भूकंप

भूकंप म्हणजे भूपृष्ठाला बसणारे हादरे. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने तणाव उत्पन्न होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसला म्हणजे धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होऊन ती सभोवार पसरतात, त्यालाच भूकंप म्हटले जाते. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात.

सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

भूकंपाची कारणे

 1. भूपट्ट सरकणे.
 2. भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
 3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
 4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
 5. ज्वालामुखींचे उद्रेक होणे.

भूकंपनाभी व अपिकेंद्रः

भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो, त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंपनाभी असे म्हणतात. या केंद्रातून
विविध दिशांना ऊर्जालहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वांत प्रथम पोहचतात, (म्हणजेच भूकंपनाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वांत जवळचे ठिकाण) तेथे भूकंपाचा धक्का सर्वांत प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते.

भूकंप लहरी

भूकंपनाभीकडून ताण मुक्त झाल्यावर, मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे तीन प्रकार होतात.

प्राथमिक लहरी (Primary or ‘P’ Waves)

भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात, त्यामुळे या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे-मागे हलतात.

दुय्यम लहरी (Secondary or ‘S’ Waves)

प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते. या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात; परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

भूपृष्ठ लहरी (Surface or ‘L’ waves)

प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत (अपिकेंद्र) येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात.

भूकंपाचे परिणाम 

 1. जमिनीला तडे पडतात.
 2. भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
 3. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा., विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.
 4. काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
 5. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
 6. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
 7. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
 8. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.
 9. संदेशवहन व्यवस्था कोलमडते.