थिऑसॉफिकल सोसायटी

स्थापना

‘थिऑसॉफिकल सोसायटी’ ची स्थापना १७ नोव्हेंबर १८७५ रोजी न्यूयॉर्क येथे झाली. ह्या संस्थेचे संस्थापक एच्. पी. ब्‍लाव्हॅट्स्की (१८३१–९१) आणि हेन्‍री स्टील ऑलकट (१८३२–१९०७) हे दोघे होते. ऑलकटच्या मृत्यूनंतर १८९६ मध्ये अ‍ॅनी बेझंट थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा झाल्या.

मुख्यालय

१८८२ साली या संस्थेचे कार्यालय कायम स्वरूपात अड्यारला स्थापन झाले. अमेरिकेस स्थापन झालेल्या या संस्थेचा प्रसार मात्र भारतात झाला. या संस्थेच्या शाखा निरनिराळ्या ५५ देशांत स्थापन झाल्या.

सभासदत्व व ब्रीदवाक्य

सत्यशोधनाची इच्छा असणाऱ्या कुणाही व्यक्तीला थिऑसॉफिकल सोसायटीचे सभासद होता येते. ‘सत्यान्नास्ति परो धर्मः’ (सत्यापरता नाही धर्म) असे थिऑसॉफिकल सोसायटीचे ब्रीद आहे. संस्थेच्या बोधचिन्हातही हे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळेच सभासदांना वैयक्तिक मतस्वातंत्र्य असते.

उद्दिष्टे

सोसायटीचे उद्देश पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहेत :

  • जात, धर्म, लिंग, वर्ण ह्यांसारखे भेद बाजूला ठेवून मानवजातीच्या बंधुत्वाचे एक केंद्रस्थान तयार करणे;
  • धर्म, तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे ह्यांच्या तौलनिक अध्ययनास प्रोत्साहन देणे आणि अज्ञात सृष्टिनियम व मनुष्याच्या अंतरंगातील शक्ती ह्यांचे संशोधन करणे;
  • सेवा, सहिष्णुता, आत्मविश्वास व समभाव या गुणांनी युक्त असा मानवसमाज निर्माण करणे.