नदीमुळे तयार होणारी भूरुपे

नदीच्या युवावस्थेतील भूरूपे

सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

‘व्ही’ आकाराची दरी (‘V’ Shaped Valley) –

नदीमुळे उभे खनन कार्य जास्त होऊन नदीपात्राचा तळभाग खोल खणला जातो. त्यामुळे नदीच्या पात्राला इंग्रजी ‘व्ही’ (V) असा आकार प्राप्त होतो.

‘व्ही’ आकाराची दरी Jim Barton [CC BY-SA 2.0], via Wikimedia Commons

घळई (Gorge) –

नदीच्या उभ्या खनन कार्यामुळे नदीपात्राचा तळभाग खोल खणला जातो. नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूचे काठ तीव्र उताराचे बनतात. या दरीची खोली रुंदीच्या मानाने अधिक असते.

घळई

निदरी (Canyon)-

काही नद्यांच्या दऱ्यांमध्ये तशाच प्रकारची दुसरी घळई निर्माण होते, या भूरूपाला निदरी असे म्हणतात.

By PradeepBisht (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons

कुंभगर्त/रांजणखळगे (Pot Holes)-

वाहत्या पाण्यामध्ये काही ठिकाणी पाण्याला चक्राकार गती प्राप्त होते. या ठिकाणी पाण्यातील दगड-गोटे नदीतळाच्या पृष्ठभागावर गोल फिरू लागतात. त्यामुळे त्याठिकाणी जी छिद्रे कोरली जातात त्यांना रांजणखळगे असे म्हणतात.

रांजणखळगे by By Sachin.gorade (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons

धावत्या (Rapids)-

पर्वतीय उंच-सखल प्रदेशात नदीप्रवाहाचा वेग अधिक असतो. येथे तीव्र उतारामुळे नदीप्रवाह वेगाने पुढे येतो यालाच ‘धावत्या’ असे म्हणतात.

By Pandionwater (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commons

धबधबा (Waterfall)-

नदीप्रवाह उंच कड्यावरून खाली कोसळत असेल तर त्याला धबधबा असे म्हणतात.

Diego Delso [GFDL or CC BY 3.0], via Wikimedia Commons

गुंफित गिरीपाद (Interlocking Spur)-

नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरांची रचना  दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवल्याप्रमाणे असेल तर नदीप्रवाहाला वाट काढताना वळणे घ्यावी लागतात, अशा भूरूपाला ‘गुंफित गिरीपाद’ असे म्हणतात.

गुंफित गिरीपाद

निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

जलोढ शंकू (Alluvial Cones)-

नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना आपल्या प्रवाहासोबत आणलेल्या पदार्थांचे निक्षेपण पर्वताच्या पायथ्याशी करते. या पदार्थांचे निक्षेपण होताना शंकूच्या आकाराचे मैदान तयार होते याला ‘जलोढ शंकू’ असे म्हणतात.

जलोढ शंकू

पंखाच्या आकाराची मैदाने/जलोढ पंख (Alluvial Fan)-

पर्वतीय प्रदेशातून वाहणारी नदी जेंव्हा पर्वताच्या पायथ्याशी येते, त्यावेळी मंद उतारामुळे तिचा वेग कमी होतो. याठिकाणी पंखाच्या आकारात प्रवाहासोबत आलेल्या पदार्थांचे निक्षेपण होते. या भूरूपास ‘जलोढ पंख’ असे म्हणतात.

जलोढ पंख

नदीच्या प्रौढावस्थेत भूरूपे

खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

नागमोडी वळणे (Meanders)-

नदीप्रवाहात एखादा कठीण खडक किंवा अडथळा आडवा आल्यास नदीप्रवाह आपला मार्ग बदलतो व वळण घेतो. अशा वळणावर नदीच्या एकाच काठाची झीज जास्त होते व दुसऱ्या काठावर निक्षेपण होते. अशा झिजेमुळे नदीला अनेक वळणे प्राप्त होता.  या भूरूपाला ‘नागमोडी वळणे'(Meanders) असे म्हणतात.

नागमोडी वळणे

नालाकृती सरोवरे (Ox-bow Lakes)-

काही वेळेस पुरामुळे नागमोडी वळण तुटते व नदी सरळ वाहू लागते. तुटलेल्या नालाकृती भागात पाणी साचून सरोवर बनते. या भूरूपाला ‘नालाकृती सरोवर’ (Ox-bow Lakes) असे म्हणतात.

नालाकृती सरोवर

निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

पूरतट (Natural Levees)-

नदीच्या प्रौढावस्थेत गाळाच्या नियमित निक्षेपणामुळे नदीच्या दोन्ही काठांवर गाळाचे उंच बांध तयार होतात. या भूरूपाला पूरतट असे म्हणतात.

पूरतट

पूरमैदान (Flood Plains)-

पूरपरिस्थितीत नदीचे पाणी सभोवतालच्या प्रदेशात पसरते. नदीने आपल्यासोबत वाहून आणलेल्या गाळाचे या प्रदेशात निक्षेपण होते. यामुळे सभोवतालच्या प्रदेशात गाळाची मैदाने तयार होतात यालाच पूरमैदान असे म्हणतात.

पूरमैदान

त्रिभुज प्रदेश (Delta Region)-

नदी समुद्रास मिळण्यापूर्वी नदीला अनेक फाटे फुटतात व हे फाटे स्वतंत्ररीत्या समुद्रास जाऊन मिळतात. या फाट्यांच्या दरम्यान त्रिकोणी आकाराची गाळाची मैदाने तयार होतात. या प्रदेशालाच त्रिभुज प्रदेश असे म्हणतात.

त्रिभुज प्रदेश