बाबा पदमनजी

जन्म व शिक्षण 

 • बाबा पदमनजी (मे १८३१ – २९ ऑगस्ट १९0६) हे मराठी साहित्यिक आणि मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक होते. त्यांचे पूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे असे होते.
 • त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला व शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे झाले. बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले; बायबल; तसेच अब्राहम, इझाक इत्यादींच्या कथा हे सर्व इंग्रजी समजू लागल्यानंतर वाचले. मुंबईच्या फ्री चर्च विद्यालयात ‘बैबल मास्तर’ म्हणून काम केले. हळूहळू ख्रिस्ती धर्माकडे ओढा निर्माण झाला.

परमहंस मंडळीतील सहभाग

काही काळ ते ‘परमहंस मंडळी’ ह्या प्रागतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते; परंतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार; तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वरदत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आशयाचे विचार त्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी ह्या संघटनेशी संबंध तोडला.

ख्रिस्ती धर्माचा स्वीकार

 • परमहंस मंडळीतून बाहेर पडल्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा त्यानंतर अधिकाधिक तीव्र होत गेली व अखेरीस ३ सप्टेंबर १८५४ रोजी त्यांनी बाप्तिस्मा घेतला.
 • ख्रिस्ती झाल्यानंतर ते पुण्यास गेले. पुणे येथे त्यांचे वास्तव्य सु. १६ वर्षे होते. तेथे असताना त्यांनी बरीच वर्षे फ्री चर्च मिशनच्या मंडळीचे पाळक म्हणून १८६७ मध्ये त्यांची नेमणूक झाली; परंतु १८७३ मध्ये ह्या कामाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:ला लेखनास वाहून घेतले.

यमुना पर्यटन-मराठीतील पहिली कादंबरी

 • बाबा पदमनजी यांच्या ग्रंथांपैकी ”यमुनापर्यटन” ही कादंबरी असून मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी आहे.
 • मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून यमुनापर्यटनाचा उल्लेख करण्यात येत असला, तरी यमुनापर्यटनात कादंबरीचे व्यवच्छेदक असे विशेष घटक सापडत नसून ती कांदबरी नव्हे, असेही विचार व्यक्तविले गेले आहेत.

ग्रंथसंपदा

 1. स्त्रीविद्याभ्यास निबंध (१८५२),
 2. व्यभिचारनिषेधक बोध (१८५४),
 3. यमुनापर्यटन (१८५७),
 4. सर्वसंग्रही ऊर्फ निबंधमाला (१८६॰)
 5. शब्दरत्नावली (१८६0),
 6. महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास (१८६६),
 7. स्त्रीकंठभूषण (१८६८),
 8. ए काँप्रेहेन्सिव्ह डिक्शनरी इंग्लिश अँड मराठी (नवी आवृ. १८७॰),
 9. कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना (१८७३),
 10. नव्या करारावर टीका (१८७७),
 11. उद्धारमार्गविज्ञान (१८७८) आदींचा समावेश होतो.
 12. अरुणोदय (१८८४) ह्या नावाने त्यांनी आपले लालित्यपूर्ण व कलात्मक आत्मचरित्रही लिहिले.
 13. उदयप्रभा, कुटुंबमित्,, सत्यदीपिका अशा काही नियत-कालिकांचेही त्यांनी संपादन केले.मुंबई येथे त्यांचे निधन झाले.