पचन संस्था (Digestive System)

दैनंदिन आहारात सर्वाधिक आवश्यक असणारे घटक म्हणजे कर्बोदके, प्रथिने व मेद होय. या जटिल घटकांचे रक्तात जसेच्या तसे शोषण होऊ शकत नसल्याने त्याचे साध्या पदार्थांमध्ये रूपांतर करणे गरजेचे असते. म्हणजेच जटिल अन्नघटकाचे साध्या पिष्टमय पदार्थांमध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला पचन असे म्हणतात. मानवाची पचन संस्था (Digestive System) विविध घटकांनी बनलेली आहे.

मानवी पचन संस्था (Human Digestive System)

मानवी पचन संस्था मुख्य अन्ननलिका व पचनग्रंथी यांनी बनलेली असते. अन्ननलिका ही मुखापासून ते गुदद्वारापर्यंत साधारण ९५० सेमी. इतकी आहे. अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होतो.

Image result for Human Digestive System

१) मुख/ तोंड (Mouth)

मानवी पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. मुखातील दाताद्वारे अन्न बारीक  केले जाते व या बारीक अन्नाची चव कळण्याचे कार्य पुढे जीभ करते. जीभेवर चव जाणण्यासाठी रूचीकलिका असतात. जीभेच्या अग्रभागी गोड, आतील टोकास कडू व दोन्ही कडांना खारट-आंबट चव ओळखू शकणाऱ्या रूचीकलिका असतात. मुखातील लाळेमध्ये अमायलेज/टायलीन हे विकर असते, ज्यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्टोज म्हणजेच साखरेत होेते.

२) ग्रासनी  (Pharynx)

अन्ननलिका व श्वसननलिका यांचा सामूहिक मार्ग असून मुखामध्ये बारीक झालेले अन्न ग्रासणीद्वारे पुढे ढकलले जाते. हे अन्न श्वसननलिकेत जाऊ नये म्हणून अपिलगद्वार मदत करते.

३) ग्रासिका (Esophagus)

घशापासून जठरापर्यंत अन्नाचे वहन करणारा भाग. अन्नाचे वहन करणारे असूनही या भागात कोणत्याही प्रकारचे पचन व शोषण होत नाही. याची लांबी जवळपास २५ सेमी असते.

४) जठर/अमाशय (Stomach)

जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते.  जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. जठरात ४ ते ५ तासासाठी अन्न साठवले जाते. अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले हे मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. जठरातील जठरग्रंथींमधून पेप्सिन विकर, हायड्रोक्लोरिक आम्ल, म्यूकस हे घटक असणारा जठररस स्रवताे. प्रथिनांचे रूपांतर त्यांच्या साध्या रूपात म्हणजे अॅमिनो आम्लात करण्याचे कार्य पेप्सिन हे विकर करते. हे रूपांतर घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारे माध्यम हायड्रोक्लोरिक अॅसिड पुरवते व या क्रियेदरम्यान जठर भित्तिकेचे संरक्षण म्यूकसद्वारे होते.

५) लहान आतडे (Small Intestine)

अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग असणाऱ्या या आतड्याची लांबी सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते. लहान आतडे अध्यांञ, मध्यांञ व शेषांञ या तीन विभागात विभागले गेले आहे. लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अध्यांञ (Duodenum) असे म्हणतात. कमी गुंडाळलेला भाग म्हणजे मध्यांञ आणि जास्त गुंडाळलेला भाग म्हणजे शेषांञ.

स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) –

स्वादुपिंड स्वादुरस स्ञवतो ज्यात मुख्य तीन घटक असतात.

  1. अमायलेज – कर्बोदकांचे पचन ग्लुकोजमध्ये
  2. ट्रिप्सिन – प्रथिनांचे पचन अॅमिनो आम्लात
  3. लायपेज – मेदाचे पचन मेदाम्लात

यकृत (liver) –

  • यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी असून पचनामध्ये महत्वाचे कार्य करतात.
  • यकृताने स्रवलेला पित्तरस खालच्या बाजूस असलेल्या पित्ताशयामध्ये वसाठवला जातो.
  • यकृताचे मुख्य कार्य म्हणजे न वापरलेल्या ग्लुकोजचा ग्लायकोजनच्या रूपात साठा करणे.
  • पित्तरसात क्षार असल्यामुळे स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते.

६)  मोठे आतडे (Large Intestine)

मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचे पचन होत नाही केवळ पाणी रक्तात शोषले जाते व न पचलेले अन्न पुढे ढकलले जाते. अपेंडिक्स हा छोटा भाग मोठ्या आतड्याच्या सुरूवातीला असतो. प्राचीन काळात कच्चे अन्न खाणाऱ्या मानवासाठी पचनक्रियेत हा भाग उपयुक्त असे परंतु सध्या हे केवळ एक अकार्यशील अवशेषांग म्हणून आळखले जाते.