बेरोजगारी (Unemployment)

बेरोजगारी (Unemployment) ही अर्थशास्ञाच्या अभ्यासातील एक महत्वाचा घटक आहे.

बेरोजगारी (Unemployment): अर्थ

व्याख्या- मुलतः बेरोजगार असलेली माञ रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणतात. अशी व्यक्ती,

  1. रोजगारासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.
  2. तिची काम करण्याची इच्छा असावी.
  3. समाजातील प्रचलित वेतनदरावर काम करण्याची तयारी असावी.

या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीने आवश्यक ते प्रयत्न करूनही रोजगार मिळत नसेल तर ती व्यक्ती बेरोजगार आहे असे समजले जाते.

बेरोजगारीचे प्रकार

संरचनात्मक बेरोजगारी

ही बेरोजगारी देशाच्या आर्थिक संरचनेशी संबंधित असते. जेंव्हा कामगारांचा पुरवठा, कामगारांच्या मागणीपेक्षा जास्त असतो तेंव्हा संरचनात्मक बेरोजगारी उद्भवते. विकसनशील देशांमध्ये उत्पादन क्षमता कमी असते. उत्पादन क्षमता कमी असल्याने कामगारांची अावश्यकता कमी असते. अशा कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी होय. या बेरोजगारीचे स्वरूप दीर्घकालीन असते.

कमी प्रतीची बेरोजगारी

ज्यावेळी व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा व शिक्षणापेक्षा कमी दर्जाच्या रोजगारावर काम करावे लागते त्यावेळी तिला कमी प्रतीची बेरोजगारी म्हणतात. अशा रोजगारामध्ये त्या व्यक्तीच्या शिक्षणाचा व क्षमतेचा पर्याप्त वापर होत नाही त्यामुळे ते उत्पादकतेमध्ये मर्यादित प्रमाणात भर घालतात.

छुपी बेरोजगारी (प्रच्छन्न बेरोजगारी)

जर रोजगारार गुंतलेली व्यक्ती आपल्या उत्पादन प्रक्रियेत कोणतेही योगदान देत नसेल किंवा त्या व्यक्तीला कामाहून काढून टाकले तरी त्याचा उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होत नसेल तर अशा बेरोजगारीस छुपी/अदृश्य/प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतात. अशा बेरोजगारांची सीमांत उत्पादकता शून्य असते कृषी क्षेञामध्ये अशी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात अाढळते.

खुली बेरोजगारी

काम करण्याची क्षमता व इच्छा असूनही नियमित रोजगार मिळत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी म्हणतात. ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तींमध्ये या प्रकाराची बेरोजगारी आढळते.

सुशिक्षित बेरोजगारी

जेंव्हा सुशिक्षित व्यक्ती कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगाराला बळी पडते, तेंव्हा ती सुशिक्षित बेरोजगार अाहे असे समजले जाते.

घर्षणात्मक बेरोजगारी

घर्षणात्मक बेरोजगारी बाजारातील मागणी पुरवठा यांतील बदलांमुळे घडून येते.या परिस्थितीत कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असून ते ऐच्छिकरित्या बेरोजगार असतात.

चक्रीय बेरोजगारी

विकसित भांडवलशाही देशातील व्यवसाय चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी निर्माण होते तिला चक्रीय बेरोजगारी म्हणतात.

दीर्घकालीक बेरोजगारी

सामान्यतः एका वर्षापेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिलेल्या व्यक्तीस दीर्घकालीक बेरोजगार असे म्हणतात. जेंव्हा एखाद्या देशाचे बेरोजगारी हे दीर्घकाळासाठी वैशिष्ट्य बनलेले असते त्यावेळी अशा स्थितीला दीर्घकालीक बेरोजगारी असे म्हणतात.

हंगामी बेरोजगारी

अशा प्रकारची बेरोजगारी ऋतूपरत्वे मागणीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे उद्भवते. कामगारांना वर्षभर रोजगार न मिळता वर्षाच्या विशिष्ट कालावधीकरिताच रोजगार मिळतो. कृषी क्षेञामध्ये अशा प्रकारची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात अाढळते.

भारतातील बेरोजगारीचे मोजमाप

बी भगवती यांच्या अध्यक्षतेखालील बेरोजगारीवरील तज्ञ गटाने १९७३ मध्ये सादर केलेल्या अहवालात १९७१ साली बेरोजगारीचा दर १०.४ असल्याचे म्हटले. ग्रामीण भागात हा दर १०.९ तर शहरी भागात ८.१ इतका होता.

नियोजन आयोगाने गठित केलेल्या बेरोजगारीच्या अंदाजावरील तज्ञ गटाच्या शिफारशीनसार  NSSO तीन प्रमुख पध्दतीने बेरोजगारीचे अंदाज जाहीर करते.

नित्य प्रमुख व दुय्यम स्थिती(दीर्घकालीक बेरोजगारी)

यात वर्षातील मोठ्या कालावधीसाठी बेरोजगार राहिलेल्या व्यक्तींची संख्या असते. ज्या व्यक्तींना मागील ३६५ दिवसांमध्ये १८३ दिवसांपेक्षा कमी दिवस रोजगार मिळाला असेल त्या व्यक्ती नित्य प्रमुख स्थितीत बेरोजगार असतात. तर एखादी व्यक्ती याच कालावधीत ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस एखाद्या दुय्यम रोजगारावर असेल तर तिला दुय्यम स्थितीत रोजगार असल्याचे मानले जाते अन्यथा अशी व्यक्ती दुय्यम स्थितीतही बेरोजगार असल्याचे मानले जाते.

चालू साप्ताहिक स्थिती

एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एका तासासाठी सुध्दा काम न मिळालेल्या व्यक्ती चालू साप्ताहिक स्थितीतील बेरोजगार असे समजले जाते.

चालू दैनिक स्थिती

चालू आठवड्यातील एका दिवशी किंवा काही दिवस रोजगार न मिळालेल्या व्यक्तींना चालू दैनिक स्थितीतील बेरोजगार समजले जाते. चालू आठवड्यात दररोज किमान चार तास काम मिळणे आवश्यक आहे.

बेरोजगारी (Unemployment) दूर करण्यासाठी सरकारच्या विविध योजना

NREP

RLEGP

IRDP

JRY

MWS

IAY

EAS

JGSY

SJGSY

SISRY

NREGA

ROSHNI

WAMBAY

PMKVY

TRYSEM

DWCRA

DPAP

DDP

RAY

CAPART

PMRY

SGRY

SAY

NF for W