भारताचे महानियंञक व महालेखापरीक्षक

संविधानच्या कलम १४८ ने भारताचे महानियंञक व महालेखापरीक्षक(CAG) या स्वतंञ घटनात्मक पदाची तरतूद केली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  CAG चा सर्वात महत्वाचा अधिकारी असा उल्लेख केला होता.

नेमणूक

CAG ची नेमणूक राष्ट्रपती आपल्या सहीशिक्यानिशी अधिपञाद्वारे करतात. CAG म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती पदग्रहण करण्यापुर्वी राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर तिसर्या अनुसूचीत दिल्याप्रमाणे शपथ घेते.

पदावधी

संविधानात CAG च्या पदावधीबद्दल तरतूद करण्यात आलेली नाही. माञ संसदीय कायद्यानुसार CAG आपल्या पदावर सहा वर्षे किंवा वयाची पासष्ट वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहतात. CAG त्यांचा पदावधी संपण्यापूर्वी आपल्या पदाचा राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात.

बडतर्फी

CAG ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे व तशाच कारणास्तव पदावरून दूर करता येते(सिद्ध झालेले गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने पारित केलेल्या ठरावाने).

स्वातंञ्य

 1. भारताचे महानियंञक व महालेखापरीक्षक (Comptroller
  and Auditor General of India)CAG ला त्याच्या पदावधीची हमी देण्यात आली आहे. त्याला घटनेत सांगितलेल्या पध्दतीने व त्याच कारणामुळे पदावरून दूर करता येते.
 2. CAG चे वेतन व सेवाशर्तींमध्ये त्याच्या सेवाकाळात त्याला अहितकारक असा बदल करता येत नाही.
 3. CAG त्याचा पदावधी संपल्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारच्या नियंञणाखालील कोणत्याही पदासाठी पाञ नसतो.
 4. त्याच्या कार्यालयाचा सर्व खर्च भारताच्या संचित निधीवर भारित असतो.

अधिकार व कर्तव्ये

 1. CAG भारताचा संचित निधी, राज्यांचा संचित निधी व विधीमंडळ असलेल्या केंद्रशासित प्रदेशांच्या संचित निधीतून झालेल्या खर्चांच्या लेख्यांचे लेखापरिक्षण करतो.
 2. तो भारताचा व राज्यांचा आकस्मिक निधी व भारताचा व राज्यांचे सार्वजनिक लेखे यातून झालेल्या खर्चांच्या लेख्यांचे लेखापरिक्षण करतो.
 3. तो केंद्र व राज्यांच्या प्रत्येक विभागाने केलेल्या व्यापार, उत्पादन, जमाखर्च, ताळेबंद व इतर दुय्यम लेखे यांचे लेखापरिक्षण करतो.
 4. CAG राष्ट्रपती व राज्यपालांनी निर्देशित केलेल्या इतर कोणत्याही प्राधीकरणाचे लेखापरिक्षण करतो.
 5. CAG केंद्र व राज्य सरकारांचे लेखे कोणत्या नमुन्यांत ठेवावे याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देतो.
 6. CAG केंद्र सरकारच्याबाबतीतला लेखापरीक्षण अहवाल राष्ट्रपतींना सादर करतो. राष्ट्रपती असा अहवाल संसदेसमोर मांडतात.
 7. CAG राज्य सरकारच्याबाबतीतला लेखापरीक्षण अहवाल राज्यपालांना सादर करतो. राज्यपाल असा अहवाल विधीमंडळासमोर मांडतात.
 8. CAG कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे निव्वळ उत्पन्न निश्चित व प्रमाणित करतो. याबाबत CAG चे प्रमाणपञ अंतिम असते.
 9. CAG लोकलेखा समितीचा मार्गदर्शक, मिञ व तत्वज्ञ म्हणून कार्य करतो. म्हणूनच त्याला लोकलेखा समितीचे कान व डोळे असे संबोधले जाते.