बिपिनचंद्र पाल

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये बिपिनचंद्र पाल (१८५८-१९३२) यांचे मोलाचे योगदान आहे. लहानपणापासून बिपिन चंद्रांच्यावरती ब्राह्मो समाजाचा प्रभाव होता. सक्रिय राजकारणात सहभाग घेण्यास सुरुवात केली तेव्हा ते मवाळवादी गटामध्ये होते. ब्रिटिश राजवट म्हणजे ईेशरी वरदान आहे असे त्यांचे मत होते. परंतु बंगालच्या फाळणीनंतर त्यांचा ब्रिटिशांच्यावरील विश्वास उडाला व ते जहालमतवादाकडे आकर्षित झाले. बिपिनचंद्र पाल यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ रोजी बंगाल प्रांतातील सिल्हेर जिल्ह्यात झाला. बिपिन चंद्रांनी ब्राह्मो समाजाची दिशा घेतल्याने वडिलाशी मतभेद झाले. त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर कटक व बंगलोर येथे काही काळ मुख्याध्यापक म्हणून काम केले. सन १८८० मध्ये त्यांनी ‘परिदर्शक’ नावाचे बंगाली साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर त्यांनी ‘बंगाल पब्लिसिटी’, ‘ओपिनियम’, ‘दि ट्रिब्यून’, ‘न्यू इंडिया’ इत्यादी वृत्तपत्रासाठी लिखाण केले. आपल्या लिखाणाद्वारे व भाषणातून स्वदेशी, बहिष्कार, स्वराज्य व राष्ट्रीय शिक्षणासंदर्भात विचार मांडण्यास सुरुवात केली. सन १९०७ मध्ये सूरत अधिवेशनात राष्ट्रसभेत फूट पडल्यानंतर टिळकांच्या बरोबर तेही बाहेर पडले. त्यानंतर ते सन १९१६ मधील लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले. बंगालमधील क्रांतीकारकांचे ते स्फूर्तीस्थान होते. सन १९०८-११ या काळात इंग्लंडधील वास्तव्यात त्यांनी संघराज्य शासन पद्धती संबंधी विचार मांडले. संघराज्य शासन पद्धतीच भारताला लोकशाहीची प्राप्ती करुन देण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्यांचे मत होते. याशिवाय पाल यांनी ‘लोकतांत्रिक स्वराज्याची संकल्पना’ मांडली. सन १९२१ रोजी महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर मात्र पुन्हा ते सक्रिय राजकारणात आले नाहीत. शेवटी २० मे १९३२ रोजी त्यांचे निधन झाले.