बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multi-Dimensional Poverty Index)

प्रस्तावना

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multi-Dimensional Poverty Index) आॅक्सफर्ड विद्यापीठातील Oxford Poverty And Human Development Initiative व यु. एन. डी. पी. यांनी मिळून विकसित केला. हा निर्देशांक सर्वप्रथम २०१० मध्ये प्रसिध्द केला. याने १९९७ पासून जाहीर होत असलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची जागा घेतली. या निर्देशांकात दारिद्र्याचे मापन करण्यासाठी उत्पन्नाच्या आकडेवारीपलीकडील अनेक घटकांचा विचार केला जातो.

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक: निकष

मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच हा निर्देशांक देखील आरोग्य, शिक्षण व जीवनमानाचा दर्जा या निकषांच्या साहाय्याने तयार केला जातो. या तीन निकषांतर्गत एकूण १० निर्देशक आहेत. या प्रत्येक निर्देशकातील वंचितता आेळखून निर्देशांक तयार होतो.

आरोग्य-१) बालमृत्यू    २) पोषण

शिक्षण- १) शालेय वर्षे   २)शालेय उपस्थिती

राहणीमानाचा दर्जा-  १) स्वयंपाकाचे इंधन   २) स्वच्छता गृह    ३) पेयजल   ४) वीज    ५)जमीन   ६)मालमत्ता

आरोग्य

(यातील प्रत्येक निर्देशकाला १/६ महत्व असते.) –

बालमृत्यू

कुटुंबातील बालकाचा मागील पाच वर्षात मृत्यू झाला असेल तर वंचितता असेल.

पोषण

कुटुंबातील प्रौढ किंवा बालकाची स्थिती कुपोषित असेल तर वंचितता.

शिक्षण

शालेय वर्ष

कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सहा वर्षाचे शालेय शिक्षण पूर्ण केले नसेल तर वंचितता.

शालेय उपस्थिती

शालेय वयाचे बालक आठवीपर्यंत शाळेत उपस्थित राहत नसेल तर वंचितता.

राहणीमानाचा दर्जा

(यातील प्रत्येक निर्देशकाला १/८ महत्व असते)-

स्वयंपाकाचे इंधन

कुटुंबामध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा किंवा शेणाचा वापर होत असेल तर वंचितता.

स्वच्छतागृह

कुटुंबातील स्वच्छतागृहाची सुविधा सहस्ञक विकास ध्येयांच्या मापदंडाप्रमाणे विकसित नसेल किंवा विकसित असली तरी असे स्वच्छतागृह इतर कुटुंबाबरोबर सामाईकपणे वापरत असल्यास वंचितता.

पेयजल

कुटुंबाकडे स्वच्छ पिण्याच्याा पाण्याची सुविधा नसेल किंवा स्वच्छ पिण्याची पाण्याची सोय ३० मिनीट अंतरावर असेल तर वंचितता.

वीज

कुटुंबाकडे वीजेची सुविधा नसेल तर वंचितता.

जमीन

घराची जमीन माती, वाळू किंवा शेणाने सारवलेली असेल तर वंचितता.

मालमत्ता

रेडिआे, टी. व्ही. दूरध्वनी, सायकल, मोटारसायकल,रेफ्रिजरेटर,कार इ. वस्तूंपैकी एक किंवा एका पेक्षा जास्त वस्तू कुटुंबाकडे नसतील तर वंचितता.

एखादी व्यक्ती एक तृतीयांश मूल्यांच्या निर्देशांकात वंचित असेल तर त्या व्यक्तीला गरीव समजले जाते.