भारतीय बँक व्यवस्था

भारतात सन १७७० मध्ये ‘बँक ऑफ हिंदुस्थान’ या पहिल्या बँकेची स्थापना झाली. .. १८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता, सन १८४० मध्ये प्रेसिडेंसी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. महाराष्ट्रात सन १८८१ मध्ये ‘‘औंध कमर्शियल बँकेची स्थापना झाली. भारतात १ एप्रिल १९३५ मध्ये ‘मध्यवर्ती बँक’ (RBI) स्थापन करण्यात आली आहे.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी १९ जुलै १९६९ मध्ये ५० कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या १४ खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तसेच १५ एप्रिल १९८० मध्ये २०० कोटी रुपये पेक्षा अधिक ठेवी असलेल्या ०६ बँकांचे (खाजगी बँकांचे) राष्ट्रीयीकरण करण्यात आले. अशाप्रकारे राष्ट्रीयकृत व्यापारी बँकाची संख्या २८ इतकी असून स्टेट बँक ऑफ इंडिया व सहयोगी बँकांचाही यामध्ये समावेश आहे. भारतात सन २००७ मध्ये IDBI चे रुपांतर राष्ट्रीयकृत व्यापारी बँकेत करण्यात आले आहे.

व्यापारी बँक अर्थ (Meaning of the Commercial Bank) :

आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात बँक (BANK) हा इंग्रजी शब्द नेहमीच वापरतो. हा शब्द इटालियन शब्द ’BANCO’ पासून तयार झाला आहे. Bank, Bankrupt, Bank rate . शब्द इटालियन शब्दापासून तयार झालेले आहेत.

) डॉ. एच्‌. एल्‌. हार्ट : ‘‘बँक म्हणजे अशी व्यक्ती की, जी आपल्या दररोजच्या व्यवहारात ग्राहकांकडून चालू खात्यावर पैसे स्वीकारते व त्यांनी काढलेल्या आदेशावर पैसे देते.’’

) प्रा. आर. एस. सेअर्स : ‘‘ज्या संस्थेने दिलेल्या कर्जाचा वापर इतर लोक आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी करतात अथवा मान्य करतात, अशी संस्था म्हणजे बँक होय.’’

) बँकिंग कंपनी कायदा १९४९ : ‘‘कर्ज म्हणून देण्याकरीता अगर भांडवल म्हणून गुंतविण्याकरीता, लोकांकडून मागताक्षणी अगर इतर प्रकारे परत करावयाच्या किंवा चेक्स, ड्राफ्टस्‌, ऑर्डर (Pay-order) अगर इतर प्रकारे काढून द्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणाऱ्या संस्थांना बँक असे म्हणता येईल.”

व्यापारी बँकांची कार्ये (Functions of Commercial Bank) :

आधुनिक काळात भारतात व्यापारी बँका शेती, उद्योग, सेवा, शिक्षण, व्यापार, पर्यटन इ. विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. व्यापारी बँकांच्या कार्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

() प्राथमिक कार्ये Primary Functions

() दुय्यम कार्ये Secondary Functions

() सामाजिक कार्ये Social Functions.

प्राथमिक कार्ये (Primary Functions) :

व्यापारी बँका आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे, पतपैशाची निर्मिती करणे व सभासदांना विविध बँकिंग सेवासुविधा उपलब्ध करून देणे. . कार्याचा समावेश प्राथमिक कार्यात केला जातो.

ठेवी स्वीकारणे (Accepting Deposits)

व्यापारी बँकांचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजेच आपल्या सभासदांकडून / खातेदारांकडून ठेवी स्वीकारणे. तसेच या ठेवींवर विशिष्ट दराने व्याज देणे. व्यापारी बँका प्रामुख्याने पुढील चार प्रकारच्या ठेवी स्वीकारतात.

 1. चालू खाते (Current Account) : सर्वसाधारणत: उद्योग, व्यापार व व्यवसायातील लोकांना आपले नेहमीचे बँकिंग विषयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी हे चालू खाते सर्वाधिक उपयुक्त असते. या खात्यावरील रक्कमेला व्याज मिळत नाही. परंतु अधिकर्ष सवलत मिळते. या खात्यावर ग्राहक दिवसातून कितीही वेळा पैसे भरू अथवा काढू शकतो.
 2. बचत खाते (Saving Account) : अल्प व मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांच्या लहान प्रमाणावरील बचती गोळा करण्याच्या उद्देशाने हे खाते चालविले जाते. या खात्यावर वरील शिल्लक रकमेवर सर्वसाधारणत: ३ ते ५% दराने व्याज सभासद/ खातेदारांना दिले जाते. आठवड्यातून दोन वेळा पैसे काढण्याची परवानगी असते. या खात्यावरील पैसे काढण्यासाठी मागणीपत्र (Withdrawal Slip), धनादेश (Cheque) किंवा ए.टी.एम. (ATM) याचा वापर केला जातो.
 3. मुदत ठेव खाते (Fixed Deposit Account) : या प्रकारच्या खात्यावर सर्वसाधारणपणे ३ महिने ते ५ वर्षे किंवा १० वर्षे मुदतीपर्यंत ठेवी स्वीकारल्या जातात. या ठेवीवर सर्वसाधारण ७ ते १०% दराने व्याज दिले जाते. मुदत संपल्यानंतर व्याजासह ठेव परत दिली जाते. मुदतपूर्व ठेव परत घेतल्यास व्याजदर कमी केला जातो.
 4. आवर्ती ठेव (Recurring Deposit) : सर्वसामान्यत: या प्रकारचे खाते पगारदार, किरकोळ व्यापारी, फिरते विक्रेते (Vendor) रोजंदारीवरील कारागीर इत्यादींना उपयुक्त खाते आहे. या खात्यावर विशिष्ट मुदतीकरीता उदा. , , , ७ व १० वर्षे मुदतीकरीता अशी खाती सुरू करता येतात. या खात्यावर व्याजासह जास्तीतजास्त १ लाख रुपये ठेव म्हणून ठेवता येते. या ठेवीवर कर्ज काढता येत नाही.
 5. इतर ठेवी खाते (Other Deposit Accounts) : समाजातील गरीब व दारिद्र्यरेषेखालील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी (उदा. पिग्मी ठेव, शुभमंगल ठेव, शैक्षणिक ठेव, गृहकोषीय ठेव, लखपती ठेव इ.) स्विकारत असतात व त्यावर आकर्षक व्याजदर दिला जातो.

थोडक्यात वरील विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकांचे एक प्रमुख कार्य आहे.

कर्जे देणे (Lending Money / Advances) :

व्यापारी बँका आपल्या कार्यक्षेत्रातून प्राप्त झालेल्या ठेवी / पैसा, भागातील / विभागातील लघुउद्योजक, कारखानदार, व्यवसायीक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, पगारदार व्यक्ती, वित्तीय संस्था, महामंडळे यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीसाठी विशिष्ट अटींवर कर्जाऊ देतात. व्यापारी बँकांचा प्रधान हेतू नफा मिळविणे हा असतो. त्यासाठी गरजू व पात्र व्यक्तींना / संस्थांना योग्य तारणावर विशिष्ट मुदतीसाठी रोख कर्जे, अधिकर्ष सवलत, अल्पसूचना कर्जे, मुदत कर्जे देतात. व्यापारी बँका प्रामुख्याने पुढील प्रकारची कर्जे देतात.

 1. कर्जे (Loans) : भारतातील व्यापारी बँका विविध कंपन्यांचे शेअर्स, सरकारी कर्ज रोखे, विकास रोखे, चल व अचल मालमत्ता इत्यादीच्या तारणावर सुयोग्य व्यक्तींस विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट कालावधीसाठी, ठराविक रक्कम कर्ज म्हणून देतात यालाच साधे कर्ज (Simple Loan) असे संबोधले जातेसर्वसाधारणत: हे कर्ज तारण वस्तूच्या ७० ते ८०% पर्यंत मंजूर केले जाते.
 2. रोख कर्ज (Cash Credit) : सर्वसाधारण सभासद, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक इत्यादींना खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तारण मालावर तारणाच्या ५० ते ७५% पर्यंत रोख साधे कर्ज म्हणून मंजूर केले जाते. मंजूर कर्जाचा विनियोग गरजेनुसार करता येतो. फक्त वापरलेल्या कर्जावरच व्याज द्यावे लागते
 3. अधिकर्ष सवलत (Overdraft facilities) : व्यापारी बँकाकडे चालू खाते असलेल्या योग्य व पात्र खातेदारांना अधिकर्ष सवलतीचा फायदा घेता येतो. शेअर्स, कर्ज रोखे, विमा पॉलीसी, विकास रोखे किंवा वैयक्तिक पतीवर ही सवलत मंजूर केली जाते. अधिकर्ष सवलतीची मुदत अल्पकाळासाठी असते. रक्कम व कालावधीनुसार व्याजाची आकारणी केली जाते.
 4. हुंडी स्वीकारणे व वटविणे (Accepting and Discounting Bills of Exchange) : व्यापारी बँका आपल्या सभासद/खातेदारांना हुंडी स्वीकारून अल्प मुदतीसाठी (९० दिवस) पैशाची गरज भागविण्यासाठी या प्रकारचे कर्ज देतात. अर्थव्यवस्थेत उद्योग, व्यापारात बरेच व्यवहार हे उधारीवर व विश्वासावर चालत असतात. उत्पादक कच्चा माल उधारीवर पुरवित असतो. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीवर माल देत असतात. या सर्व व्यवहारात हमी म्हणून ऋणकोवर हुंडी काढली जाते. बँका ग्राहकांच्या वतीने हुंडी स्वीकारून धनकोला ती रक्कम अदा करतात ऋणकोकडून मुदतपूर्तीनंतर रक्कम व्याजासह वसूल करतात. या व्यवहारात बँकांना चांगला व्याजदर / उत्पन्न मिळते. तसेच जर बँकेला गरज पडली तर आपल्याकडील हुंड्या मध्यवर्ती बँकेकडे ठेवून पैसा उपलब्ध करता येतो. यालाच Rediscounting of Bills of Exchange असे संबोधले जाते. आधुनिक काळात व्यापारी बँकांचा उत्पन्न प्राप्तीचा हा एक मार्ग आहे.
 5. इतर कर्जे (Other Loans) : व्यापारी बँका आपल्या खातेदारांना अलीकडील काळात घरबांधणी, वाहन खरेदी, शैक्षणिक कारणाकरीता, पर्यटनासाठी, प्लॉट / फ्लॅट (Plot / Flat) खरेदीसाठी कर्ज देतात. या कर्जावर आकर्षक व्याजदर आकारला जातो. हे कर्ज पगारपत्र, घर, जमिन, शेअर्स, बचतपत्रे ठेवी इ. च्या तारणावर दिले जाते. या प्रकारात बँकांना चांगले उत्पन्न मिळते.

पतपैशाची निर्मिती (Credit Creation) :

अलीकडील काळात पतपैशाची निर्मिती करणे हे आजच्या व्यापारी बँकांचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य मानले जात आहे. विशेषत: शेती, उद्योग, व्यापार, सेवा इ. क्षेत्राचा जलद गतीने विकास घडवून आणण्याचे प्रभावी साधन म्हणून पतपैसा निर्मितीच्या कार्याला सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे. प्रा. शेअर्स यांच्या मते, ‘‘बँका केवळ पैसा पुरवठा करणाऱ्या संस्था नाहीत, तर त्या एका अर्थाने पत पैसा निर्माण करणारे कारखाने आहेत.’’ व्यापारी बँकामुळेच अर्थव्यवस्थेत पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. आधुनिक काळात पतपैसा निर्मिती कार्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.


दुय्यम कार्ये (Secondary Functions) :

आजच्या गतीमान जगात व्यापारी बँका वरील कार्याबरोबरच व्यक्ती, समाज, अर्थव्यवस्था व भांडवली बाजाराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अनेकविध स्वरूपाची कार्ये पार पाडतात. त्यांनाच व्यापारी बँकाची दुय्यम कार्ये म्हणून संबोधले जाते. ती दुय्यम कार्ये पुढीलप्रमाणे

) प्रातिनिधीक कार्ये Agency Services

) उपयुक्ततेची कार्ये Utility Functions

प्रातिनिधिक कार्ये :

व्यापारी बँकांना खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून विविध कार्ये पार पाडावी लगातात ती पुढीलप्रमाणे

 1. चेक, ड्राफ्टस्‌, हुंडी, वचनचिठ्ठी इ. पैसे वसूल करणे.
 2. नियमित शोधन करणे (Regular Payments)
 3. ग्राहकांच्या वतीने रक्कम जमा करणे.
 4. शेअर्स, कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करणे.
 5. रक्कमांचे हस्तांतर करणे.
 6. ग्राहकांचे विश्वस्त म्हणून कार्य करणे.
 7. ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणे.
 8. ग्राहकांना गुंतवणूकीसाठी मार्गदर्शन करणे.
 9. ग्राहकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची खरेदी करून देणे.
 10. प्राप्तीकर विवरणपत्र भरणे.
 11. विक्रीकर भरणा करणे.
 12. रेल्वे, विमान, पंचतारांकित हॉटेल्स, पर्यटन केंद्र इ. आरक्षण करणे.

उपयुक्ततेची कार्ये / सेवा कार्ये (Utility Functions) :

आधुनिक काळात व्यापारी बँका या प्रामुख्याने उत्पादक, उपभोक्ते, उद्योजक, ग्राहक, व्यापारीव्यावसायिक इ. ना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देत असतात. त्यांना उपयुक्त सेवा/कार्ये या नावाने संबोधले जाते. ती कार्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे

 1. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे.
 2. प्रवासी चेक सुविधा उपलब्ध करून देणे.
 3. हमीपत्र (Letters of Credit) देणे
 4. भाग विमेकरीचे कार्य करणे.
 5. विदेशी व्यापारात मदत करणे.
 6. सांख्यिकी आकडेवारी (Statistical Data) गोळा करणे.
 7. विदेशी विनियमाचे व्यवहार करणे.
 8. गुंतवणूकीबाबत ग्राहकांना तज्ज्ञ सेवा पुरविणे.
 9. ग्राहक जागृती अभियान घडवून आणणे.
 10. ग्राहकांना भांडवल बाजार, पारस्पारिक निधी बाबत माहिती देणे.

सामाजिक कार्ये (Social Functions)

व्यापारी बँका आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वृद्धीचा अभिकर्ता (Agent of Growth) या नात्याने पुढील सामाजिक कार्ये पार पाडतात.

 1. आर्थिक वृद्धीचा अभिकर्ता म्हणून कार्य करणे.
 2. भांडवल निर्मितीचा वेग वाढविणे.
 3. आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देणे.
 4. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य करणे.
 5. स्वयंरोजगार वृद्धीस चालना देणे.
 6. सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत करणे.