बंगालची फाळणी

 • भारताचा व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कर्झन सन १८९९ मध्ये भारतात आला.
 • कर्झनने या काळात अनेक प्रतिगामी कायदे करुन जहालमवादी विचारसरणीला एक प्रकारे खतपाणीच घातले होते.
 • ब्रिटिश विरोधी जन-असंतोष वाढत आहे हे लक्षात येताच लॉर्ड कर्झनने ‘फोडा व राज्य करा’ या नीतीचा वापर करुन हिंदू व मुस्लीम यांच्यात फूट पाडण्याच्या उद्देशाने प्रशासकीय कारण पुढे करून जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.

बंगालच्या फाळणीचे कारण :

 • बंगाल प्रांतात यावेळी बंगाल, बिहार व ओरिसा प्रदेशांचा समावेश होता. लोकसंख्या ७ कोटी ८० लाख इतकी होती.
 • कर्झनने जुलै १९०५ मध्ये या प्रांताची विभागणी करुन जुन्या बंगाल प्रांतातील १५ जिल्हे आसाम व चितगाव जोडून नवीन पूर्व बंगाल प्रांत निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
 • या नवीन प्रांताचे क्षेत्रफळ १ लाख ६५४० मैल होते व लोकसंख्या ३ कोटी १० लाख होती. यामध्ये १ कोटी ८० लाख मुस्लीम व १ कोटी २० लाख हिंदू लोकसंख्या होती.
 • पश्चिम बंगालमध्ये जून्या बंगालचा पश्चिम भाग, बिहार, ओरिसा इत्यादीचा समावेश होता. याचे क्षेत्रफळ १ लाख ४१५८० चौ. मैल इतके होते.
 • या नवीन प्रांतामध्ये एकून ५ कोटी ४० लाख इतकी लोकसंख्या होती. त्यापैकी ४ कोटी २० लाख हिंदू व ९० लाख मुस्लिमांची संख्या होती.
 • बंगालच्या फाळणीसाठी प्रशासकीय कारण जरी पुढे करण्यात आलेले असले तरी खरे कारण बंगाल प्रांतात वाढत असलेला राष्ट्रवाद हेच होते

वंगभंग आंदोलन :

बंगालची फाळणी विरोधात बंगाल बरोबरच भारतातही प्रखर असंतोष निर्माण झाला.

 • बंगाली जनता व वृत्तपत्रांनी फाळणी विरोधी प्रखर टीका केली.
 • इंग्लंडधील ‘डेली न्यूज’ व ‘गार्डियन’ या वृत्तपत्रांनीही या फाळणीचा निषेध केला.
 • फाळणी विरोधात बंगालमधील जनतेने फार मोठे आंदोलन सुरू केले. सभा, मिरवणुका, निषेध मोर्चे व विदेशी मालावर बहिष्कार अशा स्वरुपाचे हे आंदोलन होते. हे आंदोलन ‘वंगभंग आंदोलन’ म्हणून देखील ओळखले जाते.
 • १६ ऑक्टोबर १९०५ हा फाळणीचा दिवस बंगालमध्ये राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला.
 • या आंदोलनाचे नेतृत्त्व सुरेंद्रनाथ बॅनजी, रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल, आनंदमोहन बोस यांनी केले.
 • लोकमान्य टिळकांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन स्वदेशी व बहिष्काराचे आंदोलन करण्यावर भर दिला. वंगभंग आंदोलनाची प्रखरता पाहून ब्रिटिश सरकारने हे आंदोलन दडपशाहीच्या मार्गाने थोपविण्याचा प्रयत्न सुरू केला.
 • लॉर्ड कर्झन नंतर व्हॉईसरॉय म्हणून लॉर्ड मिंटो आला. त्यानेही फाळणी रद्दची मागणी फेटाळून लावली.
 • सन १९११ मध्ये लॉर्ड हॉर्डिग्ज व्हाईसरॉय म्हणून भारतात आला. लॉर्ड हॉर्डिग्ज भारतात आला तेंव्हा युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाचे वातावरण तयार झालेले होते. युद्धप्रसंग निर्माण झाला तर भारताची मदत लागेल, परंतु भारतामधील हा असंतोष असाच राहिला तर भारतीयांची मदत मिळवणे शक्य होणार नाही असे त्याला वाटत होते.
 • भारतीयांचा असंतोष कमी करण्यासाठी व संभाव्य मदतीच्या धोरणातून १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्ली येथे ब्रिटिश युवराजाच्या सन्मानार्थ भरलेल्या कार्यक्रमात बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली.

Leave a Reply