ब्राह्मो समाज

प्रस्तावना

राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मोसमाजाने धार्मिक, सामाजिक सुधारणा चळवळ सुरू केली. हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणणारी चळवळ उभारणारी संघटना म्हणून ब्राह्मो समाज ओळखला जातो. राजा राममोहन रॉय हे ‘आधुनिक भारताचे जनक’ आणि ‘भारतीय प्रबोधनाचे जनक’ या नावाने ओळखले जातात. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रांतातील हुगळी जिल्ह्यातील राधानगर या गावात झाला. त्यांचे शिक्षण पाटणा येथे झाले. संस्कृत, बंगाली या भाषांच्या बरोबरच त्यांनी अरेबिक आणि पर्शियन या परकिय भाषेत प्राविण्य मिळविले. त्यांनी हिंदू, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, यहुदी, पारशी धर्मांचा व धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानेच त्यांना खऱ्या धर्माची ओळख झाली. परमेेश्वर एक आहे हे सर्व धर्मातील सत्य त्यांना समजले.

राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना २० ऑगस्ट, १८२८ रोजी केली. सर्व धर्माचा सखोल अभ्यास केल्यावर परमेेश्वर एक आहे असे त्यांचे मत बनले. त्यांना हिंदू धर्मात अनिष्ट रुढी-प्रथा, परंपरा, दोष आणि अंधश्रद्धा दिसून आल्या. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात मूर्तीपूजा, बहूदेवतावाद, अवतार कल्पना, कर्मकांड, पोथिनिष्ठा यासारख्या निरर्थक आणि भ्रामक समजुती आहेत असे रॉय यांना वाटू लागले. रॉय यांनी आपल्या विचारांच्या प्रसारार्थ इ. स. १८१५ साली ‘आत्मीय सभा’ तर सन १८२२ मध्ये ‘युनिटेरियन कमिटी’ स्थापन केली. २० ऑगस्ट, १८२८ रोजी कलकत्ता येथे ब्राह्मो समाज स्थापन केला.

 

ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे :

 1. हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.
 2. समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.
 3. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.
 4. हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.

ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान :

 1. एकेश्वरवाद : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.
 2. मूर्तीपूजेस विरोध : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.
 3. बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.
 4. अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.
 5. आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.
 6. सर्व धर्मातील ऐक्य : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.
 7. विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.
 8. प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.

ब्राह्मो समाजाची वाटचाल :

राजा राममोहन रॉय यांच्या समृद्ध विचाराने आणि कार्य कौशल्याने ब्राह्मो समाजाचा प्रसार झाला. समाजाच्या अनुयायांत भर पडली. ‘संवाद कौमुदी’ हे नियतकालिक सुरू करून ब्राह्मो समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. एकेेश्वरवादावर विेश्वास असणाऱ्या अनुयायांना एकत्रित यावे म्हणून एक मंदिर बांधले. या मंदिरात बसून निर्गुण, निराकार अशा ईश्वराची लोक उपासना करू लागले. या मंदिरात प्रतिमा, पुतळा, शिल्प, चित्र यास स्थान नव्हते. त्याचप्रमाणे धर्मगुरू, पुजापाठ, यज्ञयाग, होम हवन यांनाही बंदी होती. चारित्र्य, नैतिकता, सद्‌गुण आणि सर्वधर्मविचारावर भर दिला जाई. राजा राममोहन रॉय यांनी एकेेश्वरवादाच्या प्रसारार्थ अनेक ग्रंथ प्रकाशित केले. त्यांनी धर्म आणि समाज सुधारणा चळवळ सुरू केली. इ. स. १८३३ मध्ये राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू झाला.

राजा राममोहन रॉय यांचे कार्य :

स्त्री-पुरुष समतेची कल्पना मांडून राजा राममोहन रॉय यांनी स्त्रियांची गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा प्रयत्न केला. सती प्रथा, केशवपन या चालीरीतींना विरोध करण्यासाठी आंदोलने केली. परिणामी तत्कालिन गव्हर्नर जनरल विल्यम्‌ बेटिंग यांनी ४ डिसेंबर, १८२९ मध्ये सतीबंदीचा कायदा पास केला. राजा राममोहन रॉय यांनी पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. त्यासाठी महाविद्यालये सुरू केली. वेदांताच्या अभ्यासासाठी त्यांनी वेदांत कॉलेज सुरू केले. वृत्तपत्रीय लिखाण करुन समाजजागृतीचे कार्य केले.

देवेद्रनाथ टागोराचे कार्य :

राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाजाला नवचैतन्य देण्याचे कार्य देवेंद्रनाथ टागोरांनी केले. त्यांनी ब्राह्मो समाजात १८३८ मध्ये प्रवेश केला. इ. स. १८३८ सालात त्यांनी ‘तत्त्वबोंधिनी सभा’ स्थापन करुन ब्राह्मो समाजाचा प्रसार खेड्यापाड्यापर्यंत पोहचविला. धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने बाह्य विद्यालय सुरू केले. त्यांनी आपल्या शिष्यवर्गाला मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, कर्मकांड, प्रायश्चित्त घेणे इत्यादिपासून दूर ठेवले.

केशवचंद्र सेन :

केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे या समाजास नवी दिशा मिळाली. त्यांच्या उदारमतवादी विचाराने व वक्तृत्वामुळे ब्राह्मो समाज लोकप्रिय बनला. त्यांनी ब्राह्मो समाजाचा प्रसार उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास प्रांतात केला. केशवचंद्रांनी आंतरजातीय व विधवा विवाहाचा पुरस्कार केला. ते हिंदू धर्माला संकुचित समजू लागले. एवढेच नव्हे तर त्यांच्या सभेत सर्व धर्मग्रंथांचे वाचन होऊ लागले.

ब्राह्मो समाजात फूट :

देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी ‘भारतीय ब्राह्मो समाज’ स्थापन करुन समाज कार्य सुरू केले. देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज ‘आदि ब्राह्मो समाज’ या नावाने कार्य करू लागला. केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजाने बालविवाहास विरोध, विधवा विवाह व आंतरजातीय विवाहास उत्तेजन दिले. त्याचप्रमाणे स्त्री-मुक्ती, शिक्षण प्रसार आणि मद्यपान निषेध अशा कार्यक्रमावर भर दिला. इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. तरुण अनुयायांना सेन यांचे विचार मवाळ वाटू लागले. त्यांनी केशवचंद्र यांची काही तत्त्वे अमान्य केली. त्यातच सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण भारतीय ब्राह्मो समाजातून बाहेर पडले व त्यांनी १८७८ मध्ये ‘साधारण ब्राह्मो समाज’ स्थापना केला. साधारण ब्राह्मो समाजाने अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य हाती घेतले. बालविवाह आणि पडदा पद्धतीस विरोध केला. स्त्रियांना उच्च शिक्षण देण्यासाठी आग्रह धरला. विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाहाचा जोमाने आग्रह धरला. थोडक्यात ब्राह्मो समाजाने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ब्राह्मो समाजाच्या मुशीतूनच भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वैचारिक पार्श्वभूमी लाभली.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

2 thoughts on “ब्राह्मो समाज”

error: