेत. सातपुडापर्वत रांगा महाराष्ट्रामध्ये थोड्या प्रमाणात आढळते व जास्त प्रमाणात मध्यप्रदेश मध्ये आढळतात. नर्मदा व तापी नद्यांची खोरी या पर्वत रांगेमुळे वेगळी झालेली आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात तोरणमाळ हे एक पठार आहे. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वंत रांगातील सर्वात उंच शिखर “अस्तंभा” डोंगर (१३२५ मी) हे आहे. सातपुडा पर्वत रांगेचा काही भाग हा अमरावती जिल्ह्याच्या सीमेस स्पर्श करुन जातो त्यास अमरावतीमध्ये “गाविलगड” या नावाने ओळखले जाते. सातपुडा पर्वतरांगातील बैराट (११७७ मी) व चिखलदरा (१११५ मी) ही शिखरे अमरावती जिल्हयात आहे.


महाराष्ट्राचे पठार / दख्खनचे पठार / देश पठार

o सह्याद्री पर्वताच्या पुर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे. त्यास “महाराष्ट्र पठार” असे म्हणतात.महाराष्ट्र पठार हे विविध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले आहे. महाराष्ट्र पठाराचा उतार पश्चिमेकडून पुर्वेकडे आहे. या पठाराची समुद्रसपाटीपासुनची सरासरी उंची ४५० मी एवढीे आहे. महाराष्ट्र राज्याचा ९० टक्के भुभाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. या पठाराची निर्मीती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे. लाव्हा रसापासुन हे पठार तयार झाले असल्याने त्यास “दख्खन लाव्हा” असेही म्हणतात. महाराष्ट्र पठार हे मुख्यत: करुन नद्यांच्या खोऱ्यांचे पठार म्हणून ओळखले जाते.

o महाराष्ट्र पठारावर इतर लहान मोठी पठारे आहेत.

१) बालाघाट डोंगररांगावर “अहमदनगर-बालाघाट” हे पठार आहे.

२) शंभु महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात “सासवडचे पठार” आहे.

३) सातमाळा-अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेशात बुलढाणा व मालेगाव ही पठारे आहेत.

४) मराठवाड्यामध्ये “मांजरा पठार” आहे.

५) उत्तरेकडे धुळे व नंदुरबार जिल्हयामध्ये “तोरणमाळ” हे पठार आहे.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे 

1) भंडारदरा(अहमदनगर) 2) तोरणमाळ(नंदुरबार) 3) म्हेैसमाळ (औरंगाबाद) 4) चिखलदरा(अमरावती) 5) आंबोली(सिंधुदूर्ग) 6)पन्हाळा(कोल्हापुर) 7) माथेरान (रायगड) 8) महाबळेश्वर व पाचगणी (सातारा) 9) लोणावळा व ) खंडाळा (पुणे).