पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजना

केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे देशांतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये संशोधनपर जाणीव आणि आवड निर्माण करण्यासाठी पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजना सुरू करण्यात आली.

योजनेचा उद्देश

पंतप्रधान संशोधन फेलोशिप योजनेचा मुख्य उद्देश विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारकांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अथवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या प्रथितयश संस्थांमध्ये संशोधनपर पीएचडी करण्याची संधी उपलब्ध करून त्यांच्या संबंधित विषय वा क्षेत्रातील संशोधनपर प्रयत्नांना चालना देणे हा आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पंतप्रधान संशोधन फेलोशिप (PMRF) योजनेंतर्गत IISc/IIT/NIT/IISER/ IIIT मधून विज्ञान व तंत्रज्ञान विषयांमध्ये बी.टेक. अथवा एम.टेक. अथवा MSc पदवी प्राप्त करणाऱ्याला अथवा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेल्या सर्वोत्तम विद्यार्थ्यांना IIT/IISc मध्ये Ph.D साठी थेट प्रवेश दिले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची चाळणी ३० एप्रिल २०१८ पर्यंत करण्यात येईल. त्यापैकी पात्रताधारक उमेदवारांना मे २०१८ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी वा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सतर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित आयआयटी/ आयआयएससीमध्ये संबंधित विषयातील संशोधनपर पीएचडी करण्यासाठी नामवंत संशोधक/ मार्गदर्शकांच्या हाताखाली प्रवेश देण्यात येईल.

फेलोशिपची रक्कम

या विद्यार्थ्यांना पहिल्या 2 वर्षांसाठी मासिक 70,000 रूपये, तिसऱ्या वर्षी मासिक 75,000 रूपये तर चौथ्या व पाचव्या वर्षी मासिक 80,000 रूपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ष 2018-19 पासून 7 वर्षांच्या कालावधीसाठी 1650 कोटी रूपयांच्या एकूण खर्चासाठी देखील मान्यता दिली आहे. संशोधनपर काम यशस्वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनपर पीएचडी प्रदान करण्यात येईल.