पर्जन्य

Contents show

वातावरणातील बाष्प सांद्रीभवनाच्या क्रियेने दंव, दहिवर, धुके, पर्जन्य, हिमवृष्टी या स्वरूपात दिसू लागते त्यावेळी त्याला पर्जन्य किंवा वृष्टी असे म्हणतात. वृष्टीची ही विविध रूपे हवामानाच्या दृष्टीने व सजीवांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. वृष्टीची ही भिन्न रूपे कधी जमिनीवर, कधी हवेत तर कधी उंच वातावरणात दिसून येतात. त्यांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

दव (Dew) आणि दहिवर (Frost)

पहाटेच्या वेळी विशेषत: हिवाळयातील रात्री पाण्याचे थेंब किंवा जलकण वनस्पती, लोखंडी वस्तू किंवा जमिनीवर दिसतात यांना दव असे म्हणतात. हिवाळयात रात्रीमान मोठे असते. त्यामुळे उष्णतेचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी भूपृष्ठाजवळ तापमान एकदम कमी होते. वनस्पती, जमीन, लोखंडी वस्तू सभोवतालच्या हवेपेक्षा जास्त थंड झालेल्या असतात. परिणामी भोवतालच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व जलकणांची निर्मिती होते. हे जलकण या वनस्पती, लोखंडी वस्तू व जमिनीवर जलद निर्माण होतात. यांना दव असे म्हणतात. दव निर्माण होण्यासाठी दवांक नेहमी गोठण बिंदूच्या वरती असावा लागतो. दवामुळे वनस्पती व पिकांना फायदा होतो. विशिष्ट परिस्थितीत तापमानाची पातळी (संपृक्ततेची पातळी) किंवा दवांक जर गोठणबिंदूखाली असेल तर संक्रमण (Sublimation) घडून येते. म्हणजेच बाष्पाचे रूपांतर हिमकणात होते. या विविध वस्तूंवर थिजलेल्या/गोठलेल्या हिमकणांनाच दहिवर (Frost) असे म्हणतात. दहिवराच्या निर्मितीसाठी दवांक नेहमीच गोठण बिंदूच्या खाली असावा लागतो. दहिवर हे पिकांसाठी व वनस्पतींसाठी नुकसानकारक मानले जाते. जमिनीलगत वाहनारे बाष्प किंवा जलबिंदू लोखंडी खांब, विद्युतवाहक तारा, लोखंडी पत्रे, वनस्पती यांच्या संपर्कात येते व एकदम गोठते. हे गोठलेले जलबिंदू म्हणजेच ‘राईम’ (Rime) होय. विशेषत: समशितोष्ण कटिबंधात मोठ्या प्रमाणात राईची निर्मिती होते.

हिम (Snow) व गारा (Hoil)

वातावरणातील किंवा हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन सुरू झाल्यावर अभिसरण प्रवाहांमुळे (Convectional Currents) जलकण वारंवार वातावरणात उंच फेकले जातात. तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते व जलकणांचे रूपांतर हिमकणात होते. ही क्रिया मोठ्या प्रमाणात घडते व हिमवृष्टी होते. भूपृष्ठावर अनेक वेळा हिमवृष्टी होऊन हिमसंचय होतो. तेंव्हा त्यास हिम (Snow) म्हणतात. हिमकणांचे संचयन होऊन मोठ्या आकाराचे हिमखडे तयार होतात व पर्जन्याबरोबर भूपृष्ठावर येतात. तेंव्हा त्यांना ‘गारा’ (Hoil) असे म्हणतात. उर्ध्वगामी हवेच्या प्रवाहांमुळे पाऊस पडू लागतो. हे पावासाचे थेंब या प्रवाहांमुळे वारंवार उंच वातावरणात फेकले जातात. त्यावेळी हे जलकण हिमकणात रूपांतरीत होतात. असे हिमकण एकत्र येऊन हिमखडे बनतात. ते वातावरणात तरंगू शकत नाहीत. ते पावसाबरोबर भूपृष्ठावर येतात. तेंव्हा त्यास गारा किंवा गारांचा पाऊस असे म्हणतात. गाराचा वर्षाव फळबागा, पिके यांच्यासाठी हानीकारक असतो. तर जनावरे व मानवासाठीही तो नुकसानकारक ठरतो.

धुके (Fog)

रात्रीच्या वेळी विशेषत: हिवाळयातील रात्री मोठ्या प्रमाणात उष्णतेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ अधिक प्रमाणात थंड होते. या वेळी भूपृष्ठालगतचा वातावरणाचा तळाचा थर थंड होतो. परिणामी हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व भूपृष्ठालगत सूक्ष्म जलकणांची निर्मिती होते. यालाच धुके म्हणतात. धुके म्हणजेच भूपृष्ठालगतचे ढग होय. धुक्यामुळे वातावरणातील दृष्यतेवर (Visibility) परिणाम होतो. वृष्टीतील इतर घटकांच्या मानाने धुके कमी महत्त्वाचे असले तरी ते सर्वात जास्त अपायकारक व हानीकारक मानले जाते. दाट धुक्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक यामध्ये अडथळा निर्माण होतो. वनस्पती व पिकांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. दाट धुक्यामुळे मैदानी खेळ व मानवी व्यवहारावरही परिणाम होतो. दाट धुके (Fog) दृष्यता १ कि.मी., विरळ धुके (mist) दृष्यता १ ते २ कि.मी., हलके धुके (Haze) दृष्यता २ ते ५ कि.मी. असे धुक्याचे प्रकार केले जातात. तर शहरी भागावर धुर व धुके मिळून धुरके (Smog) निर्माण होताना दिसते. धुक्यामुळे जीवीत हानी घडून येते. धुके बहुतेक वेळा पहाटेच्या वेळी पडते व सुर्योदयानंतर कांही वेळाने तापमान वाढू लागल्यावर नाहीसे होते. निर्मितीनुसार धुक्याचे पुढील प्रकार केले जातात.

अ) विसर्जन धुके (Radiation Fog)

दिवसभर मिळालेल्या सौरशक्तीचे रात्रीच्या वेळी विसर्जन होते. पहाटेच्या वेळी तापमान एकदम कमी होते व वातावरणातील बाष्पाचे जल कणात रूपांतर होते. यालाच विसर्जन किंवा उत्सर्जन धुके म्हणतात. डोंगराळ भागात उत्सर्जन धूके मोठ्याप्रमाणात निर्माण होते.

ब) अभिवहन धुके (Advaction Fog)

भूखंड व महासागरांच्या थंड पृष्ठभागांवरून उष्ण बाष्पयुक्त वायुराशी वाहत जाताना थंड होते. तिच्यातील बाष्पाचे सांद्रीभवन घडून पृष्ठभागावर जलकणांची निर्मिती होते व अभिवहन धुके निर्माण होते. समुद्रकिनारी भागात या प्रकारचे धुके सारखे पहावयास मिळते. तसेच उष्ण व शीत समुद्र प्रवाहांच्या एकत्र येण्याच्या प्रदेशात अभिवहन धुके आढळते. उदा. न्यु फाऊंडलँड बेटांजवळ गल्फस्ट्रीम (उष्ण) व लॅब्रॉडोर (शित) समुद्रप्रवाहांमुळे धुके निर्माण होते.

क) सीमांत धुके (Front Fog)

समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशात दोन भिन्न गुणधर्माच्या (उष्ण व शित) वायूराशी एकत्र येऊन आघाडी (Front) निर्माण होते. यालाच वायूरांशींची सीमा म्हणतात. उष्णवायूराशी थंड वायूराशीवर आरूढ झाल्यास सांद्रीभवन घडून येते व धुके निर्माण होते. यालाच सीमांत धुके म्हणतात. समशितोष्ण कटीबंधात किंवा मध्य अक्षांशात सीमांत धुके मोठ्याप्रमाणात व वारंवार निर्माण होते. समशितोष्ण कटिबंधीय आवर्तांच्या वेळी देखील सिमांत धुक्याची निर्मिती होते.

ड) वाफ धुके (Steam Fog)

उष्ण समुद्र प्रवाहावरून थंड वारे वाहत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन घडून येते व प्रचंड प्रमाणात वाफेची निर्मिती होते. यालाच वाफ धुके म्हणतात. उच्च अक्षांशीय प्रदेशात म्हणजेच शीत कटीबंधात समुद्र भागांवर हे वाफधुके मोठ्या प्रमाणात निर्माण होते. म्हणूनच याला ‘सागरी धुर’ (Sea Smoke) असेही म्हटले जाते. उत्तर ध्रुवाजवळील आर्क्टिक महासागरावर हजारो चौरस कि.मी. क्षेत्रात सुमारे दोन कि.मी. उंच वातावरणात हे धुके आढळून येते. थोडक्यात पृथ्वीवर धुक्याची निर्मिती भूभागांपेक्षा जलभागांवर जास्त प्रमाणात होते. समशितोष्ण व शीत कटिबंधीय प्रदेश, डोंगराळ प्रदेशातही धुके वारंवार निर्माण होते. उष्ण व शीत समुद्रप्रवाह जेथे एकत्र येतात त्या प्रदेशातही मोठ्या प्रमाणात धुके आढळते. ऋतृंचा विचार करता उन्हाळयाच्या तुलनेत हिवाळयात जास्त प्रमाणात धुक्याची निर्मिती होताना दिसते.

५) ढग किंवा मेघ (Clouds) :

वातावरणात वेगवेगळया उंचीवर हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून बाष्पाचे रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होते हा जलकणांचा किंवा हिमकणांचा समुह किंवा समुच्चय म्हणजेच ‘ढग किंवा मेघ’ होय. ढगांचा उल्लेख ‘उंच वातावरणातील धुके’ असाही केला जातो. हवेचे उर्ध्वगामी प्रवाह ढगांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे मानले जातात. सर्व ढग एकसारखे असत नाहीत. कांही ढग तंतूमय, दोऱ्यासारखे, स्तरांचे, ढिगांचे तर कांही पसरट, तुकड्यांचे, लहान किंवा आवाढव्य आकाराचे असतात. त्यांच्या वेगवेगळया रंगछटा असतात. उदा. पांढरे, सोनेरी, निळे, तांबडे, काळे इ. कांही ढग अति उंचावर तर कांही अगदी भूपृष्ठाजवळ कमी उंचीवर आढळतात. १९३२ साली आंतरराष्ट्रीय मोसम विज्ञान परिषद (International Metrological Council) यांनी केलेले ढगांचे वर्गीकरण सर्व जगभर प्रमाण मानले जाते. ढगांची उंची व त्यांनी वेगवेगळी वैशिष्ट्ये यांच्या आधारे ढगांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले आहे.

अतीउंचीवरील मेघ (High Altitude Clouds)

हे ढग ६ ते १२ कि.मी. उंचीवर तयार होतात. या गटात पुढील प्रमुख ढगांचा समावेश होतो.

सिरस मेघ (Cirrus Clouds)

वातावरणात सर्वाधिक उंचीवर हे ढग आढळतात. यांची निर्मिती हिमकणांपासून झालेली असते. पिजलेल्या कापसाप्रमाणे, पांढऱ्या व सोनेरी रंगाचे हे ढग असतात. यांच्यातून सुर्यप्रकाश आरपार जात असल्याने त्यांची सावली पडत नाही.

सिरो-क्युुलस मेघ (Cirro-Cumulus Clouds)

सिरस व क्युुलस ढगांपासून यांची निर्मिती होते. आकाशात उंचीवर पसरलेल्या अवस्थेत असतात. कधी कधी हे ढग पाण्यावरील तरंगाप्रमाणे भासतात. पांढऱ्या रंगाचे चकाकणारे हे ढग हिमकणांपासून बनलेले असतात. सुर्यप्रकाश यांच्यातून जात असल्याने यांची सावली पडत नाही.

सिरो-स्ट्रॅटस मेघ (Cirro-stratus clouds)

सिरस व स्ट्रॅटस ढगांपासून यांची निर्मिती होते. हे ढग सर्व आकाश व्यापतात. त्यांच्यामुळे आकाशाला दुधाळ रंग प्राप्त होतो. यांच्यात हिमकणांचे प्रमाण जास्त असल्याने यांचीही सावली पडत नाही. परंतू यांच्यामुळे चंद्र व सुर्याला खळी (Halo) पडतात. हे ढग वादळी हवेची सुचना देतात.

मध्यम उंचीवरील मेघ (Medium Altitude Clouds)

हे ढग २ ते ६ कि.मी. उंचीवर तयार होतात. यामध्ये अल्टो-स्ट्रेटस व अल्टो-क्युुमुलस मेघांचा समावेश होतो.

अल्टो-स्ट्रेटस मेघ (Alto-stratus clouds)

मध्यम उंचीवरील वातावरणात वेगवेगळया थरांच्या स्वरूपात आढळतात. जलकणांचे बनलेले हे ढग दाट निळसर-काळया रंगाचे असतात. यांच्यातून सुर्य, चंद्र अस्पष्ट दिसतात या ढगांपासून विस्तृत प्रदेशात पाऊस पडतो.

अल्टो-क्युुमुलस मेघ (Alto-cumulus clouds)

मध्यम उंचीवरील उभ्या विस्ताराचे व प्रचंड आकाराचे हे ढग घुटाकृती दिसतात. जलकणांनी बनलेले हे ढग काळया रंगाचे असल्याने चंद्र, सुर्य झाकले जातात तसेच या ढगांची गडद सावली पडते. यांच्या पासून थोड्या प्रदेशात पण भरपूर पाऊस पडतो.

कमी उंचीवरील मेघ (Low Attitude Clouds)

हे ढग भूपृष्ठापासून २ कि.मी. उंची पर्यंत तयार होतात. यामध्ये पुढील प्रकारच्या ढगांचा समावेश होतो.

स्ट्रॅटो-क्युुलस मेघ (Strato-cumulus clouds)

स्तरांचे व अवाढव्य आकाराचे हे ढग सिरस व क्युुलस ढगांपासून तयार होतात. कमी उंचीवरील हे मेघ पाण्याने किंवा जलकणांनी भरलेले असतात. यांच्या पासून भरपूर पाऊस पडतो. काळया रंगांच्या या ढगांपासून चंद्र, सुर्य दिसत नाहीत. यांची गडद सावली पडते.

स्ट्रॅटस मेघ (Stratus clouds)

कमी उंचीवरील हे ढग दाट धुक्याचे व विविध स्तरांचे बनलेले असतात. एकावर एक स्तरांची रचना यांध्ये स्पष्टपणे पहावयास मिळते. यांच्या पासून रिमझिम पाऊस पडतो.

निंबो-स्ट्रॅटस मेघ (Nimbo-stratus clouds)

आकार नसलेले, पाण्याने भरलेले, काळया रंगाचे हे ढग जमीनीवर उतरंड्या प्रमाणे भासतात. काळया रंगाचे हे ढग सुर्य, चंद्र यांना पूर्णपणे झाकून टाकतात. या ढगांपासून सतत व बराच वेळ पाऊस पडतो. बहुतेक वेळा यांच्यापासून हिमवर्षाव होण्याची शक्यता असते.

उभ्या विस्ताराचे मेघ (Vertical streached clouds)

हे ढग भूपृष्ठापासून ते १५ कि.मी. उंची पर्यंत आढळून येतात. या ढगांचा उभा विस्तार/आकार आडव्या विस्तारापेक्षा जास्त असल्याने त्यांना उभ्या विस्ताराचे ढग म्हणतात. यामध्ये पुढील ढगांचे प्रकार समाविष्ट होतात.

क्युुलस मेघ (Cumulus clouds)

वातावरणाच्या २ ते १५ कि.मी. अंतरात हे ढग आढळतात. सपाट तळ भाग व घुटाकार माथा यामुळे हे ढग कापसाच्या ढिगाप्रमाणे भासतात. त्यांच्या आडव्या विस्तारापेक्षा त्यांचा उभाविस्तार जास्त असतो. जोरदार उर्ध्वगामी हवेच्या प्रवाहांनी त्यांची निर्मिती होते. त्यांच्या पायथ्याकडील भागात जलकण तर माथ्याकडील भागात हिमकण असतात. पांढऱ्या रंगाचे हे ढग चांगल्या हवेचे निदर्शक मानले जातात. क्वचित प्रसंगी यांच्यापासून जोरदार वृष्टी होते व गारा पडतात. हे ढग क्युुलो-निंबस ढगांची पहिली अवस्था मानले जातात.

क्युुमुलो-निंबस मेघ (Cumulo-Nimbus Clouds)

सर्वात आवाढव्य व प्रचंड आकाराचे हे ढग जास्त तापमानाने निर्माण झालेल्या उर्ध्वगामी अभिसरण प्रवाहांपासून तयार होतात. डोंगराच्या आकाराचे हे ढग वेगवान सांद्रीभवनाने तयार होत असल्याने यांच्यात प्रचंड पाण्याचा साठा असतो. काळया रंगाचे हे ढग विजा, वारे यासह जोरदार वादळी पाऊस देतात. गारांसह पडणारा हा पाऊस कमी वेळेसाठी असतो. महाराष्ट्रात उन्हाळी पावसाच्या वेळी हे ढग दिसून येतात. जलचक्र व हवामानामध्ये ढगांची निर्मिती ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. सौरशक्तीचे परावर्तन, तापमान नियंत्रण, विकीरण, तापमान कक्षेचे नियंत्रण या सारख्या क्रियांध्ये ढगांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. सागरी भाग, विषुववृत्तीय प्रदेश, समशितोष्ण कटिबंधीय प्रदेश, पर्वतांचे वाताभिमुख उतार (Windward Slope) इ. प्रदेशात ढगांचे प्रमाण जास्त आढळते.

पर्जन्य किंवा पाऊस (Rainfall) :

वातावरणात हवेचे उर्ध्वगामी संचलन होत असते. अशा वेळी हवा बाष्पयुक्त असेल तर वातावरणात उंच गेल्यावर हवा थंड होऊ लागते व सांद्रीभवनाच्या क्रियेला सुरूवात होते. दवबिंदू किंवा दवांक किंवा बाष्प संपृक्ततेच्या पातळीपेक्षा तापमान कमी झाल्यास बाष्पाचे रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होते. हे जलकण व हिमकण हवेत तरंगताना जड होतात व भूपृष्ठावर अवतरतात. यालाच ‘पर्जन्य किंवा पाऊस’ म्हटले जाते. गोठण बिंदूच्या खाली जर सांर्द्रीभवन घडून आले तर बाष्पाचे रूपांतर हिमकणात होऊन हिमवर्षा होते. पर्जन्याचे मोजमाप मीलीमीटर, सेंटीमीटर, किंवा इंचात करतात. पर्जन्याच्या मोजमापासाठी ‘पर्जन्य मापक (Rain Guage)’ हे उपकरण वापरतात. एखाद्या प्रदेशातील समान पर्जन्य असलेली ठिकाणे जोडणारी रेषा ‘समपर्जन्य रेषा (Isohyte)’ म्हणून ओळखली जाते. या रेषेच्या सहाय्याने पर्जन्याचे वितरण समजण्यास मदत होते. एका समान प्रक्रियेने पर्जन्याची निर्मिती होते. बाष्पयुक्त हवा वातावरणात उंच जाते व थंड होते. ती हवा बाष्पसंपृक्त बनते व सांद्रीभवनाच्या क्रिया घडून येते. बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते किंवा जलकणात होते. किंवा हिमकणात होते व पर्जन्य भूष्टावर अवतरतो. परंतू हवा ज्या पध्दतीने वातावरणात उर्ध्वगमन करते व ज्या पध्दतीने तीचे सांद्रीभवन होते या वरून पावसाचे पुढील प्रकार सांगितले जातात.

आरोह किंवा अभिसरण पर्जन्य (Convectional Rainfall)

सुर्यापासून मिळालेल्या सौरशक्तीमुळे भूपृष्ठ तापते. त्यामुळे भूपृष्ठाला लागून असलेली हवा देखील तापली जाते ही हवा प्रसरण पावते, तिचे वजन कमी होते व वातावरणात उर्ध्वगमन करते. वातावरणात वरती गेलेल्या हवेची पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा येते. पून्हा ही हवा तापली जाते व वातावरणात उर्ध्वगमन करते. अशा प्रकारे हवेचे उर्ध्वगामी प्रवाह सुरू होतात यांना ‘अभिसरण प्रवाह (Convectional Currents)’ असे म्हणतात. उर्ध्वगमन करणारी हवा बाष्पयुक्त असेल तर ती बाष्पसंपृक्त बनते. तीची सापेक्ष आर्द्रता १००% बनते. याच हवेचे तापमान आणखी कमी झाल्यास सांद्रीभवनाची क्रिया घडून येते. जलकणांची निर्मिती होते व पावसाला सुरूवात होते. यालाच ‘अभिसरण किंवा आरोह पर्जन्य’ म्हणतात. आरोह पर्जन्याची निर्मिती जोरदार अभिसरण प्रवाहांुळेच होत असते. विषुववृत्तीय प्रदेशांध्ये म्हणजेच ५० उ. ते ५० द. अक्षांशांच्या दरम्यान दररोज दुपारी ढगांचा गडगडाट व विजांच्या चमचमाटासह हा पाऊस पडतो. आयनिक प्रदेशांध्ये उन्हाळयात अशा प्रकारचा पाऊस पडतो. हा पाऊस कमी विस्ताराच्या प्रदेशांध्ये पडत असला तरी तो कमी कालावधीत परंतू प्रचंड प्रमाणात असतो. क्युुलोनिंबस ढगांपासून पडणारा हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असत नाही. तो जमीनीची धुप घडविणारा असतो. याचा उपयोग भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठीही होत नाही कारण या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते.

प्रतिरोध पर्जन्य (Orographic Rainfall) :

जलाशयांवरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात डोंगर रांग, पर्वत किंवा उंच पठार आल्यास वाऱ्यांना विरोध किंवा प्रतिरोध होतो. हे वारे डोंगर किंवा पर्वतांचा अडथळा ओलांडून पुढे वाहण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी ते वातावरणात उंच जातात व थंड होतात. दवबिंदूवर पोहोचल्यावर त्यांची सापेक्ष आर्द्रता १००% होते. सांद्रीभवनाच्या क्रियेने ढगांची निर्मिती होते व पर्वतांच्या वातसन्मुख उतारांवर (Windward Slope) तसेच पर्वत माथ्यांवर जोरदार पर्जन्यवृष्टी होते. यालाच ‘प्रतिरोध पर्जन्य’ म्हणतात. भूपृष्ठाच्या/भूरूपांच्या अडथळयांुळे हा पाऊस पडतो म्हणून याला ‘भूरूपीय पाऊस (Relief Rainfall)’ असे ही म्हणतात. पर्वत रांगा ओलांडून गेल्यावर पर्वतांच्या विरूध्द बाजूवरून किंवा ‘वातविन्मुख उतारावरून (Leeward Slope)’ हे वारे खाली उतरू लागतात. या वाऱ्यातील बाष्प आगोदरच कमी झालेले असते. तसेच उतारावरून खाली उतरताना या वाऱ्यांचे तापमान वाढू लागते. त्यामुळे त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते. याचाच परिणाम म्हणून वातविन्मुख उतारांवर पाऊस पडत नाही व या प्रदेशांवर ‘पर्जन्य छायेच्या प्रदेशांची (Rain Shadow Area)’ निर्मिती होते. हा प्रदेश ‘कायम दुष्काळी प्रदेश (Permanent Draught Region)’ म्हणूनही ओळखला जातो. भारतीय उपखंडात पडणारा पाऊस याच प्रकारात मोडतो. तसेच जगातील सर्वात जास्त पाऊस या पध्दतीने पडतो. मेघालयाातील ‘मॉसीनराम’ या ठिकाणी जगातील सर्वात जास्त पाऊस या प्रकारे पडतो.

आवर्त पर्जन्य (Cyclonic Rainfall) :

कोणत्याही प्रकारच्या आवर्तात किंवा चक्रवातामध्ये ‘कमी भार केंद्र (Low Pressure Area)’ विकसित होते. या कमी भार केंद्राकडे बाजूच्या प्रदेशातील वारे आकर्षिले जातात. चक्राकार दिशेत व प्रचंड वेगाने फिरणारे हे वारे वातावरणात उर्ध्वगमन करतात. हे वारे जर बाष्पयुक्त असतील तर वातावरणात वरती गेल्यावर थंड होतात. दबबिंदूवर त्यांची सापेक्ष आर्द्रता १००% होते. म्हणजेच ते बाष्पसंपृक्त बनतात व सांद्रीभवनाच्या क्रियेने ढगांची निर्मिती होते व शेवटी पाऊस पडतो. यालाच ‘आवर्त किंवा चक्रवात पर्जन्य’ म्हणतात.

आवर्त पर्जन्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. यामध्ये उष्णकटिबंधीय आवर्त पर्जन्य व समशितोष्णकटिबंधीय आवर्त पर्जन्य यांचा समावेश होतो. उष्णकटिबंधीय आवर्त हे वादळी वारे असतात. यांच्यामध्ये किंवा केंद्रभागी असलेल्या कमीभार केंद्राकडे व उर्ध्वगामी दिशेने वारे जोराने वाहतात. हे उर्ध्वगामी वारे उंच जाऊन थंड होतात व विजा, गडगडाटासह जोराचा पाऊस देतात. ही वादळे सागरी भागावर निर्माण होतात. किनारवर्ती प्रदेशात ही वादळे मोठे नुकसान घडवतात. या वादळी पावसामुळे महापूर येतात व मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्त हानी होते. मान्सुनपूर्व व मान्सुनोत्तर काळात भारताच्या पूर्व व पश्चिम किनारी प्रदेशात म्हणजेच बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात ही वादळे निर्माण होतात. समशितोष्ण कटिबंधीय आवर्त हे वेगळया प्रकारचे असते. यामध्ये दोन वेगवेगळया गुणधर्माच्या म्हणजेच उष्ण व थंड तापमानाच्या वायूराशी विषुवतृत्तीय व ध्रुविय प्रदेशातून मध्य कटीबंधात एकत्र येतात. या वायूराशी समोरासमोर आल्यावर एकमेकांना ओलांडण्याचा प्रयत्न करतात. थंड वायूराशी जड असल्याने खाली भूपृष्ठाजवळ राहते तर उष्ण वायूराशी हलकी असल्याने वरती चढते. ही उष्ण वायूराशी बाष्पयुक्त असेल तर ती थंड होते व सांद्रीभवनानंतर मोठा पाऊस देते. या आवर्तात पडणारा पाऊस शांत व रिमझिम स्वरूपाचा तसेच जास्त विस्तारित प्रदेशात जास्त काळ असतो. ही सौम्य वादळे पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली प्रवास करतात व मध्य कटिबंधात बहुधा हिवाळयात पाऊस देतात. हा पाऊस विशेषत: खंडाच्या पश्चिम भागात पडतो.