भारताचे राष्ट्रीय उत्पन्न (National Income)

Contents show

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न मोजता येऊ शकते, त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राचे उत्पन्नही मोजता येऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्न (National Income) मोजण्यासाठी स्थूल देशांतर्गत उत्पाद(GDP), निव्वळ देशांतर्गत उत्पाद(NDP), स्थूल राष्ट्रीय उत्पाद(GNP), निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(NNP) या चार संकल्पनांचा वापर होतो. या संकल्पना पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील.

स्थूल देशांतर्गत उत्पाद(GDP)

एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेतंर्गत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या मुल्याची बेरीज म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पाद होय. याठिकाणी

 • ”स्थूल” याचा अर्थ ”एकूण” असा आहे.
 • ”सीमेंतर्गत उत्पादित झालेल्या” याचा अर्थ “देशाच्या सीमेतंर्गत स्वतःच्या भांडवलाने उत्पादित झालेल्या” असा आहे.
 • “अंतिम” म्हणजे तो स्तर ज्यानंतर वस्तू व सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचे मूल्यवर्धन होणे शक्य नाही.

निव्वळ देशांतर्गत उत्पाद(NDP)

वस्तू व सेवांचे उत्पादन होत असताना उत्पादनाच्या प्रक्रियेत गुंतलेल्या मालमत्तांची झीज होत असते. उदा. कारखान्यातील यंञ-सामग्री. अशा झीजेचे एकूण मूल्य म्हणजेच घसारा होय.

निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद वजा घसारा होय.

NDP = GDP- घसारा

स्थूल राष्ट्रीय उत्पाद(GNP)

स्थूल देशांतर्गत उत्पादामध्ये परदेशातून मिळालेले उत्पन्न मिळविले की स्थूल राष्ट्रीय उत्पाद मिळते. म्हणजेच-

स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + परदेशातून मिळालेले उत्पन्न

देशाला परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्ञोत पुढीलप्रमाणे आहेत-

 1. परकीय व्यापार (व्यापार तोल)– देशाच्या एकूण आयात व निर्यातीतून मिळणारे उत्पन्न धनात्मक किंवा  ऋणात्मक असते. भारताच्या बाबतीत हे उत्पन्न नेहमीच ऋणात्मक राहिलेले आहे (२०००-२००३ या कालावधीचा अपवाद वगळता). याचे मुख्य कारण भारताकडून मोठ्या प्रमाणात होणारी तेलाची आयात हे आहे.
 2. परकीय कर्जावरील व्याज – भारताने परकीय देशांना दिलेल्या कर्जावरील मिळणारे व्याजाचे उत्पन्न. माञ भारत हा निव्वळ कर्जबाजारी देश असल्याने भारत मोठ्या प्रमाणात व्याज परकीय देश/संस्थांना पाठवतो. त्यामुळे याबाबतीत भारताचे एकूण उत्पन्न हे नेहमीच ऋणात्मक राहिलेले आहे.
 3. अनिवासी नागरिकांनी पाठविलेल्या रकमा- परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांनी भारतात पाठविलेल्या रकमा हा एक परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक स्ञोत आहे. माञ यातून परकीय नागरिकांनी भारतातून परदेशात पाठविलेल्या रकमा वजा कराव्या लागतात. वजा करून राहिलेली रक्कम धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. भारताच्या बाबतीत हा आकडा नेहमीच धनात्मक राहिला आहे. किंबहूना 2015 मध्ये भारत हा अनिवासी नागरिकांनी पाठविलेल्या रकमांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता.

शेवटी या तिन्ही घटकांची बेरीज धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. भारताच्या बाबतीत ही नेहमीच ऋणात्मक राहिली आहे. म्हणजेच भारताच्या बाबतीत-

स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + परदेशातून मिळालेले उत्पन्न

हे सूञ

स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + (-परदेशातून मिळालेले उत्पन्न)

असे बनते.

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(NNP)

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पाद वजा घसारा.

निव्वळ राष्ट्रीय उत्पाद=स्थूल राष्ट्रीय उत्पाद- घसारा

राष्ट्रीय उत्पादाबाबत इतर काही संकल्पना

बाजारभाव व घटक किंमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पाद

घटक किंमत म्हणजे उत्पादकाला वस्तू व सेवा उत्पादित करताना आलेला एकूण खर्च.

उदा. कच्चा माल, मजुरी, भाडे, व्याज, भांडवल इ.

तर बाजारभाव म्हणजे घटक किमतीमध्ये अप्रत्यक्ष कर मिळवल्यावर येणारी किंमत.

उदा.  समजा एखाद्या कारची एक्स-शोरूम किंमत चार लाख रुपये आहे. कार विकत घेताना खरेदी करणाऱ्याला कारच्या एक्स शोरूम किमतीवर रोड टॅक्स, मुल्यवर्धित कर, केंद्रीय अबकारी कर भरावे लागतील. समजा या करांची रक्कम एक लाख रुपये होते. तर कार खरेदीसाठी खरेदीदाराला पाच लाख रुपये मोजावे लागतील. या किमतीला आॅन रोड प्राईज असे म्हटले जाते. या ठिकाणी कारची घटक किंमत चार लाख रुपये तर बाजारभाव पाच लाख रुपये आहे.

भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे घटक किमतीला मोजले जाते.

चालू किमतीला व स्थिर किमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पाद

राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना महागाईचा किंमतीवरती होणारा परिणाम विचारात घेणे आवश्यक ठरते. समजा या वर्षी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न १०५ रुपये आहे, गेल्या वर्षी ते १०० रुपये होते. तर राष्ट्रीय उत्पन्नात ५ टक्के वाढ झाली असे दिसून येते. माञ त्यावर्षीचा महागाईचा दर हा ६ टक्के असेल तर ही आभासी वाढ असल्याचे स्पष्ट होईल. कारण राष्ट्रीय़ उत्पन्नात झालेली ही वाढ वस्तू व सेवांच्या उत्पादनात झालेली वाढ नसून त्या वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये झालेली वाढ असते.

राष्ट्रीय उत्पन्नावर महागाईचा होणारा असा परिणाम टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न स्थिर किमतीला मोजले जाते. यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून निश्चित करण्यात येते. आणि त्या वर्षाच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते.

अप्रत्यक्ष कर व राष्ट्रीय उत्पन्न

प्रत्यक्ष करांच्या बाबतीत कराचा दर कितीही असला तरी वस्तू व सेवांच्या बाजारभावावर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना प्रत्यक्ष करांना विचारात घेणे आवश्यक नाही.

घटक किमतीला राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अप्रत्यक्ष कर हे बाजारभावाला मोजलेल्या उत्पन्नातून वजा करावे लागतात. कारण अशा करांची गणना दोनदा होते. प्रथम ग्राहकांच्या उत्पन्नामध्ये(ग्राहक स्वतःच्या निव्वळ उत्पन्नातून अप्रत्यक्ष कर भरतात) व दुसऱ्यांदा सरकारच्या कर उत्पन्नात.

अनुदाने (सबसिडी) व राष्ट्रीय उत्पन्न

बाजारात काही वस्तूंचे काही वस्तूचे भाव कमी राहावेत यासाठी सरकार या वस्तूंच्या उत्पादकांना अर्थसहाय्य देते. तेवढ्याने त्या वस्तूंचे भाव कमी असतात. या अर्थसहाय्याला अनुदान (सबसिडी) म्हणतात.

घटक किमतीला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अप्रत्यक्ष कर व अनुदाने (सबसिडी) यांचे समायोजन करावे लागते. म्हणजेच बाजारभावाला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नातून अप्रत्यक्ष कर वजा करावे लागतील तर अनुदाने त्यात मिळवावी लागतील.

तर घटक किमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न

स्थूल देशांतर्गत उत्पाद

(घटक किमतीला मोजलेले)

स्थूल देशांतर्गत उत्पाद

(बाजारभावाला मोजलेले)

GDP fc =GDP mp – अप्रत्यक्ष कर + अनुदाने
NDP fc =NDP mp – अप्रत्यक्ष कर + अनुदाने
GNP fc =GNP mp – अप्रत्यक्ष कर + अनुदाने
NNP fc =NNP mp – अप्रत्यक्ष कर + अनुदाने

NNP fc यालाच खरे राष्ट्रीय उत्पन्न म्हणून संबोधले जाते.

राष्ट्रीय उत्पन्न तीन प्रकारे मोजले जाते-

 1. उत्पादन पध्दत- एका वर्षात प्रत्यक्ष निर्माण केलेल्या वस्तू व सेवा यांच्या वर्धित मूल्यांची बेरीज केल्याने राष्ट्रीय उत्पन्न मिळते.
 2.  उत्पन्न पध्दत- उत्पादन प्रक्रियेत भाग घेणाऱ्या उत्पादक घटकांना मोबदला मिळतो. हा मोबदला त्यांचे उत्पन्न बनते. हे उत्पन्न खंड, भाडे, मजूरी, व्याज व नफा या स्वरूपात असते. या सगळ्यांची बेरीज केल्याने राष्ट्रीय उत्पन्न मिळते.
 3. खर्च पध्दत- खर्चाचे चार गट पाडले जातात. उपभोग्य वस्तू व सेवा यांच्यावरचा उपभोग खर्च, उपभोग्य वस्तू व सेवा निर्माण करणाऱ्या भांडवली वस्तू व सेवा यांवरील खर्च गुंतवणूक, सरकारी खर्च व परकीय व्यवहारावरील खर्च. या चार प्रकाराच्या खर्चांची बेरीज केल्यास राष्ट्रीय उत्पन्न मिळते.

भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

स्वातंञ्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

दादाभाई नौरोजी

 1. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न.
 2. अर्थव्यवस्थेचे कृषी व बिगर कृषी क्षेञ असे विभाजन
 3. १९६७-६८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३४० कोटी तर दरडोई उत्पन्न २० रु.
 4. वैज्ञानिक पध्दत मानली गेली नाही.

विल्यम डिग्बी

१९९७-९८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३९० कोटी तर दरडोई उत्पन्न १७ रु.

फिंडले शिरास

१९११ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न १९४२ कोटी तर दरडोई उत्पन्न ८० रु.

व्ही. के. आर. व्ही. राव

 1. सर्वप्रथम वैज्ञानिक पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना
 2. राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन म्हणून राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक म्हणून अोळख.
 3. १९२५-२९ या कालावधीसाठी राष्ट्रीय उत्पन्न २३०१ कोटी तर दरडोई उत्पन्न ७८ रु.

आर. सी. देसाई.

१९३०-३१ साठी राष्ट्रीय उत्पन्न २८०१ व दरडोई उत्पन्न  ७२ रु.

स्वतंञ भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापे

राष्ट्रीय उत्पन्न समिती

 1. स्थापना – ४ आॅगस्ट १९४९
 2. अध्यक्ष – पी. सी. महालनोब्रिस
 3. सदस्य – डी. आर. गाडगीळ, व्ही. के. आर. व्ही. राव
 4. अहवाल सादर – पहिला १९५१ मध्ये व अंतिम १९५४ मध्ये

या समितीने शिफारस केल्यानुसार १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तर १९५४ मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना यांची स्थापना करण्यात आली.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय

स्थापना – १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणून

१९७० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणून पुनर्रचना

NSSO मार्फत १. घरगुती सर्वेक्षण  २. उपक्रम सर्वेक्षण  ३. ग्राम सुविधा  ४. भूमी व पशुधन धारणा या चार प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात.

केंद्रिय सांख्यिकीय कार्यालय

स्थापना – १९५४ मध्ये केंद्रिय सांख्यिकीय संघटना म्हणून

कार्यारंभ – १९५५

मुख्यालय – दिल्ली. माञ कोलकाता येथे आैद्योगिक सांख्यिकीय शाखा आहे.

कार्ये –

 1. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना
 2. वार्षिक आैद्योगिक सर्वेक्षण
 3. आैद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक
 4. आैद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक