भारतातील कर संरचना (Tax structure in India)

कर- अर्थ, वैशिष्ट्ये व उद्दिष्ट्ये

सरकारला वेगवगळी आर्थिक व सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आपल्या नागरिकांकडून कर गोळा करण्याचा अधिकार असतो. प्रत्येक राष्ट्रात विशिष्ट अशी कर संरचना विकसीत झालेली असते. अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात भारतातील कर संरचना अभ्यासणे आवश्यक आहे.

व्याख्या

बेस्टॅबल यांच्या मते, सार्वजनिक सत्तेच्या सेवा कार्यासाठी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडून होणारे संपत्तीचे सक्तीयुक्त अंशदान म्हणजे कर होय.

सेलिगमन यांच्या मते, विशिष्ट लाभ विचारात न घेता सर्वांच्या सामाईक हितासाठी खर्च करता यावा म्हणून व्यक्तीकडून सरकारला मिळणारे सक्तीचे अंशदान म्हणजे कर होय.

कराची वैशिष्ट्ये

 1. कर हे ऐेच्छिक देणे नाही तर ते सक्तीचे देणे आहे.
 2. करदात्याला प्रत्यक्ष व विशेष लाभ होत नाही.
 3. कर म्हणजे करार नव्हे.
 4. कर म्हणजे केवळ सरकारी उत्पन्नाचे साधन नाही.
 5. हा व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाला भरावा लागतो.
 6. कर आकारणीचा अधिकार केवळ सरकारलाच असतो.
 7. कर वसूलीला कायद्याचे अधिष्ठान असते.
 8. करभाराचे संक्रमण शक्य असते.

कराची उद्दिष्ट्ये

 1. सरकारी महसूलात वाढ करणे.
 2. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात व उत्पादनात वाढ करणे.

कररचनेचे प्रकार

 1. प्रगतीशील कररचना
 2. प्रतिगामी कररचना
 3. प्रमाणशील कररचना

करांचे प्रकार

प्रत्यक्ष कर (Direct Tax)

प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की ज्या कराचा भार, ज्याने कर भरावयाचा आहे त्याला दुसऱ्यावर ढकलता येत नाही किंवा कर संक्रमित करता येत नाही.

दुसऱ्या शब्दात ज्या व्यक्तीवर कर आकारला जातो त्याच व्यक्तीवर कराच भार पडतो तेंव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणता येईल. अशा रितीने कराघात व करभार जेंव्हा एका व्यक्तीवर पडतो तेंव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. उदा. प्राप्तीकर, संपत्तीकर, महामंडळ/निगम कर, भांडवली मिळकत कर, देणगी कर, इ.

प्रत्यक्ष करांचे गुण

 1. कर वसूल करण्याचा खर्च कमी असल्याने काटकसर पाळली जाते.
 2. प्रत्यक्ष करांबाबत करांचे दर, उत्पन्न इत्यादी गोष्टी अंदाजने शक्य असते. त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे शक्य होते.
 3. हा प्रगतिशील असल्याने सम-न्याय तत्वाचे पालन करणे शक्य होते.
 4. प्रत्यक्ष कर लवचिक असतात.
 5. प्रत्यक्ष करांमुळे नागरिकांमध्ये जबाबदारी व हक्काची जाणीव निर्माण होते.

प्रत्यक्षकरांचे दोष

 1. प्रत्यक्ष करांचा भार करदात्यांवर पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष कर अधिक अप्रिय असतात.
 2. करदात्यांना गैरसोयीचा असतो.
 3. प्रत्यक्ष कर चुकविणे अधिक सोपे असते.

भारतातील प्रमुख प्रत्यक्ष कर

आयकर/प्राप्तीकर (Income Tax)

आयकर हा प्रगतिशील स्वरूपाचा कर आहे. भारतात १८६० मध्ये सर्वप्रथम आयकर लागू करण्यात आला. आयकर कायदा-१८६१ नुसार हा कर आकारला जातो. व्यक्तींनी मागील वर्षी कमावलेल्या उत्पन्नावर हा कर लावला जातो.

महामंडळ कर/निगम कर (Corporation Tax)

कंपन्यांच्या नफ्यावर हा कर आकारला जातो. आयकर कायदा-१८६१ नुसार हा कर आकारला जातो व त्याचे प्रशासन आयकर विभागाकडून केले जाते.

मालमत्ता कर/वारसाहक्क कर

वडिलोपार्जित/वारसाहक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर मालमत्ता कर १९५३ पासून लागू करण्यात आला. १९८५ मध्ये हा कर रद्द करण्यात आला.

देणगी कर (Gift Tax)

निकोलस काॅल्डार यांच्या शिफारसींनुसार हा कर १९५८ पासून लागू केला गेला. १९९१ पर्यंत देणगी देणाऱ्याकडून वसूल केला जाई माञ त्यानंतर देणगी स्वीकारणाऱ्याकडून हा कर वसूल केला जातो. हा कर १९९८ साली रद्द करण्यात आला आहे.

खर्च कर (Expenditure Tax)

निकोलस काॅल्डार यांच्या शिफारसींनुसार हा कर १९५७ पासून लागू केला गेला. हा कर रद्द करण्यात आला आहे.

संपत्ती कर

निकोलस काॅल्डार यांच्या शिफारसींनुसार हा कर १९५७ पासून लागू केला गेला. व्यक्ती हिंदू, अविभक्त हिंदू कुटुंबे व कंपन्या यांच्या संपत्तीवर हा कर लावला जातो. संपत्ती कर कायदा-१९५७ नुसार हा कर लागू करण्यात आला असून त्याचे प्रशासन आयकर विभागाकडून केले जाते.

अप्रत्यक्ष कर

जेंव्हा व्यक्ती आपल्यावर आकारलेला कर दुसऱ्यावर ढकलू शकते आणि सरकारचा उद्देश त्या व्यक्तीनेच कर भरावा असा नसेल तर तो अप्रत्यक्ष कर होय. म्हणजेच कराघात व करभार भिन्न व्यक्तीवर होत असेल अशा कराला अप्रत्यक्ष कर म्हणतात. उदा. उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, जकात, विक्रीकर, राज्य उत्पादन शुल्क, इ.

भारतातील प्रमुख अप्रत्यक्ष कर

केंद्रीय अबकारी कर/केंद्रीय उत्पादन शुल्क

केंद्रीय अबकारी कर हा मादक द्रव्ये, साैदर्य प्रसाधने इ. वस्तू सोडून इतर सर्व वस्तूंच्या उत्पादनावर लावला जातो.

सीमा शुल्क

भारतातून निर्यात किंवा आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क आकारले जाते.

विक्रीकर

विक्रीकर हा राज्यांचा कर आहे. वस्तूंच्या राज्यांतर्गत विक्रीवर हा कर लावला जातो.

केंद्रीय विक्रीकर

वस्तूंची विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात झाल्यास केंद्रीय विक्रीकर केंद्राकडून आकारला जातो. या कराचे उत्पन्न ज्या राज्यातून विक्री होते त्या राज्यास मिळते.

राज्य उत्पादन शुल्क/ राज्य अबकारी कर

राज्य उत्पादन शुल्क हा राज्यांचा कर आहे. मादक पदार्थ, साैदर्य प्रसाधने, ड्रग्स इ. वस्तूंवर राज्य उत्पादन शुल्क आकारले जाते.

सेवा कर

१९९४ पासून सेवा कर लागू करण्यात आला. २००३ च्या ८८ व्या घटनादुरुस्तीने या कराला घटनात्मक दर्जा दिला. या घटनादुरूस्तीने घटनेत २६८A हे कलम व सातव्या परिशिष्ठातील केंद्रसूचीत ९२C या क्रमांकावर सेवा कर हा विषय घातला. कलम २६८A नुसार सेवाकर हा केंद्रामार्फत आकारला जातो, त्याची वसूली केंद्र व राज्यांमार्फत होते तर कर उत्पन्नाची वाटणी केंद्र व राज्य यांच्यात होते.